सलाम जिद्दीला............वेध, परभणी 2017

सलाम जिद्दीला............वेध, परभणी 2017

परभणी इथे संपन्न होणार्‍या तिसर्‍या वेध उपक्रमात सारंग गोसावी आणि अभिजीत थोरात या दोन सुपरहिरोंना घेऊन २६ नोव्हेंबरला सकाळी परभणी रेल्वेस्थानकावर पोहोचले. डॉ. आनंद नाडकर्णी यांचा ७६ वा वेध उपक्रम सकाळी साडेनऊ वाजता परभणीच्या कृषी विद्यापीठात सुरू झाला. 
या उपक्रमात संगणक शब्दकोषाचा जनक सुनिल खांडबहाले, स्लमडॉग सीए म्हणून प्रसिद्ध पावलेला अभिजीत थोरात, सामाजिक कार्यकर्ती आणि बंडखोर नायिका गुंजन गोळे, काश्मीरमध्ये जाऊन काम करणारा असीम फाऊंडेशनचा संस्थापक सारंग गोसावी आणि कार्व्हरला घराघरांत नेऊन पोहोचवणार्‍या लेखिका वीणा गवाणकर सामील झाले होते. 

‘सलाम जिद्दीला’ या वेधच्या उपक्रमात हट्ट आणि जिद्द यातला फरक मुलांकडूनच डॉ. आनंद नाडकर्णी यांनी स्पष्ट केला. एखादी गोष्ट मला मिळालीच पाहिजे असं वाटणं म्हणजे हट्ट. ध्येय मिळवण्यासाठी केलेला हट्ट म्हणजे जिद्द आणि ही जिद्द अशी पाहिजे की त्यामुळे आपल्याबरोबरच इतरांना ऊर्जा मिळाली पाहिजे, असं मुलांनी सांगितलं. कार्यक्रमात रंगत आणणारा परभणीचा बालविद्या मंदिरचा वाद्यवृंद खूपच कुशल होता. विशेष म्हणजे यातली चार मुलं वयानं अगदीच लहान म्हणजे ८ ते १० वर्षांची होती. 

परभणीच्या कृषी विद्यापीठातल्या सभागृहात सुरू झालेल्या कार्यक्रमात सुनिल खांडबहाले या तरुणाशी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी संवाद साधला. आई-वडील निरक्षर, एका छोट्याशा खेड्यात राहून शिक्षण, घरातली गरिबी, इंग्रजी भाषेचा न्यूनगंड, कम्प्युटर कशाशी खातात हे ठाऊक नाही, प्रकृतीचे निर्माण झालेले अनेक प्रश्‍न या सगळ्यांशी लढत अफाट परिश्रम करत हा तरुण जगावर राज्य कसा करतो, याची अनोखी कहाणी या प्रवासात उलगडली गेली. आज त्याचा शब्दकोष केवळ मराठीतूनच नव्हे तर भारतातल्या अनेक भाषांमध्ये संगणकावर उपलब्ध आहे. बिल गेट्स असो वा मार्क झुकेरबर्ग या सगळ्यांबरोबर सुनिल आज त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून उभा आहे. या सगळ्यांबरोबर त्याच्या भेटी आणि चर्चा झाल्या आहेत/होत असतात. त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

अभिजीत थोरात याच्या आयुष्यावर निघालेलं मनोज अंबिके लिखित ‘स्लमडॉग सीए’ या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन डॉ. आनंद नाडकर्णी, वीणा गवाणकर, गुंजन गोळे, सारंग गोसावी, अभिजीत थोरात आणि अस्मादिक दीपा देशमुख यांच्या उपस्थितीत झालं. अभिजीत हा तरुण नगरजवळच्या शिरूरमधल्या कामाठीपुरा या झोपडपट्टीत वाढला. तिथली हलाखीची परिस्थिती, आईचा परिस्थितीशी सुरू असलेला झगडा, वीटभट्टीवरच्या विटा वाहण्यापासून ते लग्नसमारंभातली खरकटी भांडी घासण्यापर्यंत केलेले कष्ट यातून अभिजीतचा प्रवास सुरू झाला. या खडतर प्रवासातून तो सीए कसा झाला आणि आज निखील कन्स्ट्रक्शन्स या कंपनीत सीएफओ म्हणून कार्यरत असतानाही नादान परिंदे नावाची संस्था कशी चालवतोय याविषयी त्याच्याच तोंडून ऐकायला मिळालं. आपल्याला ज्या परिस्थितीतून जावं लागलं, त्या परिस्थितीशी झगडणार्‍या विद्यार्थ्यांना तो सतत साहाय्य करतो आहे.

गुंजन गोळे ही विदर्भातली एक अफलातून तरुणी. वय वर्षं २७! मात्र आज अनेक मुलांची आई बनली आहे. ही मुलं फक्त दोन, चार, दहा वर्षांचीच नसून त्यांचं वय ४०, ६० कितीही असू शकतं. तिच्यातलं आईपण, वात्सल्य तिला समोरच्याचं वय पाहू देत नाही. मानसशाााची पदवीधर असलेली गुंजन लहानपणापासून अन्यायाविरुद्ध झगडत आलेली...बंडखोरी तिच्या नसानसांत भरलेली दिसून आली. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. ते पूर्ण होऊ शकलं नाही. स्त्री म्हणून पावलोपावली स्वातंत्र्य हिरावलं गेलं. अशा वेळी नाउमेद न होता आज ती स्पर्धा परीक्षांची मार्गदर्शक बनून अनेकांना प्रेरित करते आहे. गुंजननं १४ वेळा कळसूबाईचं शिखर पादाक्रांत केलं आहे. गिर्यारोहन, ट्रेकिंगचा तिचा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. जिथे कुठे नैसर्गिक आपत्ती आली, तिथे गुंजन जाऊन पोहोचलीच. मग नेपाळचा भूकंप असो की केदारनाथमधलं बचाव कार्य! रस्त्यावरचं मनोरुग्ण आणि एड्सग्रस्त यांचं आरोग्य आणि पुनर्वसन यावर ती काम करतेय. महिलांनी इतरांकडून संरक्षणाची अपेक्षा न करता स्वतः सरंक्षणाचे धडे घेत साहसी झालं पाहिजे यासाठी ती मार्गदर्शन करते आणि शिवाय कार्यशाळाही घेते. पहाटे पाच वाजल्यापासून गुंजनचा दिवस सुरू होतो. अडीचशे तीनशे इडल्या करून ती रस्त्यातल्या गरीब, भुकेल्या लोकांना पोटभर खाऊ घालते आणि मग आपल्या कामाला लागते. तिचा स्वतःचा संघर्ष आणि तिच्यातला मानवतावाद याविषयी ऐकताना संपूर्ण सभागृह हेलावून गेलं होतं. प्रत्येकाचे डोळे भरून आले होते. 

असीम फाऊंडेशनचा संस्थापक सारंग गोसावी या तरुणाची कथा या तिघांपेक्षाही वेगळी. पुण्यासारख्या सुशिक्षित कुटुंबातला हा मुलगा मेकॅनिकल इंजिनिअर होतो आणि कनर्ल विनायक पाटणकर यांच्या एका व्याख्यानानं त्याचं आयुष्य कसं बदललं हे या वेळी कळत गेलं. सारंग गेली सतरा वर्षं काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधतो आहे. त्यांना रोजगाराचे मार्ग उपलब्ध करून देतो आहे. कम्प्युटर असो वा विज्ञान, गणित असो वा व्यक्तिमत्व विकास या सार्‍याचं शिक्षण देतो आहे. तसंच क्रिकेटसारख्या खेळातून एकात्मतेची बीजंही रोवतो आहे. आज असीम फाऊंडेशन आणि सारंग काश्मीरच्या घराघरात जाऊन पोहोचले आहेत. काश्मीरला भारताचा खरा चेहरा दाखवायचा असेल तर प्रेमपूर्वक केलेला संवाद आणि सहवास हा खूप महत्वाचा आहे असं सारंगला वाटतं. त्याचा सतरा वर्षांचा हा प्रवास अतिशय खडतर होता, मात्र त्यातून मार्ग काढत काढत त्याची वाटचाल सुरू आहे. 

अखेरचं सत्र होतं वीणा गवाणकर यांचं! एक होता कार्व्हर या पुस्तकानं विक्रम केला. हे पुस्तक कोणी वाचलं नाही असा माणूस सापडणं विरळाच. वीणाताईंचं कार्व्हर, डॉ. आयडा स्कडर, डॉ. रेमंड डिट्मार्स, डॉ. सालिम अली, डॉ. खानखोजे, रोझलिंड फ्रँकलिन, लीझ माइट्नर, विलासराव साळुंखे आणि रॉबी डिसिल्वा ही सर्वच पुस्तकं वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेली आहेत. त्यांच्या पुस्तकांमधले नायक उपेक्षा सहन करत करत प्रवास करतात, कुठल्याही संघर्षापुढे डगमगत नाहीत, आपलं कार्य निरपेक्ष भावनेनं करत राहतात. वीणाताईंनी आपल्या लेखनप्रवासात भेटलेल्या प्रत्येक नायक/नायिकेचं वैशिष्ट्य, त्याचं काम आणि त्यांचा संघर्ष यावर भाष्य केलं. 

सुनिल, अभिजीत, गुंजन, सारंग आणि वीणाताई या सगळ्यांमधला समान धागा म्हणजे ही सगळीच जण अतिशय सकारात्मक विचारांची माणसं असून चांगल्यावाईट अनुभवांनी देखील त्यांचं मन कधी पूर्वग्रहाचा आधार घेत नाही. वाईट अनुभवांमधून शिकत जाणं, चांगलं तेच घेऊन पुढे जाणं आणि मनात केवळ प्रेमाची ज्योत तेवत ठेवणं हे या सार्‍याच मंडळींमध्ये दिसलं. या सगळ्यांच्या कार्याचा प्रवास उपस्थितांना प्रेरित करणारा होता. 

खरं तर प्रत्येक सत्र इतकं रंगलं की ते संपूच नये असं वाटत राहिलं. सुनिल, अभिजीत, गुंजन आणि सारंग यांच्या जिद्दीला खरोखरच सलाम करायला पाहिजे. या सगळ्या सुपरहिरोंना एका धाग्यात गुंफणार्‍या डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याविषयी काय बोलावं? मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, कवी, नाटककार, गीतकार, संगीतकार, गायक, संवादक, दिग्दर्शक, व्यवस्थापक, कार्यकर्ता.....यादी वाढत जाणारी....काम, कल्पकता, कृती यांच्या बाबतीत हा माणूस नव्हे तर राक्षस - राक्षस नव्हे तर महाराक्षस म्हणायला हवा! इतक्या सगळ्या क्षेत्रांत इतका लीलया या माणूस संचार कसा करू शकतो हे एक न उलगडणारं कोडं आहे. ठाणे शहरात २६ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वेधनं आज महाराष्ट्रातली ठाणे, औरंगाबाद, नाशिक, पुणे, पेण, अहमदनगर, परभणी, लातुर, नागपूर, कोल्हापूर, कल्याण अशा मुख्य शहरं काबीज केली असून  प्रत्येक ठिकाणी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 

‘वेध’ या जीवनाच्या या पाठशाळेत पालक, शिक्षक आणि मुलं सगळेच सहभागी होत आहेत आणि प्रचंड अशा ऊर्जेचा स्त्रोत घेऊन प्रवास करताहेत. परभणीचे मधुकर नायक आणि त्यांची टीम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांचं आतिथ्यपूर्ण वागणं परभणी शहराशी कायमचं नातं जोडून गेलं. 
डॉ. आनंद नाडकर्णी यांचा ‘वेध’ कुठल्याही वयोगटासाठी एक उत्साहवर्धक टॉनिक आहे. मी तर याचा लाभ गेली काही वर्षं घेतेय, तुम्हीही घ्या!

दीपा देशमुख

२६ नोव्हेंबर २०१७.
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.