सहलेखन निर्मिती - निरंजन दिवाळी २०१५
त्या वेळी मी ठाणे जिल्ह्यातल्या मासवण या गावी आदिवासी सहज शिक्षण परिवार या संस्थेबरोबर शिक्षण विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. एकदा औरंगाबादला गेले असताना माझी आणि अच्युत गोडबोले यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त ओळख झाली आणि त्यानंतर काहीच दिवसांत त्यांच्याबरोबर साहित्य, कविता, संगीत आणि चित्रकला या विषयांबरोबर चर्चा व्हायला लागल्या.
मासवण ते मुंबई या माझ्या सातत्यानं होणार्या प्रवासामुळे अच्युत गोडबोले यांच्याशी होणार्या भेटीतून संवाद वाढला आणि त्यातूनच एकमेकांच्या आवडीनिवडी कळत गेल्या. मी लिहिलेल्या अनेक कथा आणि कविता त्यांनी वाचल्या. माझं मनापासून कौतुकही केलं. त्याचबरोबर मी त्यांना त्यांच्या लिखाणात मदत करावी असा प्रस्ताव त्यांनी माझ्यासमोर ठेवला. एकीकडे माझं आदिवासी भागातलं काम सुरू होतंच, पण नंतर कामाची वेळ संपली की घरी आल्यावर अच्युत गोडबोलेंच्या कामाची सुरूवात होत असे. खरं म्हणजे सुरुवातीला सहजपणे होकार दिलेला तो प्रस्ताव माझ्यासाठी एका मोठ्या जगाचं दालन उघडवणारा ठरणार आहे याची मला त्या क्षणी खरोखरंच कल्पना नव्हती. या भेटीत अच्युत गोडबोले अनेक विषयांवर बोलत. चर्चा करत. त्यातले अनेक विषय माझ्यासाठी नवे असत. मला त्यातली माहिती फारशी नसे. पण मी त्यावर माझी मतं मांडू शके. मग त्या मतांवरून आमच्यात चर्चा घडत. त्यांना मदत करताना मी सुरुवातीला त्यांनी हस्ताक्षरात पुस्तकासाठी लिहिलेल्या नोट्स कम्प्युटरवर आणण्याचं काम करायला लागले. माझी टाईप करण्याची गती खूपच जास्त असल्यानं ते काम मी सहजपणे पटकन करत असे. त्या वेळी आपलं लिखाण करतानाच कसं शुद्ध असायला हवं हे त्यांनी मला सांगितलं. कुठेही शंका आली की तो शब्द न चुकता डिक्शनरीत बघायची सवय त्यांनीच लावली. त्यामुळे कुठलंही लिखाण करताना, ‘नंतर दुरुस्त्या करू या’ विचारापेक्षा करतानाच ते अचूक करू ही सवय लागत गेली. मग त्यानंतर त्यांनी मला त्या त्या पुस्तकासाठी लागणार्या संदर्भासाठी वापरण्यात येणारी पुस्तकंही द्यायला सुरुवात केली. ही पुस्तकं वाचून पुस्तकाला लागणारे त्यातले अनेक संदर्भ वाचणं, त्यांच्या नोट्स काढणं त्या सगळ्या नोट्स एकत्र गुंफणं, त्यांचा क्रम लावणं, त्यातली पुनरावृत्ती काढणं आणि पुन्हा एकदा शुद्धलेखन आणि वाक्यरचना तपासणं अशी अनेक कामं मी करायला लागले.
अच्युत गोडबोले यांच्याबरोबर मी गेली ९-१० वर्षं काम करते आहे. त्यामुळे मी त्यांची कामाची पद्धत खूप जवळून बघितली आहे. अच्युत गोडबोले यांनी आत्तापर्यंत मूलभूत विषयांना स्पर्श करणारी ५००ते ६०० पृष्ठसंख्या असलेली अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांना ते सहजशक्य आहे. पुस्तकाच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंतच्या निर्मितीप्रक्रियेत त्यांच्याबरोबर काम करणं हा एक विलक्षण अनुभव असतो. एखादं पुस्तक लिहिताना त्यासाठी त्या विषयाशी संबंधित १००-१२० पुस्तकं जमवणं, त्यातली बरीचशी महत्त्वाची पुस्तकं पूर्णपणे वाचणं आणि इतर पुस्तकातली पाहिजेत ती प्रकरणं वाचणं आणि नंतर त्यातल्या तज्ज्ञांशी चर्चा करणं, तसंच त्या विषयातली मूलतत्त्वं आणि त्या विषयाचा इतिहास आणि त्या विषयातल्या मुख्य नायकांची आयुष्य समजून घेणं अच्युत गोडबोले सातत्यानं करत असतात. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या लिखाणात ते समीक्षकाची भूमिका घेत नाहीत.
मी मासवणला राहत असल्यानं त्या वेळी तिथे मोबाईलचे टॉवर्स नव्हतेच. शिवाय लँडलाईन फोन जर काही कारणानं बंद झाला, तर सुरू व्हायला कधी कधी ८ दिवसही लागत. त्यामुळे अच्युत गोडबोले यांच्याबरोबरचा संपर्क इंटरनेटद्वारे (इ-मेल द्वारे) जास्त होत असे. मी मुंबईला रविवारी जात असल्यानं आमची प्रत्यक्ष भेटही होत असे. या भेटीत त्यांचा जीवन प्रवासही मला कळत गेला. त्या वेळी ‘माझी शोधयात्रा’ या नावानं त्यांच्या आयुष्यावर अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं आयोजित केली जात होती. त्यानंतर त्यांनी ‘माझी शोधयात्रा’ याच विषयावर लिहिलेला लेख साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाला आणि हा लेख वाचून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून वाचकांच्या प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया आल्या. त्या वेळी अच्युत गोडबोले यांना आपण आपलं आत्मचरित्र लिहावं असा विचारही मनात नव्हता. उलट आपण कोणी मोठी व्यक्ती नाही, मग आपलं आत्मचरित्र लोकांनी का वाचावं असाच प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत असे. पण एकदा तर रत्नाकर मतकरी आणि शंकर वैद्य यांनी अच्युत गोडबोले यांना ‘अरे, तुझं आयुष्य आजच्या तरुणांसमोर आलं पाहिजे’ अशी भावना व्यक्त केली आणि आमच्या मनात हा विचार जास्त बळावला. अच्युत यांनी जे जे प्रसंग आठवतील ते नोट्स स्वरुपात लिहायला सुरुवात केली. त्या वेळी हे आत्मचरित्र कधी छापायचं किंवा त्याचं स्वरूप कसं असेल याची आम्हाला मुळीच कल्पना नव्हती. पण त्यांचं आयुष्य बघताना असं नेहमीच वाटायचं की हे अक्षरांमध्ये उतरल्यावर तितकंच सुंदर होईल!
‘मुसाफिर’ लिहीत असताना आयआयटीतले दिवस, तुरुंगातल्या आठवणी, आदिवासींमधलं जगणं, आयटीमधला प्रवेश आणि सुरुवातीच्या काळात जुळवून घेताना झालेला त्रास, निहार (मुलाबद्दल निर्माण झालेले प्रश्न) चा ऑटिझम आणि नैराश्याबरोबर केलेला संघर्ष, व्यसनं, मित्रांबरोबरच्या आठवणी, संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान, अर्थशाा, मानसशाा, चित्रकला, तंत्रज्ञान अशा अनेक विषयांवर केलेलं वाचन आणि मित्रांबरोबरच्या चर्चा, संगीत आणि साहित्य या विषयांत बुडून जाण्यासाठी प्रभाव पाडणारे पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, किशोरी आमोणकर, झाकिरहुसेन, वसंत बापट, विं. दा. करंदीकर, नारायण सुर्वे, लाभलेले शिक्षक आणि संस्कारांची पेरणी करणारे आई-वडील, बहीण-भाऊ या सगळ्यांच्या नोट्स कच्च्या स्वरूपात आकार घेत गेल्या.
गंमत म्हणजे ‘माझी शोधयात्रा’ याच्या नोट्स एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे अर्थात, नॅनोदय, मनात, स्टीव्ह जॉब्ज, गुलाम, चंगळवादाचे थैमान अशा पुस्तकांचं कामही सुरू होतंच. ही सगळी कामं करताना अच्युत गोडबोले ‘हे पुस्तक आपलं आहे’ अशीच बोलण्याची सुरुवात करत. त्यामुळे त्या त्या वेळी लिहीत असलेलं पुस्तक हे ‘फक्त त्यांचं’ न राहता ते ‘आमचं’ होऊन जात असे. मग पुस्तकाच्या कच्च्चा आराखड्यापासून ते पुस्तक पूर्ण होईपर्यंतच्या निर्मितीप्रक्रियेत आमचा हा सहप्रवास सुरू होत असे आणि आजही असतो. ही कामं एकीकडे सुरू असताना त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठंही मी बनवायला लागले. मुखपृष्ठ बनवताना ते पुस्तक बघून वाचकाला पटकन त्यात काय आहे हे कळलं पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन असल्यानं मला तेही जमायला लागलं. त्यांच्यामुळे मला फोटो शॉप आणि कोरल ड्रॉ यातली तंत्रं समजत गेली. पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेत प्रकाशकाशी संपर्क साधणं ही देखील जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकल्यामुळे या कामात पुस्तकाचा कच्चा आराखडा ते पुस्तक पूर्ण होणं या सगळ्यातले सगळे टप्पे मला नीटपणे बघता आले आणि शिकताही आले.
अच्युत गोडबोलेंबरोबर काम करताना एकीकडे ‘किमयागार’मधले वैज्ञानिक, तर दुसरीकडे ‘झपूर्झा’तले साहित्यिक, तिसरीकडे ‘अर्थात’मधले मार्क्सपासून केन्सपर्यंतचे अर्थतज्ज्ञ, तर ‘मनात’ मधले सगळे मानसशास्त्रज्ञ समोर येऊन माझ्याशी अच्युत गोडबोले यांच्या शैलीदार लिखाणामधून बोलायला लागले. कॉलेजात शिकताना इकॉनॉमिक्स विषय नकोसा वाटणारी मी आता नोटा, नाणी आणि जीडीपीमध्ये रस घ्यायला लागले. विज्ञानाची आणि गणिताची मला वाटणारी भीती तर ‘किमयागार’ आणि ‘गणिती’ या पुस्तकांनी घालवलीच. गणिती या पुस्तकात माझा निर्मिती सहभाग असला तरी माझं गणित कच्चं असल्यानं मी गणिताची बाजू सोडून इतर सगळ्या आघाड्या सांभाळायची जबाबदारी उचलली आणि गणितीच्या प्रवासात रामानुजन, भास्कराचार्य, न्यूटन, गॅल्व्हा यांची आयुष्यं आणि काम बघताना आपल्याला गणित आवडत नाही, कळत नाही हे सगळं पार विसरूनच गेले. ‘गुलाम’ या पुस्तकावर काम करताना त्यातली गुलामगिरीचं वर्णनं अंगावर काटा आणत. त्यातही स्पार्टाकसच्या आयुष्यानं मन स्तिमित झालं होतं. ‘स्टीव्ह जॉब्ज’ या पुस्तकाच्या वेळी स्टीव्ह जॉब्ज आणि त्याचा मित्र स्टीव्ह वाझ्नियाक यांची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली झेप पाहून मी थक्क झाले. ‘थैमान चंगळवादाचे’ ही पुस्तिका तर एकाच बैठकीत अच्युत गोडबोले यांनी लिहून पूर्ण केली होती. या पुस्तकात आजच्या जागतिकीकरणाचे मानवी मनावर होत असलेले परिणाम मनाला अस्वस्थ करतात. नैराश्य, चिंता, स्किझोफ्रेनिया यांच्यासारख्या विकारांची वाढत जाणारी आकडेवारी बघून मन बेचैन होतं. त्याचबरोबर एरिक फ्रॉमसारखा माणूस येऊन यातून मार्ग कसा शोधायचा हेही सांगतो. ही पुस्तिका जास्त जिव्हाळ्याची वाटण्याचं कारण त्यातला विषय हे एक आहेच, पण आणखी एक कारण म्हणजे त्या वेळी ही पुस्तिका प्रसिद्ध करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्या नरेंद्र दाभोळकरांनी आग्रह धरला होता. ‘नॅनोदय’ या पुस्तकाच्या वेळी तर नॅनोटेक्नॉलॉजीमधल्या गमतीजमती बघताना मी ‘माऊस’ या दिवाळी अंकासाठी त्यावर चक्क मुलांसाठी एक कथा लिहिली आणि ती प्रसिद्धही झाली.
त्यानंतर झपूर्झा (भाग-१) या अच्युत गोडबोले यांनी लिहिलेल्या पुस्तकावर काम करतानाही खूप मजा आली. ‘झपूर्झा’च्या वेळी तर शेक्सपिअरपासून ते चेकॉव्ह, बाल्झॅक, टॉलस्टॉय, ऑस्कर वाइल्ड, शॉ, कामू आणि सार्त्र पर्यंतचे जगभरातले साहित्यिक माझे मित्र झाले आणि त्यांनी अक्षरशः मला मोहिनीच घातली. या काळातही अच्युत गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मला इंग्रजीतून बरंच वाचन करता आलं. कारण हे सगळे साहित्यिक विदेशी होते. त्यांच्याबद्दल अगदी जुजबी माहिती मला होती. या पुस्तकावर काम करताना अच्युत गोडबोलेंनी पूर्वी लिहिलेले लेख आणि नव्यानं लिहिलेलं लिखाण ‘झपूर्झा’ च्या फोल्डरमध्ये जमा व्हायला लागलं. मलाही शेक्सपिअरची नाटकं, त्याचा जीवनप्रवास, हेमिंग्वेचं विलक्षण आयुष्य आणि मनाला थक्क करणार्या कादंबर्या, टॉलस्टॉयचं कार्य, त्याची ‘वॉर अँड पीस’ ही कादंबरी, डोस्टोव्हस्कीचं मनाला विदीर्ण करणारं आयुष्य आणि त्याच्या साहित्यात उतरलेलं सामाजिक परिस्थितीवरचं भाष्य, ऑस्कर वाइल्डची ससेहोलपट, कामू आणि सार्त्रची अफाट बुद्धिमत्ता आणि तत्त्वज्ञान, त्यातही ‘मिथ ऑफ सिसिफस’ आणि आपलं आयुष्य यांच्यातला संबंध, चेकॉव्ह आणि बाल्झॅकचं साहित्य यांचं वाचता आलं आणि या पुस्तकासाठी अनेक नोट्स काढण्याच्या कामी मदत करता आली. हा प्रवास खूप अदभुत होता. या साहित्यिकांनी आजपर्यंतच्या माझ्या जुन्या विचारांवर आघात केले आणि नवे मार्ग दाखवले. माझ्या जाणिवांना सृजनशीलतेचे पंख दिले आणि एका वेगळ्या विशाल जगाची ओळख करून दिली.
अच्युत गोडबोलेंच्या बहुतांशी पुस्तकात मी मदत करत असले तरी त्यातही ‘मनात’ या पुस्तकाचं स्थान माझ्यासाठी खूप वेगळं आहे. एके दिवशी आम्ही काही पुस्तकं विकत घेण्यासाठी बाहेर पडलो असताना, मुंबईतल्या जुहूजवळच्या सीव्ह्यू रेस्टारंटमध्ये कॉफी घेत बसलो असताना अच्युत गोडबोलेंनी मनाविषयी बोलायला सुरुवात केली आणि त्याच वेळी मानसशास्त्रावरच्या ‘मनात’ या पुस्तकानं जन्म घेतला. मी तर चक्क तिथे असलेला टिश्यू पेपर घेऊन पेननं त्यावर मुद्दे काढायला सुरुवात केली. कारण मला या विषयाचं प्रचंड कुतूहल होतं. शिवाय मी मानसशास्त्र घेऊन त्यात पदवी मिळवावी अशी माझ्या वडिलांची इच्छा होती.
घरी परतताना मनाविषयी कितीतरी गोष्टी मनात गर्दी करायला लागल्या. कधी बहिणाबाई ‘मन वढाय वढाय’ करून मनाचं मोठेपण, मनाचं कोतेपण, मनाची विशालता सगळं काही कानात येऊन सांगत होत्या, तर कधी रामदास, ज्ञानेश्वर, तुकाराम ही मंडळी तत्त्वज्ञ होऊन मनाविषयी चिंतन करायला सांगत होती. कधी कधी तर हिंदी चित्रपटातली त्यातही ‘चित्रलेखा’ या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं ‘मनरे तू काहे न धीर धरे’ सारखी गाणीही पिंगा घालत आसपास घोटाळत होती. अच्युत यांनी त्यांच्या पुस्तकांच्या कपाटांमधून मनावरची पुस्तकं एकामागून एक टेबलवर काढून ठेवायला सुरुवात केली. ‘मनात’ च्या प्रोजेक्टनं ‘सीव्ह्यू’ रेस्टारंटच्या टेबलवर कॉफी पितानाच जन्म घेतला होता. आता प्रत्यक्षात तो साकारण्यासाठीची तयारी सुरू झाली होती. माझ्या मनात निर्माण झालेले मनाविषयीचे तरंग खूपच हलके आणि अपुरे आहेत याची जाणीव मला त्या टेबलावर जमलेल्या ५०-६० पुस्तकांनी करून दिली. ती पुस्तकं मनावर संशोधन करणारे मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, साहित्यिक, संत या मंडळींनी केलेल्या कार्याबद्दल बोलत होती. मी अवाक् झाले. ‘मनात’ चा प्रवास हा खूप खोलवर होणार आहे याची मला कल्पना आली.
या पुस्तकाची सुरूवात झाली आणि मला या पुस्तकावर अच्युत गोडबोलेंबरोबर मोठ्या प्रमाणात काम करायचं होतं. खरं तर या प्रोजेक्टविषयी मी पझेसिव्ह झाले होते. कदाचित माझा आवडता विषय आणि माझ्या वडिलांची मी अर्धवट ठेवलेली इच्छा ही कारणंही त्यामागे असावीत. माझी मनातविषयीची तळमळ अच्युत गोडबोले यांना दिसत होती आणि त्यांनी या प्रोजेक्टमध्ये मला संपूर्णपणे सहभागी करून घेतलं. मग नोट्स काढणं, क्रम जुळवणं, लेख निर्मितीत मदत करणं, फोटो शोधणं, अशी अनेक कामं सुरू झाली. एवढंच नाही तर मनातच्या लेखननिर्मितीच्या काळात ‘सकाळ’मध्ये ‘मनात’ नावाची मालिकाही सुरू झाली. त्यामुळे पुस्तकासाठी लिहिलेल्या लेखांचं संक्षिप्तिकरण करणं, ते संपादकांना पाठवणं या सगळ्या गोष्टी करण्याची मोकळीक मला अच्युत गोडबोलेंमुळे मिळाली. या पुस्तकाच्या निर्मितीत आम्ही इतके झपाटून गेलो होतो की शेवटचे तीन महिने तर दिवसांतले १५-१५ तास आम्ही फक्त ‘मनात’ मध्येच बुडून गेलो होतो. माझा अनेक दिवस मुक्काम मुंबईला त्यांच्याच घरी असायचा. त्यामुळे आता मला त्यांच्या कुटुंबातली एक सदस्यच होता आलं. पुस्तकाच्या सुरुवातीपासून ते पुस्तक बाहेर येईपर्यंतच्या प्रवासात मध्येच ‘मनात’ हे नाव मला सुचलं होतं आणि अच्युत गोडबोले यांनाही ते आवडल्यानं तेच नाव पुस्तकासाठी निश्चित झालं होतंच. त्यांनी ‘मनात’ हे पुस्तक जेव्हा मला अर्पण केलं तेव्हा माझ्यासाठी ती खूपच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट होती आणि आहे. ‘मनात’नं अफाट लोकप्रियता मिळवली. शेकडो वाचकांचे ई-मेल आणि आजही मनात आवडल्याची पत्रं आली. काहींनी तर अच्युत गोडबोले यांना मानसशास्त्रज्ञ समजून त्यांच्या समस्याही सांगायला सुरुवात केली. त्या वेळी आम्हाला हा प्रश्न किती महत्त्वाचा आणि आवश्यक आहे हे लक्षात येत गेलं.
यानंतर जन्माला आलं ते ‘मुसाफिर’! खरं तर मुसाफिरच्या निर्मितीपासूनच अच्युत गोडबोले यांना स्वतःविषयी लिहिल्यावर सर्वसामान्यांना त्यात रस का वाटेल असा प्रश्न वारंवार मनात यायचा आणि त्यातूनच एके दिवशी त्यांच्या आयुष्याबरोबरच त्यांनी प्रवास केलेला तो तो कालंखड मुसाफिरचा एक भाग बनला. अच्युत गोडबोलेंच्या वैयक्तिक प्रवासाबरोबरच वाचकाला सहा दशकांचा इतिहास अनुभवायला तर मिळतोच, पण त्याचं साक्षीदारही होता येतं, शिवाय मुसाफिरमधून अच्युत गोडबोले यांनी स्वतःच्या कर्तृत्वाबरोबरच आपल्यातल्या उणिवा, चुका, खंत, अपुरेपणा हे सगळं प्रामाणिकपणे मांडल्यामुळे वाचकाला हा मुसाफिर जवळचा वाटला आणि त्यातच मुसाफिरचं यश दडलेलं आहे असं मला वाटतं. ‘मुसाफिर’ पूर्णत्वाला येईपर्यंत त्याचं नाव ‘माझी शोधयात्रा’ असंच होतं. एका शब्दातलं काय नाव असावं याविषयी अखेरच्या टप्प्यात चर्चा करताना माझ्या मनात ‘मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना’ हे किशोरकुमारनं गायलेलं परिचय या चित्रपटातलं गाणं ओठांवर आलं आणि मी ‘मुसाफिर’ हे नाव अच्युत गोडबोले यांना सुचवलं. त्यांचं आयुष्य एखाद्या मुसाफिरासारखंच आहे हे मी अनुभवत होतेच. त्यांना तसं सांगताच त्यांनाही ते नाव खूपच आवडलं आणि माझी शोधयात्रा ही एका मुसाफिराची शोधयात्रा झाली. मुसाफिरनं विक्रमच केले. ५० ते ५५ हजार प्रतींची विक्री केली. इतकंच नाही तर शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना ते आपलंसं वाटलं.
झपूर्झाच्या प्रकाशनाच्या वेळीच आमच्या ‘कॅनव्हास’ या पुस्तकाचा जन्म झाला म्हटलं तरी चालेल. कारण अलीकडे गेल्या २-३ वर्षांपासून अच्युत गोडबोले यांना असं वाटायला लागलं, की आपल्या डोक्यात आलेल्या कल्पना जेवढ्या संख्येनं आहेत, तेवढ्या संख्येनं आपण ही पुस्तकं प्रत्यक्षात आणू शकणार नाही. तसंच त्यातल्या काही महत्त्वाच्या विषयांना जरी प्राधान्यक्रम दिलं आणि लिहायला घेतलं तरी आणखी किमान १० वर्ष तरी त्यासाठी लागतील आणि त्यातली फक्त सात-आठ पुस्तकंच बाहेर येऊ शकतील. तसंच याच दरम्यान स्पाँडिलायटिस आणि सायटिका यांच्यामुळे होणारा त्रास त्यांच्या लिखाणाच्या बैठकीत बाधा आणू लागला. तसंच त्यांना ३-४ वर्षांत यातले अनेक मोठे प्रकल्प पूर्ण करायचे होते. अशा वेळी जर आपले विचार पटणारा, चिकाटीनं काम करणारा, अभ्यासू वृत्तीचा, कुतूहल असणारा, विद्यार्थी होऊन शिकणारा, हाती घेतलेल्या विषयात बुडून जाणारा आपल्यासारखाच असा लेखक जर मिळाला तर हे काम लवकर होऊ शकेल असं त्यांना वाटलं आणि त्यातूनच त्यांनी मला विचारलं असावं. ‘कॅनव्हास’ हे पुस्तक लिहिण्याचा विचार मनात येताच अच्युत गोडबोले यांना मी या पुस्तकाला न्याय देऊ शकेल असं वाटलं आणि तसं त्यांनी बोलूनही दाखवलं. अनेक वर्षं आम्ही एकत्र काम करत असल्यामुळे त्यांची लिखाणाची शैली मला आत्मसात करता आली होती. ‘‘तुझ्यातले साहित्यगुण, चिकाटी, कलात्मक दृष्टिकोन, नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि धडपड, वाचन आणि लिहिण्याची पद्धत बघून मी खूपच प्रभावित झालो. कुठल्याही विषयानं झपाटून जाणं आणि एक्सलन्सचा ध्यास घेणं हे मी जेव्हा तुझ्यात बघितलं, तेव्हा ‘कॅनव्हास’ हे पुस्तक आपणच करावं असं मला प्रकर्षानं वाटायला लागलं’’ असं बोलून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला त्यांचा हा विश्वास सार्थ करायलाच हवा असं वाटलं. खरं तर माझे लिखाणाचे स्वतंत्र प्रकल्प सुरू होते. मुलांसाठी ‘सुपरहिरो’ या मालिकेवरचं काम सुरू होतं. पण अच्युत गोडबोलेंसारख्या व्यक्तीबरोबर लिहिणं ही माझ्यासाठी खूपच मोलाची गोष्ट होती. त्यांच्या बोलण्यानं माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं. मग आमच्यामध्ये या विषयावर चर्चा सुरू झाल्या. अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. त्यांची उत्तरं शोधत आम्ही ‘कॅनव्हास’च्या पुस्तकयात्रेला आरंभ केला!
‘कॅनव्हास’ या पुस्तकात काय काय असायला हवं, त्यातल्या प्रकरणांची रचना कशी करायची यावर आम्ही विचार केला. पुस्तक लिहिताना काय टाळायला हवं हेही आम्ही कटाक्षानं ठरवलं. प्रत्येक प्रकरणांची शब्दसंख्या किती असावी आणि त्या प्रकरणासाठी अनेक अडचणी आल्या तरी एकूण किती दिवस लागतील याचंही प्लॅनिंग केलं. पुस्तक किती कालावधीत पूर्ण करायचं आणि संपूर्ण पुस्तकाची पृष्ठसंख्या किती असावी इथंपासून सगळं नियोजन व्यवस्थितरीत्या पार पडलं. त्या पुस्तकासाठी लागणारी विशिष्ट विषयांवर असलेल्या खंडीभर पुस्तकांनी टेबल आणि एकूण खोलीची जागा व्यापली. त्यानंतर मग आम्ही एकत्र मिळूनच आपण कामाची विभागणी कशी करायची हेही ठरवलं. आम्ही लिहिलेलं एकमेकांना सतत ई-मेल द्वारे पाठवत होतो. त्या त्या वेळी त्यात भर टाकू शकतील असे अनेक मुद्दे आम्हाला सापडले, की आम्ही ते त्या त्या प्रकरणात सामीलही करत गेलो आणि त्यावर अनेकदा चर्चाही केल्या. इतकंच नाही तर ‘कॅनव्हास’ तयार होण्यापूर्वीच आम्ही त्याचं मुखपृष्ठही तयार केलं होतं.
‘कॅनव्हास’ लिहिताना या विषयावर मराठीतून उपलब्ध साहित्य खूप कमी होतं. आम्हाला इंग्रजीतून अनेक पुस्तकं वाचावी लागणार होती. त्यासाठी पुण्यातली सगळी वाचनालयं आम्ही पालथी घातली. त्यानंतर मुंबईचं एनसीपीए आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स अशा अनेक वाचनालयांतल्या पुस्तकांसाठी ‘पुणे ते मुंबई’ वार्या सुरू झाल्या. तिथली ती पुस्तकं बघून आम्ही अक्षरशः खजिना मिळाल्यासारखे वेडावून गेलो. कधी एकदा लिहून होईल असं मग वाटायला लागलं. मुंबईतलं जे जे स्कूल ऑफ आर्ट्स इथे आम्ही गेलो, तेव्हा अच्युत गोडबोले यांनी तिथल्या प्राचार्यांना भेटून आपल्याला त्यांच्या ग्रंथालयात बसू देण्याची एका सर्वसामान्य माणसासारखी रीतसर अर्ज करून विनंती केली. त्या ग्रंथालयानं तिथली पुस्तकं बाहेर नेण्यास मनाई असल्याचा नियम सांगितला. मात्र तिथे आम्ही १० ते ५ या वेळात बसून ती पुस्तकं कॉपी करू शकणार होतो किंवा आमच्या कॅमेर्यानं फोटोही काढून घेऊ शकणार होतो. मग आम्ही प्राचार्य साबळे आणि ग्रंथपाल झणकर यांचे आभार मानत एखाद्या विद्यार्थ्यासारखं जे. जे. मध्ये जायला लागलो.
सकाळी साडेआठ नऊ वाजता बाहेर पडलेलो आम्ही लोकलच्या खच्चून गर्दीतून प्रवास करत जे. जे. ला जायचो आणि काम संपल्यावर तितक्याच उत्साहानं रात्री आठ नऊ पर्यंत घरी पोहोचायचो. ग्रंथालयात आमच्यासमोर शेकडो पुस्तकांचा ढीग होता. काय घेऊ आणि काय नको अशी आमची अवस्था होती. पण अच्युत गोडबोले यांची तरबेज नजर कुठलं पुस्तकं चांगलं आहे हे पारखण्यात तयार झालेली असल्यानं आम्ही प्रत्येक चित्रकाराची ८-१० पुस्तकं निवडली. त्या पुस्तकाचं प्रत्येक पान उलटवून ते माझ्यासमोर धरण्याचं काम अच्युत गोडबोले यांनी न कंटाळता केलं आणि मी त्या प्रत्येक पानाचा माझ्या मोबाईलनं फोटो काढायची. अशी अनेक पुस्तकं आम्ही मोबाईलमध्ये बंदिस्त करायचो. मोबाईलचा डाटा भरला की आम्ही तो बरोबर नेलेल्या लॅपटॉपमध्ये रिकामा करायचो. तोपर्यंत पुढची पुस्तकं आपल्या फोटोसाठी पोझ देऊन सज्ज असायची. त्यानंतर आम्ही एनसीपीएच्या लायब्ररीतही गेलो. तिथलं रीतसर सदस्यत्व घेतलं आणि तिथेच बसून पुन्हा हेच काम आम्ही करायचो. हे पुस्तक लिहिताना ज्याप्रमाणे अनेक वाचनालयातून आम्हाला अनेक पुस्तकांचे संदर्भ मिळाले, त्याचप्रमाणे बीबीसी आणि यू-ट्यूबवरच्या अनेक फिल्मसही बघून अभ्यास करता आला. जवळजवळ १००-१२० इंग्रजी भाषेतली पुस्तकं या लिखाणासाठी उपयोगी पडली. तसंच अच्युत गोडबोले यांच्या वैयक्तिक संग्रहातली अनेक पुस्तकं मदतीला धावून आली.
‘कॅनव्हास’ या पुस्तकात आम्ही निवडलेल्या मायकेलअँजेलोपासून ते पॉल सेजानपर्यंत आणि लिओनार्दो व्हिंची पासून तुलूझ लॉत्रेकपर्यंत सगळे कलावंत आमच्याशी मूकपणे संवाद साधायला लागले. त्यांच्या कलाकृती अभ्यासताना अवाक् व्हायला झालं. त्यांचं विलक्षणपण त्यांच्या भव्यदिव्य निर्मितीतून हळूहळू कळायला लागलं होतं. मग त्या कलाकृतींना पोषक असणारा आणि नसणारा तो काळ, तो देश, ती परिस्थिती, ती माणसं, ती युद्धं आणि त्या वेळचे शासनकर्ते यांच्या अनुषंगानं शोध घेणं सुरू झालं. या लेखनप्रवासात त्या कलावंतांची वैयक्तिक आय्ाुष्यं आणि त्यांच्या कलाकृतींचा प्रवास यांचा अनुभव हे शब्दातीत होतं. कलेचा इतिहास आणि त्यातले त्या त्या काळातले कलावंत हेच इतके विलक्षण होते की त्यांनी अक्षरशः त्यांच्या विश्वात आम्हाला खेचून घेतलं. या कामात एकदाही कंटाळलेलं किंवा थकलेलं मी अच्युत गोडबोलेंना बघितलं नाही.‘कॅनव्हास’ लिहिताना आम्हाला दोघांनाही खूप आनंद आणि समाधान मिळालं. ‘कॅनव्हास’ लिहिताना माझ्यातला कल्पक लेखक आणि त्यांच्यातला इंटिग्रेटर एकत्र आले आणि त्यातूनच कॅनव्हास रंगत गेला. ‘कॅनव्हास’ पुस्तकानं आम्हाला वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या ई-मेल आणि पत्रं यांनी आम्ही भारावून गेलो आणि पुढच्या लिखाणासाठी आम्हाला त्यांच्या प्रतिसादानं आणखीनच बळ आणि उत्साह मिळाला.
आमचा दोघांचा प्रकल्प जग बदलवणार्या शोधकांचा ‘जीनियस’ हा हा नुकताच दिवाळीचं औचित्त्य साधून मनोविकास प्रकाशनातर्फे वाचकांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे. जीनियस ही अनेक पुस्तकांची मालिका असून ती १२-१२ पुस्तिकेच्या संचात वाचकांसमोर येत आहे. ‘जीनियस’च्या पहिल्या संचात गॅलिलिओ गॅलिली, सर आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, एडवर्ड जेन्नर, डॉ. रॉबर्ट कॉख, लुई पाश्चर, अॅलेक्झांडर फ्लेमिंग, लीझ माइट्नर, मेरी क्युरी, जे. रॉबर्ट ओपेनहायमर आणि रिचर्ड फाईनमन ही सगळी वैज्ञानिक मंडळी वाचकांबरोबर संवाद साधणार आहेत. जिनियस असणार्या या १२ वैज्ञानिकांचं आयुष्य आणि कार्य अफाट आहे. आज आपलं जगणंच त्यांच्या शोधावर अवलंबून असल्याची जाणीव त्यांचं कार्य बघताना वारंवार होत राहते. आईन्स्टाईनची अचाट बुद्धिमत्ता, ओपेनहायमरचा व्यासंग, फाईनमनच्या वैज्ञानिकाचं चतुरस्त्र व्यक्तिमत्व, न्यूटनचा विक्षिप्तपणा, मेरी क्युरी आणि लीझ माईट्नर यांचा संघर्ष, कॉख, पाश्चर, जेन्नर आणि फ्लेमिंग यांचे अवाक् करून सोडणारे मानवजातीच्या कल्याणासाठी लावलेले शोध हे सगळं सगळं हे ‘जीनियस’ आपल्यासमोर व्यक्त करताहेत. यानंतरच्या टप्प्यात विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशाा, मानसशाा, साहित्य, चित्र, संगीत आणि सामाजिक बदल या सगळ्या क्षेत्रांत ज्यांनी आख्ख्या जगाला एक वेगळा विचार करायला भाग पाडलं आणि जग बदलण्याचा ध्यास घेतलेल्या या शोधकांनी आपल्या जगण्याची दिशाच बदलवली असे जीनियस वाचकांच्या भेटीला लवकरच येतील. अशा सगळ्या ‘जीनियस’ शोधकांची सखोल ओळख करून देणारी ही अभ्यासपूर्ण मालिका अत्यंत सोप्या, सुटसुटीत, रसाळ आणि खुमासदार शैलीत वाचकांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ही सगळी जीनियस मंडळी वाचकांना नक्कीच आवडतील अशी आशा आम्हाला वाटते.
अच्युत गोडबोले हे हाडाचे शिक्षक आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आम्ही जीनियस प्रकल्पावर एकत्र काम करतोय. यात जेव्हा सुरुवातीला आम्ही १२ वैज्ञानिकांची आयुष्यं आणि त्यांचं काम यावर अभ्यास करायचं ठरवलं, तेव्हा प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर अणुबॉम्बची निर्मिती असो, वा क्वांटम थिअरी असो, किंवा गतीचे नियम असो वा पाश्चरायझेशनची प्रक्रिया असो, मला या गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या नीट समजल्या पाहिजेत याची त्यांनी पावलोपावली काळजी घेतली आणि समोर बसून कागदावर आकृती काढत त्यांनी एक एक स्टेप मला नीट उलगडवून दाखवली. विज्ञानाची भाषा किती सोपी असते हे मला जीनियसवर काम करताना कळत गेलं. त्या दिवशी तर माझा ज्या कोणाशी संपर्क किंवा संवाद झाला, त्या त्या व्यक्तीला अच्युत गोडबोले यांनी समजवून सांगितलेल्या वैज्ञानिक संकल्पना मी सांगत बसले. असं वाटलं अरेच्च्या, आपण शाळेत असताना अशा पद्धतीनं विज्ञान आणि गणित आपल्याला कोणी समजवून सांगितलं असतं तर किती छान झालं असतं! त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच त्यांच्याबरोबर सहलेखन करणं म्हणजे आजन्म विद्यार्थ्याचं व्रत घेऊन शिकत राहणं हा वसा त्यांच्याकडून मिळतो. सहलेखन करताना माझ्यातल्या सुप्त कौशल्यांची जाणीव अच्युत गोडबोलेतल्या शिक्षकानं मला करून दिली. त्याचबरोबर माझ्यातल्या उणिवा दाखवून पदोपदी मला कमी लेखणं असं आजपर्यंत कधीही केलं नाही. असं न केल्यामुळे मला माझ्यातल्या उणिवा तर कळत गेल्याच, पण त्यांच्यावर मात कशी करता येईल हे मी शिकत गेले.
यानंतर अच्युत गोडबोले आणि मी - आम्ही दोघांनी मिळून लिहिलेलं पाश्चात्त्य संगीतावर आधारित ‘सिंफनी’ हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. यापुढचे आमचे दोघांचे आर्किटेक्चर, जग बदलवणारं साहित्य, भारतीय साहित्यिक आणि साहित्य, स्त्री, याशिवाय संगीत (भक्तिसंगीत, हिंदी सिनेसंगीत) असे अनेक प्रकल्प प्रतीक्षेत ऊभे आहेत. त्यांच्यावरचं कामही वेगात सुरू आहे. खरं तर प्रत्येक पुस्तकाच्या वेळी प्रवास तोच असतो, पण हा प्रवास वैविध्यपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण तेव्हाच होतो, जेव्हा एक बहुआयामी चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची व्यक्ती बरोबर असते!
Add new comment