बदल पेरणारी माणसं - अतुल पेठे - पुणे वेध २२ सप्टेंबर २०१९
ये हौसला कैसे झुके..... असं म्हणणारी माणसं वेगळीच असतात,
त्यांना चालत असताना त्यांचं ध्येय गवसत जातं
त्या ध्येयानं ते झपाटले जातात, वेडे होतात
आणि त्यांना त्यांच्या या वाटेवरून कोणीही
परावृत्त करू शकत नाही...
कारण त्यांचा निश्चय पक्का असतो,
स्वतःवरचा विश्वास अढळ असतो
ही माणसं काय मिळेल याची अपेक्षा करत नाहीत
रस्त्यातल्या काट्याकुट्यांची ते पर्वाही करत नाहीत
ती फक्त चालताना वाटेत बिया पेरत जातात
त्यातल्या काही रुजतात, काही नाही
त्या रुजलेल्या बियातून अंकुर फुटतात
आणि एका बदलाला सुरुवात होते
ज्या वेळी हे बदल दिसायला लागतात,
त्या वेळी या माणसांकडे बघून मनात येतं -
हीच ती बदल पेरणारी माणसं
कशी असतात ही बदल पेरणारी माणसं?
या वेळच्या पुणे वेधच्या दोन दिवसांत
अशी ११ बदल पेरणारी माणसं भेटली
त्यांच्या भेटीनं, त्यांच्याबरोबरच्या संवादानं
मन प्रफुल्लित झालं, ताजंतवानं झालं
आणि नकळत हात पुढे झाला
तो हात मागत होता, नवं बीज
पेरण्यासाठी!
२२ सप्टेंबर २०१९, रविवार
पूणे वेधचा दुसरा दिवस! रविवारची सकाळ! सकाळी साडेनऊ वाजताच हॉल फुलून गेला होता. व्यासपीठावर डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकर यांनी नाट्यकर्मी अतुल पेठे यांचं स्वागत केलं. अतुल पेठेला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. सूर्य पाहिलेला माणूस, कचराकोंडी, सत्यशोधक, रिंगण आणि समाजस्वास्थ्य या नाटकांनी विशेष ओळख मिळवलेला हा मूल्य जपणारा आणि पेरणारा अभिनेता, दिग्दर्शक! दलपतसिंग येती गावा हे माहितीच्या अधिकारावर आणि रिंगण हे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित पथनाट्यंही त्यांनी गावोगाव केली. एसईझेडपासून अनेक माहितीपट बनवले. अतुल पेठे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असले तरी पुणे वेधमध्ये त्यांच्याशी झालेला संवाद खूपच संस्मरणीय ठरला. पुणे वेधमधलं सर्वोत्कृष्ट सत्र कुठलं असा प्रश्न कोणी विचारला तर निर्विवादपणे अतुल पेठेचं सत्र असंच उत्तर द्यावं लागेल.
नाटक आणि अतुल पेठे गेली ३८ वर्षांचा प्रवास! खर तर नाटक जगणारा माणूस म्हणजे अतुल पेठे!
अतुलनं पुणेवेधच्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत केलं आणि वेध मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आभारही मानले. अतुलच्या आयुष्यात नाटक ही कला किती महत्वाची आहे हे त्यानं सांगितलं. त्यानं चिनी म्हण उदृत केली. तुम्हाला दोन पैसे मिळाले तर एक पैसा धान्य खरेदी करण्याकरता करा आणि दुसर्या पैशात फूल विकत घ्या. धान्य तुम्हाला जगवेल आणि फूल तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. हे फूल म्हणजेच कला! कलेनं दृष्टिकोनातला बदल घडतो. डोळे सगळ्यांनाच असतात, पण दृष्टी सगळ्यांना नसते. डोळे नसलेला एरिकसेन नावाचा माणूस होता. त्याला सगळ्या जगाची माहिती असायची. जेव्हा त्याला एकानं विचारलं, तुला डोळे नाहीत, तुला कसं काय कळतं? तो म्हणाला, तुम्हाला सगळ्यांना डोळे आहेत, मला दृष्टी आहे.
अतुलचे आजोबा अनंत हरी गर्दे यांची नवनाटिकाहार नावाची नाटक कंपनी होती. त्यांनी हाऊसफुल हा शब्द मराठीत रूढ केला. तीन अंकी नाटक रंगमंचावर आणलं. तसंच निर्भिड नावाचं मासिक त्यांनी काढलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहासाठी ते बसले होते. अत्रेनी त्यांचं वर्णन महागमतीदार माणूस असं केलं होतं. अनेक क्षेत्रांशी आजोबांनी स्वतःला जोडून घेतलं होतं. अतुलच्या आजोळी अत्रे, रांगणेकर, खाडीलकर, सावरकर, मामा वरेरकर यांसारखी अनेक दिग्गज माणसं येत. लहानपणापासून त्यानं नाटक खूप बघितलं. शनिवार पेठ ओलांडली की बालगंधर्वला शाकुंतल, काशीनाथ घाणेकर, सौभद्र, संशयकल्लोळ ही नाटकं बघितली. शांकुतलमधली नांदी सुरू झाली की एक अदभुत जग समोर आल्यासारखं अतुलला वाटायचं. अंगावर रोमांच उमटायचे. नाटकाचं हे जादूमय जग त्याला खूप आवडायचं. वसंतराव देशपांडे यांचा थेट सूर हृदयाला भिडायचा. या सगळ्यांचा अतुलच्या मनावर खूप प्रभाव पडला.
अतुलला शाळेची अजिबात आवड नव्हती. दीपक पळशीकर सरांमुळे तो दहावीत पास झाल्याचं अतुलनं सांगितलं. त्याला भाषा खूप आवडायची. आपली शिक्षणपद्धती त्याला नको वाटायची. अतुल आणि त्याचे मित्र यांना नदीतले मासे कसे पकडायचे, पतंग कसे उडवायचे, कबुतरं कशी उडवायची, ट्रेकिंग या सगळ्या गोष्टींची आवड होती. अतुलच्या मनात त्या वयात आत्महत्येचेही विचार अनेकदा डोकावायचे. या जगात आपलं काही खरं नाही असं त्याला वाटायचं. मग अतुल कविता करत राहायचा. मी कोण आहे हे जाणून घेण्याची त्याची धडपड चालू होती.
शाळेमध्ये असताना त्याला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. वसंत ऋतूची भूमिका त्याला करायची होती. वाक्य पाठ केली, वसंत ऋतू मी वसंत ऋतू अशी वाक्य त्यानं पाठ केली, पण व्यासपीठावर गेल्यावर मात्र त्याची तंतरली आणि तो 'मी आंबा आहे' एवढंच म्हणत लोकांचा हशा घेऊन व्यासपीठावरून खाली उतरला. आपल्यामागे तेजपुंःज वलय वगैरे काहीही नसल्याचं अतुलनं मीश्कीलपणे सांगितलं. पुढे एका बालनाट्य संस्थेशी तो जोडला गेला. तिथे त्याला नाटकातलं पहिलं बक्षीस मिळालं. कोणीतरी केलेलं कौतुक त्याला खूप काही देऊन गेलं. पुरुषोत्तम करंडकला अतुलनं 'चेस' नावाची एकांकिका केली. ती त्यानंच लिहिली. व्यक्त होण्यासाठी त्याची अनेकदा घुसमट व्हायची. धोपटमार्ग सोडावा आणि नव्या मार्गावरचे नवे ध्वनी त्याला ऐकावे असं त्याला वाटत असायचं. चेसबद्दल त्याला अनेक बक्षिसं मिळाली. अतुलनं शिक्षण अर्धवट सोडलं. त्याच्या वडिलांना तर अतुलनं सीए व्हावं असं वाटत होतं. अतुलला मात्र ते अशक्य वाटायचं. पुढे अतुलनं त्याच्या बायकोचं आव्हान स्वीकारून एमए डिस्टिंग्शन केलं.
अतुलचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो केवळ मनोरंजनासाठी नाटकं करत नाही. ज्या विषयांना सामाजिकता आहे ती नाटकं तो करतो. हे भान अतुलला कसं आलं हे डॉक्टरांनी अतुलला विचारलं. आजूबाजूचे मित्र आणि वाचन यांनी अतुलवर प्रभाव पाडला. दृष्टिकोन बदलायला मदत झाली. त्याला स्वभाषा महत्वाची वाटते, स्वभाषेमुळे इतर भाषा कळायलाही मदत होते. पडघम, बेगम बर्वे, घाशीराम कोतवाल या नाटकांमुळे अतुलचा दृष्टिकोनात बदल झाला. सतीश आळेकर, महेश एलकुंववार आणि विजय तेंडूलकर यांनी नाटक काय, त्याचा दर्जा काय हे दाखवलं. एखादं नाटक, एखादी कादंबरी, एखादा चित्रट हे बघण्याआधी आणि नंतर बघितल्यानंतर आपल्यात काय बदल होतो, आपल्याला काय जीवनमूल्य मिळालं हे महत्वाचं. नाटकामुळे करमणूक तर झाली पाहिजे पण त्यातून त्याला जे जग दिसलं आहे, जाणवलं, विचार दिसले, असं नाटक किंवा साहित्य यानं मी समृद्ध होणार आहे. चांगलं का वाचायचं, तर ते आपल्या मनाला आणि डोक्याला गरजेचं असतं, असं अतुल म्हणाला.
१९९९ साली सादर झालेलं 'सूर्य पाहिलेला माणूस' यातला सॉक्रेटिसनं विषाचा प्याला प्यायलाचा प्रसंग यानंतर पडद्यावर दाखवण्यात आला. अतुलनं केलेलं हे नाटक नाटक नव्हतंच, तर तो एक जिवंत अनुभव होता. तो काळ, ती माणसं, त्यांच्यातले हेवेदावे, सॉक्रेटिसचं शांतपणे विषाचा प्याला तोंडाला लावून स्वतःला संपवणं हे सगळं समोर उभं करण्याची ताकद या नाटकात दिसत राहिली. हेच नाटक अतुलनं करायचं का ठरवलं, तर १९९० च्या आधी वेगळा एकसूत्र समकाल होता, तर १९९० जागतिकीकरण, उदारीकरण आलं आणि जग बदललं. टाईम आणि स्पेस याचे अर्थच बदलले. समाजात अनेक गोष्टी घडत होत्या. बाबरी मशीद पडली, इंदिरा राजीव गांधीचा खून अशा अनेक घटना घडल्या. या घटनांचे पडसाद अतुल सारख्या संवेदनशील माणसांवर होत राहिले. मेधा पाटकरांचा नर्मदा बचाव आंदोलनाचा लढा सुरू होता. अशा विस्कळित समाजामध्ये मी जगू कसा हा प्रश्न अनेक माणसांना पडला होता. इतिहासात डोकावलं असता त्या त्या वेळी तुकाराम, सॉक्रेटिस, रधो कर्वे ही माणसं कशी वागली हे अतुलला बघावं वाटलं आणि अशा वेळी एका क्षणी डॉ. श्रीराम लागूंनी अतुलला 'सूर्य पाहिलेला माणूस' ची स्क्रिप्ट हाती दिली आणि त्यानं ती करायचं ठरवलं. श्रीराम लागूंनी सॉक्रेटिसची भूमिका वयाच्या ७० व्या वर्षी अतिशय अप्रतिम अशी केली. सॉक्रेटिसमुळे सत्य, सदाचरण आणि नैतिकता यांचा वेध मिळाला. जगायचं कसं तर विष घेतलं तरी चालेल, पण सत्यानेच हेही कळलं. श्रीराम लागूंनी वाचिक आणि शारीरिक अभिनय प्रभावीपणे दाखवला. मृत्यूशी सामोरं जातानाही सत्याशी प्रामाणिक राहायचं, समोरची दमणकारी व्यवस्था आहे तिला शरणही जायचं नाही. मी जीवनाचं दान करायला तयार आहे, पण माझ्या विचारांचं करणार नाही.
अतुल म्हणाला, 'जगताना काहीतरी बरं केल्याचं समाधान वाटतं. नाटक प्रत्येकवेळेला उन्नत करतं. मला काय येतं पेक्षा मला काय येत नाही हे तपासून बघण्यासाठी मी नाटक करतो असं अतुलनं सांगितलं. कला तुमच्या आयुष्यात क्रांती करते. शिल्प कळायला लागतं, जग कळायला लागतं. फ्रस्टेशन, डिप्रेशन काहीही येत नाही. व्यक्त् होणं जे असतं ते आपण अलिप्त राहून दुरून बघतो. नाटक म्हणजे साक्षीभाव! नाटक हे एकच असं माध्यम आहे असण्याचं होणं होतं. इतर कलांमध्ये तुम्ही आहे तसेच राहता. नाटक दिग्दर्शित करताना खूप मजा येते. स्वतःला तपासून बघता येत.'
अतुल पेठे प्रयोगिक नाटक करतो. खरं तर सगळेच प्रकार त्याला छान वाटतात. अतुलची प्रवृत्ती प्रयोग करायची आहे. अपयश येऊ शकतं ही जाणीव अशा प्रकारची नाटकं करताना असते. प्रायोगिक नाटकात एक प्रयोगशाळा असते. कलेमध्ये प्रायोगिक नाटकात आपल्या जगण्यामध्ये त्रास देणारे प्रश्न कोणते हे कळतं. आधी केलं ते पुन्हा तेच करणं किंवा कम्फर्ट झोन या नाटकांत सोडावा लागतो. सुरक्षितता जिथे वाटेल तिथून पळ काढला पाहिजे. काही सुचत नसेल तर अंधारात सरळ उडी टाकावी हे अर्ध वाक्य झालं. ही उडी टाकताना डोकं आणि भान भानावर पाहिजे. म्हणजे पाठीवर पॅराशूट आहे का ती उघडते का हे तपासून बघणे. अतुलला लक्षात आलं की आपण सध्या तेच ते करतो आहोत. मग त्यानं कनकवली, जालना इथं जाऊन नाटकं केली. मधल्या काळात डॉक्युमेंट्रीज केल्या.
कचराकोंडी ही फिल्म करत असताना सफाई कर्मचारी म्हणजे काय, गटारात उतरणं म्हणजे काय हे अतुलला कळलं. आपल्या आजूबाजूला असं विश्व आहे ज्याला आपण भिडलं पाहिजे. ती लोकं राजकीय सांस्कृतिक दृष्टया अतिशय प्रखर आहेत. छंदामध्ये ताबडतोब लगेच गाणं ती रचू शकतात. पारंपरिक लोकगीतं ही त्यांची ताकद असते. या फिल्म मुळे त्याचा सफाई कामगारांशी संबंध आला आणि त्यातून वपू देशपांडे यांनी लिहिलेलं सत्यशोधक हे नाटक करायचं ठरलं. त्याचं मुक्ता मनोहरशी बोलणं झालं आणि सत्यशोधक हे नाटक सफाई कामगारांना घेऊन करायचं ठरलं. हे नाटक करताना आपलं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं आताचं नातं काय हे बघावं वाटलं. जातियता आणि धर्मांधता अलिकडल्या काळात खूप वाढलेली दिसते. अतुल म्हणाला, ज्योतिबा माळ्यांचे नाहीत, तुकोबा फक्त कुणब्यांचे नाहीत आणि ज्ञानेश्वर हे ब्राह्मणांचे नाहीत. ते आपल्या सगळ्यांचे, अवघ्या जगाचे आहेत. हा क्लेम आपण केला पाहिजे.
या नाटकात ८० टक्के लोक हे पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे सफाई कामगार होते. ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना लिहिता येत नाही, ज्या लोकांनी आजपर्यंत लोकांचा मैला डोक्यावरून वाहिला त्याच लोकांनी संस्कृतीचा भार वाहिला आणि म्हणून या नाटकाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ११८ प्रयोग झाले. नाटकाचा प्रयोग बघितल्यानंतर नसिरूद्दिन शाह, डॉ. श्रीराम लागू या सफाई कामगारांच्या पाया पडले आणि म्हणाले, आम्हाला असा अभिनय करता आला पाहिजे. कारण तो अभिनय नव्हताच, त्यात एक जिवंतपणा होता, व्याकुळता होती. सावित्रीबाई फुले शाळेत शिकवताहेत असा एक प्रसंग सभागृहातल्या उपस्थितांना दाखवण्यात आला. या वेळी पडद्यावरचे रंगकर्मी गात होते,
भिडे वाडा केला मोकळा, चला शाळेत जाऊ चला
अक्षरांचा लागला लळा, ज्ञानाचा मार्ग झाला खुला
आपल्या मुलीला शाळेत तर शिकायला पाठवायचंय, पण लोकांच्या विरोधाचीही भीती वाटतेय, अशा वेळी तो बाप आपल्या चिमुरड्या मुलीला चक्क पोत्यात घालून लोकांच्या नजरा चुकवून शाळेत घेऊन येतो. ते दृश्य बघितल्यावर मनात आलं, किती प्रतिकूल काळ होता तो! आज किती सहजपणे आपण शिक्षण घेतो आहोत, किती शाखांमधलं....सावित्रीबाईंच्या जोतिबांच्या त्यागाची, कष्टाची किंमत आपण खरोखरंच जाणलीय का?
यानंतरचं अतुलनं केलेलं नाटक म्हणजे 'समाजस्वास्थ्य'! रघुनाथ धोंडो कर्वे हा सत्य शोधणारा एक विलक्षण माणूस! हे नाटक कसं सापडलं, याबद्दल बोलताना अतुल म्हणाला, जोपर्यंत आपल्याला आपल्या परंपरा माहीत असत नाहीत, तोपर्यंत आपल्याला नवं कळत नाही. त्या माहीत करून घेतल्या तर मजा येते. आपली वाट वेगळी आहे हे कधी कळेल, तर आधीच्या वाटा माहीत असल्या तर. सत्यशोधक कन्नडमध्ये केलं. लोकांना जाऊन भिडलं पाहिजे या विचारानं ठिकठिकाणी प्रेक्षकांना जावून अतुल भेटला, त्यातून कलाकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून त्याची समज वाढली. गाडगे महाराज आपले गुरु असल्याचं अतुल सांगतो. गाडगेमहाराज हे विज्ञाननिष्ठ किर्तन करायचे. या वेळी गाडगे महाराजांची एक गोष्ट अतुलने सांगितली. चालत असताना अपयशाला घाबरायचं नाही, थोडक्यात मिळाला हत्ती तर हत्तीवरून जाऊ नाहीतर चालत जाऊ. काम करताना हत्ती भेटतात. विश्वास ठेवला पाहिजे आणि चालायलाही मजा येते हेही लक्षात घेतलं पाहिजे.
र.धो. कर्वे - लहानपणापासून लहानपणापासून अतुलला ते माहीत होते. त्यांनी सुरू केलेल्या 'समाजस्वाथ्य' या मासिकाला अतुलच्या आजोबांनी जाहिरातीसाठी मदतही केली होती. र.धो. वाचल्यावर अतुल थरारून गेला. र.धो.चं आयुष्य वादळी होतं. १९३० या काळात पहिली लैंगिक शिक्षणाविषयी पहिली क्रांती त्यांनी भारतात केली. लोकसंख्या नियंत्रण आणि गर्भनिरोधक साधनं वापरणं, समाजस्वास्थ्य हे लैंगिक विषयावर मासिक २७ वर्षं एकहाती चालवणं असं अफाट काम त्यांनी केलं. परंपरा म्हणजे फुगड्या घालणं आणि झिम्मा खेळणं नव्हे तर परंपरा म्हणजे चांगल्या साहित्याची आणि विचारांची परंपरा. अतुलला वैचारिक परंपरा जास्त महत्वाची वाटते. बाह्यस्वरूपी परंपरा जपण्यापेक्षा अंतर्गत स्व-परंपरा जपणं जास्त महत्वाचं वाटतं. आजही लैंगिक शिक्षण द्यायचं कसं, शाळेत लैंगिक शब्द वापरायचे कसे असे शाळेत शिकवताना आजही प्रश्न पडतात. म्हणून र.धो. पुन्हा तपासले पाहिजेत असं अतुलला वाटलं. र.धो.वर चार खटले भरले गेले. नाटक फक्त करमणूक करत नाही तर ते सामाजिक अभिसरण करतं. तत्कालीन विषय मांडून त्या विचारांची घुसळण करतं.
आपल्याकडलं मराठी नाटक खूप सशक्त आहे. शारदा विषय घेतला तर बाल-जरठ विवाहाचा प्रश्न आहे, एकच प्याला घेतलं तर तिथं नैतिकतेचा आणि स्खलनाचा प्रश्न आहे. किचकवध हे नाटक असं पहिलं नाटक होतं की त्यावर सेन्सारशिप लादली होती. महात्मा फुल्यांचं तृतीय रत्न हे नाटक संपूर्ण जातिव्यवस्था आणि शेतकर्याची लुबाडणूक करण्यांबद्दल बोलणारं होतं. नाटकामध्ये हा एक प्रवाह मराठी नाटकामध्ये जोरकस आहे. आपण त्याचे पाईक आहोत त्यामुळे अतुल अशा प्रकारचं नाटक करतो. र.धो.वरचा दुसरा खटला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवला. आंबेडकर हे स्त्रियांच्या बाजूनं उभे राहतात, ते लैंगिकतच्या बाजूनं उभे राहतात आणि असे बाबासाहेब या नाटकात उभे केले. हा इतिहास सर्वसामान्यांना माहीतच नव्हता.
या वेळी 'समाजस्वास्थ' नाटकातलाही एक प्रसंग उपस्थितांना पडद्यावर दाखवण्यात आला. डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले बदल पेरणारी जी माणसं असतात त्यांनी पुढे आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय, मग तो प्रत्यक्ष विषाचा प्याला असेल, किंवा अडचणींचा डोंगर असेल त्यांना तोंड देण्याची तयारी ते आधीच करून ठेवतात.
अतुलला डॉक्टरांनी फिल्म माध्यमाच्या वैशिष्ट्याविषयी अतुलला प्रश्न विचारला. अतुल चांगले फोटो काढायचा. विजय तेंडूलकर यांनी त्याला कॅमेरा घ्यायला सांगितलं आणि ते म्हणाले, फोटो काढताना कॅमेरा कसा आहे यापेक्षा तो वापरणारा त्यामागचा माणूस कसा आहे हे महत्वाचं आहे. तंत्र चालवणारा माणूस कसा आहे यावर ते तंत्र अवलंबून असतं. अतुलनं कॅमेरा विकत घेतला आणि त्याला वेगळंच जग दिसायला लागलं. कॅमेर्यातून बघणं इतकं स्वतःकडे बघण्यासारखं अतुलला वाटलं. अतुलनं स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) या विषयावर फिल्म केली. उल्का महाजन या कार्यकर्ती मैत्रिणीने अतुलला तू या विषयावर फिल्म बनवशील का असं विचारलं. २००० मध्ये शेतकर्यांच्या जमिनी हडप होत होत्या. लोकांच्या जमिनी फसवून घेतल्या जातात आणि त्यामागचं राजकारण अतुलला अस्वस्थ करून गेलं. एखाद्या कलाकाराला आपल्या समाजातले प्रश्न माहीत असणं अतुलला खूप गरजेचं वाटतं. त्यामुळे त्या कलाकाराच्या जगण्याच्या कक्षा रुंदावतात. ही फिल्म अतुलनं केली आणि ती खूप गाजली. अनेक लोकांचं लक्ष वेधलं गेलं.
मुक्ता मनोहरनं ही फिल्म बघितली आणि सफाई कामगारांवर फिल्म करशील का असं अतुलला विचारलं आणि अतुलनं सहजपणे हो म्हटलं. मात्र सहज वाटलेली आणि महिनाभरात होणारी ही फिल्म नव्हती. अतुल सफाई कामगारांबरोबर दीड वर्षं राहिला. मैला वाहून नेणं हे अमानवी कृत्य असल्याचं आपल्या घटनेनं सांगितलंय, मात्र आजही ही प्रथा बंद झालेली नाही. हे सफाई कामगार, त्यांचं जगणं, हे जवळून बघताना अतुल स्वतः गटारात उतरला. तिथून त्यानं कॅमेर्यातून बाहेरचं जग बघितलं. अतुल त्यानंतर अंतर्बाह्य बदलला. सगळा अहंकार नष्ट झाला. त्याचा आवाज बदलला. कलाकाराला कुठली भाषा, धर्म, देश नसतो हे त्याला कामगारांनी शिकवलं. चौकटीतलं सुरक्षित जीवन जगतो म्हणजे काय आणि याला तडा द्यायचा असेल तर या लोकांबरोबर राहिलं पाहिजे. त्यांना जवळ केलं पाहिजे. एम्पथीचा खरा अर्थ म्हणजे सहअनुभूती! रेड्याच्या पाठीवर उमटलेले वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटले हे एक रूपक आहे, खरं तर ज्ञानेश्वर रेड्याशी सहअनुभूत झाले होते. आज जे शहर स्वच्छ दिसतं त्यासाठी कित्येक लोक मरतात. असे कामगारांचे कित्येक मृत्यू झालेले आहेत. समाजातले वंचित, पीडित कितीतरी स्तर समाजात आहेत. ही माणसं कोण आहेत याचा शोध घेताना अतुलला एक वेगळं जग दिसलं. आपण कचरा टाकतो, थुंकतो, त्यात एक माणूस असतो. आपल्याला हे जग दिसत नाही. ही फिल्म करताना अतुल हादरून गेला. ही फिल्म बघून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. २० लाख लोकांनी ही फिल्म बघितली. कामगारांचे पैसे वाढले. कचराकोंडी ही फिल्म बघून अनेक कामगारांना घरं मिळाली, काम करण्यासाठी लागणारी साधनं कामगारांना मिळाली.
समाजामध्ये समाजविधायक बदल जसे घडतात, तसेच समाजविघातक बदलही घडतात. समाजविघातक बदलात घडलेली एक घटना म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या! या प्रसंगानंतर अतुल एका वेगळ्या भावनेनं प्रेरित झाला आणि त्याच्या हातून रिंगण नाटक उभं राहिलं. अतुल म्हणतो, गोपाळ गणेश माहीत असतील तर र.धो. कर्वे माहीत होतात. र.धो. माहीत असतील तर मग तुम्ही दाभोलकरांपर्यंत जाऊन पोहोचता. विसाव्या शतकात आगरकरांची जिवंत असताना प्रेतयात्रा काढण्यात आली. र.धों.वर चार खटले भरण्यात आले आणि एकविसाव्या शतकात दाभोलकरांवर गोळी झाडण्यात आली. ही समाजाची अधोगती आहे की प्रगती असा प्रश्नही अतुलनं उपस्थित केला. अनिल अवचटांचं 'संभ्रम' पुस्तक वाचून अतुल एका रात्रीत बदलून गेला होता. 'संभ्रम'मध्ये आजूबाजूच्या अंधश्रद्धानवर आघात केले होते. या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतात हे कळलं. एका एका पुस्तकानं एकएका चांगल्या साहित्यानं आपलं आयुष्य होत्याचं नव्हतं. ते अतुलनं अनुभवलं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अनेक व्याख्यानं अतुलनं ऐकली होती. त्यांचे लेख वाचले होते. अतुलची त्यांच्याशी मैत्री झाली. आपल्या मित्राचा असा भर सकाळी रस्त्यात खून होतो याचा त्याला धक्का बसला. आपल्या हातात निषेध करण्यासाठी काय आहे तर ते म्हणजे नाटक! आपण दगडं मारू शकत नाही, विधायक मार्गानं सुद्धा निषेध करता येतो हे गांधीजींनी सांगितलं. सविनय कायदेभंग हे त्याचचं एक उदाहरण. अतुल म्हणाला, तुमची पहिली गोळी असेल तर आमची एक कविता असेल, तुमची दुसरी गोळी असेल तर आमची एक कांदबरी असेल, तुमची तिसरी गोळी असेल तर आमचं एक नाटक असेल आणि तुमची चौथी गोळी असेल तर आमचा एक चित्रपट असेल. ही कलेची ताकद असते. कला म्हणजे नुसती गंमत नसते, तर ती तुमचं जीवन शोषून घेते.
अतुल म्हणाला, 'जळो जिणे लाजिरवाणे, भिक्षापात्र अवलंबणे' हे तुकाराम म्हणतो,' बुडती हे जन न देखवे डोळा' असंही तुकाराम म्हणतो, याच तुकारामाला अभंग लिहिण्याबद्दल शिक्षा म्हणून तेरा दिवसांचा उपवास इंद्रायणीच्या काठी घडवलेला होता. तुकारामांनी ही त्यांच्या अभंगांसाठी चुकवलेली किंमत होती. त्यानंतर ते अभंग तरून वर आले म्हणजेच लोकांनी ते तारले. कारण त्या अंभगांमधून जगण्याचं शहाणपण आणि जीवनाचा दृष्टिकोन होता. पणाला लावल्याशिवाय काही होत नाही. चुकीच्या परंपरांचा त्याविषयी लोकांना जागृत करणं हे दाभोलकर करत होते.
अतुल म्हणाला, विकासाची व्याख्या म्हणजे विवेकाची कास धरलेली समृद्धी. चार पदरी रस्ते आणि मॉल्स म्हणजे विकास नाही. आपण तकर्निष्ठ विचार करतो की नाही हे तपासून बघायला पाहिजे. समाजातला विवेक जागृत करणं हे काम दाभोलकरांनी केलं, तेच काम डॉ. आनंद नाडकर्णी देखील करताहेत. जगण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन असणं खूप महत्वाचं आहे. मनाचे आजार होतात, पण ते बरेही होतात. त्यासाठी बुवा, साधू वैदू यांच्याकडे जाण्याची गरज नाही. असे अनेक विचार अतुलच्या मनात येत राहिले. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूचं दुःख तर झालंच होतं, पण लोकांसमोर त्यांनी केलेल्या गोष्टी आणणंही गरजेचं होतं आणि यातूनच उभं राहिलं ते रिंगण नाट्य! या वेळी अतुल पेठेनं बादल सरकारची, सफदर हाश्मी यांचीही आठवण काढली. त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी, अडचणींविषयी जे काम केलं त्यावर अतुलनं सांगितलं. यानंतर रिंगणनाट्य यातलाही एक प्रसंग पडद्यावर सादर करण्यात आला.
रविवार सकाळचं हे सत्र म्हणजे उपस्थित श्रोत्यांना आपल्याबरोबरच अक्षरशः झपाटून टाकण्याचं होतं. डॉ. आनंद नाडकर्णी काही प्रश्न विचारत होते, त्यावर आपली मतंही मांडत होते आणि त्याच वेळी अतुल हा चौफेर फटकेबाजी करत होता. त्याच्या बोलण्यात उत्स्फूर्तता होती, तळमळ होती, वेदना होती, अस्वस्थता होती आणि मी आयुष्यभर पेरत जाणार हे म्हणण्याची आणि करण्याची ताकदही होती. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी अतुलला नाटक जगणारा माणूस असं म्हणतानाच रंगकर्मी न म्हणता रंगधर्मी असं संबोधन वापरलं.
डॉक्टरांनी अतुलला रॅपिड फायरमध्ये आवडता विचारवंत विचारताच अतुलनं गाडगेमहाराजांचं नाव घेतलं. आवडत्या पुस्तकाविषयी विचारताच 'माझा प्रवास' हे गोडसे भटजींचं पुस्तक सांगितलं. आवडते नाटककार विचारताच विजय तेंडूलकर हे शब्द अतुलच्या तोंडातून बाहेर पडले. आवडता रंगभूमीवरचा मराठी कलाकार म्हणून डॉ. श्रीराम लागू आवडतात, तर भारतीय रंगमंचावरचे नासिरुद्दिन शाह आणि ओम पुरी हेही आवडतात असं अतुलनं सांगितलं. प्रेरणास्थान संत तुकाराम असल्याचं अतुल म्हणाला. नाटकानं मला माणूस म्हणून काय काय शिकवलं या प्रश्नाचं उत्तर देताना ‘आपल्याला माणूस व्हायला शिकवलं’ असं अतुल म्हणाला. मला ज्या गोष्टींचा राग येतो त्या गोष्टीत 'शब्द न पाळणं आणि वेळ न पाळणं' हे उत्तर त्यानं दिलं. नाटक चांगलं झालं की त्याला आनंद होतो. नाटकाव्यतिरिक्त करायची आवडती गोष्ट म्हणजे अतुलला भांडी घासायला आवडतात. जेव्हा मी खूप अस्वस्थ होतो, तेव्हा मी नाटक करतो असं उत्तर अतुलनं दिलं. अस्वस्थतेतूनच नाटक निर्माण होतं. सुखाचं आयुष्य जगता आहातच तुम्ही, चिमटा काढण्यासाठीच नाटक आहे. चांगली कला ही ताकदवान असते, ती राजकीय असते, ती सामाजिक असते. ती विधान करते, ती हादरवते. तुम्हाला परत परत विचार करायला लावते. नेमाडेंची कोसला वाचणं, सत्यजीत रेंचा चित्रपट बघणं, कुमार गंधर्वांचं गाणं ऐकणं या गोष्टींनी आपल्यात नितांत बदल होतात, आणि हेच तर कलेचं सामर्थ्य आहे.
मी एक कलाकार आणि मी एक कार्यकर्ता या दोघांचे नातं काय हा प्रश्न डॉक्टरांनी अतुलला विचारला, तेव्हा ‘मी मूलतः कलाकार आहे, पण कलेचा कार्यकर्ता आहे’ असं उत्तर अतुलनं दिलं. याच वेळी अतुलनं सिनेमा, सिरीयल आणि नाटक यातला फरक सांगितला. सिनेमात तुम्ही आहे त्यापेक्षा मोठे दिसता, तर मालिकेत तुम्ही संकुचित होता. नाटक हे एकमेव असं माध्यम आहे की जे तुम्ही असता, तसे तुम्ही दिसता. एकदा पडदा दूर झाला की इथं कटपेस्ट चालत नाही. शेतकरी जसा शेतात राबतो तसे आम्ही नाटकात राबत असतो असं शेवटी अतुल पोटतिडकीनं म्हणाला. कुठलाही कलाकार त्या कलेमध्ये राबत राहिला तर नवं पीक जोमात येतं. आणि मग त्या दोन पैशातून घेतलेलं फूल तुमच्या मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठी चालना देतं.
डॉक्टर म्हणाले, आपण अस्वस्थ होतो आपल्या संकुचित छोट्याशा जगातल्या गोष्टींबद्दल. आपण अस्वस्थ होतो आपणच संकुचित केलेल्या नात्यांबद्दल. आपला अस्वस्थपणा आणि अतुलचा अस्वस्थपणा यातला मूलभूत फरक म्हणजे आपला अस्वस्थपणा आपल्या स्वकेंद्रिपणामधून येतो, तर अतुलचा अस्वस्थपणा त्याच्या आणि इतरांच्या अपूर्णतांकडे, त्यातल्या विसंगतीकडे, त्यातल्या विषयतेकडे पाहत असताना येतो. अतुलचा अस्वस्थपणा हा सर्जनशील असतो आणि उत्तर शोधणारा असतो. आणि त्याला माध्यम हवं असतं ते त्याच्या जगण्याचा भाग असतं. या व्यक्तीमध्ये नाटक आहे, तो नाटक जगतो आहे. 'अस्वस्थ नाटक जगणारा माणूस आज आपल्याला अतुलच्या रुपात भेटला' असं शेवटी डॉक्टरांनी म्हटलं आणि हे झंझावाती सत्र संपन्न झालं.
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
9545555540
वेध हा उपक्रम डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकारानं सुरू झाला. हळूहळू त्याचा विस्तार महाराष्ट्रभर झाला. पुणे वेधची टीम नेहमीप्रमाणेच याही वेळच्या वेधसाठी गेली सहा महिने झटत होती. दीपक पळशीकर आणि वेध टीम यांच्या परिश्रमाला तोड नाही. तसंच वेध परिवारातले महाराष्ट्रातले वेधचे कार्यकर्तेही पुणे वेधसाठी आवर्जून आले होते. त्यांची उपस्थितीही उत्साह वाढवणारी होती. पुणे वेधची समूहगीत गाणारी टीम तर लाजबाब! आता पुण्याच्या लोकांनाही वेधचे वेध लागलेले असतात आणि एक वेध झाला, की पुढल्या वेधची प्रतीक्षा असते. ही सवय लावणार्या, वेधची सांस्कृतिक-सामाजिक चळवळ जनमानसांत रुजवणार्या, मूल्याधारित जगणं शिकवणार्या, माणसातलं माणूसपण जागं ठेवू पाहणार्या, सुदृढ मनासाठी झटणार्या अशा डॉ. आनंद नाडकर्णी या आनंद पेरणार्या माणसाला आणि त्याच्या टीमला शत: शत: प्रणाम!
Add new comment