मृत्यू : आत्महत्या - इत्यादी दिवाळी २०१८
मृत्यूचं गूढ उकलण्याच्या पहिला प्रयत्न नचिकेतानं केला असं पुराणात म्हटलं गेलंय. या जगात जन्मलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे असं माहीत असलं तरी मृत्यूबद्दलची अनामिक भीती माणसाच्या मनात असते आणि आहे. मृत्यूला स्वीकारण्याची तयारी कोणाचीही सहजासहजी होत नाही. नको असताना घडलेल्या मृत्यूच्या प्रकारात अपघात येतात, दूर्धर आजारपण येतं, खून येतात, हत्या येते आणि आत्महत्याही येते.
१० ऑक्टोबर १९६४ रोजी, वयाच्या ३९व्या वर्षी वसंतकुमार शिवशंकर पदुकोण म्हणजेच एक उत्तम नर्तक (डान्सर, कोरियोग्राफर), एक संवेदनशील लेखक, एक अभिनेता, एक दिग्दर्शक, संगीताची जाण असलेला एक दर्दी आणि एक जगविख्यात दिग्दर्शक गुरुदत्त यानं मध्यरात्री १ वाजता मुंबईत आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली.
गुरुदत्तच्या जीवनात महत्वाच्या अशा तीन व्यक्ती होत्या. त्या म्हणजे त्याची बायको गीता दत्त. पण पुढे गीता दत्तसोबत त्याचे सूर फारसे जुळले नाहीत. दुसरी व्यक्ती म्हणजे त्याचा जिवलग लेखक मित्र अब्रार अल्वी हा ‘आरपार’पासून ते ‘बहारे फिर भी आयेगी’ या सिनेमाच्या पटकथांमध्ये त्याला बरोबरीनं मदत करत असे आणि तिसरी व्यक्ती म्हणजे त्याची प्रेयसी वहिदा रहेमान जिच्याशिवाय त्याला सगळं आयुष्याच अधुरं वाटत होतं, पण आपल्या प्रेमाला तो पूर्णत्वाकडेही नेऊ शकत नव्हता!
गुरुदत्तची ‘कागज के फूल’ ही भारतातली पहिली अत्यंत उत्कृष्ट सिनेमास्कोप फिल्म होती. गीता दत्तच्या आवाजातलं ‘वक्त ने किया’ या गाण्याचाही वापर त्यानं कथेच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं केला त्याला तोड नाही. आजही जगभरात ‘कागज के फूल’ ही एक अद्वितीय कलाकृती म्हणून मानली जाते. मनाची ही असहाय अवस्था त्याला सतत एकाकीपणाकडे नेत असे. प्रेमाला आपण न्याय देऊ शकत नाही याची सतत वाटणारी खंत एकीकडे होतीच, तर त्याच प्रेमाशिवाय आपण जगू शकत नाही अशीही घालमेल दुसरीकडे होती. या ओढाताणीत अत्यंत भाऊक असलेल्या गुरुदत्तला झोपेच्या गोळ्या आणि पिण्याचं व्यसन लागलं आणि त्यातचं त्यानं स्वतःला संपवलं!
‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’...सगळ्या जगाला प्रेमाचा संदेश देणारा मातृहृदयाचा कवी म्हणजे पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी! जगाला प्रेमाचा संदेश देणार्या अशा या व्यक्तीनं एका क्षणी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. ‘मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी’ अशा शब्दात आचार्य अत्रेंनी त्यांच्यावरती मृत्यूलेख लिहून आपली श्रध्दांजली वाहिली होती!
सानेगुरुजींचं संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि कष्टात गेलं. बीए झाल्यावर बरीच वर्ष त्यांनी शिक्षकाचंच काम केलं. त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. तुरंगवास भोगला. गांधीजींनी आखून दिलेल्या कार्यक्रमांचा गावोगाव फिरुन ते प्रचार करत. स्वदेशी, खादी, अस्पृश्यता निवारण, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्वावलंबन आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी ते लोकांशी सभांतून संवाद साधत. शेतकरी आणि कामगार यांच्यावर होणार्या अन्यायाच्या विरोधातही खानदेशात आवाज उठवला. एरव्ही संकोची आणि गोगलगाय असणारे गुरुजी पण व्यासपीठावर चढताच त्यांच्या अंगात वेगळंच स्फुरण संचारे. त्यांची भावनेला साद घालणारी भाषणं ऐकून लोकं प्रभावित होत.
शेवटी भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु फाळणीचं गालबोट लागून ते मिळालं याचं गुरुजींना प्रचंड दुःख झालं. फाळणीमुळं हिंदू-मुस्लिम यांच्यातली वैरभावना वाढली ही खंत गुरुजींना डाचत राहिली. त्यातच गांधीजींची हत्या झाली. गुरुजींनी २१ दिवसाचं उपोषण केलं आणि १९४८ साली मुंबईतच ‘साधना’ हे साप्ताहिक सुरु केलं. गुरुजींनी अफाट लेखन केलं. आत्मकथनपर आणि कादंबर्या, वैचारिक लेख, रविंद्रनाथ टागोर, बेंजामिन फ्रँकलिन, गौतमबुध्द, मुहंमद पैगंबरांपासून ते अनेक थोरांची चरित्रं, मराठीत अनुवादित पुस्तकं, कथा, गोड गोड गोष्टी, आवडत्या गोष्टी, नाटकं, सुंदर पत्रं, संपादित आणि संक्षिप्त साहित्य असा अफाट साहित्याचा ठेवा गुरुजींनी निर्माण केला. गुरुजींना ज्या कल्पना, जी ध्येयं आवडत, ती ती सगळी त्यांनी आपल्या लेखणीतून, साहित्यातून लोकांना दिली. त्यांची ध्येयं जीवनाला विशाल, गंभीर, उत्कट आणि जिवंत बनवणारी असत.
सानेगुरुजीच्या गरजा अत्यंत मर्यादित होत्या. मृत्यूला सामोर जाताना त्यांनी त्या दिवशी शेवटच्या महत्वाच्या दैनंदिन कामासाठी त्यांनी काही चिठ्याही लिहून ठेवल्या. कोणाचं देणं कसे फेडायचं याविषयीच्या बारीक बारीक सूचनाही त्यांनी लिहून ठेवल्या हेात्या. इतकंच नाही तर स्वतःच्या अंतःविधीचा खर्च म्हणून ३० रुपये खिशात ठेवले होते. १० जून १९५० रोजी त्यांनी झोपेचं औषध घेऊन आपलं जीवन संपवलं.
साने गुरुजींसारखी असामान्य व्यक्ती जी दारिद्र्याशी दोन हात करते, अन्यायाविरुध्द झगडते, लहानांपासून मोठ्यांपर्यत सगळ्यांना प्रेमाच्या सूत्रात बांधून जगणं किती सुंदर आहे हे शिकवते आणि तीच एका क्षणी मृत्यूलाही कवटाळते, त्या वेळी, असं का? हा प्रश्न मनात शिल्लक राहतोच.
सानेगुरुजींच्या अनपेक्षित मृत्यूनं जी सुन्नता मनाला आली त्याच आठवणी, त्याच भावना अर्न्स्ट हेमिंग्वे या साहित्यिकाच्या मृत्यूनं जाग्या होतात. १९५४ मध्ये नोबेल पारितोषिकानं गौरवलेला एक जगप्रसिद्ध साहित्यिक म्हणजे अर्न्स्ट हेमिंग्वे! त्याच्या गाजलेल्या साहित्यात ‘द सन आल्सो राईजेस’, ‘ए फेअरवेल टु आर्म्स ', ‘दी ओल्ड मॅन अँड द सी’, ‘फॉर व्हूम द बेल टोल्स ' यांचा समावेश होतो. ‘माणसानं ऐन उमेदीत मरावं’ असं त्यानं जीवन संपवण्यापूर्वी लिहून ठेवलं होतं. सहा फूट उंची, भरदार छाती, पिळदार स्नायू, रुंद खांदे असलेला भारदस्त व्यक्तिमत्वाचा साहसी माणूस! संकटाशी खेळणं, त्याला सामोरं जाणं असं हेमिंग्वेचं मर्दानी व्यक्तिमत्व होतं. तो उत्तम बॉक्सर होता़. पिस्तूल चालवण्यात निपूण होता. तसंच शिकार करण्यातही तो वाक्बगार तर होताच. क्युबा, फ्रान्स आणि स्पेनसारख्या देशांना त्यानं भेटी दिल्या. बुलफाईट त्याचा आवडता खेळ होता.
त्याच्या आयुष्यात डोकावून बघितलं तर तेा अनेक वेळा मरणाच्या दाराशी जाऊन परत आला. आफ्रिकन सफरीमध्ये त्याचं रक्त दूषित झालं होतं. पहिल्या महायुध्दाच्या वेळेस इटलीमध्ये बंदुकीमुळे त्याला बरीच गंभीर जखम झाली होती. स्पॅनिश सिव्हिल वॉर चालू असताना बंदुकीच्या तीन गोळ्या चक्क तो ज्या हॉटेलच्या खोलीत थांबला हेाता तिथे आल्या. तसंच दुसर्या महायुद्धाच्या वेळी ब्लॅकआऊट असताना एका टॅक्सीच्या अपघातात तो जेमतेम वाचला! त्यानंतर विमान दुघर्टनांनाही त्याला सामोरं जावं लागलं. एक विमान दुघर्टना इतकी गंभीर होती की वर्तमानपत्रांनी त्याची मृत्यूची बातमी देऊन त्याला श्रध्दांजलीही वाहिली होती!
स्पर्धात्मक जगणं त्याला नेहमीच आव्हानात्मक वाटे. ‘तोंडात शॉटगनची नळी घालून मी मरेन’ असं तो गंमतीनं आपल्या मित्रांना म्हणायचा. हेमिंग्वेला सतत कुठल्या ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागे. हेपॅटायटिस आणि उच्च रक्तदाबाचा त्याला वारंवार त्रास होत असे. त्याला इलेक्ट्रोशॉक थेरपीही देण्यात आली होती. शेवटी शेवटी तर त्याला वारंवार नैराश्याचे झटके येत असत. अशा अवस्थेत त्यानं अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केले होते.
१९६१ मध्ये हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर त्याचे मानसिक विकार अधिकच बळावले. जुलै महिन्यामध्ये त्यानं रात्रीच्या वेळी बंदूकीची नळी तोंडात धरुन ट्रिगर ओढला आणि आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्या ही जर अनुवंशिक आहे असं मानलं तर हेमिंग्वेच्या कुटुंबात त्याच्या ५७ वर्षाच्या फिजिशियन असणार्या वडिलांनीही पिस्तुल वापरुन स्वतःवर गोळी मारुन घेतली होती. पाचपैकी दोन भावंडं उर्सुला आणि लेस्टर यांनीही स्वतःचं आयुष्य आत्महत्येनंच संपवलं होतं.
अशा प्रकारे स्वतःला गोळी मारुन आत्महत्या करण्याच्या या पध्दतीला ‘एफिशियंट पद्धत’ म्हणतात. याला ‘पुलिंग अ हेमिंग्वे’ किंवा ‘हेमिंग्वे सोल्यूशन’ असं म्हणतात. ५२% आत्महत्यांमध्ये लोक स्वतःच्या तोंडात शॉटगनची नळी ठेवून आत्महत्या करतात असं आढळून आलं आहे.
दुसर्या महायुद्धाची आपत्ती जगावर लोटणारा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर हा जगात सगळ्यात तिरस्कार केला गेलेला माणूस १९३० पर्यंत जर्मनीतही फारसा कुणाला माहीत नव्हता! पण त्यानं अख्ख्या जगाला युध्दाच्या खाईत लोटलं. ज्यूंचा प्रचंड तिरस्कार हिटलरनं केलाच त्याचबरेाबर त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. जर्मनीतले निरपराध ७०% लोक या महायुध्दात मरण पावले आणि कित्येक कोटी लोकांच्या मृत्यूला तो जबाबदार होता.
हिटलरचं आयुष्य बघितलं तर प्रचंड विरोधाभासांनी भरलेलं त्याचं जगणं दिसतं. हिटलरला एक कलाकार, चित्रकार आणि वास्तूविशारद (आर्किटेक्ट) बनायचं होतं. मात्र त्याला प्रवेश मिळू शकला नाही. वयाच्या ५६ वर्षांपैकी तीस वर्षं तो अत्यंत सर्वसाधारण माणसाचं आयुष्य जगला. ३० वर्षांनतर मात्र तो एक प्रभावी वक्ता आणि राजकीय नेता म्हणून ओळखला गेला.
हिटलरला त्याच्या सार्वजनिक आयुष्यात मेळावे, सभा, समारंभ साजरे करण्यास अत्यंत आवडत. अशा कार्यक्रमात तो स्वतः जातीनं लक्ष घाली. असं म्हणतात की तो या कार्यक्रमांत अगदी फुलं आणली आहेत की नाहीत? पासून ते व्यासपीठामागील पडदे कसे असावेत? याविषयी जागरुक असायचा. तो स्वतःला संगीतप्रेमी म्हणवून घ्यायचा. पण प्रत्यक्षात त्याला संगीताची विशेष आस्था नव्हती. मात्र त्याच्या सभांमध्ये, मेळाव्यांत संगीताचा वापर तो जाणीवपूर्वक करीत असे.
त्याला सगळ्याच गोष्टी भव्यदिव्य लागत. वयाच्या १७ व्या वर्षीच जर्मनीतल्या लिंझ नदीवर २७० फूट उंचीचा जगातला वैशिष्ट्यपूर्ण पूल बांधण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्याला बर्लिनमध्ये ९०० फूट उंचीचं सभागृह बांधायचं होतं. ज्यात एकावेळी १ लाख ८० हजार लोक बसतील असं. फ्यूररच्या राजवाड्यासंबंधीही त्यानं असाच भव्य प्लॅन तयार केला होता. या सगळ्या अचाट योजनांविषयी आणि त्यांच्या रचनेविषयी चर्चा करायला त्याला खूपच आवडत असे. रात्री झोप आली नाही की तो या सगळ्या योजनांचे कच्चे आराखडे, रेखाचित्रं काढत बसायचा. एकीकडे युध्दाच्या धावपळीतही त्यानं पंधरा कोटी रुपयांची लिंझमधल्या संग्रहालयासाठी चित्रं विकत घेतली होती तर दुसरीकडे युद्धातल्या विजयानंतर त्यानं युरोपातल्या अनेक देशांमधून चित्रं पळवून आणली होती!
आपलं आयुष्य कमी आहे असं तो कित्येकदा सांगत असे. तो सिगारेट तर सोडाच पण चहा-कॉफीदेखील घेत नसे. वेगवेगळ्या वनस्पतींचे काढे मात्र तो आवर्जून घेई. आपल्याला कॅन्सर होईल अशी भीती त्याला सतत वाटत असे.
सर्व जगाची प्रचंड हानी करणार्या दुसर्या महायुद्धात सुरुवातीलाच जरी जर्मनीचा ठिकठिकाणी विजय झाला असला तरी नंतर हळूहळू सर्वत्र पीछेहाट सुरु झाली. युद्धाच्या अपयशामुळे २२ एप्रिलला हिटलरनं त्याच्या लष्करी अधिकार्यांचीं एक बैठकही घेतली. आपण कधीही बर्लीन सोडणार नाही असं सांगत, आता आत्महत्येशिवाय आपल्याजवळ दुसरा मार्गही नाही असंही त्यानं सांगितलं. ३० एप्रिल १९४५ रोजी दुपारी चार वाजता हिटलरनं ठरवल्याप्रमाणे त्याची प्रेयसी इव्हा ब्राउनसोबत सगळ्यांचा निरोप घेतला. जे विष घ्यायचं त्याचा परिणाम होतो की नाही हे बघायला त्यानं आपला आवडता कुत्रा ब्लाँडी याच्यावर आधी प्रयोग करुन बघितला. एका क्षणात कुत्रा मरण पावल्याची खात्री त्यानं करून घेतली. त्या दिवशीही त्यानं स्वतःची कामं, बैठका घेणं आणि बातम्या ऐकणं सगळं काही व्यवस्थित पार पाडलं. दुपारच्या जेवणानंतर सगळ्यांचा निरोप घेत इव्हानं सायनाईड घेऊन तर हिटलरनं गोळी मारुन स्वतःला संपवलं.
मरण स्वाभाविकरीत्या येणं गोष्ट वेगळी आणि स्वेच्छेनं मरणाला आपलं म्हणणं वेगळं. समाधी घेणं, देहत्याग करणं किंवा आजच्या भाषेत आत्महत्या करणं म्हणजे काय? भारतात आणि एकूणच जगात या स्वतःहून स्वीकारलेल्या मृत्यूबाबत काय विचार होता?
त्रग्वेदानंतरच्या तैत्तिरीय संहितेत आत्महत्येबाबत संदर्भ मिळतात. मनूनं आजारानं त्रस्त असलेल्यांसाठी आयुष्य कसं संपवावं याविषयी सांगितलंय. संन्यास घेतलेल्या व्यक्तीला कोणकोणत्या मार्गानं देहत्याग करता येतो हे यात सांगितलंय. आत्महत्येचा अध्यात्मिक पातळीवरचा विचार भारत देशात सर्वत्र मान्यच होता. कित्येक संतांनी आपलं कार्य पूर्ण झालं आहे असं वाटताच देहत्याग केलाय. आद्य श्रीशंकराचार्य यांनीही देहत्याग केल्याचं उदाहरण सर्वश्रुत आहेच. बंगालमधले गौरांग प्रभू या नावानं प्रसिध्द असलेले वैष्णव धर्माचे प्रचारक यांनी जगन्नाथपुरीला समुद्र पहाताच ‘समुद्र म्हणजेच ईश्वराचं रुप आहे’ असं वाटून त्यात उडी घेऊन स्वतःला ईश्वराच्या जवळ नेलं म्हणजेच स्वतःला संपवलं. संत ज्ञानेश्वरांनी तर आपल्या मोठ्या भावाची-निवृत्तीनाथाची परवानगी घेऊन समाधी घेतली. राजस्थानातली संत मीराबाई, महाराष्टातल्या संत कान्होपात्रा यांनी विषप्राशन करुन देहत्याग केला. एवढंच काय पण संत एकनाथ यांनी इंद्रायणी नदीत ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आता कैचे येणे जाणे, सहज खुंटले बोलणे’ असं म्हणत जलसमाधी घेतली, संत रामदास यांनी आपल्या असंख्य शिष्यांसमोरच अन्नत्याग करुन ईश्वराचं नामस्मरण करीत देहत्याग केला. इंग्रज भारतात येईपर्यंत भारतात सतीची प्रथा पाळली जात होती. सती जाणं म्हणजे नवरा मरण पावल्यानंतर त्याच्या मागोमाग आपणही आपलं जीवन संपवणं होय आणि या प्रथेला हिंदू धर्माची मान्यता होती. ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन रॉय यांनी प्रथम याविरुध्द आवाज उठवून सतीची चाल बंद केली.
बौद्ध आणि जैन धर्माची बरीचशी तत्वं ही समान असूनही बौद्ध धर्मात आत्महत्या करणं वाईट समजलं जातं; त्या उलट जैन धर्मात मात्र आत्मत्यागाचा पुरस्कार केलेला आढळतो. सामान्य माणसानंही आपापल्या परीनं अन्नपाणी वर्ज्य करुन देहत्याग केला तर त्यांना मोक्ष मिळतो या विचारांवर जैनांची श्रद्धा आहे. कॅथॅलिक आणि मुसलमान धर्म आत्महत्येचा धिःकार करतात.
जपानमध्ये ठराविक परिस्थितीत आत्महत्येला मान्यता आहे. ज्या जगण्यानं त्या व्यक्तीला किंवा समाजाचा घोर अपमान होतो असं जगणं जगण्यापेक्षा मेलेलं बरं ही त्यात कल्पना असते. दुसर्या महायुद्धाच्या वेळी जपानमधल्या हजारो गावकर्यांनी आणि सैनिकांनी सार्वजनिक आत्महत्या केल्या.
इतिहासाचा मागोवा घेतला तर अगदी प्राचीन काळापासून लोककथा आणि लोकगीतं यांच्यात मरणाविषयी म्हणजे आत्महत्येविषयीची उदाहरणं आणि उल्लेख ठळकपणे सापडतात. ४००० वर्षापूर्वीच्या इतिहासात इजिप्तमधील एका लोकगीतात आत्महत्येविषयी वाचायला मिळतं. त्या काळी इजिप्तमध्ये आत्महत्या करणं हा कायद्यानं गुन्हा नव्हता. ग्रीसच्या सिओस प्रदेशात तर आजारी आणि दुर्बल, आयुष्याला कंटाळलेल्या व्यक्तींनी आत्महत्त्या करावी याबद्दल प्रोत्साहित केलं जाई. मरणानंतर भूत होऊन त्या व्यक्तीनं कोणाला छळू नये म्हणून तिचं प्रेत गावाच्या बाहेर पुरलं जात असे. असं असलं तरी रोमन साम्राज्यात मात्र सैनिक, गुन्हेगार आणि गुलाम यांना आत्महत्त्या करण्यास बंदी होती. कारण गुलाम आणि सैनिक हे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षणकर्ते असल्यामुळे हा नियम होता. पण नंतरच्या इतिहासात म्हणजेच ४००० वर्षांनी ख्रिश्चन धर्म आकारास आला आणि त्यात आत्महत्या करणं म्हणजे पाप असं मानलं गेलं.
ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिसवर त्याच्या तत्वज्ञानामुळे तरुण पिढीला बिघडवण्याचे अनेक आरोप होते. तिथल्या समाजव्यवस्थेनं त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यानं शांतपणे विष घेतलं. हेगेसियस या तत्ववेत्त्यानं आपत्ती आणि संकटांनी भरलेल्या आयुष्यातून सुटका करुन घ्यायची झाल्यास आत्महत्त्या हा सगळ्यात चांगला उपाय आहे असं म्हटलं होतं. सिसेरो याची व्याख्यानं इतकी प्रभावशाली असत की ती ऐकून अनेक श्रोते चक्क आत्महत्त्या करीत. या कारणामुळे त्याला अलेक्झाड्रिंयामधून हद्दपार केलं गेलं. त्यानंतर २०० वर्षानंतर इजिप्तची राणी क्लिओपात्रा हिनं स्वतः तर आत्महत्त्या केलीच पण त्यापूर्वी तिनं आत्महत्त्या कशी करावी याचं प्रशिक्षण देणारं एक विद्यालय अलेक्झांड्रियामध्ये काढलं होतं!
६व्या शतकात फ्रान्स आणि इंग्लंड या देशांतही आत्महत्त्या करणं हा अतिशय वाईट गुन्हा समजला जाई. १८व्या शतकात माँतेक्यू, रुसो आणि बेन्थॅम या विचारवंतांनी आत्महत्या हा माणसाचा मूलभूत हक्क आहे असं ठामपणे सांगितलं. १७२१ मध्ये माँतेक्यू म्हणतो, ‘दारिद्र्य, चिंता आणि मानहानी यांना मी इतका कंटाळून गेलो होतो की आता दुःखाला विसरण्याचा प्रयत्न म्हणजे आत्महत्या हाच एक उपाय आणि त्यावर बंदी असेल तर याला काय अर्थ?’ ‘माणूस ज्याप्रमाणं घर बांधतो, शेती करतो, समुद्राची सैर करतो हे जसं करायला त्याला मान्यता आहे तर मग आत्महत्या करायला का मान्यता नाही? एखादी व्यक्ती आजारी पडून मरण पावली तर बरं झालं देवाच्या कृपेनं तो सुटला असं माणूस म्हणतो. स्वतःच्या इच्छेनं मरायचं असेल तरीही ती देवाचीच कृपा असं समजायला काय हरकत आहे?’ असं स्कॉटिश तत्वज्ञ डेव्हिड ह्यूम यानं ‘ऑन सुसाईड’ या निबंधात म्हटलंय. मात्र या विचारसरणीला चार्लस् मूर, मादाम द स्ताएल, जॉन लॉक यासारख्या विचारवंतांनी विरोध केला. जर्मन महाकवी गटे यानं ‘सॉरोज ऑफ यंग वेदर’ या कादंबरीत प्रेमानं वेडा झालेला नायक आपल्या मित्राला पत्र लिहून त्यात आपण आत्महत्या करतो आहोत असं लिहिलं आणि मग त्याच काळात युरोपमध्ये कवी, नाटककार आणि चित्रकार यांच्यात आत्महत्या करण्याची जणू लाटच निर्माण झाली असं म्हणतात!
फ्रान्समध्ये तर चक्क आत्महत्येविरुध्दच्या क्रूर कायद्यांची प्रतिक्रिया म्हणून पॅरिसमध्ये एक ‘आत्महत्या मंडळाची’ स्थापना करण्यात आली! या वाढत्या आत्महत्यांची कारणं शोधण्यासाठी मानसशास्त्रज्ञ, संशोधक प्रयत्न करु लागले.
१७६३ मध्ये मेरियन नावाच्या एका फ्रेंच समाजशास्त्रज्ञानं ‘मेमॉयर सुर ले सुसाईड’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात त्यानं माणसाच्या मनाचा तोल गेल्यानंच तो आत्महत्येला प्रवृत्त होतो असं म्हटलंय. तर फ्रेंच शरीरशास्त्रज्ञ ‘प्येर ज्वाँ क्तनाबी’ यानं आपल्या मेंदूमध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त झालं की जीव देण्याची इच्छा निर्माण होते असं सांगितलं. ब्रिटिश मानसशााज्ञ डॉक्टर एल. फोर्ब्स विन्स्लो यांनी १८४० साली लिहिलेल्या ‘दी अॅनॉटामी ऑफ सुसाईड’ या पुस्तकात ज्या लोकांना पोटाचा आणि यकृताचा विकार आहे तीच आत्महत्या करतात पण, चांगल्या मित्रांची सोबत, चांगलं साहित्य वाचणं, प्रवास करणं हे आत्महत्येपासून दूर ठेवतं असं म्हटलंय.
लोकांनी आत्महत्या करु नये; आपला मौल्यवान जीव उगाचंच एखाद्या कारणानं संपवू नये म्हणून युरोपातल्या अनेक डॉक्टरांनी वेगवेगळे उपाय काढले. लिओपोल्ड ऑनबर्गर यानं तर चक्क एक ग्लास थंड पाणी दर तासाला प्यावं म्हणजे आत्महत्या करण्याची इच्छा होणार नाही असं म्हटलं. एकानं तर खारे मासे खावेत किंवा थंड पाण्यात डुबकी मारावी आणि दारु सोडावी असेही उपाय सुचवले.
आत्महत्येची कारणं, त्यामागची सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती, आजुबाजूचं वातावरण यांचा अभ्यास करुन १८७९ साली फ्रेंच समाजशास्त्रज्ञ एमिल दुर्क्हाइम यानं ‘ले सुईसाईड’ या ग्रंथात आत्महत्येविषयी अत्यंत महत्वाचे रीतसर संशोधनात्मक विचार मांडले. आत्महत्या करणार्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येतं. पहिला प्रकार म्हणजे इगोइस्टिक व्यक्ती, या एकलकोंड्या आणि समाजापासून वेगळ्या पडलेल्या असतात, अलटू्रस्टिक प्रकारातल्या व्यक्ती सतत इतरांना मदत करत असतात आणि अॅनोमिक व्यक्ती अचानक काही संकट आलं तर त्या पार घाबरुन जातात आणि आत्महत्या करुन मोकळ्या होतात. वीझ्माँत या फ्रेंच समाजशास्त्रज्ञानं १८३४ ते १८४२ या कालावधीत फ्रान्समध्ये झालेल्या ४५९५ आत्महत्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्याला यामागची काही कारणं लक्षात आली. काहींनी मानसिक रोगांना कंटाळून, काहींनी व्यसनामुळे, काहींनी आजाराला कंटाळून, घरगुती कटकटीला वैतागून आणि प्रेमप्रकरणातल्या अपयशामुळे मृत्यूला जवळ केलं होतं.
काही तज्ज्ञांच्या मते जास्त उष्ण तापमान असणार्या प्रदेशातील लोक आत्महत्येस प्रवृत्त होतात. तसंच काहींच्या मते माणसाचा व्यवसाय हा त्याच्या कृृतीला जबाबदार असतो असं म्हटलंय. म्हणजे धर्मोपदेशक, शिक्षक हे कमी प्रमाणात आत्महत्या करतात; तर कवी, चित्रकार, नट, संगीतकार हे जास्त प्रमाणात आत्महत्या करतात.
युरोप-अमेरिकेत १९९१ साली ‘ डेरेक हंफ्रे याचं ‘फायनल एक्झिट’ या आत्महत्या करु पहाणार्यांसाठी लिहिलेलं पुस्तक प्रचंड प्रमाणात खपलं. कमी द़ृष्टी असलेल्या लोकांना वाचता यावं यासाठी मुद्दाम मोठ्या आकाराच्या फॉन्टमध्ये ते छापलं गेलं. याच वेळी इच्छामरणाची (यूथनेशिया) चळवळही जोर धरु लागली होती.
आत्महत्या करणं हे नैतिक आहे की अनैतिक? यावर अनेक वाद शतकोन्शतकं चालू आहे. पूर्वीच्या ग्रीक समाजात मृत्यूमधल्या डिग्निटीला महत्व होतं. असाध्य रोगानं खूप आजारी असलेल्या माणसांना मरण्याची परवानगी ग्रीक सरकार देई. कित्येकवेळा सरकारी अधिकारीच त्यांना विष देत. आजही नेदरलँडसारख्या पश्चिम य्ाुरोपातल्या देशात आत्महत्या करायला अधिकृतरीत्या परवानगी मिळते. १९९७ साली अमेरिकेतल्या ओरेगॉन राज्यात असाच कायदा करण्यात आला. याला ‘ओरेगॉन’ डेथ विथ डिग्निटी अॅक्ट (ओडीडीए) असं म्हणतात. २००५ साली यावर पुन्हा चर्चा आणि वाद सुरु झाले. हेमलॉक नावाचा एक गट अशा आत्महत्यांचं समर्थन करतो.
मिशिगनमधल्या ‘डॉ. जॅक केव्होर्कियन’ या डॉक्टरनं असाध्य रोगानं त्रस्त अशा १३० लोकांना आत्महत्या करायला मदत केली. मिशिगन राज्यात आत्महत्येला कायदेशीर परवानगी मिळावी म्हणूनही त्यानं प्रयत्न केले. मिशिगन राज्यानं उलट त्याचा प्रॅक्टिस करायचा परवानाच रद्द केला. १९९८ साली तर कहरच झाला. त्यानं एका माणसाला आत्महत्या करायला मदत करतानाच व्हीडीओ शूटिंग केलं आणि ते बीबीएस या वाहिनीवर चक्क ‘सिक्टी मिनिट्स’ या प्रसिध्द कार्यक्रमात सगळ्यांना दाखवलं. यानंतर मात्र सरकारनं त्याला अटक केली अिाण त्याच्यावर खटला भरुन त्याला २५ वर्षांची कैद ठोठावली!
फ्रान्स, फिनलँड, इटली, आस्ट्रिया येथील सरकारचा आत्महत्येला विरोध होता, तर जपानमध्ये तर पूर्वी आत्महत्येला एक राष्ट्रीय प्रतिष्ठा होती. त्याला ‘हाराकिरी’ असं म्हणत. हाराकिरी म्हणजे पोट फाडणे असा अर्थ होय. पुरातन काळात जपानमधले सैनिक युध्दात पराजित झाल्यावर शत्रूच्या तावडीत सापडू नये म्हणून आत्महत्या करीत. याला ‘सेपुकू’ असं म्हणत. जपानमधले त्याकाळातले सरंजामदार किंवा सरदार होते त्यांना ‘सामुराई’ असं संबोधन होतं. या सामुराईंना सेपुकू करण्याचा बहुमान असे. स्वाभिमानानं मृत्यू स्वीकारण्यासाठी हे सामुराई सेपुकू करत. सेपुकू करताना एक साक्षीदार आणि एक मदतनीस यांची आवश्यकता असे. पोटाला दोन चिरा घेताच मदतनीसानं एका घावात सेपुकू करणार्याचं डोक क्षणार्धात उडवायचं असे. सेपुकू अत्यंत उघडपणे केली जाई. स्त्रियादेखील सेपुकू करत. सेपुकू होताच शत्रू देखील मानवंदना देत. १८७३ साली कायद्यानं जपानमध्ये ही सेपुकू पध्दत बंद केली. अर्थातच जपानमधल्या अनेक प्रदेशात ती त्यानंतरही काही वर्ष चालूच राहिली.
‘एक गंभीर फिलॉसॉफीकल प्रश्न म्हणजे आत्महत्या आहे’ असं जगविख्यात थोर लेखक अल्बर्ट कामू म्हणतो, ‘ जे जगण्यासाठी उत्कट कारण असतं तेच कारण त्याच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरु शकतं (‘व्हाट इज कॉलड् अ रिझन फॉर लिव्हिंग इज आल्सो अॅन एक्सलंट रिझन फॉर डाईंग’)’.
मोठ्यांमध्येच नव्हे, तर आता मात्र मुलांमध्येही आत्महत्येचं प्रमाण वाढताना दिसत आहे. आई-वडिलांच्या प्रेमाचा अभाव, वाढते घटस्फोट, कुटुंबात सतत होणारी भांडणं, स्पर्धेचं वातावरण, तुलना, पालकांच्या महत्वाकांक्षेचे बळी, घरातील व्यसनाधिनता आणि गरिबी या कारणांमुळे ही मुलं आत्महत्या करण्यास प्रवृत्त होताना दिसतात.
घोरनैराश्य आणि आत्महत्या यांचा खूप जवळचा संबंध आहे. ४०ते ६०% लोक नैराश्याच्या तीव्र झटक्यानंतर आत्महत्या करतात. पण आश्चर्य हे की ज्यावेळी या झटक्यातून ते हळुहळू बाहेर येऊ लागतात त्याचवेळी ते आत्महत्या करतात. एखाद्याला नैराश्याचा त्रास सुरु झाल्यावर त्याच वर्षी तो आत्महत्या करेल याची शक्यता जरी १% असली तरी ज्याला आयुष्यभर नैराश्यानं ग्रासलंय अशी व्यक्ती आत्महत्या करण्याची शक्यता १५% असते. नैराश्यानं ग्रासलेला माणूस आत्महत्या करण्याची शक्यता ही नैराश्य नसलेल्या माणसांनी आत्महत्या करण्याच्या शक्यतेच्या ५० पट असते. जो आत्महत्या करतो त्यातल्या ९०% लोकांना कुठल्या ना कुठल्यातरी मानसिक व्याधीनं ग्रासलेलं असतं.
आत्महत्या करण्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण तुलनेत कमी असल्याचंही आढळून आलंय. युरोप खंडात तरुण वयात आत्महत्या करणार्या पाच पुरुषांमागे एक स्त्री तर प्रौढ वयात आत्महत्या करणार्या दहा पुरुषांमागे एक स्त्री असं प्रमाण आहे. याचा शोध घेताना मानसशास्त्रज्ञांना जी कारणं आढळली त्यात जीवशास्त्रीय कारणही आहेच! अमेरिकेत प्रत्येक वर्षी साधारणतः ३२००० लोक आत्महत्या करतात आणि १५०० आत्महत्या अयशस्वी होतात. सरासरी रोज ८० लोक आत्महत्या करतात असं हे प्रमाण आहे.
जागतिक संघटनेच्या अहवालानुसार जगात दररोज १००० माणसं आत्महत्या करतात. डेन्मार्क आणि स्वीडन हे देश आत्महत्येत पहिल्या क्रमांकावर आहेत. भारतात सर्वाधिक आत्महत्या प. बंगालमध्ये होतात आणि शहरांचा विचार केल्यास चेन्नईचा पहिला नम्बर लागतो; त्यानंतर मुंबई आणि तिसर्या नम्बरवर दिल्ली आहे.
पाश्चिमात्य जगात मृत्यू होण्याची सगळ्यात मोठी १० कारणं बघितली तर त्यात आत्महत्येचा नम्बर खूप वरचा लागतो. अमेरिकेत तो ८वा किंवा ९वा लागतो. २००० सालानंतरच्या दशकात सर्वसाधारपणे अमेरिकेत हे प्रमाण दरवर्षी ३१०००च्या वर म्हणजेच दररोज ८५च्या वर एवढं होतं. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे अनेक आत्महत्या या आत्महत्या म्हणून नोंदवल्याच जात नाहीत. खरं आत्महत्येचं प्रमाण हे वर दिलेल्या आकड्यांच्या दुप्पट किंवा चौपट आहे असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे दररोज फक्त अमेरिकेत साधारण १७० ते ३४० म्हणजेच दर तासाला साधारण ७ ते १४ किंवा दर दहा किंवा वीस मिनिटाला एक! यापुढची धक्कादायक गोष्ट ही की सर्वसाधारपणे दरवर्षी ५ लाख लोक आत्महत्येचे प्रयत्न करतात. म्हणजेच दररोज १३७० लोक म्हणजेच दरतासाला ५७ म्हणजेच दर मिनिटाला एक!
जगातलं आत्महत्येचं प्रमाण सगळ्यात जास्त जर असेल तर ते हंगेरीत. दर लाख लोकांमागे ४० असं हे प्रमाण आहे. स्विर्त्झलंड, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क, ऑस्ट्रिया आणि जर्मनी या युरोपातल्या देशात ते दर लाखांमागे २० एवढं आहे. ग्रीस, चीन, इटली आणि इंग्लंडमध्ये मात्र ते दरलाखांमागे ९ एवढं कमी आहे.
पण ही झाली फक्त आकडेवारी. प्रत्यक्ष आत्महत्येत दडलेला प्रचंड मानसिक ताण आणि आक्रोश हा आपल्याला या आकड्यातून दिसणार किंवा ऐकू येणार नाही. आत्महत्या करणारी बहुताशीं सर्व माणसं बराच काळ द्विधा अवस्थेत असतात. ज्या क्षणी ती एकटी असतात आणि प्रचंड मानसिक नैराश्य, चिंता आणि ताणतणाव यातून जात असतात तेव्हाच ते हा अतिशय कठोर निर्णय घेतात. यातला वाईट भाग असा की आत्महत्या करणार्या कित्येकांना खरं म्हणजे मरायचं नसतं. आपल्या नंतर मागे रहाणार्यांचं काय होईल याची चिंता त्यांना भेडसावत असते.
एकेकाळी २५ ते ४४ या वयोगटातल्या माणसांमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे असं मानलं जायचं. पण आता हेच प्रमाण १८ ते २४ या वयोगटातल्या मुलांमध्ये सर्वाधिक असल्याचं आढळलं आहे. धक्कादायक गोष्ट ही की ५ ते १४ या वयोगटातल्या मुलांमध्येही हे प्रमाण आज १९८१ सालापासून प्रचंड प्रमाणात वाढलंय. अमेरिकेत आत्महत्या करण्याची शक्यता स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा तीप्पट जास्त असते. तसंच घटस्फोटित माणसांमध्ये हे प्रमाण इतरांपेक्षा जास्त आढळलंय. अमेरिकेत १९३० सालानंतर जेव्हा निवृत्तीवेतन आणि आरोग्य यांच्यासारख्या कल्याणकारी योजना अमंलात आणल्या गेल्या तेव्हा वृद्धांमधलं आत्महत्येचं प्रमाण कमी कमी होत गेलं. पण १९८०-१९९०च्या दशकात नवउदारमतवादी धोरणांमुळे जेव्हा कल्याणकारी योजना कमी कमी होत गेल्या तसंतसं हे प्रमाण पुन्हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढत गेलं.
जे लोक आत्महत्येची धमकी देतात ते खरंच तसं करत नाहीत अशी एक चुकीची समजूत आहे. एका अभ्यासात आत्महत्या करणार्यांपैकी ४०% लोकांनी तसं करण्याची इच्छा दर्शवली होती. आत्महत्येपूर्वी साधारणपणे १५-२०% लोकांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठ्यांचाही सखोल अभ्यास झाला आहे. त्यात कित्येकदा असफल प्रेम, आर्थिक अपयश अशा अनेक कारणांचा उल्लेख असतो. आत्महत्येसाठी घोर नैराश्याशिवाय झोप न येणं, व्यसनाधीन होणं, बेकारी, प्रचंड चिंता आणि तणाव, असाध्य रोग, आर्थिक अरिष्ट अशी अनेक कारणं असतात. एकूणच आय्ाुष्यात आता काही अर्थ राहिलेला नाहीये अशी भावना यामध्ये प्रामुख्यानं असते.
विसाव्या शतकात जगभरात आत्महत्येचं प्रमाण खूपच वाढलंय. त्याचं एक कारण म्हणजे विज्ञानाच्या प्रगतीमुळे मृत्यू सोपा झाला आहे. विहिरीत उडी मारुन जीव देणं, गळफास लावणं, स्वतःवर गोळी झाडून घेणं, जाळून घेणं, विषप्राशन करणं, रेल्वेखाली किंवा रस्त्यावर भरधाव वाहनाखाली जीव देणं, हाताची नस कापून घेणं असे अनेक आत्महत्येचे प्रकार आपल्याला सिनेमातून, टीव्हीच्या माध्यमातून, वर्तमानपत्रांच्या रोजच्या बातम्यांतून वाचायला आणि ऐकायला मिळतात.
मानसिक हतबलता आली आत्महत्येचे विचार माणसाच्या मनात घोळू लागतात. असं मदुराईच्या ‘इंटरनॅशनल कॉलेज ऑफ फिजिऑलॉजिकल सायन्सेस’नं भरवलेल्या परिषदेत असं मांडण्यात आलं. अशा व्यक्तीच्या रक्तात सोडिअमचं प्रमाण वाढलेलं दिसतं. थोडक्यात माणसाच्या रक्ताची तपासणी केली असता सोडियमच्या वाढलेल्या प्रमाणावरुन त्याच्या मनात कसले विचार चालू आहेत याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
संशोधकांनी अनेक आत्महत्या करणार्यांच्या जीवनपटाचा सखोल अभ्यास केला. आत्महत्येची कहाणी लहानपणापासूनच चालू होते असं त्यांच्या लक्षात आलं. तसंच अनेकांच्या कुटुंबात कित्येकांना लहानपणी नीट वागवलं गेलं नव्हतं, तर कित्येकजणांच्या कुटुंबात एकूणच मानसिक अस्थैर्य होतं. स्वतःविषयचीचा अभिमान, आत्मविश्वास-थोडक्यात सेल्फ-एस्टिम ही अनेकांची खूपच खालावलेली होती. आत्महत्या करणार्या कित्येकांमध्ये जेनेटिक संदर्भ सापडले. तसंच आत्महत्या करणार्यांचया मेंदूतला सीरोटोनिन हा न्यूरोट्रान्समीटर नीटपणे काम करत नव्हता. मेंदूतली सीरोटोनिनची पातळी अशा माणसांमधली कमी झाली होती.
नैराश्याचा आत्महत्येशी बराच जवळचा संबंध आहे. तसंच वय आणि आत्महत्या यांचाही परस्पर संबंध आहेच. आत्महत्येला नैराश्याबरोबरच इतर अनेक घटक जबाबदार असतात हे आता अलिकडल्या संशोधनावरुन सिद्ध झालंय. आत्महत्येचा संबंध हा सायकॉलॉजिकल डिसऑर्डरशी संबंधित असतो. नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी अॅटिडिपे्रसिव्ह टॅबलेट्स रुग्णाला दिल्या जातात. तसंच सायकोथेरपीचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. अशा विकारांनी त्रस्त असलेली व्यक्तीच्या मनात आपण कुणाला आवडत नाही, आपली कुणालाही गरज नाही, आपल्याला कुणी समजून घेत नाही या प्रकारचे नकारात्मक विचार मनात येत असतात. अशा वेळी या व्यक्तींकडे दूर्लक्ष करून चालत नाही. ‘कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी’ हा यावरचा उत्तम उपाय समजला जातो.
भारतीय लोकमानसावर धार्मिक आणि अध्यात्मिक संस्कारांचा प्रचंड प्रमाणात प्रभाव असल्यामुळे तसंच स्थिर कौटुंबिक जीवन आणि मूल्यांवर आधारित जीवनशैली असल्यामुळे जगाच्या तुलनेत भारतात आत्महत्यांचं प्रमाण कमी आहे. आय्ाुष्यात खचून जाण्यासारखे अनेक प्रसंग प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येतात पण ही जीवनमूल्यं त्याला सुरक्षिततेची हमी कुठेतरी देत असतात. पण निसर्गाऐवजी चहुबाजूला टोलेजंग इमारती, धकाधकीचं आय्ाुष्य, प्रचंड जीवघेणी स्पर्धा, गर्दीतही भासणारं एकाकीपण, एलिनेशन अशा सगळ्यांमुळे भारतातही आता आता आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय.
आत्महत्या कशी टाळता येईल? हा आजच्या समाजासमोरचा मोठा प्रश्नच आहे. आजच्या खूप अस्थिर, प्रचंड विषमता निर्माण करणार्या, अतोनात स्पर्धा करायला लावणार्या चंगळवादी समाजात मनोविकारांचं आणि आत्महत्यांचं प्रमाण खूपच वाढलंय. ही समाजव्यवस्था बदलली नाही तर हे आत्महत्यांचं प्रमाणही कमी होणं शक्य नाही. तसंच याच अर्थव्यवस्थेत शेतकर्यांची गरिबी भयानक पटीनं वाढल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करताहेत. ही आर्थिक परिस्थिती बदलल्याशिवाय या आत्महत्याही थांबणार नाहीत. या व्यवस्थेत बेकारी प्रचंड असल्यामुळे तेवढ्याच नोकर्यांसाठी अनेक पटीनं अर्ज येतात, त्यामुळे अर्ध्या अर्ध्या, एक एक मार्कांसाठी विद्यार्थी धडपडतात, भांडतात. या सगळ्या ताणतणावांमुळे अनेक विद्यार्थीही आता आत्महत्या करायला लागले आहेत. ही शिक्षण आणि अर्थव्यवस्था बदलल्याशिवाय या आत्महत्या थांबणार नाहीत हेही उघड आहे. पण तरीही आत्महत्या करणार्यांशी सतत बोलून, त्याला धीर देऊन आत्महत्या थोड्या का होईना पण कमी करता येतात असा अनुभव आहे. यामुळे अलिकडे पाश्चिमात्य जगात आणि भारतातही २४ तास उघडी अशी अनेक सल्ला देणारी केंद्रं निघाली आहेत. आत्महत्येचे विचार डोक्यात आलेल्या कोणी जर या केंद्रात फोन केला, तर अशा लोकांशी टेलिफोनवर बोलणं, त्यांना धीर देणं हे काम या केंद्रातून होत असतं.
समृध्द निसर्गाचं सानिध्यही माणसाला सकारात्मक विचारांनी प्रेरित करतं आणि मृत्यूच्या विचारांपासून रोखण्यास मदत करतं. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राखत, निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर मृत्यूचा विचार माणसाला दूर ठेवेल हे मात्र निश्चित!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment