स्पेस 

स्पेस 

‘गिव्ह मी सम सनशाईन, 
गिव्ह मी सम रेन, 
गिव्ह मी अनादर चान्स, 
आय वन्ना ग्रो अप वन्स अगेन..

आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या गाजलेल्या चित्रपटातल्या ’ स्वानंद किरकिरे यानं लिहिलेल्या या गाण्यात एका निराश युवानं त्याची स्पेस मागितली आहे. तो पुढे म्हणतो,

‘सारी उम्र हम मरमरके जी लिए, 
एक पल तो अब हमे जीने दो़, 
जीने दो..’ 

ही ‘स्पेस’ म्हणजे नेमकं काय?
एखाद्याला आपली ‘स्पेस’ मिळणं म्हणजेच खर्‍या अर्थानं ‘आपल्याला पाहिजे ते करता येणं’. आजकाल वृद्ध असोत वा तरुण वर्ग, नोकरदार वर्ग असो वा गृहिणी सगळ्यांनाच आपली स्पेस कमी होतेय असं वाटतंय. यातूनच मग अनेक वाद,  भांडण-तंटे झालेले आणि बरीच वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक अरिष्टं आलेली आपण रोज पाहतो. 

आजकाल सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर वगैरे माध्यमांवर सर्वच वयोगटातले लोक एकीकडे व्यक्त होताना बघायला मिळतात, पण त्याच वेळी आपल्याला पुरेशी प्रायव्हसी मिळत नसल्याची खंतही ते व्यक्त करताना दिसतात. ही प्रायव्हसी किंवा स्पेस म्हणजे काय, ती का मिळत नाहीये, ती मिळणं किती गरजेचं आहे असे अनेक प्रश्न समोर आहेत. सध्याच्या व्यवस्थेत विभक्त कुटुंबपद्धतीत 'हम दो हमारा एक' अशी अवस्था सरसकट दिसत असताना नवरा-बायको दिवसभर कामाला जुंपलेली असतात आणि त्यांचा मुलगा किंवा मुलगी हे त्यांचं शिक्षण, खाजगी क्लासेस यामध्ये गुंतलेली असतात. या सगळ्या परिस्थितीत प्रत्येकाला आपापल्या स्तरावर एकटेपणाची सवयही लागलेली दिसते. हीच सवय कायम राहावी असं त्यांना हळूहळू वाटायला लागतं. 

त्यातच आज प्रत्येक गोष्ट सहजपणे उपलब्ध होत आहे. तुम्हाला हवं ते ऑनलाईन मिळण्याची सोय झाली आहे. तसंच काही शिकायचं असेल, कुठली माहिती मिळवायची असेल तर इंटरनेटच्या माध्यमातून तेही सहजसोपं झालं आहे. चित्रपट बघण्यासाठी अनेक चॅनेल्स सुविधा करून उभे आहेत. किंवा ऑनलाईन तिकिटाची सोय देखील सहज उपलब्ध आहे. पुस्तकं वाचण्यासाठी ती ई-बुक्स माध्यमातून आहेत तसंच ती घरपोच खरेदी करण्याचीही सोय आहे. असं असताना त्याला किंवा तिला या स्पेसमध्ये कोणी मध्ये आलं तर तो फार मोठा अडथळा वाटायला लागला आहे. 

तसंच मुलांजवळ आज मोबाईल फोन आहे, पालकांजवळही मोबाईल आहे. पूर्वी घरात एक टेलिफोन असायचा. प्रत्येकाजवळ स्वतंत्र फोन नसायचा. त्यामुळे घरात असलेला टेलिफोन वाजायला लागला की घरातली कुठलीही व्यक्ती तो उचलत असायची आणि काहीतरी संवाद करून ज्याच्यासाठी तो फोन आला आहे त्याला निरोप देत असायची. कित्येकदा शेजार्‍यापाजार्‍यांचेही फोन येत असत. नेहमी येणार्‍या फोनवर त्या घरातली मंडळीही ओळख झाल्याप्रमाणे बोलत असे. पण आज मोबाईलक्रांतीमुळे कोणाचा मोबाईल वाजला तरी तो दुसर्‍यानं उचलणं म्हणजे अनैतिक समजलं जातं. इतकंच काय, पण नवर्‍याचा फोन वाजला तरी त्याची बायको देखील तो उचलत नाही किंबहुना तो उचललेला समोरच्याला चालत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपण कोणाजवळ किती आणि काय व्यक्त करायचं ही मुभा मिळत आहे, पण त्याचबरोबर त्यांच्यातलं अंतरही वाढत आहे!

आज सोशल मीडियामुळे मुलंमुली आपापली स्पेस मिळवताना दिसताहेत. फेसबुक असो, ई-मेल असो वा मोबाईल प्रत्येकाला त्या त्या गोष्टींसाठी पासवर्ड हवाच असतो. माझ्या गोष्टी माझ्याशिवाय कोणीही बघू नयेत अशी त्याची किंवा तिची इच्छा असते. अशा वेळी त्यांना आपल्या पालकांचा अडथळा नको वाटतो. त्यातच पालक जास्तच जागरूकपणे मुलांकडे सतत लक्ष देत असतील तर अनेकांना ती कटकट वाटायला लागते. मग यावर उपाय म्हणून मुलं सरळ आपल्या पालकांना फेसबुक किंवा तत्सम साईटवरून ब्लॉक करून टाकतात. 

तसंच पूर्वी घरातली साफसफाई व्हायची तेव्हा कुटुंबातले सगळेच जण हिरिरीनं पुढे येऊन कामं करत. आता मात्र सुट्टीच्या दिवशी पालक मुलांच्या खोलीत शिरून जर पसारा आवरायला लागले, तर मुलं ‘ए आई माझ्या वस्तूला हात लावत जाऊ नकोस बरं.’ असं सर्रास सांगतात. आपण किती वेळ बाहेर होतो, कोणाबरोबर होतो, कधी येणार अशा प्रश्नांची उत्तरं देत बसणं म्हणजे आपल्या स्पेस वर अतिक्रमण आहे असं मुलांना वाटायला लागतं. पालकांनी अति लक्ष देणं त्यांना आवडत नाही. या प्रत्येकाच्या स्पेसमुळे, प्रायव्हसीमुळे अनेकदा एकमेकांचं काय सुरू आहे याची माहितीच एकमेकांना नसते. अनेकदा मुलं आत्महत्या करतात, तेव्हा नेमकं कारण पालकांनाही कळत नाही. अशा वेळी इतरांना ते कळणं तर दूरच. स्पेसच्या नादात आपल्यातला संवाद हरवत चाललाय. तसंच या संवादासाठी एकमेकांना वेळ देण्याची गरजही एकमेकांना वाटेनाशी झालीय. 

त्याच वेळी दुसरीकडे मोठ्यांपासून लहानांपर्यंत आपली स्पेस कमी होतेय अशी खंत ऐकायला मिळतेय. स्पेस कमी होण्याची चार मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे ‘जनरेशन गॅप’, दुसरं म्हणजे ‘वेळेचा अभाव’, तिसरं म्हणजे ‘प्रत्यक्ष जागेचा अभाव’ आणि चौथं आणि सगळ्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ‘आपल्या मनातलीच स्पेस कमी होणं’ किंवा ‘आपणच आपलं स्वत्व गमावणं’.   
अ‍ॅल्विन टॉफ्लरच्या मते इतिहासाचे शेती, उद्योग आणि सेवा असे तीन महत्त्वाचे टप्पे पडतात. शेतीचा टप्पा अनेक सहाकं, उद्योगाचा टप्पा काही शतकं, तर सेवेचा टप्पा म्हणजे अलीकडली काही दशकं एवढाच होता. पूर्वीच्या शेतीच्या टप्प्यात तंत्रज्ञान फारसं नव्हतंच. शेती उत्पादन हे फक्त शेतीतल्या अनुभवावरच अवलंबून असल्यामुळे चार पावसाळे बघणं यालाच महत्व होतं. यामुळेच एकत्र कुटुंब पद्धतीत मोठ्यांचा आणि वयस्कर मंडळींचा मान राखणं, वाकून नमस्कार करणं या पद्धती रुढ झाल्या. त्यांना सामाजिक, आर्थिक संदर्भ होता. 

पुढच्या औद्योगिक आणि नंतरच्या सेवेच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात हे सगळं बदललं. तंत्रज्ञान एवढं झपाट्यानं बदललं की वयाला मान राहिला नाही. उलट जितकं तरुण आणि टेक्नो-सॅव्ही तितकं चांगलं असंच समीकरण बनलं. यामुळे  वेगवेगळ्या पिढ्यांची स्वप्नं, जीवनशैली आणि मूल्यं यात प्रचंड फरक पडायला लागला आणि मग वेगवेगळ्या पिढ्यांत आपल्या इच्छा (उदा. वेळेवर घरी येणं, कुटुंबासाठी वेळ काढणं...) इतरांवर लादत असल्यासारखं वाटायला लागलं आणि मग या ‘स्पेस’वर अतिक्रमण झाल्यासारखं वाटायला लागलं.  

दुसरं कारण म्हणजे चक्क वेळेचा अभाव. आजच्या प्रचंड जीवघेण्या स्पर्धेच्या जगात आपल्याला महत्वाकांक्षेचे धडे दिले जाताहेत; पैसा आणि प्रसिद्धी मिळवणं, सीईओ होणं म्हणजे चांगलं, उच्च ध्येय ठेवणं वगैरे गोष्टींचा मारा होत असल्यामुळे एका बाजूला भयानक बेकारी असली तरी दुसरीकडे ज्यांना काम आहे ते २४/७/३६५ काम करताहेत; रोज रात्री ११-१२ वाजता घरी येताहेत आणि त्यामुळे स्वतःसाठी आणि इतरांसाठी वेळ देता न आल्यामुळे स्वतःसाठी आणि इतरांसाठी असणारी ‘स्पेस’ गमावताहेत आणि वाईट हे की या सगळ्यांची गरज नाहीये. आजचं उत्पादन हे एकतर बेकारी आणि प्रदूषण वाढवणारं आणि मूठभरांच्याच नफ्याकरता असतं आणि शिवाय त्यातला खूप मोठा भाग हा की मद्यं, सिगारेट्स, शीतपेयं, सौंदर्यप्रसाधनं आणि इतर अनेक अनावश्यक चैनीच्या वस्तू किंवा विनाशकारक, घातक युद्धसामग्री बनवण्यासाठीच असतो. जर समाजाला उपयोगी, टिकाऊ आणि आवश्यक असंच उत्पादन केलं, आपली ‘यूज अँड थ्रो’ची सतत वस्तूंचा साठा आणि बदल करणारी चंगळवादी संस्कृती बदलली तर फक्त ९ ते ४ असे आठवड्यातले चार दिवसही काम करुन जगातले सगळेजण व्यवस्थितपणे, सुखानं जगू शकतील एवढी साधनं - एवढे रिसोर्सेस खरं तर जगात आहेत असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. पण आजच्या युद्धखोर, नफेखोर, चंगळवादी, विषम आणि पर्यावरणनाशक विकासनीतित हे शक्य नाही.  

हा ‘वेळ’ जर मिळाला, तर आपण खर्‍या मित्रांबरोबर (बिझिनेसमधल्या हेतुपुरःस्सर केलेल्या आजकालच्या मित्रांबरेाबर नाही!) जास्त वेळ काढू शकू आणि संगीत, साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा, वाचन यामध्ये चांगला वेळ घालवून एक मानवतावादी, विवेकवादी, सुसंस्कृत आणि समृद्ध आयुष्य जगू शकू. यामुळेच खरं तर आपण स्वतः आपल्याला आणि इतरांना ‘स्पेस’ देऊ शकू. 

तिसरं कारण म्हणजे चक्क जागा. काही उच्च मध्यमवर्गियांचे आणि श्रीमंतांचे बंगले आणि फ्लॅट्स सोडले तर भारतातल्या ७०-८० % लोकांना एकमेकांना ‘स्पेस’ द्यायला खरीखरी जागा हवी की नको? मुंबईतही ७०% जनता झोपडपट्टीत किंवा फारफार तर चाळीत रहाते. कित्येक वेळा एका खेालीत आजी, आजोबा, आई-वडील आणि त्यांची मुलं, त्यांच्या बायका आणि पुन्हा त्यांची मुलं अशी डझनावारी माणसं आळीपाळीनं झोपून एकमेकांना खरीखुरी ‘स्पेस’ आणि प्रायव्हसी फक्त काहीच तास किंवा मिनिटं देऊ शकत असतील तर कुठल्या स्पेसच्या गप्पा आपण मारणार? 

पण या सगळ्यात महत्त्वाची आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण आपल्याला स्वतःला ‘स्पेस’ द्यायची असेल तर आपल्याला खर्‍या अर्थानं स्वतःसाठी जगायला हवं. लहानपणापासूनचे पालकांचे आणि समाजाचे ‘संस्कार’ आणि त्यानंतर प्रस्थापितानं  आपल्यावर जाहिराती आणि इतर गोष्टींचा भडिमार यातून आपल्याला सतत आपली अपेक्षित वागणूक काय आहे याविषयी ठसवलं जातं. आपण कुठली टूथ पेस्ट वापरतो, (सगळेजणं अमुक अमुक वापरतात; तुम्ही नाही? किती मूर्ख आहात?) कुठले कपडे घालतो, कुठे कसं वागतो, कुठचं संगीत  आपल्याला आवडायला पाहिजे, कुठे खाल्लं किंवा मित्रांना भेटलं पाहिजे (मॅकडी किंवा सीसीडीत पडीत असणं म्हणजे चांगलं..), कुठली मोटारगाडी चांगली..इतकंच नव्हे तर जीवनातली मूल्यं (श्रीमंत आणि प्रसिद्ध असणं सगळ्यात चांगलं..) आणि आपली राजकीय मतं या सगळ्या गोष्टी या व्यवस्थेत ती व्यवस्था टिकून राहील अशाच बनवलेल्या असतात. त्यातल्या बंडखोरीच्या मर्यादाही घालून दिलेल्या असतात. (फार फार गाण्यात कुमार गंधर्व ऐकणं किंवा तो कोण हे माहीत नसताना चे गव्हेराचे टी-शर्ट्स घालणं वगैरे). या सगळ्यातून तुम्ही स्वत्व गमावून बसता. आपण इतरांच्या अपेक्षेप्रमाणे आणि त्यांना काय चांगलं वाटेल त्याप्रमाणेच वागायला लागतो. आपल्याला आपण कमी पडतोय असं वाटणं म्हणजे न्यूनगंड नव्हे, तर आपण कमी पडतोय असं इतरांना वाटतंय असं आपल्याला वाटतंय म्हणजे न्यूनगंड अशीच मग आपल्याला व्याख्या करावी लागते. इतरांच्या अपेक्षेप्रमाणे समाजातल्या पठडीतले होतो आणि स्वतःची इंडिव्हिज्युऍलिटी गमावतो आणि खर्‍या अर्थानं स्वत्व आणि स्वातंत्र्य गमावतो असं एरिक फ्रॉम म्हणतो. हे आपल्या स्वतःच्या ‘स्पेस’ वरचं सगळ्यात मोठं अतिक्रमण आहे पण आपल्याला ते लक्षातच येत नाही. आपल्याला आपण ‘स्वतंत्रच’ आहोत असं वाटत राहतं,  पण ते खरं नसतं आणि त्यामुळे जरी दुसरी पिढी लुडबुडायला नसेल, वेळ भरपूर असेल आणि जागा मोठी असेल, तरीही जर आपण आपलेच राहिलो नसलो तर आपण आपल्याला स्वतःला खरंच जे हवंय ते काय करु शकणार? 

जेव्हा आपण खर्‍या अर्थानं स्वतंत्र होऊ, स्वतःला सापडू, खर्‍या अर्थानं स्वतःसाठी जगायला लागू, तेव्हा आणि इतरही वेळ, स्थळ अशी ‘स्पेस’ नष्ट करणारी कारणं दूर होतील तेव्हाच आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी खर्‍या अर्थानं ‘स्पेस’ निर्माण करू हे निश्चितच!

‘प्रेम करा, पण त्या प्रेमावर बंधन, नियम आणि अटी लादू नका. मृत्यूनं हाक देईपर्यंतचं जीवन खूप आनंदानं एकत्र येऊन जगा, पण त्या एकत्रपणातही तुमची स्वतःची एक स्पेस हवीच’. खलील जिब्रॉनसारखा महान तत्ववेत्ता प्रेमाविषयी आणि त्यासंबंधीच्या ‘स्पेस’ विषयी नेमकं भाष्य करुन जातो.  

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.