विवाहसंस्था: काल, आज आणि उद्या
एका लोककथेप्रमाणे ‘ती’ पिंजऱ्यात बंदिस्त! रोजच्या जगण्याला कंटाळलेली. मोकळा श्वास घेण्यासाठी आणि पंखांनी भरारी मारण्यासाठी उत्सुक, पण पिंजऱ्याभोवतीचं आवरण तिला ती गोष्ट कधीच करू देत नाही आणि हळूहळू तीही आपल्याला पंख आहेत हेच विसरून जायला लागते. एके दिवशी मात्र असह्य होऊन आता पाऊल उचललंच पाहिजे असा मनाशी निर्धार करते. पण त्या विचारातच रात्र होते, मध्यरात्र होते. ती विचारच करते आणि मग एकाएकी ती मनाचा हिय्या करून पिंजऱ्याचं दार उघडून बाहेर पडते. तिला नदीच्या पलीकडल्या तिरावर जायचं असतं. ती नदीकाठच्या नावेत बसते आणि नाव वल्हवायला सुरुवात करते. संपूर्ण रात्र ती नाव वल्हवत राहते, मात्र तिकडचा किनारा जवळ आलेला दिसतच नाही. तरीही ती नाव वल्हवतच राहते. पहाट व्हायला लागते आणि तिला धक्काच बसतो. कारण रात्रभर तिनं जी नाव वल्हवलेली असते, ती नाव त्याच जागी असते कारण तिनं बांधलेली नाव सोडलेलीच नसते.
स्त्रीच्या विषयी भाष्य करणारी ही लोककथा कितीतरी गोष्टी सांगून जाते. तिच्या आयुष्याची संपूर्ण गोष्ट समोर उभी राहते. विवाहाच्या पिंजऱ्यात अडकलेली ती बाहेर पडण्याचं सामर्थ्यच हरवून बसते. वरवर नाव वल्हवल्यानं तिला आपण सुटलो असं वाटत असलं तरी दोर न कापल्यामुळे ती त्याच जागी, तशीच तर बघायला मिळते. या लोककथेतल्या स्त्रीची अवस्था आजच्या प्रगत तंत्रयुगात देखील फारशी बदललेली नाही. तिच्यावर परंपरेनं लादलेली मानसिक गुलामगिरी, कौटुंबिक आणि सामाजिक बंधनं यातून होणारी कुचंबणा, घुसमट आणि अन्याय या सगळ्याला तोंड देतच तिच्यासारख्या अनेकींचा संसार सुरू असतो. माणूस प्रगत झाला तरी त्याच्यावरचे वर्षानुवर्षांचे संस्कार आणि पाळत आलेले सामाजिक नियम यांना ओलांडण्याची मानसिक ताकद त्याच्यात नसते आणि शिक्षणानं ती आली तरी ती फक्त विचारांपुरतीच मर्यादित राहते.
एकीकडे समाज कमीजास्त प्रमाणात शिक्षणानं पुढे जात आहे. तसंच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीमुळे त्या त्या संसाधनांचा वापर तो सहजपणे करत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या जगाशी जोडला जात आहे. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनं हाच माणूस कौटुंबिक हिंसाचार, मानसिक, शारीरिक अत्याचार करण्यातही तितकाच पुढे असल्याचं बघायला मिळतं आहे. विवाहानं जर स्त्रीचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलं जात असेल तर हे सगळं कधीपासून घडलं असावं? विवाहसंस्थेच्या आधी देखील तिची हीच अवस्था होती का? त्या वेळी ती कशा प्रकारचं आयुष्य जगत असेल?
खरं तर आदिम काळात मानवसमाज टोळ्यांनी एकत्र राहू लागला तेव्हा स्त्री-पुरूष लैगिक संबधाबाबत असूया किंवा मालकी हक्क अशा प्रकारच्या भावना सूतरामही नव्हत्या. आदिम काळातले स्त्री-पुरूष लैगिंकदृष्ट्या स्वतंत्र होते. स्वतःचं अस्तित्व जिवंत राहण्यासाठी लैंगिक सुखाबरोबरच प्रजोत्पादन करण्याची नैसर्गिक उर्मी त्यांच्यात होती. टोळीतले सर्वच स्त्री-पुरुष यांचे एकमेकांशी संबंध असत आणि ते सर्वांना मान्य आणि माहीतही असत. खरं तर हजारो वर्ष याच प्रकारे हे संबंध चालू होते. दोन टोळ्यात युद्घं झाली तर पराभूत झालेल्या टोळीतली मुलं आणि स्त्रिया यांच्यावर जिंकलेल्या टोळीची मालकी प्रस्थापित होत असे. टोळीतले सगळेच पुरुष आणि स्त्रिया मिळून सगळ्या मुलांचं सगोपन करत.
टोळी आणि भटकी अवस्था याच्या पुढची अवस्था म्हणजे माणसाला शेतीचा शोध लागला आणि त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. कारण शेतीमुळे माणसाच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. आता त्यांची भटकंती थांबली. तो एका ठिकाणी शेती करत स्थिर आयुष्य जगू लागला. शेतीबरोबरच तो पशुपालनही करू लागला. पाण्याच्या म्हणजेच नदीकाठावर राहायचं आणि तिथेच शेती करायची अशा पद्धतीनं जिथे जिथे नद्या आहेत तिथं तिथं मानवी संस्कृती बहरू लागली. इजिप्तमध्ये नाईलनदीच्या खोऱ्यात, तैग्रिस, युफ्रेटिस, रशियात व्होल्गा, भारतात गंगा, सिंधू या नद्यांच्या खोऱ्यातल्या संस्कृतीमधले अनेक वस्तूंच्या, हत्यारांच्या स्वरुपातले याबाबतीतले अनेक पुरावे सापडले आहेत. शेतीची सुरुवात झाली आणि स्त्रीचं स्वातंत्र्य हिरावण्यास नांगर हाच कारणीभूत झाला असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. याचं कारण शेतीमुळे जमीन, त्यातून निघणारं उत्पन्न यावर कोणाचा मालकी हक्क असावा याबद्दल माणसांमध्ये संघर्ष होऊ लागला. यातूनच संपत्तीची निर्मिती झाली. शेती, पशु हे संपत्तीचं मोजमाप बनलं. एकत्र राहत असल्यानं ती स्त्री कोणाची किंवा झालेली मुलं कोणाची हे कळायला मार्गच नव्हता आणि यातूनच मग स्त्रियांवरची बंधनं वाढत गेली. सामाजिक स्थैर्य मिळवण्याकरता आणि दैनंदिन जगणं स्थिर होण्याकरता वेगवेगळे सामाजिक नियम तयार झाले. त्या नियमांची अंमलबजावणी कडक करण्यासाठी त्याला धार्मिकतेची जोड देण्यात आली. सुरुवातीला गरज म्हणून निर्माण झालेले नियम नंतर काटेकोर बंधनात रुपांतरित होत गेले आणि मग त्यातूनच लिंग भेद, उच्च-निच, अशा सामाजिक उतरंडी देखील तयार झाल्या. प्रत्येक सामाजिक बंधनाचा परिणाम एकतर्फी होऊन विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट समाजाच्या स्वार्थासाठी त्यांचा वापर होऊ लागला.
स्त्रीवर मग तिनं एकनिष्ठ राहून त्या पुरुषाला लैगिक सुख देणं आणि निर्माण झालेल्या मुलांचं संगोपन करणं, तसंच शेतीतली कामं आणि घरगुती कामं करणं तिचं क्षेत्र बनलं. तीही इतर वस्तूंप्रमाणे एक वस्तू बनली. स्त्रीवर मालकीहक्क प्रस्थापित करण्यात येऊ लागला आणि तिच्यावर ज्याची मालकी, तसंच तिला झालेल्या मुलांवरही त्याचीच मालकी असं मानलं जायला लागलं आणि मग अशाच सामाजिक नियमांमधून उदयाला विवाहसंस्था आली. पुढे हळूहळू पुरुषाच्या वाट्याला कष्टाची आणि बाहेरची कामं (शिकार वगैरे) आली आणि स्त्रिया हळूहळू चूल आणि मूल यातच अडकल्या गेल्या. वर्षानुवर्ष स्त्री ही भार्या म्हणजे पालनपोषण करणारी एक गुलाम होऊन राहिली.
विवाहसंस्थेबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण विवाह म्हणजे काय तेही पाहू.
विवाह, पाणिग्रहण किंवा लग्न म्हणजे एक पुरूष आणि एक स्त्री यांना धार्मिक आणि कायदेशीर रीतीनं एकत्र आयुष्य काढण्यासाठी समाजानं दिलेली मान्यता म्हणजेच विवाह! माणसाच्या आयुष्यात विवाह अतिशय महत्त्वाची घटना समजली जाते. विवाहातून समाजाची वाढ होते. विवाह किंवा लग्न या शब्दांचा अर्थ म्हणजे एक संस्कार, विधी आणि पद्धत ज्यामुळे (स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये) नवरा-बायकोमध्ये कायमस्वरूपी संबंध प्रस्थापित होतात. यात नवरा-बायकोला अनेक प्रकारचे अधिकार आणि कर्तव्यं प्राप्त होतात. मुख्यतः यात नवरा-बायको यांना कामसुख उपभोगण्याचा पूर्णपणे अधिकार प्राप्त होतो. तसंच मूल जन्माला घालण्याचा अधिकार, त्याचं संगोपन करण्याचा अधिकार हा देखील मिळतो. संस्कृतमध्ये पती या शब्दाचा अर्थ पालन आणि भार्या या शब्दाचा अर्थ भरणपोषण करण्यास योग्य अशी स्त्री! लग्न झाल्यानंतर संपत्तीचा उत्तराधिकारी त्यांची संतती असते. विवाहसंस्था केवळ कुटुंबापुरतीच मर्यादित नसते, तर त्यामागे समाजहित देखील महत्त्वाचं मानलं जातं. विवाहित दांपत्य सदगुणी, चारित्र्यसंपन्न असेल तर त्यामुळे समाजात चांगल्या गोष्टी घडायला मदतच होते. विवाहामुळे स्त्री आणि पुरूष यांच्या स्वैराचारी वागण्यावर बंधनं येतात.
19 व्या शतकात वेखोफन, मॉर्गन आणि मॅकलिनान यांच्या अभ्यासानुसार आदिम काळात डोकावून पाहिलं असता त्या वेळी विवाहाचं बंधन कोणावरच नव्हतं. सगळे स्त्री-पुरूष आपल्याला वाटेल तसा आणि वाटेल त्या जोडीदाराबरोबर मनसोक्त सुख उपभोगत असत. महाभारतात पांडूनं आपली पत्नी कुंती हिला स्वतःपासून मूल होत नसल्यानं नियोग पद्धती स्वीकारण्यासाठी तयार केलं होतं आणि त्या वेळी तिला त्या पूर्वीच्या काळात कुठल्याही स्त्री पुरुषाला एकमेकांबरोबर शरीरसुख उपभोगण्याचा अधिकार होता असं स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. महाभारतात पतीच्या परवानगीनं त्याची पत्नी परपुरुषाकडे जाऊन राहू शकत होती आणि संतती झाल्यावर पुन्हा पतीकडे परत येण्याची पद्धत त्या वेळी मान्य होती. महाभारतात श्वेतकेतू यानं ही पद्धत बंद केली आणि विवाह ही प्रथा सुरू केल्याचं मानलं जातं. चीन, ग्रीस आणि युनानी देशांमधल्या साहित्यात विवाहासंबंधी अनेक प्रकारची माहिती मिळते.
भारतासह रोम, युनानी देशांमध्ये लग्न या प्रकाराला एक धार्मिक बंधन मानलं जात असे. वैदिक काळात तर यज्ञाचं खूपच महत्त्व होतं आणि हा यज्ञाचा विधी करताना त्यात पुरुषाबरोबर त्याची पत्नी असल्याशिवाय तो यज्ञ पूर्ण समजला जात नसे. पत्नी या शब्दाचा अर्थ देखील यज्ञाच्या विधीत पतीबरोबर बसणारी स्त्री असा होता. म्हणून तर रामायणात अश्वमेध यज्ञ पत्नीशिवाय पूर्ण होऊ शकणार नसतो म्हणून त्या वेळी सीतेची प्रतिमा तयार करून ती रामाबरोबर बसवली गेली होती. याज्ञवल्क्यानं आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याबरोबर यज्ञकार्य करण्यासाठी लगेचच दुसरी पत्नी केली होती. हिंदू धर्मात तर कुठलंही कार्य असो, त्यात पतीच्या बरोबर पत्नीचं असणं गृहीतच धरलं होतं. इतकंच काय पण रोमन लोकांचा असा विश्वास होता की जी मंडळी विवाह करत नसत त्यांना अपराधी मानलं जात असे. त्यामुळे लग्न हा धार्मिक विधीचा एक मोठाच भाग समजला जात असे.
अतिप्राचीन हिन्दू समाजात सख्खी बहीण, चुलत बहीण, नात, मुलगी, आते बहीण यांच्याशी शरीरसंबध ठेवण्याची मुभा होती. अगदी अतीप्राचीन काळी तर आर्यकालीन बाप आणि मुलगी यांचाही शरीरसंबंध योग्य मानला जात असे. जन्मलेल्या मुलाला आईचं नाव लागत असे. वेदांमध्ये रुद्र यानं आपल्या बहिणीशीच आणि प्रजापतीनं आपल्या मुलीशी विवाह केल्याची गोष्ट वाचायला मिळते. बेस्टेड याच्या म्हणण्यानुसार प्राचीन ग्रीसमध्ये देखील सख्खे बहीण-भाऊ लग्न करू शकत असत. गंमत अशी की घरी आलेल्या मित्राला किंवा पाहुण्याचं आदरातिथ्य करण्यासाठी स्वतःची बायको संभोगासाठी देण्याची पत पाणिणीच्या काळापर्यत सुरु होती. अगदी प्राचीन काळी मोकळ्या जागी, शेकोटीसमोर संभोग करण्याची पत होती. कालांतरानं ही पत कमी कमी होऊन नंतर फक्त यज्ञमंडपात संभोग करण्यास मान्यता होती. ऋग्वेदाच्या काळात हळूहळू विवाहसंस्था स्थिर होण्यास मदत झाली असं म्हटलं जातं. यात यम आणि यमी ही जुळी भावंडं असल्यानं त्यांचा विवाह कसा निषिद्ध आहे याची वर्णनं वाचायला मिळतात.
विवाहसंस्था कशी निर्माण झाली याच्या काही गमतीदार (दंत)कथाही प्रचलित आहेत. त्यापैकी एक म्हणजे पूथ्वी आणि आकाश आधी एकत्रच होती. जेव्हा ती दूर जाऊ लागली, तेव्हा त्यांना ते दूर जाणं असह्य झालं आणि त्यांनी ठरवलं आपण विवाह करू या आणि एकत्र राहू या. पुढे मानवानं पृथ्वी आणि आकाश यांचा आदर्श मानत विवाहसंस्थेला मान्यता दिली. ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ या पुस्तकात वि. का. राजवाडे यांनी चार कालखंडात विवाहसंस्थेची विभागणी केली आहे. कृतयुगः या काळी कोणत्याही स्त्री-पुरुषाच्या मनात आलं की ते संभोग करीत असत. आई-बाप, भाऊ-बहीण असा भेद त्या नात्यातला गृहीत धरला जात नसे. पुढे मात्र बहीण-भाऊ यांच्यातला विवाह निषिद्ध मानला जाऊ लागला. याचं कारण काही विद्वानांच्या मते नातं नसून जवळच्या संबंधांमुळे त्यांच्यात शारीरिक आकर्षणाचा भाग कमी असतो आणि त्यामुळे प्रजोत्पादनाच्या दृष्टीनं ते घातक ठरतं. मात्र अनेक विद्वानांचं याबाबतीत दूमत आहे. त्रेतायुगः या युगात इतर कुठल्या स्त्री-पुरुषांशी संभोग करण्याची तात्पुरती संमती दिली जात असे. द्वापारयुगः या काळापासून टोळ्यांमध्ये जोडप्या-जोडप्यांनी एकत्र रहाण्याची पद्घत सुरू झाली. कलियुगः या युगापासून एकपती-पत्नी विवाहपद्घत सुरू झाली.
विवाहसंस्थेत महत्त्वाच्या गोष्टीत काय काय बघितलं जात असे, तर वधू आणि वर यांची निवड, विवाहसंस्काराचे विधी, विवाहाचे वेगवेगळे प्रकार आणि विवाहाचे नियम! आपल्या जातिधर्मातली वधू किंवा वर यांची निवड करणं. विवाहसंस्थेत नात्यांमध्ये लग्न करण्याची परवानगी दिली जात नसे. असे विवाहसंबंध निषिद्ध मानले जात. आपल्या जातिधर्माच्या बाहेर विवाह करणं समाजाला मान्य नसल्यानं यातून अनेकदा हिंसेच्या घटना घडत. कैलिफोर्नियामधल्या रेड इंडियन स्त्रीनं जर युरोपियन जातीच्या पुरुषाशी लग्न केलं तर तिला ठार मारलं जात असे. अशा लग्नातून अनिष्ट घडतं अशी समजूत त्या काळी होती. अमेरिकेतल्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये तर कृष्णवर्णीयांबरोबर गौरवर्णीयांनी विवाह केला तर तो अवैध असल्याचं नियमच केले गेले आहेत. रोमन लोकांमध्ये देखील आपला वंश शुद्ध आणि उत्कृष्ट होण्यासाठी जातीला खूप प्राधान्य दिलं गेलं होतं. त्यातूनच श्रेष्ठ जाती, कनिष्ठ जाती असा भेदही पडत गेला. अनेक जातींमध्ये तर जातिबाहेर लग्न केलं तर त्या जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना समाज वाळीत टाकत असे. अशा वेळी पत्नीचा त्याग केला तर मग त्या पुरुषाला पुन्हा रीतसर समाजामध्ये परत येता येत असे. बायबल आणि कुराण यासारख्या धर्मग्रंथांमध्ये देखील विवाहसंबंधीचे अनेक नियम सांगितले गेले आहेत. यात राजे-महाराजे यांच्याबाबतीत हे समाजानं केलेले कठोर नियम काही अंशी शिथिल केले जात. मात्र एखाद्या राजाने एखाद्या सामान्य स्त्रीशी विवाह केला तर तिच्या होणाऱ्या संततीला राजाच्या संपतीत अधिकार मिळत नसे.
खरं तर विवाहसंस्थेची सुरुवातच या गोष्टीसाठी झाली की जर स्त्री-पुरूष केवळ शरीरसुखासाठी एकत्र आले तर त्या स्त्रीला होणाऱ्या संततीची जबाबदारी कोणी स्वीकारायची? त्या स्त्रीच्या गर्भवती होण्याच्या काळात तिची काळजी कोणी घ्यायची आणि मूल जन्माला आल्यावर त्याचं पालनपोषण आणि संगोपन यांचीही जबाबदारी कोणी घ्यायची असे अनेक प्रश्न होते आणि हे जर झालं नाही तर मानव जात हळूहळू नष्ट होण्याची भीती माणसाला वाटली आणि स्वतःचं अस्तित्व टिकून राहण्याच्या दृष्टीनं माणसानं विवाहसंस्थेची निर्मिती केली.
पुढे मे, 1955 हिंदू विवाह कायदा अस्तित्वात आला. पुढे औद्योगिक क्रांतीनंतर समाजामध्ये खूप झपाट्यानं बदल होत गेले आणि धार्मिकतेचं प्रस्थ हळूहळू सगळ्याच बाबतीतलं कमी कमी होत गेलं. सुदृढ निरोगी आणि सुसंस्कृत समाजासाठी मग विवाहाबद्दलचे अनेक नियम बनवले गेले. त्यात विवाहसंस्थेला फार महत्त्वाचं स्थान होतं आणि आजही बऱ्यापैकी आहे. विवाहामुळे स्त्री-पुरुष आपल्या अनिर्बंध आणि उच्छुंखूल वासनेवर नियंत्रण ठेवून समाजाच्या नैतिकतेच्या नियमांचं पालन करतील असाही उद्देश विवाहसंस्थेमागचा होता. विवाहाशिवाय जे स्त्री-पुरुष संततीला जन्म देतील किंवा शारीरिक सुख उपभोगतील ते पुढे कायद्यानंही अवैध ठरवलं गेलं.
औद्योगिक क्रांतीबरोबरच शिक्षणाचं वारं जोरात वाहायला लागलं. स्त्रिया देखील शिक्षणासाठी बाहेर पडू लागल्या. पहिल्या महायुद्धानंतर स्त्रिया नोकरीसाठी बाहेर पडल्या. स्वातंत्र्याचा विचार करू लागल्या. स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि पुरुषप्रधान संस्कृतीचं ओझं झुगारून देण्यासाठी स्त्रीला खूपच झगडावं लागलं. त्यानंतर 1920 साली स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला. तरीही नोकरीत दुय्यम दर्जाचीच वागणूक मिळत राहिली. भारतातही स्त्री शिकली, नोकरी करू लागली. लग्नाच्या बाजारात नोकरी करणारी, कमवती मुलगी पाहिजे असा आग्रह धरला जाऊ लागला. मात्र लग्नानंतरही बहुतांश ठिकाणी मुलीचा पगार नवऱ्याच्या स्वाधीन करताना ती दिसते. घरातली सर्व कामंही तिलाच करावी लागतात आणि भाजीपाला, किरणा सामान खरेदी, मुलांचा अभ्यास, दुखणं खुपणं याबरोबरच सासू-सासरा आणि नवरा-मुलं यांच्यावर प्रेमही करावं लागतं. यात त्या स्त्रीला किती मदत करायची किंवा करायची नाही हे इतर जण त्यांच्या सोयीनुसार ठरवतात.
आज भारतातच नाही तर अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांत देखील कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. इतकं की हा प्रश्न तिथला क्रमांक एकचा प्रश्न म्हणून मानला जातोय. 1992 साली लॉस एंजेलिस शहरात कौटुंबिक हिंसेचं प्रमाण दोन लाख होतं तर न्यूयॉर्कमध्ये 39 लाख कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरल्या होत्या. तिथे प्रत्येक 15 सेकंदाला पुरुषाकडून स्त्रीला मारहाण होत असते. 13% स्त्रियांना नवऱ्याच्या मारहाणीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे. पाश्चात्य देशांमध्ये 50 %हून अधिक पुरुष स्त्रियांना मारहाण करतात आणि स्त्रिया ते सहन करतात, तर भारतात कामगार वर्गातला पुरुष बायकोला मारहाण करणं आपला अधिकार समजतो. मेसोपोटामियामध्ये पूर्वी स्त्रीनं व्यभिचार केला तर तिला ठार मारलं जात असे. चीनमध्ये देखील स्त्रीनं घरातून पळून जाऊ नये म्हणून वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिच्या पायात कायमस्वरूपी जोडे घालून तिचे पाय बारीक करण्यात येत असत. असे अनन्वित अत्याचार जवळपास जगभर स्त्रियांवर होत असत. मॉर्गन यानं 1877 साली ‘एन्शंट सोसायटी’ नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात त्यानं लैंगिक संबंधांबाबत स्त्री आणि पुरुष यांच्याबाबतीत कसं दुटप्पी धोरण ठरवलं गेलं हे लिहिलंय. पुरुषानं काहीही केलं तरी त्यात तो दोषी नाही आणि स्त्री मात्र तिचा दोष नसला तरी तीच पूर्णपणे दोषी धरली जात असे. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषानं स्त्रीला - ती बाप, नवरा आणि मुलगा यांच्याच अधिपत्याखाली कशी राहील हे बघितलं. आजही भारतात अनेक स्त्रिया शिकल्या, नोकरी करू लागल्या तरी त्या एका अर्थानं पारतंत्र्यात आहेत. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय त्या घेण्यास असमर्थ ठरताना बघायला मिळतात. आशिया, मध्यपूर्व आणि आफ्रिका यासारख्या देशांतल्या कित्येक स्त्रिया अजून गुलामगिरीचं जिणं जगताहेत. युरोप आणि अमेरिकन स्त्री स्वातंत्र्यासाठी बंड करते आहे.
पुढे आत्मनिर्भर झालेली स्त्री अनेक निर्णय ती स्वतः घेऊ लागली. पुरुषप्रधान संस्कृतीतल्या अनेक गोष्टी झुगारून देण्याचं धाडस ती करायला लागली. विवाह हा धार्मिक बंधन मानण्याऐवजी आता कायदा मानून त्याप्रमाणे निर्णय घेणं जास्त सोयीचं मानायला लागली. पूर्वीच्या काळी विवाह म्हणजे स्त्रीच्या जीवनाची इतिश्री समजली जात असे. आता मात्र ती स्थिती राहिली नाही. लग्न असो वा घटस्फोट स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान अधिकार कायद्यानं दिले गेले आहेत. गर्भनिरोधक साधनांमुळे विवाहाचं पावित्र्य, सतीत्व, या गोष्टींना हादरे बसले आहेत. संततीसाठी लग्न असा जर विवाहसंस्थेचा हेतू असेल तर आजची स्त्री तोही मानायला तयार नाही. कृत्रिम गर्भधारणेनं तिच्याकडे तोही मार्ग उपलब्ध आहेच. त्यामुळे आजचे अनेक स्त्री-पुरुष लिव्ह इन रिलेशनशिप या नात्याला जास्त प्राधान्य देताना दिसताहेत. पटलं तोपर्यंत एकत्र राहू आणि ज्या दिवशी पटणार नाही त्या दिवशी मोकळे होऊ या पर्यायाला महत्त्व देत आहेत. तसंच काहींना आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येऊ द्यायची नसल्यानं त्यांचा विवाहसंस्थेलाच विरोध आहे.
विसाव्या शतकानं माणसाच्या आयुष्यात खूपच उलथापालथ करून ठेवली. त्यातही विवाहसंस्थेला सुरूंग लागून ती ढासळण्याची भीती निर्माण झाली. बँकरप्टसी ऑफ मॅरेज हे कॅल्व्हर्टनचं आणि रिव्होल्ट ऑफ मॉडर्न यूथ हे बेन लिंडसेचं पुस्तक वाचलं तर युरोप आणि अमेरिका इथं विवाहसंस्थेची जी धूळधाण उडाली आहे तिच्याबद्दल वाचायला मिळतं. अमेरिकेत विवाहसंस्था खरोखरंच मोडकळीला आली असून घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. स्त्रीचं नोकरी करणं आणि आर्थिक बाबतीत स्वतःवर निर्भर होणं यामुळे घटस्फोटांचं प्रमाण वाढल्याचं समाजशााज्ञांचं मत आहे. संसार म्हणजे तडजोड हे समीकरण आता शहरी स्त्रीला मान्य नाही. शिक्षित समाजात तर लग्न झाल्यानंतर आता दोन ते सहा महिन्यांच्या कालावधीत घटस्फोट होताना दिसताहेत. आज प्रत्येक जातिधर्मातल्या विवाहांची स्थिती बघता घटस्फोटांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतं आहे. प्रेम संपलं, आकर्षण संपलं की प्रेमाला ओहोटी लागते आणि नातेसंबंधात वितुष्ट निर्माण व्हायला लागतं. कधी कधी त्या नवरा-बायकोचं एकत्र राहणं कठीण होतं आणि मग मार्ग घटस्फोटाकडे वळतो. जगभरात सरासरी दर 10 लग्नात काही ठिकाणी 3 तर काही ठिकाणी 5 असं घटस्फोटाचं प्रमाण बघायला मिळतं. कौटिल्यानं अर्थशास्त्रात घटस्फोटाबद्दल विवेचन केलं आहे. त्यानं म्हटलंय की पती आणि पत्नी दोघंही एकमेकांचा द्वेष करत असतील तर त्यांनी घटस्फोट घ्यावा. सतराव्या शतकापर्यंत खरं तर भारतात घटस्फोट जास्त प्रमाणात होत नव्हते. पाश्चिमात्य देशांमध्ये घटस्फोट लवकर स्वीकारले गेले. भारतात पहिला पारशी मॅरेज अँड डायव्होर्स ॲक्ट हा 1865 साली अस्तित्वात आला. मात्र सगळ्याच थरातल्या लोकांसाठी हा कायदा पास होण्यासाठी 1954 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
विवाहसंस्थेबद्दल कितीही ओरड होत असली तरी सामाजिक स्थैर्य टिकून राहण्यासाठी तिची फार मोठी भूमिका होती आणि आहे. पाश्चात्त्य देशांनी स्त्री-पुरुष संबंधावर अनेक पर्याय शोधले असले तरी या गोष्टींमुळे वैवाहिक जीवनातली अस्थिरता, वाढते घटस्फोट, ट्रायल मॅरेज या गोष्टींमुळे मानसिक ताणतणाव वाढताहेत, लैंगिक विकृती आणि एचआयव्ही एड्स यासारखे रोगही वाढताना दिसताहेत. भावनिक संबंधात प्रेम आणि आकर्षण याबरोबरच असूया, मत्सर आणि द्वेष या भावनाही वाढीला लागून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. घटस्फोटानंतर स्त्रिया पुनर्विवाह करण्यास फारश्याा उत्सुक दिसत नाहीत. त्या एकटं राहणं जास्त पसंत करताना दिसतात. नवरा करून जन्मभर त्याचं दास्य स्वीकारण्यापेक्षा मित्र म्हणून हवं तेव्हा एकत्र येऊ ही भावना त्यांच्या मनात जोर धरताना दिसते आहे. आता तर अमेरिकेतल्या विवाहित स्त्री-पुरुषांना मुलं नकोच असा दृष्टिकोन बघायला मिळतो आहे. 1972 साली 45 टक्वे जोडप्यांना मुलं नको होती. तर 1986 साली हे प्रमाण वाढून 62 टक्वयांवर गेलं होतं. अमेरिकेत वय वाढल्यावर लग्न करत असले तरी शारीरिक सुखाचा अनुभव 12-13 वर्षांची मुलगी घेते. आज तिथे कुमारी मातांचा प्रश्न जटील बनला आहे. लग्नाआधी तीन-चार वेळा तिनं गर्भपात करून घेतलेला असतो. ताण वाढल्यानं अमेरिकेत प्रत्येक रात्री 1 अब्ज 80 कोटी झोपेच्या गोळ्या घेतल्या जातात. यात दूरचित्रवाणीचाही हातभार लागतो आहे. बर्लिन, बोस्टन आणि लंडन यासारख्या शहरात तर दर हजारामागे तीनशे ते पाचशे मुलं बेकायदेशीर आढळली अहोत. न्यूयॉर्कमध्ये प्रत्येक वर्षी 80 हजार गर्भपाताचं प्रमाण आहे. अविवाहित मातांसाठी काढलेल्या इस्पितळात प्रचंड गर्दी बघायला मिळते. हिंसाचार, बलात्कार, विकृत शरीरसंबंध, दारू आणि सिगारेट यांच्या अतिरंजित जाहिराती यामुळे जीवनमूल्यांना तडा जातो आहे.
हजार वर्षं मोठ्या दिमाखांत आपलं आसन घट्ट करून बसलेली विवाहसंस्था फक्त 50 वर्षांच्या काळात एवढी पोखरली जाण्याचं कारणच काय? याबाबतीत रसेलनं ‘नॅशा-पालमाल’ या नियतकालिकामध्ये विवाहसंस्था ढासळण्याची काही कारणं दिली होती. त्याच्या म्हणण्यानुसार स्त्रीही वस्तू न राहता व्यक्ती म्हणून ओळखली जाऊ लागली. तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, विज्ञानाच्या प्रगतीनं मूल हवं का नको हे तिला ठरवता येऊ लागलं. घटस्फोटाची प्रक्रिया सोपी झाली आणि तो मिळवण्याचं धाडस तिच्यात आलं. विवाहसंस्था ही नष्ट झाली तर चांगलंच आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे. ‘सेक्शुअल बिहेविअर इन द ह्यूमन मेल’ आणि ‘सेक्शुअल बिहेविअर इन द ह्यूमन फीमेल’ यात किन्सेनं विवाहबाह्य संबंधाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं प्रमाण याबद्दल लिहिलंय. तसंच सीमॉन द बोव्हा हिनं लिहिलेल्या ‘द सेकंड सेक्स’ बेटी फ्रायडन हिनं लिहिलेल्या ‘द फेमिनिन मिस्टिक’ या पुस्तकांमधून स्त्रीवादी चळवळ, स्त्री-पुरुषांमधले संबंध, स्वातंत्र्य, समानता आणि अर्थपूर्ण साहचर्य याबद्दलचं स्पष्ट विवेचन वाचायला मिळतं.
आज समाजाची वाटचाल समूहापासून व्यक्तिकेंद्री अवस्थेकडे सुरू आहे. सामाजिक नीतिमूल्यं बदलत आहेत. लग्नाचा जोडीदार समविचारी नसेल तर विवाहबाह्य संबंध निर्माण होऊ लागतात. याला कारण भारतातल्या विवाहसंस्थेतल्या मर्यादा आणि त्रुटी याच आहेत. लैंगिक शिक्षणाचा अभाव, जोडीदाराची शारीरिक दुर्बलता आणि संततीप्रतिबंधक साधनांची सहजपणे असणारी उपलब्धता या कारणांमुळे विवाहबाह्य संबंधाकडे माणसाचा कल जातो आहे. जोडीदारामधला भावनिक सांस्कृतिक दुरावा, कमी शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्या या गोष्टींमुळेही व्यक्ती विवाहबाह्य संबंधांकडे खेचली जाते. मात्र अनेकदा अशा विवाहबाह्य संबंधांना सामाजिक मान्यता नसल्यानं काही विकसित शहरं सोडली तर इतर ठिकाणी कौटुंबिक ताण आणि हिंसाचार यांची परिस्थिती निर्माण होते. आज नवरा-बायकोच्या परस्परांकडून असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या आहेत. एका व्यक्तीचे एकनिष्ठ न राहता अनेक व्यक्तींबरोबरचे संबंधही बघायला मिळतात. अमेरिकेत 1986 च्या जनगणनेनुसार 5 कोटी 20 लाख प्रौढ व्यक्तींनी आपले लग्नानंतरचे अन्य व्यक्तीशी आलेले संबंध आल्याची कबुली दिली. युरोपमध्ये विशेषतः नेदरलँडमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये जास्त मोकळेपणा आलेला बघायला मिळते. स्त्री-पुरुष स्वातंत्र्यामुळे अनिती वाढेल वगैरे विचार त्यांना मान्य नाहीत. तिथले कायदे आणि अधिकार देखील नव्या वातावरणाशी मिळतेजुळते आहेत.
विवाहसंस्था मोडकळीस येण्याच्या अनेक कारणांमध्ये आजची चंगळवादी व्यवस्थाही आपला हातभार लावते आहे. एकत्र कुटुंब पद्धती, सर्वांचं एकमेकांवर प्रेम, वेळप्रसंगी तडजोड आणि त्याग हे सर्व आता मागे पडत चाललं आहे. आत्मीयता, प्रेमभावना, एकमेकांच्या मदतीला धावणं या गोष्टी हळूहळू मागसलेपणाचं लक्षण ठरू लागल्या आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकाबरोबरच आत्मकेंद्री वृत्ती स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही सारखीच वाढताना दिसते आहे. मी आणि माझं एवढंच जग होत असल्यानं एकमेकांची गरज शिल्लक असल्याचं दिसत नाही. पैसा अणि भौतिक सुखं महत्त्वाची ठरताहेत. अशा समाजव्यवस्थेत विवाहसंस्थेचं टिकून राहणं खूपच अवघड आहे हे निश्चित!
उद्या काय होईल याचा विचार करताना विवाहसंस्थेला आज लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे पर्याय उपलब्ध होताना दिसताहेत. पण त्यातही सुरक्षिततेचा अभाव असल्यानं तेही मोठ्या प्रमाणात स्वीकारले जातील की नाही याचं चित्र आजतरी स्पष्ट होत नाही! उद्याच्या जगात तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे अनेक आश्चर्यकारक बदल घडतील. नवरेगिरी करणाऱ्या पुरुषापेक्षा रोबोट घरी आणणं स्त्रिया अधिक पसंत करतील. तो रोबोटही आज्ञेबरहुकूम कामं करत राहील. हेच पुरूषही बायको आणण्याऐवजी स्त्री रोबोट आणून आपली कामं साध्य करतील. आज नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाचा वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या नात्यानं अनेक स्त्री-पुरुषांशी संबंध येतो. कोणाशी भावनिक शेअरिंग होतं, तर कोणाशी बौद्घिक पातळीवरचं. त्यामुळे नवरा किंवा बायको म्हणून एकाच व्यक्तींशी आयुष्य जोडून घेण्यापेक्षा भविष्यात एकाच वेळी अनेक व्यक्तींशी असे मल्टीपर्पज रिलेशन्सही स्त्री-पुरुष नात्यांत गरजेप्रमाणे तयार होतील. किंवा कदाचित रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्र जपलं जाईल आणि वैश्विक कुटुंबं (कम्युन पद्धतीनं) निर्माण होतील. एकमेकांवर अवलंबून न राहता, अपेक्षांची ओझी एकमेकांवर न लादता स्वतंत्रपणे लोक एकत्रित येतील आणि कोणी सांगावं, आदिम काळात ज्याप्रमाणे टोळ्यांनी मानवी समूह एकत्र राहत होता, तसाच आधुनिक काळात तो वेगळं नाव धारण करून एकत्र राहील!
(आगामी ‘स्त्री’ या पुस्तकातून)
दीपा देशमुख
Comments
खूप वास्तववादी लेख आहे.
खूप वास्तववादी लेख आहे.
Add new comment