बुद्धांसोबत क्षणोक्षणी...
पुण्यातल्या एस. एम. जोशी सभागृहातली एक सुरेख सायंकाळ...डॉ. आनंद नाडकर्णीनी लिहिलेल्या आत्तापर्यंतच्या पुस्तकांनी आयपीएचचा एक स्टॉल सजलेला, तर मनोविकास प्रकाशनाच्या पुस्तकांनी नटलेला दुसरा स्टॉल, येणारे लोक थबकताहेत, पुस्तकं हाताळताहेत, काहीजण विकत घेताहेत, काहीजण खूप दिवसांनी एकमेकांची भेट झाल्यामुळे आनंद व्यक्त करताहेत आणि हळूहळू ते सभागृहात येऊन दाखल होतायत....दाखल होतानाच प्रत्येकाच्या हातात बुद्धाचं सुरेख रेखाटन असलेलं कार्ड आणि त्यामागे असलेली डॉ. नाडकर्णींची कविता रसिकांच्या हातात दिली जातेय असं दृश्य (प्रत्येक रसिक वाचकाला भेट देण्यात आलेलं बुद्धाचं रेखाटन केलेलं कार्ड तन्वी पळशीकर या तरुणीने केलं होतं.) ....ही गोष्ट १६ तारखेच्या म्हणजेच बुद्धपोर्णिमेच्या संध्याकाळी घडलेली...निमित्त होतं, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या ‘बुध्दांसोबत क्षणोक्षणी’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित केलेल्या मुक्त संवाद सत्राचं.
व्यासपीठावर ज्येष्ठ प्राच्य विद्या विशारद आणि संशोधक, संस्कृत विषयाचे अभ्यासक, चाळीस वर्षं संस्कृत भाषेचा अविरत अध्यापन करणारे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत भाषा विभाग प्रमुख, वेद आणि बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि संशोधक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाली भाषेचे सहाय्यक अध्यापक, जगातल्या अनेक देशांपर्यंत कार्य पसरलेलं असे डॉ. श्रीकांत बहुलकर, तसंच ३५ वर्षांहून अधिक काळ मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे, श्रीलंकेच्या पॅगोडा मेडिटेशन सेंटरची सुगत आचार्य हे पद प्राप्त केलेले, आयआयटी मुंबई आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंट इथे सन्माननीय अध्यापक आणि सल्लागार असलेले, थायलंडमधल्या वेगवेगळ्या परिषदांमध्ये सामील झालेले, माइंडफुलनेस आणि भगवदगीता यांचे गाढे अभ्यासक असलेले, पाश्चात्य वैद्यकीय वैज्ञानिक पध्दती आणि पौर्वात्य तत्वज्ञान यांची सांगड घालून उपचार करणारे डॉ. राजेंद्र बर्वे, तसंच मनोविकास प्रकाशनाचे संस्थापक/संचालक अरविंद पाटकर, वैद्य ज्योति शिरोडकर आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ म्हणजे आयपीएचचे संस्थापक/संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष, मानसिक आरोग्यावर विपुल लेखन करणारे, नाटककार, मनोविकासतज्ज्ञ असलेले डॉ. आनंद नाडकर्णी स्थानापन्न झाले होते.
प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या ज्योतीने सभागृहात स्थानापन्न झालेल्या रसिकांचं आपल्या मधुर आवाजात स्वागत केलं. मनोज देवकर, अतुल कस्तुरे, दीपा देशमुख अशा काही स्नेह्यांचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आला. ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ या डॉ. आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाची निर्मिती करणारे अरविंद पाटकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत अवघ्या ३ मिनिटांत प्रास्ताविक केलं आणि संपूर्ण सभागृहातलं वातावरण ताजंतवानं झालं. काहीच क्षणांत पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि दिग्गजांच्या गप्पांना सुरूवात झाली. या सगळ्यांचा संवाद एका धाग्यात गुंफायची जबाबदारी ज्योती अतिशय समर्थपणे पार पाडत होती.
माझ्या मनात अनेक प्रश्न उमटत होते, बुध्दांसोबत क्षणोक्षणी म्हणजे काय, बुद्ध इतका सहजी भेटतो का, त्याला भेटायचं असेल तर काय करावं लागेल, कसा प्रवास करावा लागेल, बुद्ध म्हणजे जर विचार असेल, तर तो विचार आपल्याला कसा समजेल, आपल्यात कसा रुजेल? डॉ. आनंद नाडकर्णींना भेटलेला बुद्ध कसा आहे, डॉ. बर्वेंना बुद्ध कुठे भेटला आणि डॉ. बहुलकरांनी बुद्धाला भेटत असताना किती खोलवर तळ गाठला असेल?
कार्यक्रम सुरू झाला होता, संपूर्ण सभागृह या दिग्गजांना ऐकण्यासाठी आतुर झालेलं होतं. काहीजण तर पुण्याबाहेरून खास हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आले होते. मी व्यासपीठावरून बोलणाऱ्यांचं बोलणं ऐकत होते आणि त्याचबरोबर माझ्या मनात उमटलेल्या संवादासोबत बोलतही होते.
डॉ. राजेंद्र बर्वे यांनी बुद्धाची भेट आणि माइंडफुलनेस याविषयी सांगायला सुरुवात केली. ते बोलत असताना आधीचे बर्वे आणि आजचे/या क्षणाचे बर्वे वेगळे आहेत असं वाटत होतं. त्यांना या बुद्धाने काहीतरी दिलंय, त्यांना काहीतरी मिळालंय असंही जाणवत होतं. माइंडफुलनेसबद्दल बोलताना राजेंद्र बर्वे यांनी हुका (VUCA) या संकल्पनेविषयी सांगितलं. ही एक विचारपद्धती असून जगण्यासाठी ती खूप महत्वाची आहे. आज अस्थिर होत चाललेल्या जगात कोणत्या क्षणी काय होईल ते सांगता येत नाही. तसंच वर्तमानात अत्यंत अकल्पितपणे गोष्टी घडताहेत, शिवाय जग कमालीचं गुंतागुंतीचं झालंय. यामुळे माणूस सदैव द्विधा झालाय. अशा वेळी बौद्ध तत्वज्ञान जगाकडे कसं बघायचं याची दृष्टी देतं. खरं तर सुमारे अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी तत्वज्ञानाकडे, व्यवहाराकडे, कर्मकांडाकडे, धर्माकडे, जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी बुद्धाने दिली. अत्त: दीपो भव - स्वत:ला जाणून घ्या, क्षणोक्षणी स्वत:ला शोधा. जगाला समजून घ्या, जगात दु:ख असतं ते नाकारू नका, असं त्यानं सांगितलं. मनाप्रमाणे न घडणं, किंवा मनाच्या अस्थिर अवस्थेला त्यानं दु:ख असं संबोधलं होतं. त्यासाठी त्यानं अष्टांग योगाचा मार्ग सांगितला होता. पंचशीलाचं पालन करायला सांगितलं. जगाकडै स्वच्छ नजरेने बघायचं. क्षणोक्षणी आपण जजमेंटल होत सगळीकडे बघत असतो. भावना, विचार, विकार, घटना या सगळ्या गोष्टीकडे स्वच्छ नजरेने पहावं आणि त्यांचा स्वीकार करावा कारण ते टिकणारं नाही. प्रत्येकाने माझं दु:ख काय, त्याचं कारण काय, त्याचं निवारण होउ शकतं, या मार्गाने आपण चालायचं आहे. चार आर्यसत्य प्रत्येकाने स्वत:मध्ये शोधावीत असं बुद्धानं म्हटलं. एकदा बुद्धाला कोणीतरी विचारलं, तुम्ही करता काय, तेव्हा त्यांनी म्हटलं, मी जेवतो तेव्हा जेवतो, चालतो तेव्हा चालतो, झोपतो तेव्हा झोपतो. आपण असं करतो का हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. आहे तो क्षण अनुभवणं, जगणं म्हणजेच खरं तर माइंडफुलनेस!
डॉ. राजेंद्र बर्वे यांनी आपल्या आयुष्यात बुद्धाचा प्रवेश कसा झाला, ते सांगितलं. त्यांनी त्या वेळची स्थिती सांगणारी एक हायकू सादर केली:
शांत जलाशय
काठी बसला बेडूक
प्लाँक, उडी मारली
आपल्या शांतपणे चाललेल्या आयुष्यात एकदा मोठ्या बेडकाने उडी मारली, म्हणजे त्या वेळी काय घडलं, अजिंठ्याच्या लेण्या बघताना बुद्धाचं शिल्प बघून त्यांना काय जाणवलं, स्वत:च्या आयुष्यात आलेली रिग्रेशनची अवस्था आणि केलेले उपचार, बुद्धाबरोबरचं नातं याबद्दल डॉ. बर्वे खूप प्रांजलपणे बोलले.
त्यानंतर प्राच्यविद्या अभ्यासक, डॉ. श्रीकांत बहुलकर यांच्याकडे बघताना तर लालबहादूर शास्त्री आठवत राहिले. मूर्ती लहान मात्र त्यांचा व्यासंग, अभ्यास आणि विद्वत्ता अंगी रुजवलेला हा माणूस बघताना मन आदरानं झुकून गेलं. ते बोलत होते, ऋजूतेनं, सौम्यपणे - इसपू पाचवं शतक - त्या वेळची परिस्थिती कशी होती, वैदिक परंपरेचं प्राबल्य कसं होतं, यज्ञ परंपरेत लोक मग्न होते. माणसानं यज्ञ करावा आणि स्वर्गप्राप्ती करावी अशा प्रकारचा पगडा जनमानसावर होता. वर्णाश्रमाची चौकट घट्ट पकड घेत चालली होती. एकीकडे वैदिक धर्म कर्मकांडात गुंतलेला होता, आणि त्याच वेळी उपनिषदांचा विचारही प्रबळ होत चालला होता. अशा सगळ्या वातावरणात बुद्धांनी आपला विचार मांडायला सुरुवात केली होती. ऐहिक आनंद घेणारं, उपभोग घेणारं असं एक जग आणि आत्मक्लेश करणारं दुसरं जग असे दोन टोकाचे विचार मांडले गेले होते. ही दोन्ही टोकं सोडून बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला होता. त्या वेळच्या विद्वानांनी सांगितलेले जीवनविचार बुद्धांनी नाकारले. त्याविषयीची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथात केली, तो उतारा बहुलकरांनी श्रोत्यांना वाचून दाखवला.
प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा, ती पडताळून बघा, केवळ मी म्हणतो म्हणून ती करू नका असं स्पष्टपणे बुद्धांनी सांगितलं. संसारात पिडलेल्या लोकांना त्यांनी दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला. यज्ञात पशुंची आहुती देऊन काहीही होणार नाही, असं सांगून त्यांनी यज्ञ या शब्दाचा अर्थ म्हणजे दान असा सांगितला. त्यांनी वेदपरंपरा, कर्मकांडाची परंपरा मानली नाही, महत्वाचं म्हणजे वेदप्रामाण्य मानलं नाही. जन्मानं कोणी श्रेष्ठ होत नाही, तर कर्माने होतं हेच त्यांनी सांगितलं. इतकंच नाही, तर स्त्रियांना देखील संघामध्ये प्रवेश दिला होता.
डॉ. बहुलकरांचं बोलणं होताच डॉ. आनंद नाडकर्णी यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. कोरोनानं उलथापालथ केलेल्या वातावरणात डॉ. आनंद नाडकर्णींना बुद्ध भेटला आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या भावना कवितेचं रूप घेत राहिल्या. या संवादसत्रात डॉ. नाडकर्णी यांनी अनेक अर्थांच्या कविता सादर केल्या. मात्र सुरुवातीला डॉ. राजेंद्र बर्वे यांनी सांगितलेल्या माइंडफुलनेसवर त्यांनी एक कविता सादर केली :
मनाने मनात मनाला पाहावे
भाव विचारांचे रंग न्याहाळावे
म्हणू नये कोणा हवेसे नकोसे,
खेळ मात्र त्यांचे अवलोकावे
तुझी पंचेंद्रिये सतत सोबती
उत्तेजना बाह्य हो त्यांचा सोबती
ध्वनी-स्पर्श-स्वाद, दृष्टी आणि गंध
मर्म प्रत्येकाचे ओळखावे
पुढती हे येती अन्य आणि जग
अनुभव तयांना अ-मग्न पहावे
प्रवास पळांचा जळावे फळावे
ढग वादळांच्या पल्याड अंबर
रात-दिवसाचा अनंत हा खेळ
कधी वीज वाजे कधी सप्तरंग
आकाशासाठी हे फक्त येणे-जाणे
तसे पहावे रे चित्ताच्या नभास
ना ते कुणाचेही, अंग-रंग घेई
दिसे तैसे नसे निळे किंवा काळे
न लगे तसाच थांग चैतन्याचा
बुध्दासोबत म्हणजे कोणासोबत, बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध म्हणजे विचार असं डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले. बुद्धांनी ग्रंथप्रामाण्य, प्रेषित असणं, दैवतीकरण नाकारलं. त्यांनी स्वत:मधल्या ‘मी’चा म्हणजेच अहंकाराचं निर्वाण करा असं सांगितलं. स्वहित आणि परहित यामधली रेषा पुसून टाकणं बुद्ध शिकवतात. अहंकाराचं निर्वाण करा म्हणजेच विचार, इतरांच्या दु:खाबद्दलची तळमळ म्हणजेच भावना आल्या, स्वहित आणि परहित यांचा मेळ घालणारी सातत्यपूर्ण कृती करा म्हणजेच वर्तन आलं, थोडक्यात म्हणजेच बुद्ध आपल्याला मानसिक आरोग्य शिकवतात. बुद्ध हे जगातले पहिले कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्ट आहेत. कारण त्यांनी विचार, भावना, वर्तन या कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी ही जी तिवई मानते तीच त्यांनी मांडली आणि या तिवईकडे कसं बघायचं हे त्यांनी सांगितलं.
बुद्ध हे लोकशिक्षक होते, समाजशिक्षक होते आणि संस्कृती शिक्षकही होते. लोकांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी पाली भाषा वापरली. त्या वेळी त्यांना आत्मज्ञानात विहरत राहता आलं असतं, पण त्यांचा मानवजातीला नवा मार्ग दाखवण्यासाठीचा शोध सुरू होता.
डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. श्रीकांत बहुलकर आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून अनेक गोष्टींची उकल झाली. बुद्ध विचारांचे ग्रंथ कसे नष्ट झाले आणि काही ग्रंथ आजही तिबेट, इंडोनेशिया आणि चीन या देशांत कसे जतन केले गेले याविषयी बोललं गेलं. आज चीनमध्ये बौद्धधर्माला जास्त उत्तेजन दिलं जात आहे. बुध्दाचं नवं रूप म्हणजे सेक्युलर बुदिधझम असून याच वेळी माइंडफुलनेसवर कसा रिसर्च सुरू आहे आणि माइंडफुलनेसचा मेंदूवर परिणाम कसा होतो याबद्दल डॉ. बर्वे यांनी सांगितलं. बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा, करुणा यांची मेंदूतली स्थानं सापडताहेत, असं ते म्हणाले. आज अमेरिकेतल्या २० हजार शाळांमधून माइंडफुलनेस शिकवलं जातंय. चिकित्सा करणारं, तपासणारं, अनुभवानं, प्रयोगानं सिद्घ करणारं बुद्धाचं नवं रूप लोभस असून बौद्ध धर्माने कूस बदलली आहे असं डॉ. बर्वे म्हणाले. या वेळी डॉ. नाडकर्णी यांनी डॉ. अल्बर्ट एलिसनं लिहिलेल्या ‘द मिथ ऑफ सेल्फ एस्टिम’ या पुस्तकाचा उल्लेख केल आणि बुद्धाचा विचार आपल्या अखेरच्या काळात एलिसने रुजवण्याचा प्रयत्न कसा केला याबद्दल ते बोलले. याच वेळी आपल्याला भारतातल्या लोकांवर/लोकांसाठी काम करायचं असल्यामुळे आपल्याला लोकपरंपरांपासून फारकत घेता येणार नाही तर लोकांच्या जवळ जाण्यासाठी परंपरांचा अभ्यास करणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. डॉ. नाडकर्णी यांनी भगवदगीता, अद्वैत वेदांत यांचा अभ्यास कसा सुरू झाला आणि तो पुढे कसा जात राहिला याविषयी बोलताना ‘मनमैत्रीच्या देशात’ वेदांत, न्यूरोसायन्स आणि कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी कसा केला याविषयी सांगितलं. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नाडकर्णी यांनी बौद्धविचाराचं पसायदान सादर केलं.
या तिन्ही दिग्गजांनी या कार्यक्रमातून बुद्धविचारांतून बुद्धाचा सहवास उपस्थितांना करवला. संपूर्ण सभागृह बुद्धमय झालेल्या वातावरणात विहार करत होतं. खरंच, एक चांगला विचार, चांगली दिशा, आयुष्याचं शांत सरोवर कसं अबाधित राखावं, त्यातल्या अलगद उमटलेल्या हळुवार तरंगाकडे कसं बघावं आणि आपल्या आत दडलेला, आपल्याला सोबत करणारा बुद्ध कसा शोधावा हे या कार्यक्रमाने सांगितलं.
डॉ. आनंद नाडकर्णी, तुम्ही मीच नव्हे, तर महाराष्ट्र आणि त्याच्या सर्व सीमा ओलांडून गेलेल्या सर्वांची आवडती व्यक्ती आहात. तुमचं कार्यकर्तृत्व, तुमचा उत्साह, तुमच्यातलं माणूसपण आम्हाला आमचं आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी खूप काही देत असतं. आजही तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने किती भरभरून दिलंत.
आज मनाचा तळ ढवळून निघालेला असताना, सगळं वर्तमान अस्वस्थ झालेलं असताना, सगळ्या स्तरावर हिंसेंचीच भाषा सुरू असताना तुम्ही आपल्या सोबत बुद्धाला घेऊन आलात आणि आम्हाला आश्वस्त केलंत, आमचा बुद्ध शोधण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलंत, तेही कसं, तर हसतखेळत, आमच्या मनात कुठलंही न्यून न येऊ देता, आमच्यासमोर मैत्रीचा/स्नेहाचा हात पुढे करून - मी/आम्ही तुमचे खूप खूप ऋणी आहोत.
‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ या पुस्तकाची सोबत किती महत्वाची आहे, हे पुस्तक वाचूनच प्रत्येकाला कळू शकेल. जरूर वाचावं - मनोविकास प्रकाशनाचं डॉ. आनंद नाडकर्णी लिखित ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’!
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment