Spiti Valley

Spiti Valley

हिमालयाचं वर्णन पुस्तकांमधून वाचलं होतं, 
शम्‍मी कपूरच्या ‘याहू’ आरोळीतून तो दिसला होता
अनेकजणांच्या तपश्चर्येचा भाग असणारा
म्हणून वाचलेल्या पुस्तकांमधल्या गोष्टीतून तो कळला होता...
धाडसी, निर्भय अशांना साथ देणारा म्हणून 
तो लक्षात राहिला होता
त्याचं हिमाच्छादित असं रूप डोळ्यात साठवून होते
प्रत्यक्षात मात्र त्याला बघितलं आणि 
त्याचं रूप बघून छाती दडपून गेली, मन अवाक् झालं...
अद्भभुत, अचाट, अफाट, की भयंकर, भीषण, भीतिदायी?
अप्रतिम, सुंदर, मनोहारी की अटल, अचल, अशाश्वत?
चकित, स्तिमित, अचंबित, स्तंभित या सगळ्या
भावनांच्या पलीकडे नेणारी ती भावना होती.
कधी हिरव्‍यागार उंचच उंच आकाशाला भिडणाऱ्या
सूचिपर्णी वृक्षांमधून त्याचं विलोभनीय रूप दिसत होतं,
तर कधी उग्र, रौंद्र रूप धारण केलेला
वाळूच्या असंख्य पर्वतांना कवेत घेऊन
क्षणभंगूर जीवनाचं वास्तव सांगणारा
असा हिमालय मी बघितला, अनुभवला
अजूनही मी गांगरलेल्या मन:स्थितीतच आहे.  ते जीवघेणे, कठीण घाट, तो मातीने मळकटलेला क्षणोक्षणी ढासळत जाणारा अरूंद कच्चा रस्ता, डोक्यावरून कोसळत येणारे अगणित लहान-मोठे धबधबे आपली वाट काढत रस्त्यांवर दमदाटी करत आपलं अबाधित अस्तित्व दाखवणारे आणि पर्वतांवर पहुडलेले सुस्त, आळशी बर्फाचे थर.
मागच्या वर्षी मी आसाम, मेघालयच्या ट्रीपवरून परत आले आणि आसावरी, रिच्या यांनी ‘आपणही मिळून कुठेतरी जाऊयात’ असा हट्ट धरला. मग पर्यावरणतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी हिमालयातली स्पिती व्‍हॅलीच्या ट्रीपचं नियोजन करतो असं म्हटलं आणि आमची पुणे ते चंदीगढ अशी विमानाची तिकिटंही बुक केली.
बघता बघता जाण्याचा दिवस उजाडला. आम्ही गायकवाड यांच्या सूचनेनुसार थर्मल, गॉगल, शूज, स्टीलची पाण्याची बाटली, कापूर, खाण्याचे पदार्थ अशी तय्यारी करून निघालो. या वेळी मुद्दामच प्रवासातल्या सर्व ठिकाणांचा अभ्यास केला नाही. कोरी पाटी घेऊन जाऊयात आणि दिसेल ते टीपूयात असं ठरवलं.
पुण्याहून 11 जूनच्या रात्री निघून चंदीगढला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पोहोचलो. मोकळं सुटसुटीत असं विमानतळ, विमानतळाच्या मध्येच छोटीशी बागही. तिथून आम्ही सिमला, नारकांडा, कल्पा, नाको, काझा, हिक्‍कीम, लांग्झा, किब्बर, मनाली असं करत परत चंदीगढला पोहोचायचं आणि तिथून पुणे इथे आपल्या मुक्कामी यायचं असं ठरलं.
डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितलं होतं, ‘इतर प्रवासासारखा हा प्रवास असणार नाही हे लक्षात ठेवा. सतत थांबून कुठल्यातरी वास्तू आपण बघणार असं या प्रवासात नसून आपण हिमालयाच्या अंतरंगात शिरून - स्पिती व्‍हॅलीचा अनुभव घेणार आहोत. हिमालयाचं वेगवेगळं रूप डोळ्यात, मनात, साठवणार आहोत. त्यामुळे  डोळे आणि मन उघडे ठेवा’. त्यांचे शब्द कानावर पडले, तरी प्रत्यक्ष अनुभव इतका थरारक असणार आहे याची स्वप्नातही कल्पना केली नव्‍हती.
डॉ. महेश गायकवाडसह माझे सहप्रवासी गजानन बिराजदार, डावकिनाचा रिच्या, मेघना हांडे, सुवर्णा खराडे, कामिनी आढाव, प्रा. राजाराम ढोक, प्रा. ऋतुजा तावरे आणि श्रुती कदम असे आम्ही एकूण दहाजण होतो. थोडक्यात, सर्व वयोगटातली मंडळी होतो. श्रुती ही इंजिनियरिंगची विद्यार्थिनी, तर ऋतुजा ही कम्युटर सायन्सची प्राध्यापक, गजानन हा अनिसचा कार्यकर्ता आणि इंडस्ट्रियल सप्लायर, रिच्या कार्यकर्ता आणि विज्ञान लेखक, मेघना ही ससूनमध्ये कार्यरत, तर सुवर्णा अजिम प्रेमजीची स्कॉलरशिप घेऊन उच्च शिक्षण घेणारी कार्यकर्ती, कामिनी ही प्राथमिक शाळेतली शिक्षिका, तर राजाराम ढोक हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक. महेश गायकवाड हे पर्यावरणतज्ज्ञ असून त्यांची निसर्गजागर  संस्था पर्यावरणाबद्दल जागरूकता आणण्याचं काम करते. 
चंदीगढच्या विमानतळावर सकाळी सात वाजता ड्रायव्‍हर बलजितसिंह टेम्पो ट्रॅव्‍हलरसह पोहोचला. नाव बलजितसिंह असलं, तरी किरकोळ शरीरयष्टीचा, उदासवाणा, कंटाळलेला, थकलेला असा तो वाटत होता.
गाडीत सामानासह स्थानापन्न होताच चंदीगढ ते शिमला, कुफरी असा प्रवास सुरू झाला. गाडीत चमकिलाच्या गाण्यांसारखी पंजाबी ठेक्यावरची गाणी वाजत होती. प्रवासात लागलेलं शिमला मुळीच आवडू नये असं ठिकाण वाटलं. पर्वत कोरून त्यात पर्यटकांसाठी बांधलेली निवासाची व्‍यवस्था, कचरा, प्लॅस्टिकचे ढीग, निसर्गाला विद्रुप करण्याचा चंग बांधलेलं दृश्य होतं. अत्यंत भयकारी अशी अरूंद रस्त्यावरची वळणं पार करत आम्ही कुफरीला पोहोचलो. 
हिमालयाच्या आकाशाला भिडणाऱ्या रांगांमधलं कुफरी नॅशनल पार्क आम्हाला बघायचं होतं. इथे सफरचंदांच्या बागा होत्या, मात्र त्यावरच्या नेटच्या आच्छादलेल्या जाळ्या वाईट दिसत होत्या. आमची गाडी पोहोचताच तिथले ‘पंडे’ आमच्यावर तुटून पडले. आम्ही मोठ्या शिताफीने त्यांच्या कचाट्यातून सुटका करत नॅशनल पार्कच्या दिशेने चालायला लागलो. आपापली दुकानं चालवणारी ही मंडळी नॅशनल पार्कविषयी काहीच बोलत नाहीत. त्यांचा रस फक्‍त तुम्ही त्यांच्या घोड्यावरून प्रवास करण्यात होता.
कुफरी इथलं नॅशनल पार्क अतिशय व्‍यवस्थित, नीटनेटकं पर्वताच्या चढउताराप्रमाणेच सजलेलं. सोबतीला सूचिपर्णी वृक्षांची साथ होतीच. इथे सांबर, काळवीट, बिबट्या, भालू, गिधाड असे प्राणी बघितले. दुपारची वेळ असल्याने काही निवांत वामकुक्षी घेत होते. भालू इकडून तिकडे जोडीने फिरत होते. हिमालयातले कावळे भारी गमतीशीर होते. त्यांचा आवाज एखाद्या सुस्तावलेल्या आळशी माणसासारखा होता. काव काव करण्याऐवजी ते आ आ आ व असा काहीसा विचित्र उच्चार करत होते.
नॅशनल पार्कमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही नारकांडा इथे जाण्यास निघालो.
वाटेत बलजितसिंहने तीन जणांना धक्का मारला. त्याला झोप येतेय का अशी  विचारणा केली, पण त्याने तसं काही नसल्याचं सांगितलं आणि एका कठीण वळणावर त्याने चक्‍क स्टेअरिंग व्‍हिलवर आपली मानच टाकली. त्याला हात लावून बघताच, तो तापाने फणफणला असल्याचं लक्षात आलं. संध्याकाळ होत आलेली, घाटात गाडी बंद करून शुद्धीत नसलेला ड्रायव्‍हर...काय करायचं? गजाननने गाडी चालवण्याची तयारी दर्शवली. पण हिमालयाच्या घाटातले रस्ते इतके अरूंद आणि भयावह आहेत की जीव मुठीत धरून या शब्दांचा खरा अर्थ इथे समजतो. त्यामुळे आपण आता कुठलीही जोखीम न घेता मिळेल त्या वाहनाने नारकांडाला पोहोचायचं आम्ही ठरवलं.
आम्ही सगळे पटापट आपापल्या सॅकसह गाडीतून उतरलो. आम्हा दहाजणांचा जत्था पाहून हिमाचल प्रदेशातल्या बसच्या कंडक्टरने आपली बस थांबवून आमची विचारपूस केली.  तो तरूण कंडक्टर खूपच गोड होता. त्याने मदतीचा हात दिला आणि आम्ही पटापट आपापल्या मोठ्या बॅगा बसमध्ये टाकत सॅकसह बसमध्ये चढलो. बस आधीच प्रवाशांनी खचाखच भरलेली, आणि त्यात आम्ही दहाजण. गाडीत चमकिला सदृश गाणी वाजत होती. पहाडी तरुण, वृद्ध, मुलं अशी वेगळ्या चेहरेपट्टीची मंडळी होती. पहाडी वृद्ध सुरकुतलेल्या चेहऱ्यांच्या काटक स्त्रिया स्थानिक भाषेत एकमेकींशी बोलत होत्या. 
संपूर्ण प्रवासात घाटावरची वळणं  शरीर खिळखिळं करत होती. सतत डावंउजवं करत दोन्ही बाजूंनी आदळवत होती. त्यातच बसमध्ये सुरीला याने संगीतबद्ध केलेलं 2022 मध्ये प्रसिद्ध होऊन एकच धुमाकूळ घालणाऱ्या हरियाणवी अल्बमचं गाणं वाजत होतं आणि बसमधली तमाम मंडळी आपण जणू हिरवळीवरून सुखद प्रवास करतो आहोत असे भाव चेहऱ्यावर घेऊन आंनद लुटत होती. गाण्याचे बोल होते:
तू छोरी फ्लावर पॉट रै खुशबू आवै महकी महकी 
जब पहर पलाज़्ज़ो चलै चाल तेरी लागै बहकी बहकी 
पूरा शहर स्टेचू होज्या रै शहर स्टेचू होज्या रै 
ना घणी शिंगर कै चालै कमर तेरी 
कमर तेरी लैफ्ट राइट हालै कमर तेरी लैफ्ट राइट हालै 
अजय हुडाच्या या गाण्याने आमचे चेहरे जरा जास्तच उजळले. बसचा ड्रायव्‍हरही गाण्याच्या तालावर त्याच्या हातातलं स्टेअरिंग लेफ्ट राईट करत होता. मी त्याच्याकडे बघितलं, तर दिसायला धट्टाकट्टा, गोरागोमटा, अगदी ऋषी कपूरसारखा क्यूट, गोबऱ्या गालाचा, हसतमुख, आपल्याच धुंदीत  इतक्या कठीण वळणावळणाच्या रस्त्यावरून तो बस चालवत होता. रस्त्यात भेटणाऱ्या इतर गाडीचालकांशी मधूनच गाडी न थांबवता हाय हॅलो करत होता, त्याच्या हाताच्या मनगटावर अरूण असं गोंदवलं होतं. तर मानेच्या बाजूला सूर्याचं चित्र गोंदलेलं होतं. त्याच्याकडे बघत आणि पहिल्यांदाच ऐकलेल्या या गाण्याचा आनंद लुटत असताना बसने कच्कन ब्रेक मारला आणि नारकांडा आल्याचं सांगितलं. आम्ही बसमधून भराभर उड्या मारल्या, तर दयाळू कंडक्टरने आम्हाला श्याम रिजन्सी या आमच्या हॉटेलसमोरच उतरवलं होतं.
हॉटेल स्वच्छ, सुंदर. फक्‍त हिमालयातल्या आतल्या भागात कुठलीही हॉटेल जास्त उंचीची नाहीत. त्यामुळे लिफ्टचा संबंधच येत नाही. त्यातच महेश गायकवाड यांनी हालचाली कमी करा, म्हणजे थकवा जाणवणार नाही ही सूचना दिलेली असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरच्या आमच्या रूममध्ये पोहोचेपर्यंत गडकिल्ला चढल्याचा अनुभव आला.
फ्रेश होऊन आम्ही  गरमागरम जेवणावर ताव मारला. इथून पुढे आपण जास्त उंचीवर जात राहणार तेव्‍हा ऑक्सीजनचा त्रास होऊ शकतो, असं गायकवाड यांनी सांगितल्यामुळे काय काय खबरदारी घ्यायची याची उजळणी मनाशी करू लागलो. नाकाशी कापराची वडी हुंगायला घ्यायची, पाणी सतत घोट घोट पित राहायचं अशा काही सूचना होत्या.
रात्री गाढ झोप लागली, सकाळी जाग आली, मी थंडी वाजत असतानाही बाल्कनीत आले, समोर आमची गाडी उभी होती आणि एक धट्टाकट्टा, हिरोसारखा तरूण काळ्या टीशर्टमध्ये गाडीची साफसफाई करत होता. हा आमचा दुसरा बदली ड्रायव्‍हर सुखबिंदरसिंह होता. बलजितसिंहच्या जागी आलेला. मी त्याच्याकडे बघून स्मितहास्य् केलं. त्यानंतर गरमागरम पाण्याने आंघोळ करून, नाश्ता करून आम्ही नारकांडावरून कल्पाच्या दिशेने कूच केलं.
कल्पाच्या रस्त्यावर मोनेस्ट्री बघितली. इथल्याच पर्वतांच्या कुशीत ध्यानधारणा करण्यासाठीच्या गुहाही दिसल्या. इथे ठिकठिकाणी बुद्धाच्या मोनेस्ट्री आहेत. यातली की मोनेस्ट्री तर चौदाव्‍या शतकातली असून त्यांचं आर्किटेक्चर खूप प्राचीन आहे. आपण तिबेटमध्ये असल्याचा भास या ठिकाणी होतो. इथून पुढे गाव दिसलं, की प्रत्येक घरावर बुद्धाचे संदेश असलेले अनेकरंगी झेंडे लावलेले बघायला मिळतात. संपूर्ण गाव झेंड्यांनी स्वागत करताना दिसतं. अर्थात गाव, म्हणजे थोडीशी तुरळक दिसणारी घरं.
रस्त्यावरून जाताना चंदीगढपासूनच सतलज नदी आम्हाला सोबत करत होती. सतलज तिबेट मध्ये उगम पावते आणि स्पिती खोऱ्याच्या डाव्या बाजूने खाली येते 
दोन्हीचा संगम झाल्यावर त्या मोठ्या नदीला सतलज म्हटलं जातं.. सतलजचं पुढे नाव झेलम...मग ही झेलम पाकिस्तानला जाते आणि तिथून पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळते. सतलज नदीकडे बघून ही नदी अशी कशी असा प्रश्न वारंवार मनाला पडत होता. इतर नद्यांची पात्रं, त्यांचे वाळुचे किनारे, त्यांचं निळंशार पाणी, आतले दगडगोटे असं दृश्य मनात ठसलेलं असताना सतलजने मनातल्या दृश्यांना पार सुरूंग लावला. सतलज नदी सोबत करत होती, पण तिची सोबत काही कामाची नव्‍हती, ती आपल्याच नादात, कर्तव्‍यभावनेने धावत होती. तिला आमच्याशी काहीएक देणंघेणं नव्‍हतं. त्यातच तिचा मळकटलेला अवतार....आपल्याकडच्या नद्या पावसात जसं चहाचा गढुळलेला रंग घेतात, तसा न घेता चक्‍क सिंमेटचा रंग घेऊन ही सिमेंटलेली नदी वाहत होती. आसपास भरपूर दगडगोटे होते...तिच्या पाण्याच्या खळखळाटावर भरोसा ठेवून खूप मोठा हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्टचं काम सुरू होतं.
बघता बघता आम्ही घाटातल्या एका ठिकाणी थांबलो. नेहमीप्रमाणे घाटातला अरूंद रस्ता आणि वळणं, भीतीने थरकाप उडवणारं दृश्य, एका बाजूने उंचच उंच पर्वत, तर दुसऱ्या बाजूने नजर पोहोचू शकणार नाही इतकी खोल दरी....हे ठिकाण सुसाईड पॉइंट म्हणून प्रसिद्ध होतं. इथे कोणी आत्महत्या केली, तर त्याच्या शरीराचा बारीकसा तुकडाही सापडणार नाही. काहीतरी विचित्र मनस्थिती इथे झाली होती हेही खरं. जगताना किती इच्छा, किती महत्वाकांक्षा, किती हेवे-दावे, किती स्वप्नं उराशी बाळगून आपण धावाधाव करत राहतो आणि शेवटी कधी हताश, तर कधी कृतकृत्य होवून या जगाचा निरोप घेतो. मात्र इथे या पर्वतरांगांनी माणसाच्या जगण्याला कधीच स्थैर्य नसतं हे सांगायला सुरूवात केली होती. जगणं फोल आहे असं सांगणाऱ्या या पर्वतरांगा, झालंय तुझं जगून, आता कशाला फरफटत निरर्थक जगायचं असं सांगत, मार उडी असं खुणावत होती. त्या सगळ्या निराशावादी विचारांना झटकून क्षणात भानावर आले. विषारी संदेश देणाऱ्या पेरणाऱ्या या सुंदर दिसणाऱ्या पर्वतांकडे दुर्लक्ष करत मी आपलं असणारं जग पुन्हा डोळ्यांसमोर आणलं. माझा ठामपणा बघून आकाशाच्या टोकाशी चमचमणाऱ्या पर्वताने आपलं रूप पालटून मला शांततेचा अनुभवही त्याच क्षणी दिला. माझी भव्‍यता टिपून घे असंही हळूच कानात सांगितलं.
रात्री कल्पाच्या हॉटेल हिमालयामध्ये पोहोचलो. नेहमीप्रमाणे तिसऱ्या मजल्यावरची रूम...छानशी बाल्कनी आणि बाल्कनीमधून दिसणारे हिमालयाचे पांढरेशुभ्र बर्फाळलेले पर्वत. जेवण करून हॉटेलच्या खाली मोकळ्या जागेवर आम्ही सगळेच कमर तेरी लेफ्ट राईट हाले या गाण्यांवर मनसोक्‍त नाचलो.
इथूनच मला ऑक्सिजन कमी पडतोय याची जाणीव झाली. बोलण्यासाठी तोंड उघडलं की बोलताच येईना. आपल्या छातीवर पिशाच्चाने कब्जा केला आहे आणि आपलं हृदय दाबून टाकलंय असं वाटत होतं. कितीही प्रयत्न केला तरी श्वास घेता येत नव्‍हता. रात्री झोपेतून सतत जाग येत होती.
सकाळी कल्पाहून नाकोकडे प्रवास सुरू झाला. नेहेमीप्रमाणे कर्तव्‍यभावनेने सतलज नदी सोबतीला होतीच. आता चहुबाजूंनी वेढलेले पर्वत खडकाळ होते, तर काही निव्‍वळ वाळूचे ढिगारे होते. कधी ढासळतील याचा नेम नसलेले. रस्त्यात मस्त धबधबा लागला. थोडेसे पंजाबी आणि महाराष्ट्रीयन पर्यटक आनंद घेत होते.
दुपारी बारा वाजता नाको इथे पोहोचलो. आता उंचीवरच्या गावांना सुरूवात झाली होती. त्यामुळे ऑक्सिजन किती महत्वाचा असतो हे समजायला लागलं होतं. इथे पोहोचेपर्यंत कामिनीला उलट्या सुरू झाल्या, तर ऋतुजाचं पोट दुखायला लागलं, मेघनाचं डोकं दुखायला लागलं आणि माझ्या छातीवर तर पिश्शाच्च्याने आधीच ताबा मिळवलेला होता. मी तोंड उघडताच महत्प्रयासाने एखादा शब्द बोलता यायचं.  नशीब मला ऑक्सिजनचं सिलेंडर लावावं लागलं नाही. मला या प्रसंगी दिल बेचारा चित्रपटामधला सुशांतसिंग राजपूत आणि त्याची मैत्रीण आठवत होते. दोघांच्याही पाठीवरचे ऑक्सिजनचे सिलेंडर आणि नाकातल्या नळ्या आठवून त्यातली तीव्रता लक्षात आली. कोणीतरी मलाही ऑक्सिजन सिलेंडर लावा असं मन म्हणत होतं.
जेवण करून आम्ही इथला एक तलाव बघायला निघालो. 
नाको एक छोटसं गाव...या गावातही लोक बाहेर फारसे बघायला मिळत नाहीत. सहा महिने यांचं जगणं सुरळीत असतं आणि त्यानंतर मात्र बर्फवृष्टीमुळे घरात बंदिस्त होतं. हे इतकं जुनं गाव होतं की इथली डोंगरावरची मोनेस्ट्री, गावातली जनावरांसाठी बांधलेली घरं, दगडगोट्यांच्या उभारलेल्या कपांउंड वॉल बघणं सुरेख अनुभव होता. तलाव मात्र छोटासाच होता. स्थानिक मुलं शंभर रूपयात अर्ध्या तासाची चक्‍कर बोटीतून मारून आणत होती. तलावांचं शहर संबोधल्या जाणाऱ्या ठाणे शहरातले तलाव यापेक्षा मोठे होते. इतक्या लहानशा तलावाभोवती एक चक्‍कर मारणं मला असह्य झालं कारण माझी पावलंच मोठ्या कष्टाने पडत होती. मी कापूर गुंडाळलेला रूमाल सतत हुंगत असल्याने निदान मी जिवंत आहे याचा फिल मला येत होता.
माझ्याबरोबरचे इतर सगळेजण डोंगरावरची मोनेस्ट्री बघण्यासाठी गेले, मी मात्र सावकाश चालत हॉटेलवर येऊन पोहोचले.
इथल्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाक बनवणारी पेमा नावाची तरूणी खूप गोड होती. तिने स्वयंपाकही अत्यंत चविष्ट बनवला होता. विशेषत: या संपूर्ण प्रवासात डाळ अतिशय रूचकर आणि स्वादिष्ट होती. जेवण करून रूममध्ये प्रवेश केला. खूप मोठी रूम, आतून थंडीला अटकाव करणारं लाकडी फर्निचर आणि लाकडी फळ्यांनी उभारलेल्या भिंती आणि सिलिंग. अंगातल्या थर्मल, कानटोपी आणि स्वेटर/कोटमुळे थंडीशी सामना करता येत होता.
खरं तर थोडा वेळ आम्ही सगळे पत्ते खेळलो होतो. पण आता रूममध्ये आल्यावर उदास वाटायला लागलं. इथपर्यंतच्या प्रवासातल्या कितीतरी नकोशा आठवणी जाग्या व्‍हायला लागल्या. अपमान, खंत, चुका, फसवणूक, विश्वासघात, दांभिकता/दुटप्पीपणा, ओझी, फरफट, घुसमट यांना झिडकारून लावता लावता थकवा आला. बाल्कनीतून दिसणारा हिमालय अचानक नकोसा झाला. तू खूप रखरखीत, कोरडा, भयाण, भकास आहेस असं त्याला सांगावंसं वाटलं.  अचानक पुण्यातल्या आपल्या घरी जावंसं वाटायला लागलं.
रात्रीच्या जेवणात इकडचा थूपका पदार्थ खाल्ला. बाकी जेवणही होतंच. कधीतरी झोप लागली. पण रात्री दीड वाजता, तीन वाजता आणि पाच वाजता जाग येतच गेली.
सकाळी जाग आली आणि नाकोहून काझाकडे जायचं आहे हे लक्षात आलं. रस्त्यात पुन्हा एक मोनेस्ट्री बघितली. या प्रवासात मात्र हिमालयाने पुन्हा एकदा आपलं अत्यंत रौंद्र दर्शन घडवलं. तुम्ही किती यत्किंचीत आहात याची जाणीव त्याने करून दिली. इथे कुशल ड्रायव्‍हर नसेल तर तुम्ही परत येऊच शकत नाही हे वास्तव आहे. आमचा वाहनचालक, सारथी सुखबिंदरसिंह याला जागतिक पुरस्कार द्यायला हवा असं मनाने जाहीर केलं.
मी हे सगळं कोणाशी बोलू शकत नव्‍हते कारण छातीवर बसलेलं पिश्शाच्च हलायचं नाव घेत नव्‍हतं. दुपारी घाटांना पार करत एका रेस्टारंटमध्ये शिरलो. एक हसतमुख गोरापान तरूण काउंटरवर बसला होता. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर सुवर्णाने सुरेल आवाजात चळवळीतलं एक गाणं म्हटलं. मला आग्रह झाल्यावर मीही वैभव देशमुखच्या कविता आणि किशोरकुमारची गाणी गायली. काउंटरवरचा तरूणही मन लावून माझं गाणं ऐकत राहिला. आमचं जेवण झाल्यावर त्याने माझ्या जवळ येऊन माझा आवाज आवडल्याचं सांगितलं. तो तिथल्या भागातल्या काँग्रेसचा अध्यक्ष असल्याचंही सांगितलं आणि त्यांची पारंपरिक टोपी माझ्या डोक्यावर घालून माझा सत्कार केला. मग काय रंगाखुशच झाला. पुन्हा येऊ असा निरोप घेत आम्ही रस्त्याला लागलो. इथे आम्ही थुपका, फ्राइड राईस खाल्ला.
संध्याकाळी आम्ही काझाला पोहोचलो. इथे आम्ही एका बैठ्या घरात शिरलो. हा आमचा होम स्टे होता. पंचवीशीचं एक तरूण जोडपं आणि त्यांचा राहा कपूरसारखा दिसणारा पावणेदोन वर्षांचा सोनम वांगचूंग हा मुलगा असं ते कुटुंब होतं. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आमच्या रूम स्वच्छ आणि छान होत्या. इथलं जेवण संपूर्ण प्रवासातलं अतिशय स्वादिष्ट जेवण होतं. उडदाच्या डाळीची आमटी, गरमागरम भात, गव्‍हाची रोटी, अंडाकरी, मिक्स भाजी, घरचं तूप, सॅलेड असं जेवण, त्यात जेवणासाठीची बैठी व्‍यवस्था, तत्परतेने आग्रह करत वाढणारं जोडपं, मध्येमध्ये करणारा सोनम वांगचूंग. त्याला भात खाऊ घालण्यात गुंग झालेली मेघना उर्फ मॅगी... तृप्त होवून रूममध्ये प्रवेश केला.
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जगणारी माणसं बघितली आणि माणसामधला चिवटपणा किती महत्वाचा आहे हे जाणवलं. रात्री डॉ. रवींद्र तांबोळींचा फोन आला, छानंसं कुलू मनालीला जावं, सुंदर निसर्ग बघावा आणि परत यावं हे सोडून हिमालयात त्यातही इतक्या आतल्या दुर्गम भागात जाण्याची कसली दुर्बुद्‍धी सुचली आहे असा त्यांनी मला सवाल केला. त्याचबरोबर हिमालयाची रजिस्ट्री करून विकून टाका एकदाचा आणि या परत असा आदेशही दिला. त्यांनी हिमालयाचं दुर्गम भागातलं रूप आधीच फिरून बघितलं असल्यामुळे हिमालयाच्या रौंद्र रूपावर आम्ही विचारवंतांसारखी चर्चा केली आणि एकमत केलं.
आता उद्या देखील काझामध्येच मुक्काम असणार होता. त्यामुळे निवांतपणे झोपेच्या आधीन झाले. सकाळचा नाश्ता गंमतशीर होता. घरी केलेला ब्रेड, म्हणजे रात्री सोडा घालून भिजवलेली कणिक आणि सकाळी तिच्या केलेल्या जाडसर रोट्या. त्याबरोबर बटर, जॅम, शेंगदाण्याची चटणी वगैरे. नाश्त करून आमचा
सकाळी प्रवास सुरू झाला. आता हिमालयाच्या तुसडेपणाची किंचित सवय झाल्यामुळे त्याचं भीती दाखवणाऱ्या रूपाची पर्वा करावीशी वाटेना. मात्र घाटातली वळणं अजूनही मनाचा थरकाप उडवत होतीच. आपण सुखरूप परत जाऊ शकू ना हा प्रश्न वारंवार मनाला पडत होता. नास्तिक असल्यामुळे कुठल्याही देवाचा धावा करणं उपयोगी पडलं नसतंच. अशा प्रसंगी माणसाला मंदिरांचा/देवांचा अदृश्य आधार का लागत असावा हे लक्षात आलं. आपला आपल्यावरचा विश्वास जेव्‍हा ढळतो, तेव्‍हा कोणीतरी यातून बाहेर काढणारं आहे किंवा असावं ही भावना माणसाला तारणारी असावी.
आम्ही जगातल्या सर्वाधिक उंचीवरच्या पोस्टऑफीसच्या ठिकाणी पोहोचलो होतो. हे ठिकाण म्हणजे हिक्‍कीम. अर्थात इथेही वाळूंचे भयंकर पर्वत होतेच. इथली मोनेस्ट्री अनेक आक्रमणं पचवून उभी असलेली.
पोस्टाच्या डब्याच्या आकाराची पोस्टऑफीसची वास्तू बघून लहानपणापासून लिहिलेल्या, मिळालेल्या पत्रांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यातही अतुल या माझ्या मित्राला मी लिहिलेली आणि त्याची आलेली अनेक पत्रं जशीच्या तशी आठवली. आयुष्याने इतकं निखळ मैत्र, इतका चांगला मित्र अतुलच्या रूपात दिला याबद्दलची कृतज्ञता मनात दाटून आली. इथे मग काही पोस्टकार्ड विकत घेतली. सुवर्णसंध्याला फोन करत पत्ता मागवला. मग सुवर्णसंध्या, नयन, आसावरी/शुभा, श्वेता आणि अपूर्व-सायली यांना पत्रं लिहिली आणि तिकिटं लावून पोस्टाच्या पेटीत टाकली. जगातल्या इतक्या उंचीवरूच्या पोस्टाच्या पेटीत पत्रं टाकल्याचा आनंद खूप वेगळा होता. 'आता इथून पुढे काय व्‍हायचं ते होवो, तू मला भीती दाखवू शकत नाहीस' असं मी हिमालयाच्या पर्वतांना ठणकावून सांगितलं. मनातल्या भीतीला झुगारून लावलं होतं. छातीवरच्या पिश्शाच्च्यालाही 'काय करायचं ते कर मी तुला नाही घाबरत' असं सांगितलं होतं.
जगातलं सर्वात उंचीवर असलेलं गाव आणि इथे असलेला बुद्धाचा 35 फूटी ध्यानस्थ मुद्रेतला पुतळा. त्यानंतर मिळेल ते जेवण करून पुन्हा सोनम वांगचूग या लाघवी मुलाशी गप्पा मारायला परतलो. या मुलाने आम्हाला खूपच लळा लावला. तो आमच्याशी एक एक शब्दांत बोलत होता. हसत होता, आमच्या मांडीवर, कडेवर येऊन बसत होता. रात्री पुन्हा जेवणावर ताव मारत आम्ही झोपेच्या आधीन झालो.
पहाटे चार वाजता आम्ही तयार होऊन चांद्रताल लेकच्या दिशेने प्रवास सुरू केला. रस्त्यात आम्ही एका टेकडीसदृश्य पठारावर थांबलो. सोनम वांगचूंगच्या आई-वडिलांनी सोबत दिलेला ब्रेड, जॅम, बटर, काकडी, कोबी, कांदा यांना घेऊन ऋतुजा, कामिनी, श्रुती यांनी बनवलेले सँडविच खाल्ले. तिथून पुन्हा प्रवास केला आणि अचानक सर्वत्र बर्फाळलेले पर्वत दिसायला लागले, आम्हाला खुणावायला लागले. आधी भीती दाखवून झाली होती, आता लोभस रूपडं हिमालय दाखवत होता. आम्ही त्याच्या आणखी जवळ गेलो. मग काय? त्याच्याशी दोस्ती करत  अंगावरच्या कपडयांची ओलं होण्याची पर्वा न करता बर्फात मनसोक्‍त खेळलो. स्वच्छ पाणी प्यायलो.
इथून आम्ही चांद्रताल लेक बघितला - खूपच लांबच लांब न संपणारा रस्ता....चालत राहिलो...मात्र लेक दिसला, तेव्‍हा उंचावरून खाली उतरून जावं लागणार हे लक्षात येताच, माझ्या छातीवरच्या पिश्शाच्याने मला जाण्यास नकार दिला. सुवर्णा आणि मी वरतूनच लेकचं दर्शन घेतलं. अतिशय नितळ, स्वच्छ, सुंदर असं त्याचं रूप होतं. तिथे न जाणारा येडाच. मी आणि सुवर्णा सोडल्यास सगळ्यांनी तिथे नृत्य केलं. हवेत उंच उड्या मारल्या आणि आनंद लुटला. रिच्या आणि मॅगी यांनी तर इथे येऊन आपले पैसे वसूल असंही म्हटलं.
चांद्रताल लेक बघण्यासाठी भारतातल्या कानाकोपऱ्यातून म्हणजे पंजाबी, गुजराथी, बंगाली असे अनेक लोक आले होते. त्यातली वृद्ध जोडपी बघून तर हुरूप आणखी वाढत होता. एकमेकांचे हात धरून शांतपणे एक एक पाऊल टाकणाऱ्या त्या 75-80 वर्षांच्या जोडीला बघून नेमकं काय वाटत होतं हे शब्दात सांगणं अवघड आहे. मात्र ते दृश्य मनाला खूप दिलासा देत होतं.
तिथून राजमा चावल खायला मिळालं. ते खाऊन आम्ही रोहतांग, 9 किमी लांबीचा अटल टनेल बघितला. मनाली लागल्यावर विकेंडची गर्दी जशी लोणावळा रस्त्यावर असते तसा अनुभव घेतला. 13 किमी अंतर पार करण्यासाठी तीन ते चार तास आम्हाला लागले. मनालीच्या हॉटेल वूडलँड इथे रात्री पावणेदहा वाजता पोहोचलो. फ्रेश होवून जेवायला गेलो. जेवणात मासे खास बनवले होते. पण बाकी जेवण यथातथाच होतं. सोनम वांगचूंगच्या घरची अशा वेळी तीव्रतेने आठवण आली.
सकाळी उठून तयार झाले, तर बाल्कनीतून मनालीचं सुंदर दृश्य नजरेस पडलं. सूचिपर्णी वृक्षांचे पर्वत, खळाळत वाहणारी नदी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि आल्हाददायक वातावरण. मनालीत येताच हिमालयाने आपलं रूप पालटून आपल्यातला अलिप्तपणाचा आव बाजूला सारून लुभावणारं रूप दाखवलं होतं.
सकाळी नाश्ता करून रस्त्यात भरपूर चेरीची खरेदी करून आम्ही अल्पाईन धाब्यावर पोहोचलो. राजवाड्यासारखा रसिकतेने केलेला हा ढाबा आम्हाला खूपच आवडला. त्यातही विशेष म्हणजे इथे तयार केलेली स्वच्छतागृहं बघून आम्ही अवाक झालो. इतकी मोठी स्वच्छतागृह भारतात दुसरीकडे कुठेच नसावीत. इतकी सुंदर आणि छतावर चक्‍क झुंबर टांगलेली....इथे पंजाबची लस्सी पिवून तृप्त झालो. रस्त्यात लागलेल्या ट्रॅफिकमुळे चंदीगढचं रॉक गार्डन, रोज गार्डन, आणि इतर ठिकाणं बघणं राहून गेलं. रात्री आठ वाजता सरळ शहीद भगतसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचावं लागलं. सुखबिंदरसिंहचा निरोप घेताना खूप भरून आलं. आठ दिवसांतलं त्याच्याशी जुळलं गेलेलं नातं त्याची सतत आठवण देत राहील.
हिमालयाच्या अंतरंगात शिरून त्यालाच्याबरोबरचा प्रवास करताना मी भारतीय असल्याचा अभिमान वाटला. माझ्या देशातलं वैविध्य आणि त्यातही हिमालयाचं असणं मला काय काय देऊन गेलं हे शब्दात सांगणं अशक्य आहे. खरं तर माझ्या या देशातला हिमालय बघण्याची संधी मला लाभली, त्याच्याकडून इतकं शिकायला मिळालं. त्याने आपली इतकी वेगवेगळी रूपं दाखवत माझ्यातल्या ‘मी’लाही खोलवर बघायला सांगितलं. स्पिती व्‍हॅलीचा एकूणच प्रवास एक तप पूर्ण -तपश्चर्या करायला लावणारा असा वाटला. आतल्या संयमाची परीक्षा घेणाराही ठरला.
कोसळणाऱ्या दरडी आणि अगणित धबधबे बघून 
क्षुल्लक गोष्टींना महत्व देऊन समोर आलेले क्षण खराब करू नका हे सांगणारा वाटला
आसाम-मेघालय प्रमाणेच इथले ट्रॅफिकचे नियम पाळणाऱ्या ड्रायव्‍हरबद्दल 
अभिमान दाटून आला. त्यातही एकमेकांवर न खेकसता, मी कशीही गाडी घालून 
रस्त्यावर कसा खोळंबा करीन या वृत्तीचा तो नाही. एकमेकांना जास्तीत जास्त मदत
कशी करता येईल, चांगलं वागता येईल हे बघणारे हे तमाम ड्रायव्‍हर बघून यांना
ही शिकवण हिमालयानेच दिली असाची याची खात्री पटली.
इथे गरिबी दिसली, लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसले नाहीत.
हिमालयाच्या आतल्या भागात तर पशुपक्षी जवळजवळ दिसलेच नाहीत. स्पिती व्‍हॅलीतल्या मोनेस्ट्रीजवळ केसाळलेली तगडी कुत्री आढळली आणि ती खूपच फ्रेंडली होती.
आम्ही ज्या वेळी जगातल्या सर्वात उंच गावात पोहोचलो, तेव्‍हा डॉ. महेश गायकवाड यांनी माझं भरभरून कौतुक केलं आणि वेळ पडली तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्‍यवस्था केली होती असंही सांगितलं.
एक मात्र खरं, आयुष्यात स्पिती व्‍हॅलीच्या प्रवासाचा एक अनुभव जरूर घेतला पाहिजे. संपूर्ण जगात असा प्रदेश आढळणार नाहीच, पण या प्रवासातून तुम्ही काय काय वेचाल हेही सांगता येणार नाही. या निमित्ताने हिमालयात लोक तप करण्यासाठी, संन्यास घेऊन का जात असावीत, सगळ्या जगापासून तोडून अलिप्त कशी होत असावीत आणि तिथे त्यांना नेमकं काय गवसत असावं हा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असावा.
मोनेस्ट्रीमधले बौद्ध भिक्खु, त्यांचे जतन करून ठेवलेले प्राचीन हस्तलिखित ग्रंथ, त्यांचे जडीबुटीवाले गरमागरम काढे, त्यांचं पेंटिंग, त्यांची जुनी दुर्मिळ भांडी, त्यांचे मनातल्या इच्छा पूर्ण करणारे गोल डमरू, तिथली स्वच्छता, मैत्रीपूर्ण संवाद यामुळे हा प्रवास अतिशय वेगळा ठरला. सतलजच्या किनाऱ्यावरून जाताना काही स्त्रिया दिसल्या. त्यांनी गोड हसत तिथल्याच फुलांनी बहरलेल्या झाडाची एक डहाळी तोडून गाडीच्या खिडकीतून माझ्या हातात दिली. कोणकुठल्या त्या स्त्रिया, पण त्यांचं ते हास्य कितीतरी वेळ सोबत करत राहिलं.
या प्रवासात माझ्या मैत्रिणी आसावरी आणि सुवर्णसंध्या बरोबर नाहीत याचा सल पूर्णपणे गेला. कारण आसावरीला तिच्या पायांच्या त्रासाने फिरताच आलं नसतं आणि सुवर्णसंध्याला इतका कठीण प्रवास सहनच झाला नसता.
चंदीगढवरून पुण्याच्या विमानतळावर उतरताच, आपण नवीन आयुष्य घेऊन परततो आहोत हा विचार मनात आला. चंदीगढची ठिकाणं पुन्हा कधीतरी डॉ. महेश गायकवाड दाखवतील ही खात्री आहे. त्यामुळे त्याची खंत मनात न ठेवता मनापासून त्यांना थँक्यू. सर, तुमच्यामुळे हिमालयाचं, सतलजचं खोरं मी बघू शकले. त्यातच साथीला असलेली सर्व मंडळी इतकी चांगली होती, की खेळीमेळीचं वातावरण परत येईपर्यंत अबाधित राहिलं. प्रवास तुमच्यातलं नातं किती तकलादू आणि किती मजबूत आहे हे सांगतो, तेच या प्रवासात सांगितलं.
रोज 15 हजार पावलं चालून, चढ-उतार करून, छातीवरच्या पिश्शाच्च्‍याला झेलून परतले आहे. पुन्हा दिनक्रम सुरू करायचा आहे. मात्र प्रवासात अलिप्तपणाचा राग आलेल्या, रौद्र रूपाने भेडसावणाऱ्या, मृत्यूची भीती दाखवणाऱ्या हिमालयाची आठवण येते आहे. 
आपल्या कुशीत घेऊनही 'तुझ्या जीवनाचा मार्ग तूच शोध' म्हणणाऱ्या हिमालयापुढे कोटी कोटी वेळा नतमस्तक व्‍हावं लागेल हे नक्‍की.
बाय स्पिती व्‍हॅली.
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmai.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.