प्रभात -रूपगंध - बलात्कारामागचं भीषण वास्तव आणि आपण!
१८ एप्रिल २०१३ रोजी दिल्लीमध्ये ६ वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार तिच्या शेजारी राहत असलेल्या तरुणानेच केला आणि एवढंच नाही तर तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करून तो बिहार येथे फरार झाला. आपली चिमुरडी सापडत नाही म्हणून हवालदील झालेले पालक जेव्हा पोलिसांकडे तक्रार नोंदवायला गेले तेव्हा त्यांना मिळालेली निर्दयी वागणूक आणि त्यानंतर हे प्रकरण दडपलं जावं यासाठी त्याच पालकांना २००० रूपये पोलिसांकडून देऊ केले गेले. प्रकरण इथंच थांबत नाही, तर आम आदमीच्या संजय केजरीवाल, इतर संस्था, कायकर्ते आणि प्रसारमाध्यमांनी नागरिकांना हाक दिली आणि सारेच न्यायासाठी रस्त्यावर उतरले. या सगळ्यांनी जेव्हा पोलीस आयुक्त नीरजकुमार यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी, मी का राजीनामा देऊ, माझ्या राजीनाम्याने अशा घटना थांबणार आहेत का, असं म्हणून आपण त्या पोलिसांना निलंबित केलंय ना, असं उत्तर दिलं. याला काय म्हणायचं?
दिल्लीतल्या निर्भयाच्या बलात्काराच्या घटनेची जखम अजून पुरती भरलेली नसताना एकामागून एक अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यानंतर केवळ २-३ दिवसाच्या कालावधीतच औरंगाबादला रस्त्यावरून चालणार्या एका विवाहितेला रिक्षात जबरदस्तीनं ओढून तिला मुकुंदवाडी परिसरातील एका शाळेच्या मागच्या भागात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. रोज या आणि अशा प्रकारच्या घटना आपण वाचतो आहोत, ऐकतो आहोत.
या सगळ्या घटना प्रसारमाध्यम जागरूतेनं सर्वांच्या समोर ठेवत आहेत. त्यातली भीषणता मांडत आहेत. स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते, सजग नागरिक सरकारला जाब विचारत आहेत, कायद्यात बदल मागताहेत. हे सगळं त्या प्रक्रियेतून घडत राहील. मात्र या अशा घटनांच्या मागील दाहक वास्तवाचा आपण वेध घेणार आहोत का?
बलात्कार जेव्हा होतो, तोही केवळ वय वर्षं ५ असलेल्या मुलीवर तेव्हा - आरोपीच्या विकृत मानसिकतेवर, क्रौर्यावर चर्चा होतात - अशांना फाशी द्यायला हवी, त्यांचं लिंग कापून टाकायला हवं असाही एक तीव्र सूर निघतो, पण त्याचबरोबर मृत्यू हा मार्ग नाही, तर समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असाही दुसरा सूर निघतो.
जगभरात भारत हा असा देश आहे की इथे महिलाना देवता, माता मानलं जातं. पण इथेच कोटयवधी स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचारही होतात. युनायटेड नेशन्सच्या एका अहवालाप्रमाणे ६५ देशांत मिळून दरवर्षी २ लाख ५० हजार बलात्काराच्या केसेस नोंदवल्या जातात. बलात्काराच्या एकूण घटनेपैकी केवळ ५४ टक्केच घटना पोलिसांपर्यंत पोचतात. बलात्कार होन्याच्या केसमध्ये ४४ टक्के मुली १८ वर्षाच्या आतल्या असतात. तर ८० टक्के ३० वर्षाच्या आतल्या. भारतात दरवर्षी २५००० बलात्काराच्या घटना पोलिसांकडे नोंदवल्या जातात. पोलिसांपर्यंत न पोचलेल्या घटना तर या आकडयांपेक्षा कितीतरी पटीनं अधिक! दरवर्षी महाराष्ट्रात ७७०३ बलात्काराच्या केसेस नोंदवल्या जातात.
बलात्काराची सुरुवात कशी आणि कधीपासून सुरू झाली असेल याचा विचार करताना अशी माहिती मिळते ती म्हणजे अगदी आदीम काळात दगडी हत्यारं, अग्नी या शोधांबरोबरच आपल्या लिंगाचा उपयोग कसा आणि काय होतो हे जेव्हा पुरुषाला लक्षात आलं तेव्हा तिच्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी, तिला आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी, तिच्यात भीती निर्माण करण्यासाठी सुरुवात केली. पुढे मनुष्य जेव्हा स्थिर झाला, शेती करू लागला, टोळ्यांनी राहू लागला तेव्हा समाजात वंशपरंपरा आणि अधिकार गाजवण्याची परंपरा निर्माण झाली. ज्याच्याकडे पुरेसं धान्य, पुरेशी शां, पशु तो जास्त सामर्थ्यशील मानला जाऊ लागला. आणि यातूनच स्त्रीचं मातृत्व आपला वंश पुढे नेतं या भावनेला बळकटी मिळून तिला बंदिस्त करण्यात आलं. तिच्यावर हळूहळू बंधनं घालण्यात आली. तिच्यावर मालकीहक्क गाजवला जाऊ लागला. वस्तूप्रमाणे तिला गणलं जाऊ लागलं. वंश पुढे नेण्यासाठी तिची जननक्षमता तपासण्याची गरजही पुरुषप्रधान समाजाला भासू लागली आणि मग तिच्या शरीराची मोजमापं योग्य आहेत की नाही ठरवणं, ज्याच्याकडे जास्त स्त्रिया तो जास्त सामर्थ्यशील असं मानलं जाऊ लागलं.
स्त्रियांकडे भोग्यवस्तू म्हणून पाहण्याचं प्रमाण वाढत गेलं आणि आज बलात्कारांचं वाढतं प्रमाण ही सर्व स्तरातल्या समाजासाठी चिंतेची बाब झाली आहे. स्त्रियांना सुरक्षित वातावरण नाही हा सूरही सर्वत्र दिसतो. कधी स्त्रियांनी तोकडे कपडे घालू नयेत, सातच्या आत घरात जावं वगैरे वगैरेही ऐकवलं जातं. अशा वरवरच्या आणि पोकळ उपायांनी हे थांबेल असं नाही. यासाठी लैंगिकतेच्या मुळाशी जावं लागणार आहे.
शेकडो वर्षांपूर्वी लैंगिकतेच्या शास्त्रीय अभ्यासाची वात्स्यायन त्रषींनी मुहूर्तमेढ रोवली. पण कधी काळी खुलेआम चर्चिला गेलेला विषय अंधार्या खोलीत जाऊन पडला. नैतिकतेच्या चर्चेत शाास्त्रीयता मागे पडली आणि जग काय आहे यापेक्षा ते कसं असावं अशा स्वप्नाळू बाबींमुळे वास्तव नाकारून एक प्रकारे दांभिकपणे जगणारा समाज निर्माण झाला. त्यामुळे आज अतिशय आधुनिक युगात जगतानाही लैंगिक शिक्षणाची गरज विधीमंडळातल्या प्रस्तावही आपण नाकारतो आहोत ही खरोखरंच अतिशय दुर्दैवाची बाब आहे. गावोगावी विवाहबाह्य सबंधांची रेलचेल उघड्या डोळ्यांनी दिसत असताना विवाहसंस्थेतील मंगलाष्टक रचण्यात आपण मग्न आहोत. त्यातून बाहेर येऊन नग्न सत्याला आपण सामोरं जायला हवं. प्रश्न नाकारल्याने किंवा टाळल्याने नाहिसे होत नाहीत. त्याला सामोरे गेल्यानं त्रास होतो खरा, पण उपायांची आणिा सुटकेची शक्यताही त्यातच असते. त्यामुळे अशा घटनांसाठी सरकार, प्रशासन, पोलीस यांना जबाबदार धरणं अयोग्य नसलं तरी पुरेसंही नाही. त्यामुळे यापूर्वी उल्लेख केलेल्या सामाजिक विकृती आहे असं म्हणून त्याकडे पाहणं आवश्यक आहे. भाऊ किंवा तत्सम नात्यातला नातेवाईक जेव्हा अशा प्रकारचं कृत्य करतो, तेव्हा त्यासाठी पोलिसांना कसं जबाबदार धरावं असा माझ्यापुढे प्रश्न पडतो. तेव्हा नीरजकुमारचा राजीनामा हा कुठल्या प्रश्नावरचं उत्तर आहे हा प्रश्नही मला सतावत राहतो.
भाऊ, चुलतभाऊ, मामा याबरोबरच नवर्यानं केलेल्या बलात्काराविषयी तर बोलायलाच नको. कारण त्याची नोंद होणं तर सोडाच, पण परंपरेनं तो त्याचा अधिकार मानला गेला आहे. त्या स्त्रीच्या इच्छेचा प्रश्न यात येतच नाही. त्यामुळे नवर्यानं मारलं, आणि पावसानं झोडलं तर दाद कोणाकडे मागायची सारख्या म्हणी जन्म घेतात. त्यामुळे बलात्काराच्या घटनेतल्या आरोपीचं लिंग कापून टाकणं, त्याला भर चौकात फाशी देणं हे बलात्कारावरचे उपाय नाहीत. आपल्याला या घटनांमागील दाहक वास्तव समजून घ्यावं लागेल.
पार्लमेंटमध्ये अशा घटनांनंतर होणार्या चर्चा, कधी सुषमा स्वराजचा आवेश आणि जया बच्चनचे अश्रू हे मला खोटे वाटत नाहीत पण त्याच्या पलीकडे त्या कधी जातील याची मी वाट पाहते आहे. वास्तवाच्या जमवाजमवीतून आपण सत्याचा शोध घेणार आहोत की नाही? त्यामुळे दिल्लीमध्ये अशा घटनेनंतर रस्त्यावर उतरणार्या जनतेबद्द मला आदर आणि आशावाद दिसत असला, तरी देखील सगळ्या आंदोलनातून सुटलेल्या बाबी यातच खरं उत्तर दडलेलं आहे असं मला वाटतं. तात्कालिक आणि ताबडतोबीचं उत्तर या समस्येला नाही. दमा, मधुमेह हे जसे क्रोनिक आजार आहेत तसाच हा समाजाला झालेला क्रोनिक आजार आहे. स्त्रियांवर होणार्या अत्याचाराच्या गोष्टी पुराणकथेपासून दिल्लीच्या घटनेपर्यंत सातत्यानं घडताहेत. मनोविकास प्रकाशनानं मागच्या वर्षी प्रकाशित केलेलं कामगारनेत्या मुक्ता मनोहर यांनी बलात्कारावर लिहिलेलं ‘नग्नसत्य’ हे पुस्तक या संदर्भात आठवतंय! भारतात घडलेल्या ठळकपणे समोर आलेल्या बलात्कारांच्या अनेक घटना या पुस्तकात आहेत. या घटना, त्यातली सत्यता मांडून हे पुस्तक थांबत नाही, तर या घटनांमागील धागेदोरे उलगडतं, त्याचं नेमकं विश्लेषण आणि या घटनांमागील वास्तवाचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखिकेनं नेमकेपणानं केला आहे.
त्यामुळेच अशा घटनांविषयीचा आक्रोश व्यक्त करताना भावनेच्या प्रवाहात वाहून न जाण्याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल आणि या समस्येची उत्तर भावनेच्या आणि नैतिकतेच्या पलीकडे जाऊन शास्त्राच्या आधारे शोधावी लागतील, सोडवावी लागतील.
आज आपण जागतिकीकरण स्वीकारलं. निओलिबरल व्यवस्था स्वीकारली आणि तिच्या फायद्यांबरोबरच या व्यवस्थेचे अगणित असे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागताहेत. आज या भांडवलशाही व्यवस्थेमुळे गरीब-श्रीमंत दरी प्रचंड प्रमाणात वाढते आहे. बेरोजगारीचं प्रमाण वाढतं आहे. चंगळवाद वाढतो आहे आणि परिणामी ज्या मूठभरांकडे सर्वकाही सुबत्ता भरभरून आहे त्याविषयीची असूया आणि द्वेषही इतरेजणात वाढतो आहे. त्याचबरोबर किडामुंगीसारखं जगणंही आजच्या सामान्य माणसाला असह्य झालं आहे. साध्या साध्या मूलभूत गरजांसाठीही रोजचं झगडणं चालू आहे. याच गोष्टींचा परिणाम म्हणजे नैराश्य, चिंता यासारख्या मनोविकांरांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या नैराश्यातून, फ्रस्ट्रेशन’धून, जगावरचा-स्वतःवरचा सूड म्हणून काही विकृती जन्म घेत आहेत. आणि त्यातूनच आत्महत्या, खून, बलात्कार, हिंसा, नक्षलवाद, आतंकवाद जन्म घेतो आहे. एक कीड लागलेला समाज समोर येतो आहे. म्हणूनच या कारणांच्या मुळाशी जाऊन ही गरीब-श्रीमंत दरी मिटवणं, सर्वसामान्यांच्या शिक्षण, आरेाग्य, रोजगार यासारख्या मूलभूत गरजा भागवणं यातूनच एका निकोप समाजाची उभारणी होऊ शकेल.
दीपा देशमुख
adipaa@gmail.com
Add new comment