प्रभात -रूपगंध -अंधश्रद्धेचा पहिला बळी स्त्रीच

प्रभात -रूपगंध -अंधश्रद्धेचा पहिला बळी स्त्रीच

तारीख

आज आपण स्त्री स्वातंत्र्याची, समानतेची भाषा बोलत असलो तरी ते अजूनही झालेलं नाही. स्त्री आपल्या आधाराशिवाय जगूच शकत नाही असं पुरुषांना तर वाटतंच, पण आपण पुरुषाशिवाय जगू शकत नाही अशी बहुतांशी स्त्रीयांच्या मनात आजही भावना आहे. याच बरोबर स्त्री नं कसं वागावं, कसं वागू नये, तिचं तिच्या कुटुंबातलं स्थान, तिचं सुख याविषयी प्रत्येक धर्मातही काही ना काही लिहून ठेवलं आहे.
जीवनाच्या सगळ्याच पातळ्यांवर स्त्रीच्या वाट्याला दुय्यमत्व आलेलं दिसून येतं आणि या दुय्यमत्वाबरोबर तिने काय करावं आणि काय करू नये या नियमावलीबरोबर अनेक अंधश्रद्धांनी तिच्या आय्ाुष्यात प्रवेश केलेला दिसतो. उदाहरण द्यायचं झाल्यास पुरुषाच्या ब‘ह्मचर्यात अडथळा आणणारी कोण? तर ती स्त्री! त्यामुळे स्त्री ही अपवित्र, स्त्री ही नरकाचं दार असं म्हणून चर्चनं देखील बाराव्या शतकापर्यंत तिला चर्चमध्ये प्रवेश निषिद्ध ठरवला होता. तिला चर्चमध्ये प्रार्थना म्हणण्याची बंदी होती. तिला नरकाचं दार, चेटकीण असंच मानलं गेल्यामुळे जवळ जवळ दहाव्या शतकापर्यंत ती आपल्या नवर्‍याबरोबर एकाच वेळी जेऊ शकण्यासही बंदी होती. चेटकीण समजल्या जाणार्‍या स्त्रीला एका कोंदट कोठडीत डांबून ठेवलं जाई. बळजबरीनं तिच्याकडून ती चेटकीण असल्याचं वदवून घेतलं जाई. तिने कबूल करावं म्हणून तिचा भयानक छळ केला जात असे. तिची धिंड काढत तिला वधस्तभांकडे नेण्यात येत असे. ती वृद्ध असली तरी तिच्या वयाचाही विचार त्या वेळी केला जात नये. इंग्लंडमध्ये तर सतराव्या शतकापर्यंत मुलींची विक‘ी होत असल्याचे उल्लेख आहेत. गुलाम झालेल्या स्त्रीनं समजा एखादी क्षुल्लक वस्तूची चोरी केली तर त्याची शिक्षा म्हणून तिला जिवंत जाळण्यात येत असे आणि या कामात इतर गुलाम स्त्रीयांची मदत घेतली जात असे.
हिंदू धर्मातही स्त्रीच्या बाबतीत अशा अनेक अनिष्ट प्रथा होत्या. त्यातल्या काही आजही आहेत. विधवा होणं हा जणूकाही तिचा गुन्हाच असं समजून तिला सती जायला भाग पाडलं जायचं. राजा राममोहन रॉय यांच्या वहिनीच्या बाबतीतली घटना अत्यंत विदारक अशी आहे. राजा राममोहन रॉय त्या प्रसंगी परदेशी होते. त्यांच्या भावाचा आकस्मिक मृत्य झाला आणि वहिनीची सती जाण्यासाठी इतरांनी तयारी सुरू केली. तिला पतीच्या चितेवर ठेवलं चढवलं गेलं. चितेवर तुपाचा धूर करणं या मागे त्या सती जाणार्‍या स्त्रीची अवस्था दिसू नये आणि ढोलताशांचे जोरात आवाज यामुळे तिच्या किंकाळ्याचा आवाजही कानावर पडू नये अशी दक्षता घेतली जायची. दुसर्‍या दिवशी राजा राममोहनरॉयच्या भावाच्या अिाण वहिनीच्या अस्थी सावडायला नातेवाईक गेले, तेव्हा त्यांना एकाच व्यक्तीच्या अस्थी आढळून आल्या. शोधाशोध केल्यावर लक्षात आलं की बाजूच्या झाडीत अर्धवट जळालेल्या जिवंत अवस्थेत त्यांची वहिनी होती. तिला जगायचं होतं. पण समाजमनावरचा पगडा जास्त शक्तिशाली होता. जमावाने तिला झाडीतून खेचून बाहेर काढलं आणि तिला पुन्हा लगेचंच दुसरी चिता करून तिच्यावर टाकून जाळण्यात आलं. तिने सती जाण्यापूर्वी राजा राममोहन रॉय  यांना पत्र लिहून आपली व्यथा व्यक्त केली होती. ते असते तर , आपल्यावर ही वेळही आली नसती असंही तिनं लिहून ठेवलं होतं. या घटनेचा परिणाम होऊन पुढचं राजा राममोहन रॉय यांचं सती संदर्भातलं आणि एकूणच स्त्रीयांच्या संदर्भातलं कार्य आपल्याला माहीत आहेच.  अर्थात ही उदाहरणं झाली इतिहासातली. मात्र आजही भारतात सतीचा कायदा लागू झाल्यावरही रुपकँवरसार‘या घटना बघायला मिळतात. आजही जन्माच्या आधीपासूनच स्त्रीची परवड सुरू होते.
स्त्री-भूणहत्येसारखे अमानुष प्रकार आजही बघायला मिळतात. मुलगी होणं हा त्या स्त्रीचाच दोष हे गृहीत धरलं जातं आणि त्या पुरुषाच्या दुसर्‍या लग्नाची तयारी केली जाते. विज्ञान सांगतं की मुलगा किंवा मुलगी होणं हे पुरुषाच्या वाय गुणसूत्रावर अवलंबून असतं पण तरीही आम्ही विज्ञानापेक्षा आमच्या (गैर) समजुतींना जास्त महत्त्व देतो. त्यानंतर पांढर्‍या पायाची, अंगात येणं पासून अनेक गोष्टी स्त्रीच्याच वाट्याला येताना दिसतात. अंगात येणं म्हटल्यावर तर ग‘ामीण भागात आजही भगत किंवा मांत्रिकाचा सल्ला घेतला जातो. तो मांत्रिक तिला चटके देतोय, मारतोय तरीही नातेवाईक तो क्रूर  प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत राहतात. कुमारिकेचा बळी घेणे हाही प्रकार आजही अनेक बाबांच्या आश्रमात छुप्या रितीने चालू असल्याच्या घटना कधी कधी ऐकायला मिळतात. आज अनेक ठिकाणी मासिक पाळी चालू असल्यावर स्त्रीला अपवित्र समजलं जातं. मूल होत नाही म्हणून बाबांच्या हाती स्वाधीन करताना अनेक नवरे आणि सासवा आजही आढळून येतात. आणि हेच बाबा मग प्रत्यक्ष माझ्या अंगात परमेश्‍वर संचारला आहे आता माझं शरीर केवळ माध्यम आहे असं म्हणून त्या स्त्रीचा उपभोग त्या नवर्‍याच्या आणि सासूच्या संमतीने घेतो.
पुणे जिल्ह्यातल्या चाकण परिसरातल्या २८ वर्षाच्या विलास पाचगे या तरुणाने तर एका स्त्रीचा खून केला तर डोक्यावर पैशाचा पाऊस पडेल हे कळाल्यानं प्रत्यक्ष आपल्याच आईला देवळात नेऊन तिचा गळा चिरून टाकण्याची मजल जाणं या कृत्याला काय म्हणायचं? आज एकविसाव्या शतकात आपल्याच जन्मदात्या आईचा खून केल्यावर पैशाचा पाऊस पडतो अशी अंधश्रद्धा उराशी बाळगून कोणी जगू शकतं ही गोष्ट मनाला अस्वस्थ करणारी आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी अशा प्रकारच्या अनेक अंधश्रद्धांच्या विरोधात रान पेटवलं होतं. त्यांना त्या वेळी जे कळालं ते आज शिकलेल्या लोकांना कळत नाहीये. अशा एक ना अनेक अंधश्रद्धा आजही खूप मोठ्या प्रमाणात समाजात शहरी आणि ग्रामीण भागात दिसतात. यामागे सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक अनेक कारणं आहेत. त्यासाठी शिक्षणाची, प्रबोधनाचीही तितकीच गरज आहे. पण त्याचबरोबर कायदे झाले की कायद्याच्या अंमलबजावणीमुळे अशा अनिष्ट प्रकारांना आळा बसतो. लोकांना वचक बसतो. काय करणं म्हणजे गुन्हा हे त्यांना लक्षात येतं. म्हणून कायद्याचं महत्व नाकारता येत नाही.
आणि या पार्श्‍वभूमीवर जादूटोणा बिलाचं संमत होणं ही आजच्या समाजात स्त्रीसाठीच नव्हे तर एका सुदृढ समाजासाठी किती अत्यावश्यक बाब आहे हे लक्षात येतं. जादूटोणा बिलात हे  स्पष्ट केलं आहे की अज्ञानाच्या आणि अनिष्ट दुष्ट रुढी आणि प्रथांपासून समाजातल्या सर्वसामान्य लोकांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि समाजातल्या सर्वसामान्य लोकांचे शोषण करण्याच्या दुष्ट हेतूने भोंदू लोकांनी सर्वसामान्यतः जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या तथाकथित अमानवी किंवा अलौकिक शक्तीच्या किंवा भूतपिशाच्च यांच्या नावाने निर्माण झालेल्या नरबळी आणि इतर अमानुष दुष्ट अघोरी प्रथांचा मुकाबला करून त्यांचं समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने तसंच समाजात निकोप आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हे बिल अतिशय अत्यावश्यक आहे. यात अपराध्याला सहा महिन्यापासून ते सात वर्षांपर्यंत कडक शिक्षेची तरतूद केली आहे.
या कायद्यानुसार भूत उतरवतो म्हणून एखाद्या व्यक्तीला साखळदंडानी बांधणं, मारहाण करणं, धुरी देणं, विष्ठा तोंडात जबरदस्तीनं टाकणं, शरीरावर चटके देणं हा गुन्हा ठरेल. चमत्कारांचं प्रदर्शन करून लोकांना फसवणं, गर्भवती स्त्रीला तिच्या गर्भाचं लिंग बदल करून देतो असं सांगून फसवणं, अंगात अलौकिक शक्ती असल्याचं सांगून फसवून एखाद्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणं अशा अनेक बाबींचे तपशील या बिलात नमूद केले आहेत.
या कायद्याने स्त्रीयांच्या वाट्याला येणारी उपेक्षा थांबेल, मानहानी आणि क्रूरपणे होणारी विटंबना याला आळा बसेल अशी अपेक्षा आहेच. जादूटोणा बिल संमत तर झालंय, आता कायद्यात रुपांतर होऊन अंमलबजावणीही सुरू होईल. मात्र स्त्रीयांच्या बाबतीत जादूटोण्याव्यतिरिक्त मनातली असमानता, स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहणं हे थांबणंही तितकंच गरजेचं आहे. आज मिनिटाला बलात्कार होताहेत. पुरुषांनी अर्ध्या चड्डीत सर्वत्र फिरलं तर चालतं. मात्र स्त्रीने तोकडे कपडे घातल्यामुळे पुरुषांना बलात्कार करावे वाटतात म्हणणार्‍यांची ही मानसिकता बदलली पाहिजे. पुरुषाच्या मनातल्या वर्चस्वाचं उच्चाटन होणं आवश्यक आहे. त्यामुळे जादूटोणा बिल संमत होणं ही सुरूवात आहे. ही लढाई पुढे न्यावी लागणार आहे!

दीपा देशमुख

adipaa@gmail.com
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.