सिर्फ एक नजर काफी है...
इंस्तबुलच्या मांजरांवर बनवलेली केडी ही डॉक्युमेंट्री नुकतीच बघितली. त्यातल्या काही गोष्टी खूपच आवडल्या. इस्तंबुलमध्ये खूपच मांजरं आहेत आणि ही मांजरं त्यांचंच राज्य असल्यासारखी सगळीकडे, म्हणजे भाजी मंडई असो वा सुपरमार्केट, दुकानं असोत वा भररस्ता, ही सगळी मांजरं अगदी सहजपणे वावरताना दिसली. गंमत म्हणजे समोरून एक मांजर येत असताना तर एक कुत्रा आपल्या मालकाच्या पायामध्ये जाऊन घाबरून जीव मुठीत धरून बसलेला दिसला. ही सगळी मांजरं खाऊनपिऊन भलतीच सुखात दिसली. त्यांना माणसाकडून लाड करून घ्यायचे असले तरी फार हळुवारपणे लाड करून घेणं त्यांना आवडत नसावं. त्यामुळे आपल्याला हव्या त्या पद्धतीनं ती त्या माणसाला वाकवत होती. एका प्रसंगात दुसरी एक मांजर आल्यावर एका जोडप्यातल्या मांजरीणबाईंनी त्या बयेला आपल्या नवर्यापासून दूर ठेवण्यासाठी भांडून चक्क पळवून लावलं. तिचा कटाक्ष म्हणजे सिर्फ एक नजर काफी है...प्रमाणेच होता!
सगळ्यात मजेशीर गोष्ट मला जी दिसली ती म्हणजे मांजराचं एक जोडपं! यातल्या मांजरीणबाई आपल्या जेवणावर ताव मारताना दिसल्या. तेवढ्यात त्यांचे पतीदेवही तिथे आले. मात्र त्या खाद्यपदार्थाला तोंड लावण्याची त्या बोकोबांची हिम्मतही झाली नाही आणि त्या मांजरीणबाईंनीदेखील आलाय भुकेजलेला नवरा तर बसेल तोही आपल्याबरोबर असा साधा विचारही केला नाही. ती शांतपणे खात बसली. तिचं पोट भरल्यावर ती तिथून निघून गेली आणि त्यानंतर जे शिल्लक राहिलं ते बिचारे बोकोबा खात बसले. मांजरीणबाईंचा हा रुबाब एकदमच भारी होता!
इस्तंबुलमध्ये अनेक ठिकाणी चक्क मांजरांचे पुतळे देखील आहेत. एकूणच इस्तंबुलमधली मांजरं बघणं हा खूपच रम्य अनुभव आहे. जरूर बघा, यू-ट्यूबवरची 'केडी' ही डॉक्युमेंट्री!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment