दीपा मॅडम, बी प्रॅक्टिकल!
आपण व्यवहारशून्य आहोत, प्रॅक्टिकल नाही आहोत याचा मला अनेक वर्षं लैच अभिमान वाटायचा. पण गेल्या काही दिवसांपासून मात्र उठसूठ हे वरचं ‘ दीपा मॅडम, बी प्रॅक्टिकल’ वाक्य येता-जाता कानावर पडतंय. म्हणजे त्याचं असं झालं, मी इतके दिवस कामासाठी बाईच ठेवत नव्हते. मला वाटायचं, आपलं काम आपणच केलं पाहिजे. पण गेले काही दिवस अपूर्वने पिच्छा पुरवल्यामुळे मी अखेर मान तुकवून कामवाली बाई संशोधन मोहीम हाती घेतली. सोसायटीच्या वॉचमननं एकीला पाठवलं. मी तिच्याकडे बघतच राहिले. सुरेखशी झुळझुळीत साडी, हातात मॅचिंग पर्स आणि थंडी वाजली तर हातात छानशी शॉल. मी डी-मार्ट मधून विकत घेते, तशाच चपल्या तिच्याही पायात. मी तिच्याकडे बघतेय तोपर्यंत तिनं सरळ स्पष्टपणे कामाची नियमावली बोलून दाखवली. मी मान डोलावत राहिले. त्यानंतर मी तिला विजयी मुद्रेनं म्हणाले, 'तू आजारी पडलीस तर मी तुझे पैसे कापणार नाही किंवा मी गावाला गेले तरी तुझे पैसे कापणार नाही.' त्यावर ती हसत म्हणाली, 'ते तर आम्ही कापूच देत नाही. कोणाकडून का खाडा होईना. इतकंच सांगते, एकही जादा काम करणार नाही.' मी तिला म्हटलं, 'अग, पण कधी पाहुणे आले, जादा काम पडलं तर आगाऊ पैसे देईन की मी तुला. ' त्यावर ती म्हणाली, 'जमणार नाही बाई. दुसरीकडच्या कामाला वेळ झाला तर माझी कामं सुटतील त्याचं काय? ते तुमचे पाहुणे राऊळे तुम्ही बघा. हॉटेलात न्या, नाहीतर स्विगी बिगीनं घरी मागवून घ्या.....उद्यापासून यायचं की नाही तेवढं सांगा. ' मी होकारार्थी मान डोलावली. माझ्या चेहर्यावरचे बावळट भाव तिला कळले असावेत. ती हसून निघून गेली, पण तिच्या चेहर्यावर उमटलेलं वाक्य मला स्पष्ट दिसलं होतं, ती म्हणत होती, ‘दीपा मॅडम, बी प्रॅक्टिकल!’ पण मला आठवत होती माझ्या लहानपणी मी आईकडे बघितलेली कामवाली मावशी! सणासुदीला आई तिला फराळाचं ताट भरून देणारी, आईच्या पाठीत उसण भरल्यावर ती मावशी अमृतांजन लावून देणारी....ते चित्रं आता कुठे गेलं?
एकदा एका मैत्रिणीकडे गेले. ती म्हणाली 'इथं करमत नाही ग. गावाकडली सवय. तिकडे कसं कोणी रस्त्यात भेटलं आणि घरी या म्हटलं की आपण जायचो. इथं तसं नाही. एकदा एकजण आम्हाला रस्त्यात भेटले, गप्पा झाल्या. ते म्हणाले, या एकदा घरी. रविवारच्या दिवशी मी नवर्याला म्हटलं, आज जाऊ या का, त्यांच्या घरी? त्यांनी बोलावलं होतं. तो माझ्याकडे बघून छद्मी हास्य करत म्हणाला, मंजू, इतकी ग कशी खुळी तू. अग ते फक्त म्हणायचं असतं आणि त्यांनी तसं म्हटलं तरी आपण जायचं नसतं.’ त्या तिच्या नवर्याच्या चेहर्यावरचे तिच्यासाठीचे ‘बी प्रॅक्टिकल’ हे भाव मला ठळकपणे दिसले.
अशीच एकदा एका मैत्रिणीची मैत्रीण घरी आली. ती खूपच दुःखात असावी. तिचं दुःख घडाघडा तिनं माझ्याजवळ बोलून दाखवलं. तिचा नवरा गेली अनेक वर्षं तिला मारहाण करत होता, लोकांसमोर, मुलांसमोर तिचा अपमान करत होता. बाहेरख्याली होता. ही चांगली शिकलेली. मी तिला म्हटलं, 'तुझी प्रॅक्टिस सुरू कर. पुन्हा स्वतःच्या पायावर उभी राहा. कशाला त्याची मारहाण आणि टोमणे सहन करतेस?' तर ती डोळे पुसत म्हणाली, ‘वा ग, काय सांगतेस. अग, लग्न होऊन पंधरा वर्षं झाली. इतकी वर्ष सहन करतेय ती का उगाच? मारलं झोडलं तरी बाहेरच्या जगात त्याचं मोठं नाव आहे आणि त्याचा पैसा, बंगला, गाडी या सगळ्यावर पाणी सोडून मी कष्टाचं आयुष्य जगू की काय?’ मी म्हटलं, 'अग पण तू मला हे सगळं का सांगत होतीस? ' त्यावर ती म्हणाली, 'फक्त एक आऊटलेट ग बाई.' आणि ड्रायव्हरला गाडी गेटजवळ आणायला सांगत ती निघाली देखील. तिच्या चेहर्यावरचे ‘दीपा मॅडम, बी प्रॅक्टिकल’ चे भाव मला स्पष्टपणे दिसले.
मध्यंतरी एक तरुण मुलगा खूपच ओळखीचा झाला. इंजिनिअर झालेला. लग्नाचं वय झालं. आईविना वाढलेला....नातेवाईकांनी दाखवलेली मुलगी पसंत पडली. ती देखील इंजिनिअर. दोघांचा होकार ठरल्यावर दोघंही दोन-चार वेळा भेटले. दोघांचे स्वभाव जुळले. आपण एकमेकांना आवडतो आहोत असंही त्यांना वाटलं. मग घरातल्यांनी आता लग्नाची बोलणी करूयात असं ठरवलं. दुसर्या दिवशी त्या तरुण मुलाऐवजी त्या मुलीचाच मला फोन आला. 'दीपाताई' असं म्हणत ती रडायलाच लागली. मी तिला विचारलं, 'अग काय झालं?' ती म्हणाली, 'त्याच्या घरातून नकार आलाय.' मी म्हटलं, 'अग, पण तू कशाला रडतेस. त्यानं थोडीच नकार दिलाय? मी बोलते त्याच्याशी.' तिचं रडणं मी थांबवलं. त्याला फोन करून घरी बोलावलं आणि तुझ्या नातेवाईकांनी नकार देण्याचं कारण काय असं विचारलं. त्यावर तो म्हणाला, 'माझ्या काकांनी मुलीकडे पुण्यात फ्लॅट आणि एक मोटारसायकल मागितली. ते नाही म्हणाले. म्हणून मग नकार कळवला.' मी चकित झाले आणि त्याला म्हटलं, 'अरे पण लग्न तुझ्या नातेवाईकांना करायचंय का? तुला मुलगी आवडलीये ना? तुम्ही दोघंही इंजिनिअर आहात. तुमच्या कष्टानं घर उभं करा, सावकाश कर्ज काढून गाडी घ्या.' त्यावर तो म्हणाला, ‘दीपाताई, बी प्रॅक्टिकल! अग, त्यांच्याच मुलीसाठी फ्लॅट आणि गाडी मागताहेत ना माझे नातेवाईक? त्यांचं काही चुकलंय असं मला वाटत नाही. आणि या मुलीला काही सोनं लागलं नाही. अशा पन्नास मिळतील मला.' एवढं बोलून तो निघून गेला. पण यालाच 'प्रॅक्टिकल' म्हणतात का असा प्रश्न मला कितीतरी वेळ छळत राहिला.
त्यानंतर अनेक वर्षांनी एक मित्र भेटला. त्याच्यासोबत त्याची बायको नव्हती. वेगळीच कोणी फॅशनेबल तरुणी होती. मी प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघताच तो म्हणाला, 'अग बायको आहे घरी. पण आता लग्नाला इतकी वर्षं झाली की त्या नात्यात काही रामच राहिला नाही बघ. सगळं कसं रटाळ झालंय. मग ही भेटली. हिला मी मैत्रीचा हात पुढे केला आणि हिनं तो पकडला. कुठलीही लपवालपवी नाही आमच्या नात्यात. आम्ही मस्त भेटतो, मजा करतो. आयुष्य कसं ताजतवानं झालंय बघ.' मी त्याला म्हटलं, ‘अरे पण तुझ्या बायकोचं काय? ती जास्तच एकाकी समजत असेल ना स्वतःला?’ तो म्हणाला, ‘अग, तिचा विचार तू कशाला करतेस. तुझा मित्र मी आहे ना. मी खुश दिसतोय ना तुला? बी प्रॅक्टिकल यार’ आणि खुशीत त्या तरुणीच्या कमरेभोवती हात घालून तो चालता झाला. मी मात्र मैत्रीची व्याख्या नेमकी काय हे शोधत राहिले.
एकदा अशीच एका मित्राच्या घरी गेले. शहरातलं प्रतिष्ठित नाव! त्याच्याकडे शहरातले बरेच मान्यवर आलेले होते. तो त्या सर्वांशी अतिशय नम्रपणे वागत होता. अधूनमधून महात्मा फुले, आगरकर, गांधीजी, विनोबा, आंबेडकर यांची वाक्यं उदृत करून बोलत होता. त्याच्या घरातल्या भिंतीवर याच लोकांच्या तसविरी टांगलेल्या होत्या. ते लोक थोड्या वेळानं त्याची 'तो किती साधा आहे, त्याच्यात किती माणुसकी आहे' अशी प्रशंसा करत बाहेर पडले. मी चकित झाले. मी ज्याला ओळखत होते, तो मित्र असा नव्हता. तो सतत जातिवाचक शब्द उच्चारून अमूक लोक कसे असतात, तमूक लोक कसे असतात असं बोलून या महापुरुषांची देखील चेष्टा करायचा. त्याच्यात इतका बदल आणि तोही इतका चांगला बदल कसा झाला याचं मला आश्चर्य वाटू लागलं. माझ्या चेहर्यावरचे झरझर बदलणारे भाव त्यानं ओळखले. तो म्हणाला, ‘दीपा मॅडम, बी प्रॅक्टिकल. आजच्या जगात असाच मुखवटा जास्त चालतो. तो घालायचा आणि आपलं काम साधायचं. समजलं?’ मी त्याला विचारलं, ‘अरे, पण असं का वागायचं?’ तो म्हणाला, ‘त्याशिवाय आपले हेतू साध्य कसे होणार?’ तो हसत राहिला.
मी मात्र 'दीपा मॅडम, बी प्रॅक्टिकल' असं स्वतःशी म्हणत घराकडे परतले. पण असे हेतू ठेवून गोष्टी साध्य करता येतील का हे मला ठाऊक नाही आणि जमेल असंही वाटत नाही. त्यामुळे आपण लैच व्यवहारशून्य आहोत, प्रॅक्टिकल नाही आहोत हेच बरंय नाही का?
दीपा देशमुख
Add new comment