एकटी आणि एकाकी!

एकटी आणि एकाकी!

गेले आठ-पंधरा दिवस फेसबुक आणि व्हॉटसअपवर एक कविता फिरतीये.....
मी उष्टी भांडी विसळत होते, तेव्हा तू अमूक अमूक करत होतास, 
मी तमूक तमूक करताना तू आणखी ढमूक ढमूक करत होतास.....

वगैरे वगैरे....मी दुर्लक्ष करत होते. पण या कवितेनं माझा पिच्छा सोडला नाही. त्यातच कहर म्हणजे माझ्या सुविद्य, सुजाण, सजग अशा आसावरी या मैत्रिणीनं हीच कविता मला व्हॉट्सअपवर पाठवली, तेव्हा मी हतबुद्ध झाले. माझा संयम, विवेक सगळं काही संपलं. वाटलं स्वतःचे केस ओढत जोरात किंचाळावं! असंही एकदा वाटलं, हिटलर होऊन हिला छळछावणीत डांबून हिचा अतोनात छळ करावा. 
नवर्‍याची, जोडीदाराची, प्रियकराची, एखाद्या पुरुषाची तक्रार करणं - त्यांचा छळ सहन करणं हे एखाद्या बिनशिकलेल्या, अवलंबून असलेल्या, अपंग, आत्मविश्‍वास नसलेल्या, ग्रामीण भागातल्या जिथे समतेचं वारं अजून वाहत नाहीये, पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व असलेल्या भागातल्या स्त्रीनं केलं तर मी खरंच समजू शकते. तिची तक्रार, तिची व्यथा मला कळेल. तिच्यासाठी माझा जीव तुटेल. पण माझी ही पुण्यासारख्या फुल्यांच्या शहरात जन्मलेली, शिकलेली, वाढलेली स्वतंत्र विचारांची मैत्रीण अशा प्रकारची कविता  मला पाठवते म्हणजे हद्द झाली होती. 

अरे किती दिवस आपण पुरुषी छळाची गुटी उगाळून उगाळून स्वतःच स्वतःला चाटवणार? तो काय करतो पेक्षा मी काय करतेय, मला काय करायचंय याचा विचार मी कधी करणार? स्त्री-पुरुषाचं नातं ही निसर्गानं दिलेली अतिसुंदर आणि अतिसुरेल गोष्ट आहे. पण ती गोष्ट, ते नातं जर बेसूर होत असेल तर रडगाणं किती दिवस गाणार? मुळात तो असो की नसो, तुम्ही स्वतः स्वतःकडे कधी बघणार? त्याच्याशिवाय देखील एक जग आहे आणि ते जग सुंदर आहे हे कधी कळणार?

माझ्या एका मैत्रिणीवर ती शाळेत असताना तिच्या सख्ख्या मामानं जबरदस्ती केली. घाबरून ती कोणालाच बोलू शकली नाही. पुढे महाविद्यालयीन शिक्षण झााल्यावर तिचा एकाशी प्रेमविवाह झाला. तिनं खूप विश्‍वासानं आपल्या जोडीदाराला आपल्या मनातली ती भळभळती जखम उघड करून दाखवली. त्यानं त्या वेळी समंजसपणे त्यावर हळुवार फुंकर घातली. मात्र नंतर तो यशाच्या पायर्‍या चढत गेला. पैसा आणि प्रसिद्धी बरोबर व्यसनानंही घरात प्रवेश केला. मद्य प्यायलानंतर त्याला हिनं सांगितलेली मामाच्या जबरदस्तीची गोष्ट आठवायची. त्याच्या आतल्या पुरुषाला ती सहन झाली नव्हती. त्यामुळे मग तो तिला 'कुलटा, छिनाल' वगैरे वाट्टेल ते बोलायचा, कॉलनीला ऐकायला जातील अशा आवाजात जोरजोरात शिव्या द्यायचा आणि वेळप्रसंगी मारहाणही करायचा. तिनं आपला आत्मविश्‍वास गमावला होता. ती त्याचं हे वागणं वर्षानुवर्षं सहन करत राहिली. एके दिवशी लिव्हर डॅमेज होऊन तो गेला. कायमचा. तिनं मला थंड आवाजात फोनवर सांगितलं, 'दीपा तो गेला. येतेस का?'  मी तिच्या घरी गेले. नातेवाईक, मित्र गर्दी करून त्याच्या प्रेताकडे बघत कुजबूजत होते. ती मात्र निर्विकारपणे शांत बसलेली होती. डोळ्यात एक टिपूसही नव्हता. त्याला नेताना इतर बायकांनी तिला रडवण्याचा प्रयत्न केला. पण ती रडली नाही. 

तो जाताच तिनं घरातल्या त्या विटलेल्या भिंतींना उजळ रंगांनी रंगवून घेतलं. खिडक्यांचे जाडेभरडे पडदे बदलवून झुळझुळीत पडदे लावले. घराचं रंगरूप पूर्ण बदलवून टाकलं. सांत्वनासाठी येणारा 'तिला वेड लागलं' असं म्हणून परत फिरत होता. मला मात्र तिची कृती कळली होती. ती तिचं आयुष्य नव्यानं जगू पाहत होती. तिच्यात पुन्हा उभारी आली होती. तिच्या चेहर्‍यावर हसू उमटलं होतं. खरंच महिनाभरात तिची तब्येत सुधारली आणि तिचा चेहरा तेजानं लकाकू लागला. बघे मात्र म्हणाले, ‘नवर्‍याला खाल्लं कैदाशिनीनं आणि आता बघा कशी सुटलीये’ तिच्या कानापर्यंत, मनापर्यंत हे शब्द आता मात्र पोहोचूच शकत नव्हते. माझा हात हातात घेऊन ती म्हणाली, 'दीपा मोकळा श्‍वास घेतेय ग, कित्येक वर्षांनी!'

हे तिचं सुंदर जगणं बघताना, त्याचं साक्षी होताना मी तिला तिच्याजवळ होते तोपर्यंत साथ दिली. एकत्र फिरणं, एकत्र नाटक-सिनेमा बघणं, छान छान पदार्थ करून खाणं या छोट्या छोटया गोष्टीत तिचा आनंद दबलेला होता. आता ती मोकळ्या आवाजात गायला लागली होती. 'ताल' सिनेमातलं संगीत तिच्या अंतःकरणाला स्पर्शून गेलं होतं. या फुलपाखरी रंग भरलेल्या माझ्या मैत्रिणीला अशा रुपात बघणं माझ्यासाठी खूप सुंदर अनुभव होता. 

आपण किती 'समजात' जगत असतो. थोडक्यात, इथं एकटी स्त्री म्हटली की उपेक्षा, सहानुभूती, 'उपलब्ध आहे' अशा अनेक नजरांनी तिला बघितलं जातं. पण धुडकावून लावूया ना अशा नजरांना, अशा वृत्तीला! मी एकटी आहे हा विचार मलाच डळमळीत आधी करतो. म्हणून एकटं असणं आणि एकाकी असणं यातलं अंतर समजावून घेऊ या. एकाकी असणं म्हणजे जगापासून तुटणं, एका अंधाराला आपलं मानणं, आपलीच आपण कीव करणं! एकाकीपण तुम्हाला नैराश्याकडे नेऊ शकतं. पण एकटं असणं ही गोष्ट नितांत सुंदर आहे. ही गोष्ट एकदा अनुभवून तर बघा. 

माझी लेखिका मैत्रीण आशा साठे यांनी मला एक लोककथा सांगितली होती आणि मला ती खूपच आवडली होती. एक स्त्री अनेक वर्षं मनाविरुद्ध जगण्याला वैतागते आणि अखेर कृती करायचा निश्‍चय करते. तिला नदीच्या या तीरावरून त्या तीरावर जायचं असतं. ती एके रात्री घरात नीजानीज झाल्यावर घरातून बाहेर पडते. नदीजवळ येते. नावेत बसते आणि पैरतीरी जाण्यासाठी नाव वल्हवायला लागते. तिला त्या वल्हवण्याचे कष्टही जाणवत नसतात. रात्रभर ती नाव वल्हवत राहते. पहाटे जरा झुंजुमुंजू होतं आणि ती स्वतःकडे आणि नावेकडे बघते, तेव्हा तिला धक्काच बसतो. रात्रभर तिनं नाव वल्हवलेली असते, पण त्या नावेचा बांधलेला दोर सोडलेलाच नसतो. त्यामुळे ती नाव एकाच जागी असते. तसूभरही पुढे गेलेली नसते. 

आपल्यातल्या अनेक स्त्रियांची हीच अवस्था आहे. शिक्षण घेतलंय, पण ते पुस्तकातच आहे. किंवा पैसे मिळवण्यासाठीचं एक साधन आहे. आमच्या कृतीत आमच्या जगण्यात ते शिक्षण उतरलंच नाही. पैलतीरी जायचं असेल तर नावेचा बांधलेला दोर सोडावा लागेल. स्वातंत्र्य मिळवण्याची किंमत चुकवावी लागेल. मी काहीच करणार नाही, पण मला सगळं मिळालं पाहिजे असं होणार नाही. 
म्हणूनच - एक स्त्री म्हणून स्वतःकडे नंतर बघता येईल. आधी व्यक्ती म्हणून बघणं शिकूया. मी एकटी आहे आणि हे एकटं असणं खूप सुंदर आहे. ते अनेकांचा आधार बनू शकतं ही गोष्ट कळायला लागेल. खरं तर हे एकटं असणं आत्मनिर्भर करतं, स्वावलंबी बनवतं, ताठ मानेनं स्वाभीमानानं जगायला शिकवतं. हे एकटेपण आपली चालणारी पाऊलवाट असो वा आपला हमरस्ता - तो कितीही खाचखळग्यांनी भरलेला असो, त्यावर चालण्याची ताकद हे एकटेपण देतं. 

या एकटेपणाची मौज अशी आहे की तुम्हाला अशा वेळी आसपासची दृश्यं, घटना, प्रसंग स्पष्टपणे दिसायला लागतात. जे कधी आधी बघितलेलेच नसतात. आणि मग एकटेपणाच्या साथीला कितीतरी पावलं बरोबरीनं साथ देत चालू लागतात. हा अनेक नात्यांचा बहरलेला कारवॉं उत्सवी असतो, सुंदर असतो. चालून तर बघा!

दीपा देशमुख, पुणे.
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Categories