हितगुज  - मैत्र

हितगुज  - मैत्र

झी मराठी दिशा साप्ताहिकाचे फेब्रुवारी महिन्याचे लेख लिहून हुश्श करावं तर बाकीची राहिलेली डोंगराएवढी कामं समोर दिसायला लागली. ही सगळी कशी होणार या काळजीत मी......त्याच वेळी मैत्रिणीचा मेसेज, ‘सहज लिहू शकता तुम्ही. तुम्हाला विषयाची गरजच नाही. प्लीज लिहाच.’ 
कम्प्युटर ऑन केला आणि लख्खकन वीज चमकून गेली.....आपल्या कामाचा दिवसाचा जास्तीत जास्त वेळ जातो तो कम्प्युटर या मित्रावरच. चला आज याच्यावरच लिहूयाकी!
मला आठवतं, औरंगाबादला असताना 'मिळून सार्‍याजणी'च्या महाराष्ट्रातल्या प्रतिनिधींची आमची सहल कोकणात असोंडमाळ इथे गेली होती. म्हणजे काम आणि सहल असं स्वरूप होतं. आमची तिथली मैत्रीण सुप्रिया हिच्या शेतातल्या घरात आम्ही राहणार होतो. त्या दिवसांत आम्ही खूप धमाल केली, गप्पा, मस्ती, खाणं विचारायलाच नको. परतल्यावर मला या सहलीचा वृत्तांत लिहायचा होता आणि तो 'मिळून सार्‍याजणी'ला पाठवायचा होता. मी डायरीत त्या सगळ्या गाभुळलेल्या चिंचेच्या चवीच्या आठवणी लिहून काढल्या. माझे धावणारे विचार आणि डायरीतलं हस्ताक्षर यांची जुगलबंदी सुरू झाली होती. लिहून झाल्यावर लक्षात आलं, हे जरा नीटनेटकं करून पाठवायला हवं. मग मी घराजवळ असलेल्या एका कम्प्युटरच्या दुकानात गेले. डीटीपी करून हवं असल्याचं सांगितलं. घाईत लिहिलेलं माझं अक्षर समजणार नाही तेव्हा मीच बसून सांगते. पटकन टाईप करून मला द्या असं सांगताच त्यानं त्याला खूप कामं असून दुसर्‍या दिवशीची दुपारी एकची वेळ दिली. मी दुसर्‍या दिवशी एक वाजता गेल्यावर त्यानं खूप टंगळमंगळ करत टाईप करायला सुरुवात केली. मध्ये मध्ये तो तंबाखू खाण्यासाठी उठायचा वगैरे. त्यानंतर प्रिंटआऊट काढून देताना त्यानं डबल स्पेसिंग दिलं आणि साहजिकच पानंही दुप्पट झाली आणि मग त्याप्रमाणे त्याने मला जास्त पैसे आकारले. आपण फसवल्या जात आहोत हे कळूनही मी काहीच करू शकले नाही. माझी गरज होती आणि मी निमूटपणे पैसे देऊन ते कागद हातात घेतले. तो वृत्तांत दिसायला माझ्या मनासारखा झाला नव्हता हे खरं. मी हिरमुसल्या मनानं तो पोस्टाने पुण्याला पाठवून दिला. 
मात्र त्या डीटीपीच्या त्या दुकानातला प्रसंग मला विसरता आला नाही. आपण कोणावर अवलंबून राहिलं की काय होतं याचा अनुभव मला अपमानित करत होता. त्यानंतर मी कुठेही कम्प्युटरचं मोफत प्रशिक्षण अशी वर्तमानपत्रात जाहिरात वाचली की तिकडे धाव घ्यायची. त्या कम्प्युटर्स क्लासेसचा हेतू येणार्‍यांनी आपल्याकडे पुढे कोर्सेस करावेत हा असायचा. मला मात्र माझं काम मला यावं यासाठी कम्प्युटरची माहिती हवी होती. मला तर सीपीयू म्हणजे काय, माऊस म्हणजे काय आणि मॉनिटर म्हणजे काय हे देखील ठाऊक नव्हतं. 
 मी पंधरा दिवसांचं ते मोफत प्रशिक्षण औरंगाबादला शहागंज या भागात एका ठिकाणी केलं. त्या वेळी मला सीपीयू, मॉनिटर, माऊस समोर दिसलेच पण त्याचबरोबर हार्डवेअर म्हणजे काय, सॉफटवेअर म्हणजे काय हेही कळालं. ही माहिती वरवरची असली तरी माझ्यासाठी जादूचं दालन उघडणारी होती. त्यानंतर मग मी असेंबल्ड केलेला कम्प्युटर विकत घेण्याचं ठरवलं. घरी कम्प्युटर आला. माझा गुरू आता अपूर्व असणार होता. कारण त्याला पाचवीपासूनच शाळेत कम्प्युटर हा विषय होता आणि त्याला हा विषय खूपच आवडायचा. 
अपूर्वने मला हळूहळू वर्ड म्हणजे काय, त्यात कसं लिहायचं (टायपायचं.) पेंट म्हणजे काय, त्यात कशी चित्रं काढायची, ती चित्रं रंगांचं बकेट घेऊन कशी रंगवायची, पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन म्हणजे काय, त्या स्लाइड कशा घ्यायच्या हे दाखवलं. माऊस कसा वापरायचा, फोल्डर कसं बनवायचं....असं करत करत मी चक्क फोटोशॉप शिकण्यापर्यंत मजल मारली. वर्डमध्ये फॉन्ट निवडता येतो, तो लहान मोठा करता येतो, मध्ये कुठलाही शब्द विसरला तर पुन्हा टाकता येतो. असं सगळं शिकताना मला कल्पवृक्ष मिळाला तर किती आनंद होईल इतका आनंद झाला होता. माझ्यासाठी कम्प्युटर म्हणजे जादूगार होता. दिवस असो वा रात्र, अपूर्व झोपलेला असला तरी मध्यरात्रीही त्याला हाक मारून माझा अडलेला प्रश्‍न विचारायची. 
यानंतर एके दिवशी इंटरनेट कॅफेमध्ये अपूर्वनं मला नेलं. खरं तर सुरुवातीला मी घाबरलेच. आख्ख्या जगाच्या संपर्कात मी आले होते. मुंबईत पहिल्यांदा गेल्यावर त्या गर्दीत मी जशी बावचळून गेले होते तसंच या इंटरनेटच्या मायाजालात मला झालं. माझी मतीच गुंग झाली. पण इथंही अपूर्वने मला ईमेल आयडी कसा उघडायचा, मेल कशी करायची, ऍटेचमेंट कशी जोडायची, चाटिंग कसं करायचं हे शिकवलं. मग आम्ही घरातच इंटरनेट घेतलं आणि माझ्यासाठी तर आर्कुट काय, याहू मेल काय, माझ्या कविता टाईप करणं काय, ग्रिटिंग कार्ड बनवणं काय आणि माझ्या आवडत्या किशोरकुमारच्या  आवाजातली गाणी मी गाऊन रेकॉर्ड करणं काय, सगळी धमालच होती. याच काळात वैभव देशमुख आणि मनोज ठाकूर हे दोन तरूण कॉलेजात शिकत होते. आम्ही रात्री बारा बारा वाजेपर्यंत गजल, कविता आणि गाणी गायचो, रेकॉर्ड करायचो. स्वतःच ऐकायचो. रात्री बारा वाजता आम्हाला भुकेची जाणीव व्हायची. मग पीठलं भात टाकून त्यावरही ताव मारायचो. 
तेव्हा युनिकोड नव्हतं. त्यामुळे एपीएस नावाचं मराठी सॉपट्वेअर अपूर्वने मला कम्प्युटरमध्ये टाकून दिलं होतं. काही सुरेख क्लिपआर्ट टाकून दिल्या. मी मराठी शिकताना अक्षरशः पहिलीच्या वर्गात जाऊन बसले आणि रोज कानामात्रावेलांटीउकार नसलेले शब्द मन, दगड, अहमदनगर असे टाईप करून बघू लागले. त्यानंतर पुढले दोन दिवस फक्त काना असलेले शब्द, त्यानंतरचे दोन दिवस फक्त पहिली वेलांटी असलेले शब्द असं करत करत कीबोर्डवर माझा हात बसला. मी न बघता टाईप करायला लागले. आज समोरचा ज्या वेगानं बोलतो, त्या वेगानं मी मराठी टाईप करू शकते. त्यामुळे मग माझ्या कथा असतील, गजल असतील, कविता असतील त्या नीटनेटक्या रुपात कम्प्युटरवरच्या फोल्डर्समध्ये आपापल्या फाईल्समध्ये दिमाखात सजून धजून बसू लागल्या. सजून धजून यासाठी की मी कविता टाईप केली तर ती हिरव्या रंगात टाईप करायची. मग खाली एखादी क्लिपआर्ट मधली इमेज घ्यायची. स्वतःची स्वाक्षरी करताना वेगळा फॉन्ट निवडायचा. कवितेला साजेसं चित्र त्यात टाकायचं असं काय काय करून ते पान सजवत असे. या कम्प्युटरनं आणि इंटरनेटनं माझं सगळं जगच बदलून टाकलं होतं. 
मग हळूहळू आर्कुट आलं, फेसबुक आलं, व्हाट्सअप आलं. जगभरातले मित्रमैत्रिणी माझे झाले. कोणी शिक्षक, कोणी अधिकारी, कोणी वैज्ञानिक, कोणी साहित्यिक, कोणी जगप्रसिद्ध चित्रकार, कोणी संगीतकार, तर कोणी अभिनेता, कोणी ड्रायव्हर, कोणी गृहिणी, कोणी उद्योजक असे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथं भेटले. हे जग मला कधी आभासी वाटलं नाही. यातले धोके माझ्या वाट्याला कधी आले नाहीत. खूप चांगले लोक मला भेटले. त्यांच्याशी अक्षरगप्पा मारून मी समृद्ध होत गेले/जातेय.
मग मी ब्लॉग कसा तयार करायचा, वेबसाईट कशी बनवायची, पेजमेकर कसं वापरायचं, इनडिझाईन कसं शिकायचं, पुस्तकं ऑनलाईन विकत कशी घ्यायची, डाऊनलोड कशी करायची अशा अनेक गोष्टी शिकण्याची धडपड सुरू केली. इनडिझाईनसाठी संजय साळुंखे आणि प्रभाकर भोसले यांच्याकडे मला काही धडे मिळाले. अर्थातच श्रेय सगळं माझ्या मित्राला -यमाजी मालकरला!
यमाजी मालकर, प्रभाकर भोसले, संतोष देशपांडे, शुभानन गांगल आणि मी - दीपा देशमुख आम्ही सकाळ परुळेकर ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत/गावात पत्रकारांसाठी कार्यशाळा घेतल्या. पत्रकारांनी तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या कामात करावा आणि त्यांना  ही सगळी कौशल्य आत्मसात करता यावीत असा आमचा हेतू होता. मी युनिकोडचं सत्र घेत असायची. त्या काळातले सगळे प्रवास आम्ही कोणीही विसरू शकणार नाही.
आर्कुटपेक्षाही फेसबुकनं माझ्या विश्‍वात क्रांती केली! मी माझ्या मनातल्या अनेक गोष्टी इथे शेअर करू लागले. आजही करते. कधी चित्रपटाचं परीक्षण असतं, कधी वाचलेल्या पुस्तकाबद्दल मला वाटलेल्या भावना असतात, कधी माझे लेख असतात, कधी मला आवडलेली नाटकं, सिनेमे याबद्दलही असतं. कधी माझ्या कविता फेसबुककडे धाव घेतात. कधी मी सुगृहिणी होत आवडणारे पदार्थ करते तेव्हा तीच रेसिपी शेअर करत असते. कधी मला कोणी दिलेल्या भेटवस्तूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असते. कधी मला आवडणारी गाणी फेसबुकवर टाकून मीच पुन्हा पुन्हा ऐकते. कधी कधी दूरदूरपर्यंत पोहोचलेली माझी यशस्वी मुलं काहीतरी वेगळं काम करत असतात. त्यांचं कौतुक इथंच करता येतं. कधी विचारवंत मित्र/मैत्रिणी नवे विचार देऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा पुन्हा करून देतात. जगभरात घडणार्‍या बातम्या काही सेकंदात इथंच बघायला मिळतात. 
हा कम्प्युटर, हे फेसबुक माझ्यासाठी माझं एक घरच मला वाटतं. घर आवरावं तसं मी काही दिवसांनी कव्हरफोटो बदलते. मी स्वतःही ताजीतवानी वाटावी अशी प्रोफाईल पिक्चर बदलते. मांडलेले विषय काही दिवसांनी विसरायला होतात. पण इथं डॉक्युमेंटेंड झाल्यामुळे मी निर्धास्त असते आणि झुक्या मला आठवण करून देतोच की! माझं सगळं लिखाण याच कम्प्युटरवर मी करत असते. पुस्तकांची मुखपृष्ठ बनवत असते....आणि बरंच काही!
हे सगळं घडतंय, घडलंय ते केवळ आणि केवळ कम्प्युटरशी केलेल्या/झालेल्या दोस्तीमुळेच!
आणि शेवटी, याच कम्प्युटरमुळे माझी अच्युत गोडबोले नावाच्या जागतिक स्तरावर कीर्ती मिळवलेल्या एका संगणकतज्ज्ञाशी मैत्री झाली. आज माझ्या लिखाणाचं जेवढं श्रेय अच्युत गोडबोले या व्यक्तीला आहे, तितकंच ते माझ्या या लाडक्या कम्प्युटर नावाच्या मित्रालाही आहे. मित्राला थँक्यू आणि सॉरी म्हणायचं नसतं. पण तरीही थँक्यू माय बेस्ट फ्रेंड कम्प्युटर! थँक्यू माय डीअर झुक्या!
दीपा देशमुख. 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.