दिल ढूँढता है फिर वही फुरसत के रात दिन.......
कॉलेजमधली माझी ही मैत्रीण सुचेता! अकरावीपासून आम्ही बरोबर! शांत, सुस्वभावी, कमी बोलणारी....त्या वेळी बेलबॉटमची फॅशन होती. त्यामुळे बेलबॉटम पँट आणि त्यावर चेक्सचा शर्ट हा आमचा ड्रेस ठरलेला असायचा. ती कमी बोलायची आणि मीही कमीच...आमच्यातली तिसरी रजू ही मैत्रीण खूप बडबडी! सुचेता आणि मी अकरावीपासून ते बी. कॉम फर्स्ट इअरपर्यंत बरोबर होतो....मग तिच्या वडिलांची बदली जळगावला झाली आणि ती जळगावला गेली.
सुचेताची खूप आठवण यायची. कारण त्या वयातल्या प्रेमात पडल्यापासून ते प्रेमभंग झाल्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तिला ठाऊकच होत्या. अगदी आम्ही घरच्यांना चोरून बघितलेला आंबा-अप्सरा थिएटरमधला शशी कपूरचा ‘जब जब फूल खिले’ चित्रपट देखील! ती जळगावला गेल्यावर रजू आणि मी खूप कल्पनारंजन करायचो. माझा इतिहास विषय चांगला, पण भूगोल विषय कच्चा असल्यामुळे औरंगाबाद ते जळगाव अंतर मला तासाभराचं वाटायचं. मग मी आणि रजू जळगावला सकाळी कॉलेजच्या वेळात निघून पाचच्या आत घरात कसं पोहोचू याविषयीचे प्लॅन आखायचो. जाण्यायेण्यासाठी पैसेही जमवायचो. एके दिवशी तर आम्ही बसस्टँडवर जाऊन चौकशीही करून आलो. तेव्हा जाण्यायेण्याचे चार-चार म्हणजेच आठ तास कदाचित जास्तच लागतील हे वास्तव डोळ्यासमोर आलं. त्यातूनही मग मार्ग काढला. एके दिवशी वडिलांनी सांगितलं, माझी फर्दापूरला कमिशनरसोबत मिटिंग आहे, मग मात्र मी हट्ट धरला. वडिलांबरोबर फर्दापूरला येतो आणि तिथून मी आणि रजू जळगावला जाऊन येतो असं सांगितलं. वडिलांनी ऐकलं आणि मी आणि रजू जळगावला मैत्रिणीला म्हणजेच सुचेताला भेटायला गेलो. तासादोनतासाची ती भेट - काय बोललो असू काहीही आठवत नाही. पण जगातला सगळ्यात मोठा आनंद त्या क्षणांनी दिला होता.
पुढे अनेक चढउतारात सुचेताची भेट काही काळानंतर होत राहिली. जेव्हा कधीही भेटली, तेव्हापासून ते आजपर्यंत ती तशीच शांत, सौम्य, समईतल्या ज्योतीसारखी मला भासते. कधीही तक्रारीची रेषा कपाळावर नसते की कधी नाखुशीची आठी! तिचा जोडीदार संजय हा तर दिलखुलास माणूस! एकदम मोकळा, बडबड्या आणि स्मार्ट!
अशी ही सुचेता - मी जळगावला व्याख्यानासाठी गेले, तेव्हा भेट घेणं - भेट होणं हे होणारच होतं. सुचेतानं खूप अगत्यानं स्वागत केलं. पुन्हा निवांत राहायला ये असं आवर्जून सांगितलं. निघताना माझ्यासाठी आवर्जून आणलेली कॉटनची काठापदराची मला आवडेल अशी साडी आणून ठेवलीच होती. इतकंच नाही तर आता माझ्या बरोबर आसावरी आहे कळल्यावर तिच्याहीसाठी तिला आवडेल अशी साडी पठ्ठीनं घेऊन ठेवली होती. (आसावरी म्हणजे आपली दुसरी रजूच असंही तिनं मला लक्षात आणून दिलं!) जळगावहून आल्यापासून सुचेताची साडी सारखी खुणावत होती. मग आज नम्बर लागला. अपूर्व कडून फोटोसेशन पार पाडून घेतलं. आपण कम्प्युटरवर कसे काम करतो आहोत याचा आव आणला. अर्थात, हे सगळं सुचेतासाठी! सुचेता, अशीच कायम बरोबर राहा!
अपूर्व घरी येताच, जवळच असलेल्या चिनार गार्डनमध्ये गेलो. तिथला हॉटेलमालक प्रेम आमचा चाहता आणि आम्ही त्याचे चाहते! कुठले ऋणानुबंध आहेत कळत नाही, पण तिथे गेलं की तो जे खाऊ घालेल ते खायचं. माझं बी-१२ कमी आहे हे माहीत असल्यामुळे प्रेमनं लगेचचं किचनचा ताबा घेऊन लेमन कोरिएंडर सूप आणि माशांचा (काटे काढून) सुंदरसा प्रकार समोर आणून ठेवला. कधीही नॉनव्हेजला हात न लावणारी मी प्रेमच्या हातचे मासे आजकाल खाते. जणूकाही माझं बी-१२ वाढणार हा विश्वास त्याचा सुग्रण हात मला देतो. प्रेमशी गप्पा मारून अपूर्व आणि मी घरी परतलो....मन गात होतं :
दिल ढूँढता है फिर वही फुरसत के रात दिन.....
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment