थिंक पॉझिटिव्ह - टेन्शन कायकू लेनेका?
सकाळचा 'शब्ददीप', 'किशोर' आणि 'थिंक पॉझिटिव्ह' हे दिवाळी अंक अद्याप मिळायचे राहिले होते. विचार करत असतानाच प्रभाकर भोसले यांचा वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा देणारा फोन आला. आम्ही जवळच्याच अंतरावर असल्यामुळे लगेचच भेटायचं ठरवलं. पाचच मिनिटांत प्रभाकर ‘ थिंक पॉझिटिव्ह’ च्या दिवाळी अंकासह पोहोचला. अंकासोबतच मला एक जंबो आकाराचं चॉकलेट वाढदिवसाची भेट म्हणून दिलं. थोड्या गप्पा झाल्या आणि लवकरच भेटू म्हणून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
घरी येईपर्यंतही खरं तर धीर नव्हता, पण मनाला आवरलं. घरी येताच अंक उघडला. प्रभाकरचा अंक वाचायलाच नव्हे तर दिसायलाही देखणा असतो. त्याचं कलाकार असणं, त्याच्यातली सौंदर्यदृष्टी त्याच्या अंकामधून दिसते. त्यामुळेच अंक वाचण्याबरोबरच बघण्याची उत्सुकता जास्त होती.
या वेळच्या थिंक पॉझिटिव्ह दिवाळी अंकाचा विषय होता - 'ताणतणाव! टेन्शन कायकू लेनेका?' खरं तर मी ताणतणाव यावर यापूर्वीही अनेकदा लिहिलेलं आहेच, पण प्रभाकरचा दिवाळी अंकासाठी फोन आला आणि पुन्हा एकदा हा विषय लिहायला घेतला. 'थिंक पॉझिटिव्ह'साठी लिहिणं म्हणजे आपल्याच घरातलं कार्य आपण नीटपणे पूर्ण करण्यासारखं होतं. मी मला येणार्या ताणाकडे कसं बघते, हे ताण मला कसे दूर ठेवता आले किंवा येतात आणि ताणामागची शास्त्रीय कारणं आणि उपाय यावर लिहिल्यावर मला हुश्श झालं होतं. आता आपला लेख या अंकात प्रभाकर कसा सजवतो याचे वेध लागले होते.
'थिंक पॉझिटिव्ह'च्या या वेळच्या दिवाळीअंकात एकूण आठ भाग आहेत. टेन्शन अटेन्शन, नात्यांचं वर्तुळ, सकारात्मक ताण, ताणाला सामोरं जाताना, रंगरूप, क्षण टेन्शनचा, ताण, भक्ती आणि मुक्ती आणि परेशानसी क्यों है जिंदगी? अशा आठ भागात प्रतिभा देशपांडे, डॉ. विद्याधर बापट, स्मिता जोशी, डॉ. सागर पाठक, प्रवीण दवणे, मनोज अंबिके, डॉ. उमेश कणकवलीकर, अतुल पेठे (मुलाखत), ऐश्वर्य पाटेकर, महावीर जोंधळे, अॅड, उज्ज्वल निकम, राजू देसले, छाया महाजन, इंदुमती जोंधळे, अमृता देसरडा, प्रतीक पुरी, पराग पोतदार, सचिन परब यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख सामील झालेले आहेत.
या विश्वाचा प्रचंड मोठा असा पसारा आणि त्यातलं आपण स्थान, त्यात आपल्याला येणारे ताण आपण किती मोठे करतो याविषयी अतिथी संपादक म्हणून यमाजी मालकर यांनी ताणाविषयी खूप यथार्थ भूमिका मांडली आहे. प्रभाकर भोसले यांनी संपादक म्हणून दिवाळी अंकातल्या लेखांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. तसंच आयुष्याकडे बघण्याचा, आलेले प्रसंग हाताळण्याचा द़ृष्टिकोन सकारात्मक कसा असायला हवा याबद्दलचं त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
अंक वरवर चाळला आहे, सविस्तर वाचल्यावर पुन्हा लिहीनच, मात्र प्रत्येक पानावरची प्रभाकरची कॅलिग्राफी, लेआऊट, चित्रं वाचकाला खिळवून ठेवतात. पदार्थ चांगला रुचकर चविष्ट करण्याबरोबरच तो आपण कशा प्रकारच्या भांड्यातून सजवून सर्व्ह करतोय याला जितकं महत्व आहे तितकंच महत्व दिवाळी अंक असो वा कुठलंही पुस्तक, त्याच्या मांडणीला, सजावटीलाही आहे. यात प्रभाकर अर्थातच यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच प्रत्येक वर्षी 'थिंक पॉझिटिव्ह' दिवाळी अंकाला अनेक पुरस्कार मिळत असतात!
जरूर वाचा - थिंक पॉझिटिव्ह - टेन्शन कायकू लेनेका?
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment