विनाशकाले विपरित बुद्धी......
तब्बल १५ दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शननं त्रस्त आणि घरात आराम करत मस्त असताना विनाशकाले विपरित....म्हणतात तसं आज झालं. बरं नसतानाही बकरीला बळी जाण्याची इच्छा झाली. याला कारणीभूत पहिली व्यक्ती म्हणजे डॉ. प्रशांत पाटील! या भल्या माणसानं किरण नगरकरबद्दलची पोस्ट टाकली. इतकं अप्रतिम लिहिलं होतं की मी लगेचच ती पुस्तकं बुकगंगावर आहेत का बघितलं, पण मला हवी असलेली सगळीच पुस्तकं आऊट ऑफ स्टॉक दिसली. मग संभा यानेके वाघोबाकडे (संजय भास्कर जोशी!) चौकशी केली. या माणसाच्या शब्दकोषात ‘नाही’ हा शब्दच नसल्यानं त्यानं लगेचच ‘आपल्याकडे ही पुस्तकं आहेत’, असं म्हटलं. मग ‘ती मला हवी आहेत’ असं मी म्हणताच, वाघोबा प्रेमातुर आवाजात म्हणाले, 'दीपा, लवकर ये, मी तुझी वाट पाहतो.' जाणं भागच होतं. पुढे काय वाढून ठेवलंय हे दिसत असतानाही संमोहित झालेली बकरी स्वतःहून वाघोबाच्या गुहेत शिरली.
तिथे (पुस्तकपेठेत) पोहोचले तर, एका बळीची आधीच तयारी सुरू झालेली होती. मधुरा नावाची गोड मुलगी बळी जाण्यासाठी स्वतःहून सज्ज झाली होती. संभा वाघोबाचे दोन्ही मांत्रिक साथीदार कुलकर्णी आणि वैशंपायन आता तरबेज झाल्यामुळे संभाला साहाय्य करत होते. दोन-तीन हजाराचं बिल मधुराच्या गळ्यात मारून ‘लवकर ये हो मधुरा’ असं म्हणत संभानं आणि साथीदार मांत्रिकांनी तिला निरोप दिला.
आता माझी पाळी होती. संभानं सुरू केलं, ‘दीपा, दुष्यंत कुमार आहे ना तुझ्याकडे?' मी संमोहित न होता, ‘माझ्याकडे दुष्यंतकुमार आहे, बशीर बद्र आहे आणि निदा फाजली देखील आहे’ असं म्हणाले. पण हार मानेल तो संभा कसला? गोड हसत मला म्हणाला, 'दीपा तुझ्याकडे राजेंद्र यादव असायलाच हवा.' मी आता स्वतःवरचा ताबा हरवत चालले होते. मी होकारार्थी मान डोलावली. संभानं माझ्यापुढे काही बोटं नाचवली, जी मला स्पष्ट दिसतच नव्हती. संभाच्या लक्षात ही गोष्ट आल्यामुळे संभानं मला विचारलं, 'दीपा, मंटो बघितलास ना? काय चित्रपट आहे ग?' मी कसाबसा स्वतःवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत म्हणाले, 'पण नंदिता दासनं प्रेक्षकांना गृहीत धरायला नको होतं, प्रेक्षकांना सगळं ठाऊक असल्यासारखं..'....माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच संभानं बोलायला सुरुवात केली, 'अग, खरा लेखक वा खरा दिग्दर्शक तोच जो वाचकाला आपल्यापेक्षा दोन पायर्या वरचा समजतो, आपल्यापेक्षा कमी समजत नाही'. मला ते पटत चाललं होतं, मी पुन्हा होकारार्थी मान हलवली आणि तिथंच फार मोठी चूक झाली. फार मोठा घात झाला. लबाड वाघोबा हसला आणि मंटोचा पूर्ण सेट काउंटरवर बिलासाठी जाऊन पोहोचला. आता राज्य संभा वाघोबाच्या हाती होतं. मग संभानं डौलदार चालीत अनेक पुस्तकं उचलली. ती पुस्तकं माझ्याकडे नसतील तर मी जगूच शकणार नाही याची खात्री त्यानं मला दिली. मला तर ते सगळं पटतच चाललं होतं. ही बघ ही तीन पुस्तकं तर तुझ्या नावाचं खास लेबल तयार करून मी वेगळी ठेवली आहेत. स्वताच्या अतिशय सुरेख हस्ताक्षरात त्याही पुस्तकांवर 'दीपा देशमुख' नावाची लिहिलेली संभाची एक चिट्ठी मला खुणावत होती.
अशा तर्हेनं आज पुस्तकपेठ नामक गुहेत स्वखुशीनं दोन दोन बळी गेले आणि संभा वाघोबा खुश झाले! 'अरे ओ संभा, दो पिशव्या लाव' असं स्वतःशीच म्हणत माझ्यासाठी दोन ऐवजी तीन पिशव्या आणत, त्या कशा मजबूत दणकट आहेत असं सांगत संभानं त्यात सगळी पुस्तकं भरली.
मी पुस्तकपेठेच्या बाहेर पडत असतानाच कानावर आवाज आदळला, ‘पुन्हा लवकर ये हो दीपा, मी वाट बघतो!’
तुम्हालाही बळी जायचं असेल आणि स्टार (पुस्तक पेठेचा) व्हायचं असेल, तर बघा, विचार करा आणि जा पुस्तकपेठ नामक पुस्तकांच्या गुहेत!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment