आहे मनोहर - विष्णु मनोहर
गेले काही दिवस मी विष्णु मनोहर या माणसाच्या प्रचंड प्रेमात आहे. विष्णु मनोहर म्हणजे तेच हो, ते विष्णुजीकी रसोईवाले! गेले दोन महिने मी रोजच यूट्यूबवर त्यांचे कार्यक्रम बघते/ऐकते आहे. मग काय त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व, कुठलीही किचकट प्रक्रिया नसलेलं पदार्थ बनवणं मला एकदमच भावलं. स्वयंपाकाचा कंटाळा करणारी मी सध्या त्यांचे कार्यक्रम बघणं आणि त्यानंतर ते पदार्थ करून बघणं आणि अर्थातच नंतर खाणं अशा उद्योगात व्यस्त आहे.
लोखंडी खलबत्यात शेंगदाण्याची चटणी कुटणं, लोखंडी कढईत पालेभाजी करणं, पितळी कढईत गुठळ्यांचं पिठलं करणं, तांब्याच्या भांड्यात इंद्रायणी किंवा बासमती भात शिजवणं....असं सगळं चालू आहे. विष्णु मनोहरांचं म्हणणं, भांडी वजनाला जरा चांगली हवीत, थोडक्यात वजनाला टपरी असलेली भांडी वापरू नयेत. लोखंडी, पितळी आणि तांब्यांच्या कढई आणि भांड्यात पदार्थ कोणते करावेत आणि त्यामुळे त्यांच्या चवीत कसा फरक पडतो हेही ते सांगतात. त्यांच्या किचनमध्ये असलेली ती सगळी पारंपरिक भांडी बघून ‘मला पण पाहिजे’ अशी अवस्था झाली. मग काय माझ्याकडे असलेली सगळी निर्लेपची वगैरे आधुनिक भांडी मी हद्दपार केली आणि त्यांनी सुचवल्यानुसार त्यांच्याच ऑनलाईन शॉपमधून पारंपरिक तांब्या/पितळ/लोखंडाची भांडी विकत घेतली. विष्णु मनोहरांसारखंच माझंही स्वयंपाकघर पारंपरिक भांड्यांनी लगेचच सजलं.
दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि त्यात विष्णु मनोहरांचे रेसिपीजवरचे अनेक कार्यक्रम बघून झालेले. आज तर मला आणि अपूर्वला एकदमच काहीतरी हटके खायचा मूड आला. मग कांदा, टोमॅटो, बटाटा घालून पितळेच्या कढईत चविष्ट असे पोहे केले आणि त्यानंतर गिलके/घोसाळे यांची भजी केली. सोबतीला टोमॅटो सॉस! या भज्यांची रेसिपी विष्णु मनोहरांची! बेसन पीठ, तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर, थोडे जिरे/ओवा, कोथिंबीर, थोडा खाण्याचा सोडा आणि यात जरा जाडसर गोल केलेल्या गिलक्यांच्या चकत्या टाकून मस्त भजी तयार झाली. यात भरपूर लोहाचं प्रमाण असल्यानं माझ्यासारखीला तर आनंदी आनंद गडेचं वातावरण झालं. अपूर्वनं लोणावळा-खंडाळा इथून माझ्यासाठी खरेदी केलेली क्रॉकरी असल्यानं त्यात हे पदार्थ खाताना आणखीनच मजा आली.
आता लवकरच मला मनोज अंबिके यांना भेटून त्यांच्याकडून त्यांच्या माय मिरर पब्लिकेशननं प्रसिद्ध केलेली विष्णु मनोहरांची पुस्तकं ताब्यात घ्यायची आहेत!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment