माझं मांजर प्रेम!
मला मांजर आवडण्यामागचं कारण म्हणजे आमच्या घरी ते आम्ही लहान असल्यापासूनच पाळलं गेल्यामुळे कदाचित असावं. मी लहान असताना आमच्या घरी म्हैस, कोंबड्या, कुत्रा, पोपट आणि मांजर ही मंडळी आमच्याबरोबरच गुण्यागोविंदाने नांदत होती. आई मराठवाड्यातल्या औंढा नागनाथ या छोट्याशा गावातली असल्यानं तिला शेती आणि प्राणी यांची मनापासून आवड होती. तिच्या आवडीमुळेच हे सगळे प्राणी-पक्षी आमच्या घराचा हिस्सा झाले होते. आई म्हशीचं दूध स्वतः काढायची. तिच्या घरी शेत असल्यामुळे तिला बागकामाचीही खूप आवड होती. वडील सरकारी अधिकारी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सरकारी निवासस्थानाला लागून बरीच जागा असायची. त्यात आई मग फुलंझाडं आणि भाज्या असं काय काय लावायची. घरातल्या पिंजर्यात बंदिस्त असलेला पोपट कायम बडबडत असायचा. माझा एक भाऊ नियमितपणे पिंजरा साफ करणं, पोपटाला त्याचे आवडते पदार्थ खाऊ-पिऊ घालणं आवडीने करत असे. मी कोंबड्यांना दाणे टाकलेले फोटोही मला आठवतात. अल्सेशियन, पॉमेलियन कुत्र्यापासून ते गावठी कुत्र्यापर्यंत सगळ्या प्रकारची कुत्री आमच्या घरी होती. त्यातही पिंकी आणि टायगर ही माझ्या खास आवडीची!
मांजर आवडण्याच्या आणखी काही कारणांपैकी एक कारण म्हणजे ते स्वतःवर प्रेम करतं. ते स्वच्छताप्रिय असतं आणि एक आदर्श माता म्हणून मांजराकडे (मांजरीणबाई!) बघितलं जातं! आपल्या पिल्लांना ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रशिक्षित करतं. मुख्य म्हणजे त्याच्या डोळ्यात प्रचंड कुतूहल असतं!
खरंच, मांजरासारखं स्वतःवर प्रेम करावं. आपणच आपल्याला स्वीकारलं नाही तर जगानं का स्वीकारावं? आणि आपण आपल्यावर प्रेम केलं की सार्या जगावर आपण प्रेम करू शकतो असं मला नेहमीच वाटतं. मांजराइतकं स्वच्छतेची काळजी कुठलाही प्राणी घेत नसावा. (बहुतेक त्याला ओसीडीचा विकार असण्याची दाट शक्यताही असू शकते!) कोवळ्या उन्हात जाऊन उन्ह खाणं, दुपारच्या उन्हात गडबडा मातीत लोळून स्वतःच्या शरीरावरच्या (केसांमधल्या) पिसवांचा नायनाट करणं, नंतर मात्र जिभेनं चाटून चाटून, स्वतःच्या गादीसारख्या मऊ पंजानं स्वतःचं शरीर आणि तोंड पुसणं (थोडक्यात आंघोळ करणं!) हे मांजर अतिशय छान पद्धतीने करतं. घरात कधीही घाण न करता बाहेरच्या मातीत जाऊन मांजर शू आणि शी करतं. आधी ते पंजाने माती उकरून खड्डा करणार आणि कार्यक्रम झाल्यानंतर तो खड्डा पंजानं माती लोटून जैसे थे करणार. पोट दुखलं की बागेतल्या दुर्वा शोधून खाणार आणि आपली तब्येत नीट ठेवणार. आपल्या मालकाकडून हवे तितके लाड करून घेणार. नेहमी नीटनेटके राहणार. आपण सेलिब्रिटी आहोत याच थाटात यांचा वावर असतो. कोणी बघत असो वा नसो, कायम फोटोजनिक पोझमध्ये ही मंडळी असतात! लाडात असल्यावर शेपटी हळुवारपणे मोरपिसासारखी नाचवणार, तर रागात आल्यावर तीच शेपटी दणदणा आपटवणार. भीती वाटल्यावर शेपटीचे सगळे केस 'रोंगटे खडे हो गये' प्रमाणे फुलवणार! जास्तच चिडल्यावर कुत्रा आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे हे कळूनही त्याच्या थोबाडीत मारून त्याला नखांनी बोचकारून त्याला हार पत्करायला लावणार! स्वतःचं स्वातंत्र्य कधीही गहाण ठेवणार नाहीत. आपल्या मर्जीप्रमाणे वागणार. (गोविंदाचं 'मेरी मर्जी' हे गाणं यासाठी आठवावं.) कुत्र्याप्रमाणे मालकाची मर्जी सांभाळण्यात ही मंडळी आपला जन्म फुका व्यर्थ घालवत नाहीत. पाळलेलं असलं तरी मालक कुठेही गेला तरी मांजरं अंगी संतपण बाणवल्यागत दुःख करत बसत नाहीत. वा अन्नपाणी त्यागत नाहीत. आपापल्या पोटापाण्याची सोय ते करतात. कुत्रा मात्र मालकाची वाट बघत डोळ्यातून आसवं गाळत बसतो. मांजर कधीच कोणावर अवंलबून राहत नाही.
माणूस या प्राण्याचा इतर प्राण्यांप्रमाणेच मांजर जवळ येण्यापूर्वी नीट अंदाज घेतं. माणसाचा अभ्यास करतं म्हणा हवं तर. सुरुवातीला आपण अनोळखी असताना कितीही दूध टाका किंवा त्याचा आवडीचा पदार्थ, ते ढुंकूनही त्या पदार्थाला तुमच्यासमोर तोंड लावणार नाही. मात्र एकदा का त्यानं तुम्ही बरे आहात असं ऍप्रूव्हल दिलं की ते उपकार केल्यागत दुधाच्या बशीला तोंड लावून एका दमात ते दूध संपवतं. मांजरं अतिशय उत्तम शिकार करतात. पण आजकालचे पाळीव मांजरं मात्र आळशी बनल्यामुळे समोरून उंदीर गेला तरी ते 'हिंसा कशाला करायची' असं म्हणून साफ दुर्लक्ष करताना दिसतात.
आमच्या घरी ज्यूली, मिली, मन्या अशी अनेक मांजरं पाळली गेली. त्यातली ज्यूली तर दिसायला खूपच सुंदर म्हणजे अगदी सायराबानोसारखीच दिसायला होती. अनेक मांजरांच्या चेहर्यात मला ओळखीच्या माणसांचे चेहरे दिसतात. का कोणास ठाऊक! मांजरातही टपोरी मांजरं, गुंड मांजरं, भुरट्या चोर्या करणारी मांजरं, गरीब आगतिक मांजरं (हा तात्पुरता प्रकार असतो. शक्यतो मांजरं या प्रकारात फार कमी मोडतात.), माजलेली मांजरं, राजकारणी मांजरं, आपण बरे आणि आपलं काम बरे टाईप मांजरं असे अनेक प्रकार आढळतात.
आईच्या प्राणी-पक्षी प्रेमामुळे आम्हा सगळ्याच भावंडांमध्ये आणि नंतर त्यांच्या त्यांच्या मुलांमध्येही हे प्राणी-पक्षी प्रेम आपसूकच आलं. एका अर्थी हे बरंच झालं. कारण त्यामुळे लहानपणापासून मला कुठल्याही प्राण्याची भीती कधा वाटलीच नाही. लोक कुत्र्याला खूप घाबरतात आणि रस्त्यावरून जाताना अशा घाबरणार्या एकट्यादुकट्या माणसांना असे कुत्रे बरोबर ओळखतात आणि त्यांच्या मागे 'पंजे धुवून' लागतात.
तसंच या प्राण्यांना कदाचित कळत असावं, की कोण आपल्याबद्दल खरं प्रेम दाखवून आहे. त्यामुळे ते फक्त भित्यापाठी लागतात. मला तर कुठल्याही अनोळखी कुत्र्या-मांजराबरोबर दोस्ती करता येते. थोडा 'ओव्हर कॉन्फिडन्स' म्हटलं तरी चालेल. हेमिंग्वे, सार्त्र, पिकासो, न्यूटन, हेन्री मातीस, पॉल क्ली, गुस्ताव क्लिम्ट, साल्वेदोर दाली, जॉन लेनन, अब्राहम लिंकन, एल्व्हिस प्रेस्लेची मुलगी, मार्लिन मन्रो, मार्लन ब्रान्डो, ही आणि यांच्यासारखी अनेक ग्रेट मंडळी त्यांच्या कुत्रा-मांजर-पोपट प्रेमामुळे मला जास्तच आवडायला लागली! त्यांचे या प्राण्या-पक्ष्यांसोबतचे फोटोज मी सांभाळून ठेवत असते.
आमच्या घरात पाळलेल्या पिंकीची, टायगरची, मिली, ज्यूली आणि मन्या यांची अनेक वैशिष्ट्यं होती. ते अनेक गमतीजमती करायचे. त्यांच्या वावरण्याच्या, बसण्या-उठण्याच्या आपापल्या ठरलेल्या जागा होत्या. विशेषतः ज्यूलीला टीव्हीवर बसायला खूप आवडायचं. आई तर सडा, रांगोळी करायला जाताना गॅसवर ठेवलेल्या दूधाकडे लक्ष द्यायला ज्यूलीलाच सांगून जायची. आमच्या घरात पाळलेल्या मांजरांनी कधीच संधी साधून दूधात तोंड बुडवलं नाही. उलट त्यांनी राखणच केली. टायगरच्या शेपटीशी मांजरं नेहमीच खेळत, पण तो कधीच वस्सकन ओरडत त्यांच्या अंगावर धावून जात नसे. या सगळ्या मंडळींच्या आठवणी कधीतरी लिहीन आणि तुमच्याबरोबर शेअर करीन. तुर्तास इतकंच!
दीपा २७ जून २०१७.
Add new comment