आरती प्रभू आणि मांजर
चिं. त्र्यं. खानोलकर - म्हणजेच आरती प्रभू - अवघ्या ४६ वर्षांच्या आयुष्यात या माणसानं तीन कवितासंग्रह, चार कथासंग्रह, बारा कादंबर्या, आठ नाटकं, दोन ललित लेखसंग्रह, एक बालगीतसंग्रह आणि चार अनुवाद याशिवाय अनेक नियतकालिकांत प्रसिद्ध झालेलं साहित्य इतकं प्रचंड लिखाण केलं आहे. खरं तर असा साहित्यिक, असा कवी पुन्हा होणे नाही म्हटलं तरी चालेल. आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्यांचं स्थान फार मोठं आहे. त्यांची प्रकर्षांनं आठवण येण्याचं कारण म्हणजे आज आरती प्रभू यांचा ‘मी लेखक कसा झालो?’ हा लेख अनेक वर्षांनी पुन्हा वाचत असतानाच मला त्यांची एक कविता दिसली आणि मी उडालेच. मी आणि माझी बहीण रूपा ही कविता मोठमोठ्यानं तारसप्तकात म्हणत असू आणि हसत असू. पण ही कविता आरती प्रभू यांची आहे हे तेव्हा मुळीच माहीत नव्हतं आणि ती कुणी शिकवलेलीही नव्हती. आजही ही कविता मला तोंडपाठ आहे. पुन्हा पुन्हा म्हणते आहे आणि एकटीच हसते आहे.....मज्जाच मज्जा !!!!
मांजर बिल्ली हल्ली हल्ली
फिरू लागली गल्ली गल्ली
भटकभवानी मिशा फुलवुनी
ऐटीत घेते चहा इराणी
येतो वेटर घेऊन वेफर
बिल्ली मागते ताजा पेपर
वेफर भरपूर खाऊन कुरकुर
खुशीत बिल्ली करते गुरगुर
मग तळलेला खाऊन मासा
सहज मागवी इडली डोसा
वेटर येतो सलाम करतो
बील देऊ का हळूच म्हणतो
मांजर म्हणते अहो कॅशियर
वेटर तुमचा महा बिलंदर
बिलबिल बिलबिल म्हणतो मजला
थट्टा माझी करतो मेला
मांजर बिल्ली मी तर सिस्टर
दिल्लीस असती माझे मिस्टर
टाकुनी तोंडी पट्कन वेफर
निघून गेली तरतर तरतर
-दीपा देशमुख
२५ मे २०१७.
Add new comment