खरवसाच्या किसून केलेल्या वड्या, स्मिता, उषा आणि मी

खरवसाच्या किसून केलेल्या वड्या, स्मिता, उषा आणि मी

तारीख

काल एका मित्राबरोबर 'मनोविकास प्रकाशन' मध्ये जायचं होतं. निघाले आणि रस्त्यात  वैद्य खडिवालेची पाटी दिसली. याच इमारतीत माझी मैत्रीण उषा राहत असल्यानं मी स्कुटी थांबवली आणि तिला फोन लावला. दुपारचे चार वाजल्यामुळे कदाचित ती वामकुक्षी घेत असेल असंही वाटून गेलं. पण फोन लागला होता. ती तिकडून म्हणाली, 'ये ग दीपाताई.' मी तिला म्हटलं, 'अगदी पाचच मिनिट येईन. माझी तिकडे वेळ ठरलीये.' ती 'हो' म्हणाली आणि मी तिसर्‍या मजल्यावर असलेल्या तिच्या घरात शिरले. बघते तर काय ती या वेळी जेवायला बसलेली.....'इतका उशीर?' 

'हो ग, उशीरच झाला. आज बाई पण आली नाही. आणि बाई आली नाही की मला आणखी चांगलं चटपटीत खमंग असं काहीतरी करावंसं वाटतं. त्यामुळे उशीरच होत गेला.' असं म्हणत तिनं दुसरं ताट घेतलं आणि मला वाढायला सुरुवात केली. तशी मी जेवणाच्या आणि स्वयंपाकाच्या बाबतीत कंटाळेश्‍वर! सुगृहिणी म्हणून कुठल्याच कॅटॅगरीत न बसणारी! पण कधी नव्हे ती नेमकी व्यवस्थित जेवण करून बाहेर पडले असल्यानं तिला 'नाही' म्हणत असतानाही तिनं तिच्या नेहमीच्या आग्रही पद्धतीनं जेवायला बसवलंच.

मला भेटलेल्या आजपर्यंतच्या प्रवासात सुहासिनी जोशी आणि उषा नवले या माझ्या दोन मैत्रिणी अतिशय सुग्रण, प्रेमळ आणि उत्साही! सुहासिनी तर एकटी असली तरी कधी स्वयंपाकाचा कंटाळा करताना मी बघितली नाही. उषाला तर स्वयंपाक करणं म्हणजे जीव की प्राण! इतरांना आग्रहाने खाऊ घालण्यात तिचा हात कोणीच धरू शकणार नाही. त्यातच तिचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फारशी न शिकलेली, वाचन फार नसलेली उषा हिला मुळातच सौंदर्यदृष्टी आहे. तिचा कपड्यांचा चॉईस अप्रतिम असतो. घरातली सजावट उत्कृष्ट! ती स्वतः अतिशय छान, नीटनेटकी राहते. दोन नातवंडांची आजी असूनही संतुर साबणाच्या जाहिरातीतली एक वाटते. स्वभावानं प्रेमळ आणि निरागस असणारी उषा उत्साहानं नेहमीच सळसळत असते. 

एकदा जेवण झालेलं असतानाही मी उषाच्या आग्रहामुळे दुसर्‍यांदा भरपेट जेवले. नंतर तिनं स्वीट डिश म्हणून पौष्टिक लाडू माझ्यासमोर ठेवले आणि बोलत बोलत दुसरा डबा उघडला. मी बघतच राहिले. माझ्या कितीतरी जुन्या कधीही वर आल्या नसत्या अशा आठवणी त्या उघडलेल्या डब्यातल्या पदार्थानं जाग्या केल्या. 

मी सहावीत असेन. आम्ही विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर या गावी होतो. दादा (वडील) तिथं सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट होते. नुकतीच बदली होऊन तिथं गेले आणि एकट्याला करमत नाही म्हणून एकदा औरंगाबादला आले आणि आम्हाला घेऊन गेले ते चक्क तिथल्या शाळेत नावच दाखल करून टाकलं. मलकापूर छोटंसं आणि छान गाव होतं. आमचं क्वार्टर (निवासगृह) कौलारू, मागे-पुढे मोठा बगिचा असलेलं.....एकदा माझी ओळख स्मिता नावाच्या माझ्याएवढ्याच मुलीशी झाली आणि आम्ही खूप छान मैत्रिणी झालो. तिचं नाव स्मिता प्रभाकर हस्तक! तिची आई तिथल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि वडील न्यायाधीश होते. तिचा एक भाऊ आशिष! आम्ही जवळजवळ दिवसांतले शाळा सोडून बाकी अनेक तास एकमेकींबरोबरच असायचो. सारखे कपडे शिवायचो. मज्जा!

एके दिवशी तिची आई जबलपूरला काही कारणानं गेली आणि जाताना मी तिला सोबत करावी असं सांगून गेली. घरात नोकर-चाकर असल्यानं आणि ऑफीस झाल्यावर तिचे वडील असल्यानं आम्हाला अडचण कुठलीच नव्हती. उलट दिवसभर खेळण्यासाठी मोकळं रानच. तिच्या आईनं त्या वेळी डबाभर खरवसाच्या किसून वड्या केल्या होत्या आणि 'स्मिता संपवणार नाही, तर दीपा तुझी जबाबदारी. मी येईपर्यंत या डबाभर वड्या संपवल्या पाहिजेत.' असं सांगितलं. मी 'हो' म्हटलं. पण त्या वड्या इतक्या अप्रतिम होत्या की स्मितानं खाल्ल्या नसत्या तरी मी एकटीनं संपवल्या असत्या. 

आज उषानं उघडलेल्या डब्यात त्याच, तशाच खरवसाच्या किसून केलेल्या वड्या माझी वाट पाहत होत्या. किती वर्षांनी? मी पौष्टिक लाडूकडे पाठ फिरवली आणि मन लावून खरवसाच्या वड्यांवर ताव मारला. पोट भरलं पण हावरट मन मात्र 'आणखी, आणखी' असं ओरडायला लागलं होतं. मी उषाला निर्लज्जपणे 'मला डब्यात घालून आणखी वड्या दे' असं सांगितलं. उषासाठी तर ती आनंदाची गोष्ट असते. तिनं तत्परतेनं मोठा डबा घेतला आणि त्यात वड्या भरून माझ्या हातात ठेवला.

मी हातातल्या डब्यासह तिचा निरोप घेतला. थँक्स उषा, आज माझी बालपणीची ती मैत्रीण कुठे आहे ठाऊक नाही पण थँक्स, माझ्या मैत्रिणीबरोबरच्या माझ्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल आणि खरवसाच्या इतक्या चविष्ट वड्यांबद्दल!

दीपा २२  नोव्हेंबर २०१६
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.