थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2021 - अबोल नाते

थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2021 - अबोल नाते

तारीख

मला आठवतंय, मी लहान असताना आईला आवड असल्यामुळे आमच्या घरात कुत्रा, मांजर, पोपट, कोंबड्या, म्हैस असे पाळीव प्राणी होते. आमची अल्सेशियन कुत्री पिंकी, आमच्या घरातली एक प्रमुख सदस्य होती. दिसायला देखणी आणि वागायची देखील एकदम ऐटीबाज. त्यानंतरचा टायगर हा खरं तर गावठी कुत्रा, चहासारख्या रंगाचा, तब्येतीनं धष्टपुष्ट आणि घराची राखण इमानदारीने करणारा...आमच्यावर भरभरून प्रेम करणारा...त्यानंतर ज्युली, चिली, मन्या नावाची मांजरं...यातली चिली तर दिसायला पर्शियन जातीची दिसावी अशी, इतकी सुंदर की आम्हाला ती सायरा बानो या अभिनेत्रीसारखीच वाटायची. कुत्रे प्रामाणिक, इमानदार असतात, पण मांजरं मात्र स्वत:वर प्रेम करणारे आणि दूध चोरणारे वगैरे त्या वेळीचे आमच्या मनातले समज तिने पार खोटे ठरवले होते. गॅसच्या शेगडीवर दूध ठेवलेलं असतानाही चिलीने कधीच दूधाला तोंड लावलं नाही. जोपर्यंत आई तिला तिच्या प्लेटमध्ये दूध देणार नाही, तोपर्यंत ती वाट बघत राहायची. सतत आमच्या मागे मागे असणारी चिली, आमच्याकडून लाड करून घ्यायची, पण त्याचबरोबर आमचेही लाड करायची. तिची जागा घरातल्या टीव्‍हीवरची असायची. आम्ही टीव्‍ही बघत असलो, की ती टीव्‍हीवर ध्यानस्थ मुद्रा करून बसायची. टीव्‍ही नव्हे, तर जणूकाही आम्ही तिलाच बघतो आहोत असं वाटावं. 
कॅलेंडरसारखे दिवस उलटत गेले तसं पुढल्या वेगवान प्रवासात माझं प्राणीप्रेम हे आठवणीपुरतंच मर्यादित राहिलं. आताशा पाषाण परिसरात राहत असलेल्या नयन या मैत्रिणीकडे कधी गेले की तिच्याकडचे तारा, अँटेना वगैरे मांजरं, प्रिन्स, स्नोई ही कुत्रा गटातली मंडळी भेटतात आणि मग माझं प्राणिप्रेम परत जागं होत असतं. 
तर एके दिवशी माझ्या आत्याला भेटायला पुण्यातल्या मार्केट यार्ड भागात मी पोहोचले. अनेक वर्षांनी मी आत्याला भेटत होते. तिच्या चेहऱ्यावरचा आमच्या भेटीचा आनंद टीपत होते, आणि इतक्यात 'ति'ने प्रवेश केला. मी बघतच राहिले तिच्याकडे...पांढराशुभ्र कापसाचा मऊसूत गोळा महाराणीच्या तोऱ्यात पुढे सरकत आमच्या दिशेनं येत होता. तिची पांढरीशुभ्र झुपकेदार शेपटी, तिचे मण्यांसारखे डोळे आणि तिच्या चेहऱ्यावरचा निरागस गोडुलेपणा...इतकी सुंदर मांजर मी यापूर्वी कधी बघितलीच नव्‍हती. मी तिला उचलून मांडीवर घेतलं. तीही माझ्याजवळ शांतपणे बसली, मी तिच्या कपाळावरून, गळ्यावरून हात फिरवत तिचे लाड करायला सुरुवात केली, अर्थातच तिनेही ते लाड करून घेतले. मग आत्याकडूनच तिचं नाव ‘कँडी’ आहे असं मला कळलं. पहिल्या भेटीतच मला कँडी खूप आवडली होती.
त्यानंतर महिन्याच्या कालावधीतच माझी आत्या कायमची आम्हाला सोडून गेल्याची दु:खद बातमी कळली. आतेभाऊ जितू-त्याची बायको सोनाली, मुलं- देवेन, देवश्री, असे घरातले सगळे आत्याचे अंतिम विधी करण्यासाठी गावी गेले. कँडीचं कॅट फूड, प्यायला पाणी असं सगळं काही घरात ठेवून ही मंडळी कँडीला एकटीला घरात ठेवून नाईलाजाने गावी गेली होती. घरात नेहमी असणारी माणसांची वर्दळ नाही, बघून कँडी केविलवाण्या आवाजात ओरडत होती. तिचा आवाज क्षीण होत चालला होता. शेजाऱ्यांकडून बातमी कळताच मी तिला आमच्या घरी घेऊन यायचं ठरवलं.
अपूर्व आणि मी ताबडतोब आत्याच्या घरी पोहोचलो, दार उघडलं आणि कँडीने माझ्याकडे आणि मी तिच्याकडे बघितलं. सगळ्यात आधी तिला मी जवळ घेतलं, तिला प्रेमानं थोपटलं. तिच्यासाठी असलेलं तिचं खास घर  (केज) शोधलं आणि त्यात तिला टाकून मी निघाले. तिलाही ते समजलं असावं. तिचा चेहरा खुलला होता. गाडीत बसल्यावर ती तिच्या लुकलुकत्या डोळयांनी सगळीकडे बघत होती. अपूर्वची काही दिवस का होईना पण मांजर पाळण्याची इच्छाही पूर्ण होणार होती त्यामुळे तोही आनंदात होता. येता-जाताना बाणेरच्या रस्त्यावर मी नेहमीच प्राण्यांच्या वस्तू मिळण्याचं खास दुकान बघत असायची, आता तिथे जाण्याची संधी कँडीमुळे मिळाली होती. गाडी थांबवून आम्ही कँडीसाठी कॅटफूड, तिच्यासाठी खास खेळणी, गळ्यात बांधायचा सुरेखसा लाल रंगाचा बेल्ट, केस विंचरण्यासाठी ब्रश, नखांना धार करण्यासाठी स्क्रॅच बोर्ड असं सगळं काही खरेदी करून घरी पोहोचलो.
कँडीने घरातून पळून जाऊ नये म्हणून सगळ्या खिडक्या आणि दारं व्‍यवस्थित बंद केले. तिला तिच्या घरातून (केजमधून) बाहेर काढलं. कँडीने अंदाज घेत आपल्या घरातून बाहेर उडी मारली आणि नवीन घराचा कोपरा न कोपरा वास घेत बघितला. एका कोपऱ्यात तिच्यासाठी पाणी, खाण्याची व्‍यवस्था, शीशू करण्यासाठीची व्‍यवस्था आम्ही केली आणि तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. कितीतरी वर्षांनी आमच्या घरात इतकी सुंदर पाहुणी आली होती. आम्ही तिला जवळ घेत होतो, पण तिला मात्र आमच्यापेक्षाही घराचं निरीक्षण करण्यात जास्त रस वाटत होता. मध्येच एकदा आमच्यावर तरस खात तिने कॉटवर उडी मारली आणि राजेशाही थाटात मध्यभागी सुरेखशी पोझ देत काही वेळ बसली. पण काहीच वेळ,  जसजशी रात्र सरकत राहिली, तसतशी कँडी अस्वस्थ झाली. ती संपूर्ण घरभर वेड्यासारखी फिरत राहिली. विशेषत: घरातल्या खिडकीजवळ जाऊन ती अंधाराकडे तोंड करून बघत बसली. मध्येच ती जवळ येऊन बारीक आवाजात मियाँव म्हणत राहिली. घरात आल्यापासून तिने अन्नाचा एक कणही खाल्ला नव्‍हता. फक्त घोटभर पाणी मात्र प्यायली होती. तिची ती सैरभैर अवस्था अपूर्व आणि मी बघत रात्रभर जागे राहिलो. आपण तिच्या घरातून तिला आणायला हवं होतं की नाही हेच आम्हाला कळत नव्‍हतं. साध्या स्थानिक मांजरांचा आत्तापर्यंतचा अनुभव मला होता. पण पर्शियन मांजर मी पहिल्यांदा सांभाळत असल्याने अनेक गोष्टी मला समजत नव्‍हत्या. तिची केविलवाणी अवस्था पाहून काय करावं कळत नव्‍हतं. आमच्या दोघांचा डोळा लागला आणि ही खिडकी उघडून पळून गेली तर काय, अशी भीतीही मनाला सारखी वाटत होती.
कँडीकडे बघत आम्ही जागेच राहिले आणि या सगळ्यात पहाटेचे पाच वाजले. कँडीची अस्वस्थता दूर कशी करावी या विचारातूनच अपूर्वने मांजरांना सांभाळत असलेल्या (फॉस्टर केअर किंवा कॅट्स हॉस्टेल) श्वेता या मांजरप्रेमी तरुणीचा फोन नंबर गूगलवरून मिळवला. तिच्याशी बोलणं होताच, तिने आम्हाला ताबडतोब कँडीला घेऊन या असं सांगितलं. आम्ही पहाटे सहा वाजता कँडीला घेऊन श्वेताकडे पोहोचलो. श्वेताने आमचं आणि कँडीचं स्वागत केलं. श्वेताशी बोलताना आम्हाला कळलं, की चार दिवस घरात एकटीला कोंडल्यामुळे कँडी ट्रॉमामध्ये गेली होती आणि तिला बसलेल्या शॉकमुळे ती अशी वागत होती. आता पुढचे काही दिवस कँडीला श्वेताकडे ठेवायचं आम्ही ठरवलं. कँडीला पुनश्च माणसाळवायची जबाबदारी श्वेताने घेतली होती. श्वेताकडे पर्शियन आणि इतर जातीची प्रिन्स, रुमी, अशी अनेक मांजरं होती. ती सगळी श्वेताकडे खुश दिसत होती. कँडीला बघताच त्यांनी समोर येऊन तिला न्याहाळलं होतं, पण कँडी मात्र बारीक आवाजात त्यांच्यावर फिस्कारली. आता आमच्यापेक्षा श्वेताकडे कँडी सुरक्षित असणार होती आणि तीही तिची उत्तम काळजी घेणार होती. श्वेताशी बोलून आम्हाला खूप बरं वाटलं.
कँडीला सोडून अपूर्व आणि मी घरी पोहोचलो. एका रात्रीने आम्हाला खूप काही शिकवलं होतं. एक मुका जीव सांभाळणं किती कठीण गोष्ट आहे, हे आम्हाला समजलं होतं. पण त्याचबरोबर कँडीचा एका रात्रीचा सहवास आम्ही विसरूही शकत नव्‍हतो. तिचं कॉटवरचं मधोमध बसणं, मध्येच एक डुलकी काढणं, तिचं घरभर फिरणं, तिचं मध्यरात्री खिडकीतून बाहेर बघणं, तिची निरागस नजर, तिचा मऊमुलायम स्पर्श सगळं काही आठवत होतं.
एका रात्रीतून कँडीने आम्हाला लळा लावला होता. त्यामुळेच श्वेताकडे सोडून आल्यानंतरही आम्ही तिला सातत्यानं फोन करत कँडीची विचारपूस करत होतो. श्वेताकडे कँडी खरोखरंच रुळली होती. त्या चार दिवसांतला शॉक हळूहळू ती विसरली होती. श्वेतावर ती प्रेम करायला लागली होती. श्वेता कम्प्युटरवर काम करताना कँडी तिच्या मांडीवर बसून मस्तपैकी लाड करून घेत होती. खिडकीत बसून बाहेरचे पक्षी टीपत होती. बाल्कनीत डोलणारी फुलझाडं बघून स्वत:चा वेळ मजेत घालत होती. श्वेताच्या घरात कँडीनं आपलं महाराणीपद प्राप्त केलं होतं. इतर मार्जारांनी तिचं अनिभिषिक्त सम्राज्ञीपद स्वीकारलं होतं, मान्य केलं होतं. कँडीचं सौंदर्यच असं काही होतं की तिला बघताच समोरच्यांनी शरणागतीच पत्करावी.
बघता बघता कँडीचा श्वेताकडचा मुक्काम संपला. गावाकडून जितू-सोनाली, देवेन-देवश्री परतले. आम्हाला कँडीला आता त्यांच्या मूळ मालकाकडे परत सोपवायचं होतं. त्यामुळे अपूर्व आणि मी श्वेताकडे जाऊन कँडीला घेऊन आलो. श्वेताला 'थँक्स' म्हटलं, मनातून एकदा नाही तर शंभर वेळा कृतज्ञता व्‍यक्‍त केली. कारण आता कँडी सैरभैर नव्‍हती. ती खूपच खुश होती. कँडीने मला आणि अपूर्वला ओळखलं होतं - आता ती आमचीच असल्यासारखी आमच्याजवळ आली. आमच्याकडून भरपूर लाड करून घेतले. स्वत:ला आमच्यावर पूर्णपणे सोपवलं. जणूकाही आमच्यावर तिने आता पूर्ण विश्वास ठेवला होता. 
किती कमी वेळात कँडी आणि माझ्यात एक नातं निर्माण झालं होतं. कँडीचं वागणं, कँडीचं चालणं, तिचं खाणं, तिचं पिणं, तिचं खुश असणं, तिचं दु:खी असणं या सगळ्यांचा परिणाम माझ्यावर झाला होता. माणसाचं माणसाशी असलेलं नातं, संवादातून, सहवासातून, अनुभवातून दृढ होत जातं, मात्र कँडीसारख्या एका मांजरीबरोबरचं माझं नातं अबोल भाषेतून, अबोल नजरेतून फुलत गेलं आणि कायमचं घट्ट झालं!
कँडी, आय लव्‍ह यू!

दीपा देशमुख, पुणे
लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या 
adipaa@gmail.com
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.