विनासायास वेटलॉस
मध्यंतरी व्हॉट्सअपवर आलेला एक विनोद वाचला. हे जग म्हणे दोनच गटात विभागलं गेलं आहे. एक गट म्हणजे जो जगन्नाथ दीक्षित यांना फॉलो करणारा आहे आणि दुसरा गट त्यांना फॉलो न करणारा! यातला विनोदाचा भाग सोडला, तर डॉ. जगन्नाथ दीक्षित ही व्यक्ती सध्या इतकी लोकप्रिय आहे की त्यांना भेटण्यासाठी आणि ऐकण्यासाठी अमिताभपेक्षाही जास्त गर्दी होऊ शकते आणि पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंदिरात ती गर्दी झालीही होती. सध्या त्यांचं 'विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध' हे पुस्तक खूपच गाजतं आहे. मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर खुशीत सांगतात, 'हो, हे पुस्तक धो धो चाललं आहे.' मुळात विषयच इतका संवेदनशील की सुरुवातीला घाबरतच लठ्ठमुठ्ठ वाचकांनी या पुस्तकाला हात लावला.
मात्र पुस्तक वाचताच आणि जगन्नाथ दीक्षित यांचं व्याख्यान ऐकताच त्यांच्या लक्षात आलं की अरेच्च्या आपल्याला फारसं काहीच अवघड काम करायचं नाहीये. न की भरमसाठ खर्च करायचाय. फक्त दोन वेळ व्यवस्थित जेवायचंय. तेही आवडेल ते. त्यातही फारसे कुठलेही किचकट नियम नाहीत. या दोन जेवणाच्या मध्ये फारच हुक्की आली, तर टोमॅटो खा, शहाळ्याचं पाणी प्या किंवा ताक प्या. बस्स! मग लोक म्हणायला लागले, 'पूर्वी नाही का आपण दोनच वेळा जेवायचो. पण नंतर अनेक डॉक्टरांनी मनात भीती पेरली, की दोन दोन तासांनी खा वगैरे.' तसंच अनेक आहारतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञींनींनीही त्यात भरच टाकली. अमूक एक भाजी खाल्ली की हे जीवनसत्व मिळेल, तमूक एक फळ खाल्लं की तमूक जीवनसत्वाचा अभाव दूर होईल. कुणी म्हणत होतं, ती भाज्या आणि फळांची स्मूदी (स्मॅश केलेली पावभाजीच जणू!) खा किंवा प्या. हे सगळं स्वतःसाठीच स्वतःच करणं तेही जड देहाला जागचं हलवत करणं फारच कठीण होतं. तरीही अनेकांनी तेही केलं. अनेकांनी आहाराचे तक्ते तयार केलं. अमूक तमूक ग्रॅम प्रमाणे तितकेच पदार्थ ते खाऊ लागले, पण हाय रे कर्मा, त्यांचं वजन मात्र जैसे थे असंच होतं.
डॉ. जगन्नाथ दीक्षितांनी मात्र समस्त लठ्ठमुठ्ठ जमातीतल्या लोकांना फार मोठा दिलासा दिला. लोक त्यांचं म्हणणं ऐकून लागले की हो कामाला. चालायला लागले (म्हणजे चार-सहा किमी मॉनिर्ंग वॉक हो!), दोन वेळा व्यवस्थित जेवायला लागले आणि आफिसात जाताना बाटलीभरून ताकही न विसरता न्यायला लागले. तहान लागली की रस्त्यात थांबून शहाळ्याचं पाणीही प्यायला लागले. अधूनमधून चबर चबर खाणं बंद झालं आणि मग चमत्कार घडावा तसा महिन्या-दोन महिन्यानं वजन करून बघितलं तर चक्क तीन किलो कमी झालंय, पाच किलो कमी झालंय असं वजनकाटाही सांगायला लागला. मग ही मंडळी भारीच खुश झाली.
तर ‘विनासायास वेटलॉस’ या बहुचर्चित आणि लोकप्रिय असलेल्या पुस्तकात काय लिव्हेल आहे हेही बघूया की. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यावर डॉ. श्रीकांत जिचकार या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा प्रभाव आहे. त्यांच्या स्मृतिला अभिवादन करत दिक्षितांनी आरोग्य अभियानाच्या पुनरुज्जीवनासाठी आणि प्रसारासाठी हे पुस्तक लिहिलं आहे, असं म्हटलंय. तसंच ते अनेक ठिकाणी आपल्या व्याख्यानांमधूनही लोकांमध्ये अवेअरनेस आणत आहेत. रक्तातली इन्सुलिनची वाढलेली पातळी हीच लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांना आमंत्रण देते असं जिचकार म्हणत. वारंवार खाण्याच्या सवयीमुळे इन्सुलिन सतत तयार होत राहतं आणि ते घातक असल्यानं दोनच वेळ खायला हवं असं दीक्षित सांगतात. खरं तर आधी तुमची मानसिक तयारी ते करतात. भूक ही अनेकदा मानसिक असते, ती खोटी भूक तुम्हाला तुमच्या लागलेल्या सवयीमुळे सतत खायला भाग पाडते. त्यामुळे एकदा का तुम्हाला दोन वेळ खाण्याची सवय लागली की खोटी भूकही भीती दाखवणं बंद करते. मग तुम्ही आपोआपच फिरायला जाता. आणि मग जगन्नाथ दीक्षितांचं पुस्तक वाचताच त्यात दिलेला आहार, त्यातला व्यायाम हेही करायला लागता.
थोडक्यात, सुरुवातीलाच घाबरवलं तर कोणीही तयार होणार नाही, हे ओळखून डॉ. जगन्नाथ दीक्षितांनी ‘हे सगळं खूप सोपं आहे’ असा आधार समस्त मंडळींना दिला. विनासायास वेटलॉस हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाचं असून या पुस्तकाचं अतिशय बोलकं असं मुखपृष्ठ असून पुस्तकाची रंगसंगती लक्ष वेधून घेणारी आहे. मुखपृष्ठ आणि आतील रचना राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले यांची आहे. अतिशय सोप्या भाषेत हे पुस्तक असून अगदी आपल्या पर्समध्ये बसेल इतके आटोपशीर आहे. मराठी असूनही मराठी वाचता न येणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक विंग्रजी मधून देखील आहे. जरूर वाचा आणि कुठल्या गटात जायचं ते ठरवा!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment