वुई द चेंज - आम्ही भारताचे लोक -संजय आवटे

वुई द चेंज - आम्ही भारताचे लोक -संजय आवटे

संजय आवटे ‘ज्यांना मी पाहायचो आणि मग भेटण्याचा मोह व्हायचा, अशा संजय आवटे सरांना कणकवलीच्या श्रमसंस्कार शिबिरात भेटलो. सरांसोबत खूप गप्पा झाल्या. माझी कविता सरांना ऐकवायची होती. तशी इच्छा मी व्यक्त केली. त्यांनी ती मान्य देखील केली. कविता ऐकून झाल्यावर सरांनी मीठीच मारली. आयुष्यात आत्तापर्यंत माझ्या कवितेला मिळालेला हा सर्वात मोठा सन्मान मी मानतो. घरी आल्यावर डोळ्यांत आनंदाचे अश्रू घेऊन आयेला सांगितलं, तर ती म्हणाली, ‘ते तुला नोकरीला लावणार हायेत का?’ आयचा प्रश्न मनात पुन्हा माझ्या गरीबीची जाणीव करून देत होता. मग मी माझाच अश्रू हातावर घेऊन पाहिले. त्यात आनंद होता की दुःख, मला अजूनही समजलं नाही. माझ्यासारखी अशी किती तरूण मुलं असतील, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, स्वतःचं भविष्य घडवायचंय. उद्याचा भारतही आम्हाला घडवायचाय. पण, म्हणजे काय करायचंय, तेच समजत नाही. आमचा विकास करू म्हणणारे सगळेच आम्हाला आमचे वाटतात. सगळेच नेते एकतर खरे वाटतात, नाहीतर सगळे एकजात खोटे वाटतात. काही वेळ सगळ्यांवरचाच विश्वास उडून जातो. आपले अश्रूच खरे वाटत नाहीत, तर विश्वास कोणाच्या अश्रूंवर ठेवावा?’ हे मनोगत आहे तुषार मांडवकर नावाच्या तरुणाचं....हे मनोगत संजय आवटे यांच्या सध्या चर्चेत असलेल्या पुस्तकात - ‘वुई द चेंज - आम्ही भारताचे लोक’ यात आहे. या पुस्तकात शरद पवार, कुमार केतकर, कुमार सप्तर्षी, गणेश देवी अशा अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया आहेत. मात्र तुषारचं मनोगत अस्वस्थ करणारं आहे ....!

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत गीताली मुकुंदा यांचं घर तरुण आणि प्रौढ या दोन्ही वयोगटातल्या लोकांनी फुलून गेलं होतं. सगळेच जण संजय आवटे यांची प्रतीक्षा करत होते. आजच्या पुरुष ऊवाच अभ्यास वर्गाचा विषय होता - वुई द चेंज हे पुस्तक! संजय आवटेंचं आगमन झालं आणि लगेचच मुकुंदाने अभ्यासवर्गामागचा हेतू सांगितला, संजयचा थोडक्यात परिचय करून दिला आणि संजयनं उपस्थितांशी संवाद साधला. साडेसहा ते साडेआठ असा तब्बल दोन तास चाललेला हा कार्यक्रम चांगलाच रंगला. तुषार नावाच्या तरुणाचं मनोगत वाचून संजयच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आणि त्याच वेळी तुषारसारखे अनेक तरुण-तरुणी त्याला व्हॉट्सअपवर प्रश्न करत राहिले. झपाटल्यासारखा संजय त्या सगळ्यांना न कंटाळता उत्तरं देत राहिला. एके दिवशी हे सगळं लिखाण बघितलं तेव्हा ते काही निवडक तरुणांपुरतंच मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही तळमळ संजयला लागली. त्यातूनच हे पुस्तक साकारलं. या पुस्तकात राजकारणापासून दूर पळणार्‍या माणसाला राजकारण हे समजून घेतलं पाहिजे हे उमगतं. तसंच या पुस्तकाची भाषा इतकी सहजसोपी आणि संवादी आहे की संजयनं आरव आणि चार्वी या दोघांशी पत्रातून केलेला संवाद पुस्तकरूपानं वाचकांसमोर आणला आहे. सहा भागात असलेल्या या पुस्तकात भारताचा इतिहास, थोरपुरुषांची भूमिका, देश म्हणजे काय, आपली भूमिका काय असणार आहे या सगळ्याच प्रश्नाला हात घातला आहे. मात्र हे प्रश्न सहजपणे तरुणाईची भाषा बोलत पुढे गेले आहेत. यात टेक्नॉलॉजी येते, यात चित्रपट येतात, यात गाणी येतात आणि यात आजची परिस्थितीही येते. वुई द चेंज हे पुस्तक केवळ तरुणांनीच नव्हे तर प्रत्येकानं वाचायला हवं. हे पुस्तक वाचल्यानं मनावरची जळमटं दूर होऊ शकतील, मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतील, प्रवासाची दिशा कळेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करत जगणं अर्थपूर्ण कसं बनवता येईल यासारख्या अनेक गोष्टी या पुस्तक वाचनातून उलगडत जातील. आजच्या कार्यक्रमानंतर तरूणांनी आणि प्रौढांनी सगळ्यांनी संजय आवटेंना अनेक प्रश्न विचारले. खरं तर या संवादानंतर सगळ्यांना खूप पॉझिटिव्ह चार्ज झाल्यासारखं वाटत होतं. आपल्यालाच उत्तरं शोधायची असली तरी नैराश्य झटकून कामाला लागलं पाहिजे हे प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होतं, त्यासाठीचे वेगवेगळे मार्ग मनात गर्दी करत होते. या वेळी संजय आवटेंचा वाहन चालक संतोष याचंही विशेष कौतुक करावं वाटलं. हा तरुण खूप वाचतो आणि या वाचनातून आणि संजय आवटे यांचं बोलणं ऐकून या पठ्ठयानं पत्रकारितेच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतली आणि तो परीक्षेत चक्क पहिला आला. संतोषबरोबरचा संवाद, वेगवेगळ्या ठिकाणच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाट्याला आलेले अनुभव, लोकांच्या मनातले प्रश्न असं सगळं संजय आवटे यांनी मनमोकळेपणानं सगळ्यांबरोबर शेअर केलं. पुस्तक वाचून झालं की पुस्तकाबद्दल सविस्तर लिहीनच, पण हे पुस्तक खूपच देखणं झालं आहे. याचं मुखपृष्ठ नांदेडच्या नयन बारहाते यांनी केलं असून ते लक्षवेधक झालं आहे. या पुस्तकाची आतली मांडणी (रचना) खूपच सुरेख आहे. एखादी डायरी अथवा वहीचं पान उघडावं आणि वाचतच जावं असा फिल पुस्तक उघडताच येतो.

या अभ्यासवर्गाला विद्या बाळ, सुनिती सू.र. प्रशांत कोठडिया, उज्ज्वला मेहेंदळे, साधना दधिच, अभिजीत थोरात, सीमा चव्हाण, मानसी घाणेकर, पूनम आणि मोठया संख्येनं तरूण उपस्थित होते. आजचा कार्यक्रम खूपच अनौपचारिक आणि खूपच मस्त झाला.

दीपा देशमुख, पुणे.

 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.