डायनासोरचे वंशज

डायनासोरचे वंशज

मॅडम, मी आपल्याकडे दुपारी दीड वाजता येतोय...असा मोबाईलवर मेसेज आला आणि बरोबर दीड वाजता डावकिनाचा रिच्या आमच्या घरात दाखल झाला. हातात दोन पुस्तकं आणि एक सुरेख डायरी, चेहऱ्यावर प्रसन्न हासू...मी त्याचं स्वागत केलं....गप्पा झाल्या आणि त्यानं आणलेलं एक पुस्तक माझ्या हातात दिलं. त्याला ते पुस्तक खूप आवडलं होतं आणि मी ते वाचावं असं वाटल्यामुळे तो ते घेऊन आला होता.

फेसबुकवर डावकिनाचा रिच्या सगळ्यांना माहीत आहेच. रिचर्ड डॉकिन्सचा चेला, अनुयायी, चाहता, फॉलोअर, शिष्य वगैरे वगैरे....आता त्याचं खरं नाव मला कळलं असलं तरी माझ्यासाठी तो कायमच डावकिनाचा  रिच्याच असणार आहे. अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीतला हाडाचा कार्यकर्ता, विज्ञानवादी, विज्ञानावर लिहिणारा आणि तेही आपल्याला समजेल अशा भाषेत...ज्याप्रमाणे आमची ‘प्री’ ही राजकुमारी आईन्स्टाईनच्या प्रेमात पडून त्याला ‘अल्बू’ म्हणते तसंच सगळी वैज्ञानिक मंडळी या डावकिनाचा रिच्यासाठी त्याचे ‘भिडू’ असतात...अनेक अंधारातले, उपेक्षा वाट्याला आलेले वैज्ञानिक हा शोधून काढतो आणि त्यांच्याबद्दल लिहितो. मला त्याच्या पोस्ट नेहमीच आवडतात. त्यात विज्ञान असतंच, पण त्या वैज्ञानिकाचा संघर्ष असतो, त्याचा दृष्टिकोन असतो आणि विज्ञानाचं आयुष्यातलं महत्वही असतं.
तसं पाहिलं तर रिच्याची आणि माझी ओळख फेसबुकवरचीच. पण अल्पावधीत तो माझा चांगला मित्र, स्नेही,....नात्याला काहीही नाव द्या, पण जवळचा झाला. 30 किमी अंतर पार करून हा तरुण भेटायला भर उन्हात भेटायला येतो काय आणि जणू काही घरापासून पाच मिनिटांच्या बागेत आल्यासारखा चेहऱ्यावरचा अर्विभाव काय, वर ‘त्यात काय एवढं’ असं खांदे उडवत म्हणतो काय... खरोखरंच मी भारावून गेले. डावकिनाचा रिच्या, तू एक कार्यकर्ता म्हणून, एक वाचक म्हणून आणि एक माणूस म्हणून खरोखरंच भावलास...

तर सांगत काय होते, त्यानं मला ‘डायनासोरचे वंशज’ हे पुस्तक दिलं आणि तो गेला....पुस्तकावर लेखकाचं नाव होतं दिनानाथ मनोहर....मला आठवलं, काही वर्षांपूर्वी मुंबईत असताना मी आणि माझा मित्र मनोज आचार्य आम्ही ‘कबीरा खडा बाजार मे’ या दिनानाथ मनोहर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला गेलो होतो. त्या वेळी हाडाचा कार्यकर्ता असलेला हा साहित्यिक - दिनानाथ मनोहर यांची छबी लक्षात राहिली होती...

आज दिवसभराची कामं आटोपून ‘डायनासोरचे वंशज’ हे पुस्तक हातात घेतलं....
मी या पुस्तकानं झपाटून गेले, 2011 साली प्रकाशित झालेलं पुस्तक आपण अजूनपर्यंत वाचलं नव्‍हतं याचं खूप खूप वाईट वाटलं. मानसशास्त्राच्या अंगानं प्रवास करणाऱ्या या सगळ्या कथा एका अदभुत विश्वात मला घेऊन गेल्या. या पुस्तकात एकूण 10 कथा आहेत, पण एका दमात या कथा वाचता येत नाहीत. प्रत्येक कथा मेंदूला झिणझिण्या आणते. विचारात पाडते आणि पुढे जाऊ देत नाही. आजच्या या वेगवान पळापळीच्या जगातही थांबवून ठेवण्याची ताकद या कथांमध्ये आहे. मी अजून सगळ्या कथा वाचलेल्या नाहीत. पण व्‍यक्‍त झाल्याशिवाय राहवलं नाही म्हणून हा शब्दप्रपंच....

पहिली कथा ‘स्क्रीन कॉन्टॅक्ट’...यात सगळी टेक्नॉलॉजी...तेच शब्द...कम्प्युटर, वर्ड प्रेस, माऊस, फाईल्स, ई-मेल, डाऊनलोड वगैरे वगैरे...ही कथा स्क्रिनसेव्‍हरमध्ये गुरफटलेली...एका अगम्य जगात थेट क्रेट बेटावरच्या मिनोअन संस्कृतीमध्ये घेऊन जाणारी कथा...ही संस्कृती समुद्रात नष्ट झालेली...या स्क्रिन सेव्‍हरमधून ते जग आणि आजचं जग यातलं माध्यम बनलेला कथेतला नायक....सगळं काही सांगत नाही, पण ही कथा बांधून ठेवते. रहस्यकथा, गूढकथा, विज्ञानकथा अशा सगळ्या प्रकारांना ती आपलंसं करून वाचकाच्या मनावर अधिराज्य करते...कथा संपली तरी मी त्याच जगात होते...त्या कथेतून मी बाहेर निघू शकत नव्‍हते...कारण रोजचं लिखाण याच कम्प्युटरवर मी करणारी....त्यातल्या सगळ्या तंत्राशी परिचित असलेली...तरी दिनानाथ मनोहर जेव्‍हा त्यातून एका वेगळ्या जगात पोहोचवतात, तेव्‍हा ...त्यांच्या या अप्रतिम अशा कथानिर्मितीसाठी माझ्याजवळ शब्द नाहीत.

मध्ये काही वेळ सोडून, पुन्हा पुस्तक हातात घेतलं आणि ‘संस्कार’ ही कथा वाचायला सुरुवात केली. एका संशोधिकेचं संशोधन, त्यातले गिनिपिग्ज आणि 13 गिनिपिग्जनंतर गोंधळलेली तिची अवस्था, 13 नंतर नेमकं काय बिनसलंय याचा ती शोध घेत राहते आणि त्यानंतर तिला जे सत्य कळतं त्यानं आपणही अस्वस्थ होतो....संस्कार म्हणण्यापेक्षाही आपल्या मानसिकतेवर प्रचंड प्रमाणात पडलेला पगडा आपण कितीही वर्षं झाली तरी कसा झुगारून देऊ शकत नाही, तो आपल्या सबकॉन्शस माइंडमध्ये कसा तळ ठोकून बसलेला असतो हे सांगणारी कथा....या कथेनंही मी कितीतरी वेळ अंतर्मुख झाले....पुन्हा दिनानाथ मनोहर यांनी टीपलेले एक एक बारकावे बघून हा माणूस मला कधी मानसशास्त्रज्ञ, कधी संशोधक तर कधी तंत्रज्ञ आहे असंच वाटायला लागलं. त्यांचं चालू काळाबरोबरचं अपडेट राहणं आणि ते आपल्या लिखाणात उतरवणं मला खूप आनंद देऊन गेलंच, पण त्यांच्याविषयीचा आदरही वाढवून गेलं.

तिसरी मी वाचलेली कथा म्हणजे ‘अखेर’. या कथेत कॅटल ब्रिडिंग फॉर्ममध्ये संशोधक म्हणून काम करणारी नायिका....तिचं कामातलं झपाटलेपण अनुभवत असतानाच, तंत्रज्ञानानं केलेल्या प्रगतीनं आपण काय काय प्रगती/अधोगती करतो आहोत याचाही प्रवास आपल्याला घडतो. पण त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्य, त्यातला संघर्ष, प्रयोग सिध्द करण्याचं मानगुटीवर बसलेलं भूत, त्याचबरोबर आतल्या मनाला दाबून दडपून ठेवलेलं...ते मनही कधीतरी जागृत होऊन बंड करतं....आणि मग एक अनाकलनीय प्रदेशातला प्रवास सुरू होतो...या प्रवासात जग वेगळ्या टाईमलाईनमध्ये प्रवास करतं. एकीकडे हे सगळं अदभुत तर वाटतंच, पण खरंही वाटतं आणि त्याचबरोबर मानसशास्त्रीय अंगावर प्रकाशझोतही टाकतं. ही कथा वाचणं म्हणजे एक थरार देणारा अनुभव आहे. 

या सगळ्या कथांमधून दिनानाथ मनोहर यांची कल्पनाशक्ती, त्यांच्यातलं माणूसपण किंवा कार्यकर्तेपण आणि अफाट बुद्घिमत्ता, त्यांनी केलेलं वाचन सगळं काही डोकावतं. मानवी संबंध, माणुसकी, मानसिकता, जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा वापर इतकं काही या कथांमधून येतं की कथेबरोबर प्रवास करताना दिनानाथ मनोहर यांच्याबरोबरही एक समांतर प्रवास वाचकाचा सुरू राहतो. या पुस्तकाचं अतिशय समर्पक आणि बोलकं मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचं आहे. 

थँक्यू दिनानाथ मनोहर, थँक्यू डावकिनाचा रिच्या आणि थँक्यू समकालीन प्रकाशन. जरूर वाचा ‘डायनासोरचे वंशज’!

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.