कॅम्प फायर

कॅम्प फायर

कॅम्प फायर - धुंद करणारा स्वच्छंद अनुभव!
काही दिवसांपूर्वी बुक गंगा इंटरनॅशनलचा नव्या रुपातला उद्घाटनाचा कार्यक्रम मंदार जोगळेकर यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वेळी कडकडीत उन्हाळा असूनही ऐन वेळी विना निमंत्रण येऊन पावसानं सगळ्यांचीच फिरकी घेतली होती. पण पावसाला न जुमानता महाराष्ट्रभरातून अनेक लोक या कार्यक्रमासाठी आले आणि हा कार्यक्रमही तितकाच देखणा झाला.
या कार्यक्रमाच्या वेळी वसंत वसंत लिमये यांची भेट झाली आणि गप्पाही झाल्या. नावापासूनच त्या व्यक्तिविषयी एक वेगळं कुतूहल निर्माण झालं होतं, त्या नावाचा इतिहास जाणून घ्यावा या हेतून मी त्यांना विचारलं, 'वसंत वसंत लिमये हे नाव कसं अस्तित्वात आलं?’ असं नाव सहसा कुठे बघायला मिळत नाही. फार तर आजोबांचं नाव नातवाला ठेवलं जातं किंवा तिकडे परदेशी चार्ल्स दुसरा, जोसेफ पहिला किंवा हेन्री चौथा असं इतिहासात वाचलेलं. बस्स. नावांबाबत आमच्या जनरल नालेजनं इथंच पूर्णविराम आणि आराम घेतलेला. जराही आढेवेढे न घेता हसतच वसंत वसंत लिमये यांनी त्यांच्या बारशाची स्टोरी सांगितली.  लहानपणी जेव्हा या बाळाचा (ज्यूनियर वसंत) जन्म झाला, तेव्हा बारश्याच्या दिवशीपर्यंत नावाचं काही ठरलेलंच नव्हतं. ऐन वेळी आता काय नाव ठेवायचं असा प्रश्‍न पडला. खरं तर आत्यानं नाव ठेवण्याचा प्रघात असतानाही आईनंच आपल्या बाळाचं नाव ठेवावं असा आग्रह झाला आणि कुठलीच तयारी न केल्यानं बाळाच्या आईनं बाळाच्या वडिलांना विचारलं, तेव्हा सिनियर वसंत लिमये यांनी ‘तुला आवडेल ते नाव ठेव.’ असं म्हटलं आणि काही न सुचल्यामुळे (आणि नवर्‍यावरच्या निस्सिम प्रेमामुळे) या बाळाच्या आईच्या तोंडून नवर्‍याचंच नाव बाहेर पडलं आणि तेच नाव पुढे कायम झालं.
तर या वसंत वसंत लिमये यांचं ग्रंथाली प्रकाशनानं प्रकाशित केलेलं ‘कॅम्प फायर’ हे पुस्तक सध्या पुस्तकांच्या दुकानांमधून दिमाखात झळकत आहे. ‘लॉक ग्रिफिन’ या कादंबरीनंतर याही पुस्तकाला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. खरं सांगायचं तर हे पुस्तक बघताक्षणीच कुठलाही माणूस पुस्तकाच्या प्रेमात पडेल असं नीलेश जाधव यांनी केलेलं मुखपृष्ठ! शिखरावर उभा असलेला तो कोणी, आता सूर्याच्या सोनसावळी प्रकाशाच्या साक्षीनं तुमच्या-आमच्याबरोबर हितगुज करू इच्छितोय! मी शिखर सर केलंय, तुम्हीही करू शकता असं काहीसं सांगतोय.
जेवणातले पदार्थ उत्कृष्ट असले तरी, ते तितक्याच सुरेख रीतीनं छानशा डीनरसेटमधून सजवून समोर आलं, तर तो आनंद केवळ अवर्णनीयच! त्याचप्रमाणे पुस्तकाचा कंटेंट उत्कृष्ट असला, तरी मुखपृष्ठ आणि आतली रचना तितकीच उत्तम असेल तर मग आणखीनच बहार! तसंच ‘कॅम्प फायर’ या पुस्तकाचं झालं आहे.
गिर्यारोहणाची आवड कशी लागली इथंपासून ते या वेड लागलेल्या प्रवासाचं वर्णन या ‘कॅम्प फायर’मध्ये येतं. केवळ एका उत्सुकतेपोटी गिर्यारोहणाचा अनुभव घ्यायला गेलेला लेखक त्या अनुभवानं, त्या काटेरी क्षणानं ओरबाडून निघतो. ठणकत्या शरीराला आणि मनाला समजावत आता पुन्हा या वाटेकडे स्वप्नातही बघायचं नाही असंही ठरवतो आणि तोच तरूण त्या वाटेनं, त्या कड्यांनी, त्या दर्‍याखोर्‍यांनी, त्या रानवट मााणसांनी साद घालावी आणि तसा पुढच्या आयुष्यात त्या वाटेवरनं खेचल्यागत चालत राहतो.
वरवर बेफिकीर वाटणारा लेखक आतून किती संवेदनशील आणि कवीमनाचा आहे हे पानोपानी वाचकाला अनुभवायला मिळतं.....जलाशयाचं पहुडणं, निखार्‍यांचं जागं होणं आणि ठिणग्याचं कारंजं......... स्वप्नवत भासावं असं लाखो काजव्यांनी लखडलेलं झाड....तार्‍यांनी चमचमणार्‍या आकाशाची दुलई..... तसंच मिट्ट काळोख आणि पावसाचं कोसळणारं संगीत..बाहेर कोसळणारे मेघमल्हाराचे सूर... वा, क्या बात है!
हिमालयाच्या दर्शनानं लेखक स्तिमित होतो. तो म्हणतो, ‘समोरच्या उतारावरून लगबगीनं उतरणारा सूचिपर्णीवृक्षांचा गर्द पडदा आणि त्यामागून चंदेरी प्रकाशाचं झिरझिरीत वा सावरत, हिमालयाच्या दर्शनानं जणू काही लाजून नुकतीच अवतरलेी चंद्रिका.....हलकेच पसरत जाणारे चंद्रकिरण, खाली खोलवर पसरलेल्या दरीतले चुकार पांढरे ढग, मंदपणे चकाकणारे पांढरेशुभ्र हिमउतार आणि दिमाखदार आकाशाला भिडणारी हिमाच्छादित शिखरं. मध्येच सुटणारा थंडगार बोचरा वारा. त्या स्वच्छ, शीतल वार्‍याला सहज स्पर्श करणारे बिटल्सच्या प्रेमगीताचे आर्त स्वर.....लेखकाच्याच शब्दात सारा आसमंतच मंत्रमुग्ध करणारा......या हिमालयानं लेखकाला वेडच लावलं. एका गिर्यारोहकाचं आणि हिमालयाचं नातं शब्दांपलीकडलं लेखक मानतो. ‘प्रेयसीच्या उन्मादक सहवासाची आसही फिकी पडेल अशी आसक्ती हिमालयात आहे’ असं त्याला वाटतं. हा हिमालय लेखकाला निवडलेल्या वाटेवर चालण्याच्या शुभेच्छाच देतोय असं वाचताना वाटत राहतं.
या प्रवासात एव्हरेस्ट सर करण्याच्या सगळ्यात पहिल्या यशस्वी मोहिमेचा नेता हेन्री सेसिल जॉन हंट या ब्रिटिश गिर्यारोहकाची आणि लेखकाची भेट झाली. त्या भेटीचं मनावर दडपण घेतलेला लेखक, त्या वेळी त्याला त्या वातावरणात ‘इंग्रजी गुलाबांच्या गर्दीमध्ये एखाद्या झेंडूच्या फुलानं असावं असं मला वाटलं’ या शब्दातून आपलं दडपण व्यक्त केलंय. पण नंतर हे दडपण सर हंट यांच्या विनम्र आणि लाघवी स्वभावानं कसं गळून पडलं तेही लेखक सांगतो.
कॅम्प फायरमध्ये गांधीलमाशांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग ....चहासारख्या अमानुष, खुनशी पाण्याचं जिवघेणं रूप ..., यशोदेच्या डोळ्यातली बहिणीची माया .... साधूबाबानं जेवणासाठी केलेली मदत.....वाट चुकणं......प्रत्येक सफर अनुभवसंपन्न करणारी...या सफरीतल्या माणूसपणाच्या दर्शनानं लेखकाबरोबर वाचकही समृद्ध होत जातो.
गिर्यारोहण करणं म्हणजे नेमकं काय, त्याबद्दलची तांत्रिक माहिती, लागणारं साहित्य, याबद्दल अतिशय सखोल माहिती हसतखेळत हलक्याफुलक्या शैलीत लेखक देतो. गिर्यारोहण करताना माणूस कसा घडतो, निसर्गाचं सान्निध्य त्याला काय काय शिकवतं याचं मनोहारी दर्शन या पुस्तकातून होतं.
लेखक म्हणतो, ‘इतिहासाचं स्तोम माजवू नये हे खरं असलं तरी याच इतिहासात, निसर्गात आपलं स्वत्व लपलेलं आहे याचं भानच काय, तर त्यासंबंधीची आपली आठवणही पुसट व्हायला लागली आहे. दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास नसलेली अमेरिका कदाचित कमनशिबी असेल, पण शतकानुशतकांचा देदीप्यमान इतिहास लाभलेले आपण जर त्या इतिहासाच्या खुणाही नामशेष झालेल्या स्वस्थपणे पाहणार असलो, तर आपल्यासारखे कपाळकरंटे आपणच!’ लेखकाचं खंतावलेलं मन म्हणतं, ‘या जटायूच्या जखमा मलमपट्टीपलीकडल्या आहेत....’ कालिदास, बालकवी आणि अगदी महानोरांनी टिपलेला निसर्ग खरोखरंच अस्तित्वात आहे का आणि आपण तो ठेवलाय का, असाही प्रश्‍न लेखक वाचकापुढे उपस्थित करतो. पण त्याच वेळी तो शोधण्याचं आव्हानही करतो.
औद्योगिकीकरणामुळे, सुबत्तेमुळे निसर्गाची माणसानं जी विल्हेवाट लावण्याचा धडाका लावलाय. भौतिक सुखसोयींसाठीच्या हव्यासी मनानं निसर्गाचे लचके तोडले आहेत. शहरी प्रदूषणात घुसमटणारे आम्ही जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जातो, तेव्हा निसर्ग आमच्या बापाचाच असं समजून जो कचरा करतो त्याबद्दलही लेखक प्रश्‍न उपस्थित करतो. धुंद होणं म्हणजे बधिरता नाही, मस्ती म्हणजे बेतालपणा नाही. खरं तर आपण धुंदीचा आस्वाद घेणंच विसरलो आहोत असं लेखक म्हणतो.
एकीकडे आयुष्याची क्षणभंगुरता लेखकाला कळते, तर दुसरीकडे त्याच आयुष्याची व्यापकता आणि विशालताही जाणवते. शहरीकरणानं यंत्रवत, स्वार्थी, फसवी झालेली माणसंही एकीकडे लेखकाला दिसतात, तर दुसरीकडे अनोळखी वाटेवरती भेटलेले, प्रेमानं विचारपूस करणारे,  वैश्‍विक कुटुंबातले आप्तही भेटतात.
लेखकाचा पुनर्जन्मावर विश्‍वास नाही. मिळालेल्या जन्मात त्याला अनेक मोहिमांवर अजून जायचंय आणि समोर आलेली आव्हानं पेलायचीयेत. लेखक म्हणतो, तसा हा 'कॅम्प फायर' एखाद्या स्वल्पविरामासारखा आहे, काहीच सेकंदाचं थांबणं आणि पुन्हा प्रवास सुरू.... सह्याद्री, हिमालय, युरोप आणि इतर अनेक ठिकाणी भटकंती केलेल्या या स्वच्छंदी माणसानं आपले अनुभव खूप रसरशीतपणे वाचकांसमोर व्यक्त केले आहेत. माणूस म्हणून जगतानाचे अनेक प्रश्‍न आणि अनेक आव्हानंही समोर उभी केली आहेत.  या ‘कॅम्प फायर’मध्ये अडकलेलं वाचकाचं मन आयुष्यातली आव्हानं स्वीकारायला नक्कीच तयार होईल. जरूर वाचा!
दीपा देशमुख
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.