लॉक ग्रिफीन

लॉक ग्रिफीन

नक्की वर्षं आठवत नाही, पण मुंबईहून पुण्याला आपल्याला ‘बाळ्या’ या मित्राबरोबर जायचं आहे असं अच्युत गोडबोले यांनी मला सांगितलं. त्याच्याबद्दल सांगताना तो आयआयटीपासूनचा मित्र असून त्यानं आयआयटीत असताना किती धमाल केली होती, त्याला गिर्यारोहणाचं कसं प्रचंड वेड आहे, तसंच त्याची दुर्मिळ वस्तूंचा संग्रह असणारी आणि ऐतिहासिक काळात घेऊन जाणारी पुण्यातली राहती वास्तू बघणं हा कसा सुंदर अनुभव आहे हेही सांगितंल.
सकाळी सहा वाजता हा मित्र अंधेरीतल्या घरासमोर उभा होता. आम्ही गाडीत बसलो. त्या अर्धवट अंधारलेल्या वातावरणात मला तो मित्र नीटसा दिसला नाही. पण त्यानं घातलेलं जाकीट मात्र ठळकपणे नजरेत भरलं. त्या मित्राची आणि माझी ओळख अच्युत यांनी करून दिली.
हा मित्र त्याच्या येणार्‍या कादंबरीचा काही भाग आम्हाला प्रवासात वाचून दाखवणार होता. कादंबरीचा प्लॅाट थोडक्यात सांगून औपचारिक गप्पांच्या फंदात न पडता, त्यानं हळूच आपलं बाड बाहेर काढलं आणि दमदार आवाजात वाचायला सुरुवात केली. अतिशय सुरेख असा तो अनुभव होता. त्याच्या त्या कादंबरीत अक्षरशः गुंगून गेलो. समोर नेमकं दृश्य उभं करण्याची जबरदस्त ताकद त्या आवाजात होती. काहीच वेळात मॉल आला आणि आम्ही एकमेकांशी न बोलता नाश्त्यासाठी उतरलो. तिथेही वाचनात खंड नव्हताच. पुन्हा गाडीत बसल्यावरही तेच....मात्र पुणं दिसायला लागल्यावर नाइलाजानं वाचन आटोपतं घ्यावं लागलं आणि त्या पुस्तकावर चर्चा सुरू झाली. मी त्याला विचारलं, 'खूपच उत्कंठा वाढवणारं कादंबरीतलं हे प्रकरण आहे. ही या कादंबरीची सुरुवात असणार आहे का?’ त्यानं नकारार्थी मान हलवत सांगितलं, 'हे त्या कादंबरीतलं सातवं प्रकरण मी वाचलंय. अजून पहिलं प्रकरण लिहायचंय.’ 
खरं तर ते वाक्य ऐकून मी अवाक् झाले. त्याचा कादंबरीचा पूर्ण आराखडा तयार होता. एखाद्या बिल्डिंगचा असावा तसा. त्यामुळे सांगाडा तयार झाल्यानं आता कुठला मजला कधी तयार करायचा हे त्याच्या हातात होतं. हे सगळं माझ्यासाठी विलक्षणच होतं. कारण कथा लिहिताना मला एखादं बीज मिळालं की ते रोपटं कसं आकार घेईल आणि किती आणि कुठे फोफावत जाईल हे मलाही ठाऊक नसायचं. त्या कथेची वळणं मला तिला वाटेल तिथे घेऊन जायची. इथं मात्र तसं नव्हतं. 
त्यानं आपल्या कादंबरीचा प्लॉट आधीच निश्‍चित केल्यामुळे तो दुसरं प्रकरण ते एकदम सातवं प्रकरण असं कुठेही कसाही जाऊन त्याविषयीचे संदर्भही सांगत होता. नंतर काहीच दिवसांत ती कादंबरी बाळ्याने झपाटल्यासारखी पूर्ण केली. तो ही कादंबरी, यातली पात्रं जगला म्हटलं तरी चालेल. बाळ्याची कादंबरी फक्त एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका दुर्घटनेपुरती मर्यादित राहत नसून ती आपल्याला अमेरिका, कॅनडा, स्कॉटलंडचं नव्हे तर जगभर सैर करवून आणते. वास्तव आणि कल्पना यातली धूसरता मिटवून टाकण्यासाठी बाळ्याने चक्क परदेशवार्‍या केल्या. तिथले संदर्भ मिळवले आणि ते असे काही गुंफले की वाचकाला हे सत्य की स्वप्न हाच संभ्रम मनात निर्माण होतो. 
लेखकानं तीन पिढ्यांचा जीवनपट यात उलगडलाय. त्याचबरोबर या तीन पिढ्यांच्या आजूबाजूची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणार्‍या घडामोडीही उदृत केल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटनाक्रमात ते देश, तिथली शहर, तिथल्या बारीकसारीक घटना, नियम आणि कायदे असे काही उभे केलेत की वाचणारा स्वतः त्या देशातला होऊन ती कादंबरी जगू लागतो. वरवर पाहता एका साध्याशा घटनेचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या तर्‍हेनं जाऊन पोहोचतात, त्यातलं अंगावर काटा आणणारं राजकारण अनुभवताना अंगावर थरार येतो. या कादंबरीत राजीव गांधीची हत्या, त्यावेळची देशातली परिस्थिती, अमेरिकेचा स्वतःच्या स्वार्थासाठी इतर देशात हस्तक्षेप करून चाललेला धुडगूस, असा राष्ट्रापासून सुरू होणारा प्रवास आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचतो. त्याचबरोबरच सौमित्र आजच्या आयटीच्या काळातला तरूण...माहिती तंत्रज्ञानातले अत्याधुनिक प्रवाह, सायबर सिक्युरिटीसारखे अनेक संदर्भ आज आपण आयटीशिवाय जगूच शकत नाही त्याचे हे संदर्भ आपल्या जीवनात आयटीचं असलेलं महत्वाचं स्थान अधोरेखित करतात. या कादंबरीचं वैशिष्ट्यं हे की संपूर्ण कादंबरीमध्ये एक थरार नाट्य आहे. वाचक आता पुढे काय या कुतूहलापोटी वाचत जातो. अनेक घटनांनी तो अचंबित होऊन जातो आणि कादंबरीच्या शेवटाकडे जातानाही आपल्या मनातली अस्वस्थता घेऊन विचारात गुरफटतो.
या कादंबरीत डोंबिवलीपासून ते हिमालयापर्यंत आणि भारतापासून ते अमेरिकेपर्यंत फक्त सैरच नाही तर त्यातल्या दैनंदिन जीवनात घडणारे बारकावेही लेखकानं टिपले आहेत. कथानकात तीन पिढ्यांचं एकमेकांशी असलेलं नातं आणि त्या त्या वेळच्या बारीकसारीक सवयी आणि लकबी हे देखील त्यानं अतिशय नेमकेपणानं रेखाटलं आहे. आयआयटीत असलेला सौभद्र - वडिलांची हत्या, अमेरिकेत असलेला काका अचानकपणे नैनितालमध्ये अपघातात मरण पावल्याची बातमी...अशा एकामागून एक धक्कादायक घटनांनी नायकाबरोबर वाचकही हादरून जातो. त्याच्या शोधयात्रेचा प्रवास त्याच्या साथीने मग वाचकही करायला लागतो. वाचकालाही आपल्या घरातला कोणी धनंजय दिसायला लागतो. मुंबईतल्या बकाल झोपडपट्टीपासून ते पंचतारांकित हॉटेल्समधलं सप्तरंगी वातावरण इथे अतिशय तरलपणे केलेल्या वर्णनामुळेच अनुभवायला मिळतं. रस्ते, रस्त्यावरची वळणं, माणसांचे एकमेकांकडे टाकलेले कटाक्ष, उसासे, तुच्छ भाव एकीकडे तर दुसरीकडे निसर्ग, निसर्गातल्या प्रत्येक हालचालीचं लयीत उभारलेलं संगीत बाळ्याच्या यातल्या वर्णनातून जागोजागी अनुभवता येतं. 
या कादंबरीचं मर्म म्हणाल तर आजच्या या जागतिकीकरणाच्या युगात, स्पर्धेच्या तांडवनृत्यात इच्छा असो वा नसो माणूस फरफटत चालला आहे. अमेरिकने वरतून घेतलेला लोकशाहीचा बुरखा आणि आतून असलेलं तिचं काळं चित्रं आपल्यासमोर येतं. तेलासाठी आणि सगळं जग पादाक्रांतकरण्याच्या आसुरी इच्छेनं माणुसकीला, व्यक्तीला आणि तिच्या स्वप्नांना इथे थोडीही जागा नाही हेही वास्तव लेखकानं प्रखर भूमिका घेऊन मांडलं आहे. 
आयआयटीतल्या जिगरबाज बाळ्याची जिगर त्या कादंबरीमधूनही तशीच जाणवते. काहीच दिवसांत ही कादंबरी ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आणि वाचकांनी तिला प्रचंड प्रतिसादही दिला. ‘बाळ्या‘ या  अच्युतच्या त्या मित्राचं नाव आहे, 'वसंत वसंत लिमये’ आणि कादंबरीचं नाव आहे ‘लॉक ग्रिफीन!!!’ 
जरूर वाचा!!!
दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.