जिवाभावाचे - अनिल अवचट

जिवाभावाचे - अनिल अवचट

'जिवाभावाची' असं म्हणणार्‍यास......!
जिवाभावाची, त्रास (न) देणारी, माझे फोन (न) उचलणारी....दीपास,
बाबा.

प्रत्येक पुस्तक हातात पडलं की लगेचच फोन करून मला बोलावून घेणार आणि मग त्यावर हे असं काहीतरी प्रत्येक वेळी लिहून माझ्या हातात ठेवणार! 
बाबाने ‘जिवाभावाचे’ हे पुस्तक मला दिलं आणि मी फेसबुकवर या पुस्तकासहित त्याचा आणि माझा फोटो टाकून मोकळी झाले. आणि या पोस्टचा परिणाम असा झाला की बुकगंगामधून मला फोन आला, 'दीपा मॅडम, तुमच्या बाबांचं नवं पुस्तक कोणतं आलंय? काही वाचक विचारणा करत होते.....' मी लगेचच ‘जिवाभावाचे’ मौज प्रकाशन असं तत्परतेनं सांगितलं. माझ्या एका पोस्टनं, फोटोनं वाचकांपर्यंत 'जिवाभावाचे' ची बातमी जाऊन पोहोचली होती आणि ते वाचक पुस्तक विकत घेण्यासाठी बुकगंगात जाऊन धडकले होते ही किती किती सुखावह गोष्ट होती! 
'जिवाभावाचे' मध्ये बाबाचं छोटसं मनोगत खूप बोलकं आहे. त्याला ज्यांनी घडवलं त्यांच्याविषयीची कृतज्ञता त्यानं व्यक्त केली आहे. आपल्याला एक चांगला माणूस बनायचं आहे असं म्हणणारा बाबा म्हटलं तर किती छोटी इच्छा व्यक्त करतोय आणि म्हटलं तर किती कठीण गोष्ट आहे ही आपल्या सर्वांसाठीच! चांगलं बनणं इतकं सोपं असतं? असतंही आणि नसतंही! तेव्हाच असतं, जेव्हा आपण स्वतःशी आणि आपल्या जगाशी प्रामाणिक असतो. नसतं तेव्हा जेव्हा सगळाच गुंता आपणच करून ठेवलेला असतो. त्या प्रतिमेत आपणच कुठेतरी हरवून गेलेलो असतो. 
'जिवाभावाचे' या पुस्तकात बाबाच्या जिवलगांचे असे १६ लेख आहेत. पहिलाच लेख 'सुनंदाला आठवताना'....मी बाबावर पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा 'सुनंदाला आठवताना' हा लेख दोनदा वाचून काढला होता. सुनंदाविषयी बाबाला बोलतं करावं का, बाबा अस्वस्थ होईल का असे अनेक प्रश्‍न मनात आले होते. पण प्रत्यक्षात बोलताना मात्र सगळ्या शंकाकुशंका मिटल्या. बाबानं सुनंदावरच्या कितीतरी कविता नव्यानं ऐकवल्या. अनेक प्रसंग सांगितले...त्याच्या समोर जणू काही सुनंदा उभी होती. तिच्याकडे बघतच तो माझ्याशी बोलत असावा....त्याच्या चेहर्‍यावर कुठलंही दुःख, वेदना नव्हती. किती चांगलं जगायला शिकवून गेली होती ती..... त्याच्यावरचं पुस्तक लिहीत असताना सुनंदाच्या आणि त्याच्या नात्यानं मलाच खूप हळवं करून सोडलं. त्यांच्या परस्परांवरच्या प्रेमानं मी भारावले होते. शेवटचा प्रसंग वाचताना....एकटीच खूप खूप रडले होते.....आजही त्याचा हा लेख वाचताना पुन्हा डोळे पाणावले. दोघांमधल्या उत्कट नात्याला शतःश प्रणाम!
'जिवाभावाचे' या पुस्तकातले सगळेच लेख मी त्या प्रक्रियेत असतानाच वाचलेले आहेत. लेख लिहून झाला की ताजा ताजा लेख मी वाचायलाच पाहिजे! 'इंदूताईंची गोष्ट' या लेखात इंदूआज्जीला न ओळखणारा माणूसही तिच्या प्रेमात पडावा इतकं बोलकं व्यक्तिचित्रं बाबानं उभं केलंय. तिच्यातल्या कला, तिनं सोसलेला त्रास, तिचा गोरा रंगही तिच्यासाठी कसा वाईट ठरला होता, तिची बुद्धिमत्ता, तिची माणसांबद्दलची पारख, तिचा सुग्रणपणा, तिचं वाचनवेड सगळं सगळं या लेखात आलंय. इतकंच नाही तर ती म्हणत असलेली गाणी, तिचे वापरातले अनोखे शब्द असं खूप काही ...भरभरून....!
त्यानंतरचा लेख मी वाचला होता तो 'आनंदा' विषयीचा! म्हणजेच डॉ. आनंद नाडकर्णी बद्दलचा! तितकाच हृद्य....नात्याविषयीचा, परस्परांमधल्या घट्ट जिव्हाळ्याबद्दलचा, अनेक अडचणी आणि प्रसंगातून एकमेकांचा हात घट्ट धरून प्रवास करतानाचा....आणि इतकं सगळं सोसूनही कायम हसतमुख राहण्याचा हा प्रवास मला खूप खूप आवडला. 
खरं सांगायचं तर यशो, मुक्ताविषयीचा लेख असो, वा मित्रांविषयीचे लेख, कुठल्याच लेखाची तुलना एकमेकांशी करता येत नाही. एक वाचला की मन त्यातच गुंतून पडतं. मग जरा श्‍वास घेऊन दुसरा वाचला की अरे हा तर आणखी चांगला असं मन म्हणतं आणि तिथेच रेंगाळत राहतं. 
बाबाचं हे पुस्तक...खरं तर हेच नाही बाबाची सगळीच पुस्तकं शालेय अभ्यासक्रमात ठेवायला हवीत. याचं कारण आजच्या वेगवान आयुष्यात नातेसंबंधं हरवत चालले आहेत. नितळ, निर्मळ प्रेमाला जागाच शिल्लक नाही. सगळं काही आभासी! 
अशा वेळी आपल्या लिखाणातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून बाबा कधीही कोणालाही उपदेश करत नाही, कुठला सल्लाही देत नाही, कुठलीही सक्ती करत नाही. तो फक्त सांगतो, ‘बघा माझा प्रवास.....आवडला तर तुम्हीही चला या वाटेवरून!’
मी या प्रवासात त्याच्याबरोबर केव्हाच चालायला सुरुवात केली आहे. तुम्हीही यात जरूर जरूर सामील व्हा आणि लवकर वाचा ‘जिवाभावाचे!’
दीपा देशमुख २० जानेवारी २०१८.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.