लव्ह इन द टाईम ऑफ करोना
अतिशय कठोर असा पोलीस अधिकारी राणे, त्याच्या तुरुंगात अनेक गुन्हेगारांना कोरोनाची लागण झालेली असते. हे सगळे गुन्हेगार बरीच दीर्घ शिक्षा भोगत असतात, त्यातला एक गुन्हेगार बलात्काराच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतो. शिक्षेचा काही कालावधी शिल्लक असतो. अशा वेळी राणे त्याला तुझी तुरुंगातून सुटका करतो असं सांगत त्याला बाहेरच्या जगात गेल्यावर २ लाख रुपये देखील देण्याचं कबूल करतो. त्याबदल्यात त्यानं एका स्त्रीवर बलात्कार करायचा असतो. विशेष म्हणजे ही स्त्री दुसरीतिसरी कोणी नसून राणेची सुंदर, देखणी अशी बायको असते. राणेला या बलात्कारानं आपल्या बायकोलाही कोरोना पॉझिटिव्ह करायचं असतं का, तसं असेल तर का? तिनं असं काय त्याचं घोडं मारलेलं असतं? तसंच हा बलात्कारी गुन्हेगार हा चांगला उच्चशिक्षित असताना बलात्काराची शिक्षा का भोगत असतो, त्यानं बलात्कार का केलेला असतो, शिवाय बलात्काराचा गुन्हाही कबूल केलेला असतो.....
ही कथा हळूहळू आपली उत्कंठा वाढवत नेते...कथेतला हा नायक बलात्कार करण्यासाठी राणेनं दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो. मात्र तो तिच्यावर म्हणजे राणेच्या सुंदर बायकोवर बलात्कार करतच नाही, उलट तिला सत्य कथन करतो. तिथून त्याचा आणि तिचा प्रवास सुरू होतो, हजारो/लाखो लोक या काळात जसे स्थलांतर करत होते, करताहेत, अगदी तसाच. या प्रवासात काय घडतं, हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जातो, काय देऊन जातो, याची कथा म्हणजे ‘लव्ह इन द टाईम ऑफ करोना.’
या कथेच्या शेवटी आपणही नकळत गुणगुणू लागतो, निके निके चालन लागी......
रोहन प्रकाशनानं नुकताच प्रकाशित केलेला ‘लव्ह इन द टाईम ऑफ करोना’ हा कथासंग्रह असून यात गणेश मतकरी, नीरजा, श्रीकांत बोजेवार, प्रवीण धोपट, मनस्विनी लता रवींद्र, प्रणव सखदेव, परेश जयश्री मनोहर आणि हृषिकेश पाळंदे या लेखकांच्या कोरोना काळातल्या कथा आहेत. या पुस्तकाचं संपादन अनुजा जगताप हिनं केलं असून मुखपृष्ठ देखील आल्हाददायक आहे.
आज मी या पुस्तकातली एकच कथा वाचलीय आणि ती आहे, श्रीकांत बोजेवार यांची ‘निके निके चालन लागी...’ ही कथा. नैया मोरी निके निके चालन लागी हे कबीराचं अतिशय अप्रतिम असं भजन आहे. हे भजन कुमार गंधर्व यांनी गायलंय. तसंच राहुल देशपांडे, भुवनेश कोमकली आणि इतर अनेक गायकांनी आपापल्या शैलीत अतिशय सुरेखरीत्या गायलं आहे. ही कथा कोरोनाच्या मरगळ आलेल्या काळात टवटवीत करून जाते! श्रीकांत बोजेवार यांचं दीडदमडी वाचल्यानंतर आज ही कथा वाचली आणि खूप आवडली.
आता इतर कथा वाचण्याची उत्कंठा लागलीय.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment