नूपुरा
किशोर दीक्षित हा सहा-साडेसहा फूट उंचीचा, प्रसन्न देखण्या व्यक्तिमत्त्वाचा आणि दणकट शरीरयष्टीचा मित्र भेटला ती वेळ आणि तो दिवस आता नक्की सांगता येणार नाही. मात्र किशोर दीक्षितची ओळख अच्युत गोडबोलेंमुळे झाली आणि खरं तर तो त्यांचा मित्र! किशोर दीक्षित यांच्या बोलण्यातून मैत्रीचा, स्नेहाचा ओलावा लगेचच जाणवतो. आत्मीयता जाणवते. माझ्याशीच नव्हे, तर अपूर्वशीही त्यांचं नातं जोडलं गेलं आहे. त्यामुळे जेव्हा कधी फोन होईल, तेव्हा ‘आमचा राजेंद्रकुमार काय म्हणतो’ असं आस्थेनं विचारणार! अपूर्वला राजेंद्रकुमार हे नाव त्यांनीच बहाल केलेलं! मुंबईला आपल्या घरी येण्याचा आग्रह करणारा हा मित्र 'कवी' आहे हे मला अनेक दिवस ठाऊकच नव्हतं.
एके दिवशी माझ्या हातात त्यांचा 'नूपुरा' हा काव्यसंग्रह पडला आणि थक्कच झाले. १९६६ सालापासून हा मनुष्य कविता करतो, याच्या अनेक कवितांना विख्यात संगीतकार दत्ता डावजेकर, दत्तराज खोत, डेव्हिड रुबिन यासारख्या दिग्गज संगीतकारांनी संगीतबद्ध करावं आणि वाणी जयराम, रंजना जोगळेकर, विठठल शिंदे यांनी गावं, या गीतांचं सादरीकरण आकाशवाणी, दूरदर्शन यावरून व्हावं आणि आपल्याला हे माहीत नसावं याची मला खंत वाटायला लागली. 'नूपुरा' एका दमात माझ्याकडून वाचणं झालं नाही, प्रत्येक वेळी काही ना काही अडथळे येत गेले. पण किशोर दीक्षित अतिशय संयमशील! त्यांनी माझ्या प्रतीक्रियेची प्रतीक्षा केली, पण कधीही माझ्याविषयी राग धरला नाही. आज मात्र आस्वाद घेत या कवितांनी मला सोबत केली.
'नूपुरा' या काव्यसंग्रहातली पहिलीच कविता 'कलंदर' या नावानं आहे. या कलंदराचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे, मात्र त्याच वेळी त्याच्यातली संन्यस्त वृत्तीही जाणवत राहते. आसपासंचं सगळं काही हा संन्यस्त वृत्तीनं, अलिप्तपणे न्याहाळणारा तो वाटतो. 'तळ्याचा काळ' या कवितेत एका प्रेमिकाचं मन कवीनं समोर खुलं केलं आहे. अर्थात ही कविता प्रेमात पडलेल्या प्रत्येकाचीच!
तू असताना सारं कसं धुंद धुंद असतं, थोडक्यात सगळं 'आलबेल' असतं. पण तेच तू नसताना मात्र तेच ठिकाण, तीच परिस्थिती, तेच दृश्य कसं बदलून जातं, सारं काही भयाण, भीषण वाटायला लागतं.... 'तरू तळाशी' या कवितेत कवीनं बहार आणली आहे. तो म्हणतो,
शब्द खगांना पंख फुटावे
आशय शोधित मनी बुडावे
एकाच वेळी प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी जिवांना किती बोलू आणि किती नको असं होतं. शब्दांचे पक्षी होऊन त्यांना पंख फुटतात, मात्र त्याच वेळी विहरत असताना आशय शोधत मनातल्या तळाशी त्यांचं बुडणंही असतं. विहरणं आणि बुडणं....व्वा, क्या बात है!
किशोर दीक्षितांची प्रेमकवितांवर जास्त पकड असल्याचं दिसतं. त्यांची 'उनाड पाखरा' ही कविता अशाच प्रेमभावना व्यक्त करणारी ः
चांदरात रोज एक स्वप्न पाहते
ही पहाट जगण्याचे अर्थ सांगते जीवनास तू दिलास रंग बावरा 'लाजवंती' या कवितेत कवी म्हणतो,
तू दूर का उभी गे, ये ना समीप राणी
वेडावते जिवाला मधुगंध रातराणी
'सांजवेळ' ही कविता वाचून बालकवींची आठवण होते. बालकवींचा निसर्ग तितक्याच तरलतेनं कवीनं समोर उभा केल्याची जाणीव होते. आणखी एक निसर्गाचं दर्शन घडवणारी 'कहीं दूर जब दिन ढल जाये' ही कविता मावळतीचे रंग घेऊन समोर येतेः
मावळतीचे रंग उतरले सागर लाटांवरती
लाटा या की स्पंदन माझे, जुनी शोधते नाती
याच कवितेत जीवनातला सूर हरवला की काय अवस्था होते तेही तो व्यक्त करतो. तो म्हणतो ः
सूर हरवले, शब्द हरवते जीवन हे एकाकी
मागे वळुनी बघता दिसते, शून्य एकले बाकी
तसंच 'श्रावण' ही कविता वाचताना तर श्रावणातलं वातावरणच या कवितेच्या रुपात समोर अवतरतंः
घन घन बरसत श्रावण आला
हिरवी चाहूल घेऊन आला
झिरझिर उधळी श्रावणधारा
लगबग हिरवी धरणी आपुल्या
सावरते पदराला......
'सर' या कवितेत कवीचं मन प्रेमात आकंठ बुडालेलं, चिंब न्हालेलं दिसतं. त्याचं आतूर झालेलं मन आणि पावसाची सर यामुळे एक धूंद झालेलं वातावरण देखील बघायला मिळतं. अशा वातावरणात या ओढ लागलेल्या मनाला कसं आवरायचं कसं सावरायचं हे त्या प्रियकराला कळत नाहीये. शृंगाररसाची ही अप्रतिम कविता आहे! 'समाप्ती' या कवितेत तो प्रेमी म्हणतोः
तू ये नूपुरा होऊन श्रावणातल्या धारेसारखी...
असं म्हणताना तिचं म्हणजे आपल्या प्रेयसीनं आपल्या आयुष्यात कसं यावं याचे हा प्रियकर दाखले देतो. अनेक दाखले देत असतानाच अखेर एक वेळ अशी येते की तिचा जाण्याचा क्षण येऊन ठेपतो आणि त्या वेळी तिचं जाणं त्याला फाल्गुनातल्या उष्म्यासारखं चटका देणारं, असह्य करणारं वाटतं. कवीच्या शब्दरूपी उपमाही मनातून ‘वा, क्या बात है’ अशी दाद निघावी अशा - म्हणजे 'स्वप्नफुलांच्या पाऊल टिकल्या...' अशा ओळी ऐकताना 'व्वा', हे सहजगत्या ओठातून बाहेर पडतं. किंवा 'पाकोळी मनाची...' असे शब्द कानावर पडले की कवीचं पाकोळीसारखं झालेलं मन दिसायला लागतं.
'कुछ तो लोग कहेंगे' या शीषर्काची कविता - राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचं 'अमरप्रेम' या चित्रपटातलं किशोर कुमार यानं गायलेलं गाणं आठवतं. ही कविता मात्र त्या गाण्याचा अनुवाद नाही, किंवा त्याच्याशी साधर्म्य दाखवणारी नाही. तिचं एक स्वतंत्र अस्तित्व ती तुमच्यासमोर घेऊन येते. 'नको' ही कविता कवीचं स्वाभिमानी मनाचं दर्शन घडवणारी...कवीला प्रेम हवंय, पण ते कुठल्या अटींवर, कुठल्या नियमांवर असलेलं नकोय. या कवितेत कवी म्हणतो, जर साशंक मन असेल, मनात व्यवहार जागा असेल, कर्तव्याची भावना जागी असेल तर मला ते प्रेम, त्या भेटी, त्या शपथा नकोत. प्रेमानंतर प्रेमभंग आलाच, विरह आलाच, विरहातलं व्याकुळ होणं आलंच.
'हे मना' या कवितेत कवी या दुखर्या मनाची समजूत घालताना भेटतो. 'वाटलेच होते' या कवितेत कवीला प्रेमाचा शेवट काय होणार याची धाकधूक वाटत असतेच, अखेर तो क्षण समोर आल्यावर त्याचं मन आक्रंदत म्हणतंः
दुःख असे तुटण्याचे शल्य एक आहे
'आपल्यातले’ 'तू', 'मी' वेगळे निघाले ही ताटातूट, हे वेगळं होणं वाट्याला आल्यावर त्याचा स्वीकार करणं तितकं सोपं नाही. अशा वेळी कवीच्या दुखर्या मनावर फुंकर घालायला भूतकाळ धावून येतो आणि कवी ‘काल एकदा’ या कवितेतून म्हणतो ः
काल एकदा पुन्हा उजळल्या आठवणींच्या वाटा
खडकावर फेसाळत फुटल्या कितीक सागरलाटा
नव्हते अंतर कधीच जेव्हा अतूट होते नाते
आयुष्याला अनोळखी हा फुटला कुठला फाटा
हे दुःख कवीच्या अंतःकरणात पार झिरपत गेलेलं....सगळं कसं सुरळीत चाललेलं असताना हे काय अचानक झालं याचा टाहो हे मन फोडतं. त्याच वेळी कवीनं लावणी हा प्रकारही खूप अप्रतिमरीत्या हाताळला आहे, त्यांची लावणी शृंगारिक आहे, पण तिच्यात अश्लिलता नाही. तिच्यात ठसका आहे, पण उथळपणा नाही. खानदानी लावणी असंच तिचं वर्णन करावं लागेल. 'ज्वानी' ही लावणी पुन्हा पुन्हा ऐकावी/वाचावी वाटते. ऐकावी यासाठी म्हटलं की किशोर दीक्षितांच्या सगळ्याच कविता लय, नाद, ताल यांचं देणं घेऊनच भेटायला आल्या आहेत. त्यामुळे आपोआपच त्या प्रकारेच त्यांचं वाचन होतं. कवीनं 'फटका' हा काव्यप्रकारही अतिशय उत्तमरीत्या हाताळला आहे. तो म्हणतो ः
अबोला असावा परि कटुता नसावी आणि
मित्रतेची परीक्षा नसावी
हा फटका मनावर कोरत आणि नूपुराचा मधूर नाद मनात साठवत मीही नादमय झाले.
जरूर वाचा, नूपुरा...! (नूपुरा हा कविता संग्रह बुक गंगा इथे उपलब्ध आहे.)
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment