कॅनव्हास
कॅनव्हास हे ६०० पानांच्यावर असलेलं पुस्तक अच्युत गोडबोलेंबरोबर लिहिलं. हे पुस्तक विदेशी चित्रकार आणि शिल्पकार यांचं जीवन आणि कार्य यावर आहे. हे पुस्तक आपण मिळून लिहू या असा प्रस्ताव अच्युत गोडबोले यांनी माझ्यासमोर ठेवल्यावर मला अर्थातच आनंद झाला. मी होकार दिला. पण त्यानंतर मात्र हे काम खूप कठीण आहे याची जाणीव मला झाली. मराठीतून या कलाकारांबद्दल खूप थोडी माहिती होती. व्ह्यन गॉग आणि पिकासो सोडल्यास बहुतांशी कलाकार मला ठाऊकच नव्हते. पण अच्युत गोडबोलेंमध्ये हाडाचा शिक्षक दडलेला असल्यानं समोरच्यामधले सुप्त गुण ओळखण्याचं कसब त्यांच्यात आहे. तुला हे जमू शकतं असे आश्वासक शब्द त्यांनी उच्चारल्यामुळे माझा पुढला प्रवास खूप सोपा झाला.
मुंबईला जाऊन जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि एनसीपीए इथली बसण्यासाठी परवानगी मिळवणं, तिथल्या ग्रंथालयात जाऊन त्या दुर्मिळ पुस्तकांच्या प्रत्येक पानाचा फोटो मोबाईलवर घेणं आणि नंतर ते सगळे फोटोज लॅपवर काढून ठेवणं असं काम आम्ही ८ ते १० दिवस रोज १० ते ५ वेळात केलं. सकाळी ८ वाजताच आम्ही लोकलनं निघायचो आणि काम संपल्यावर पुन्हा लोकलंन घरी परत. या फोटो काढलेल्या पानांचे प्रिंटआऊट काढून मग आपल्याला हवा असलेला भाग आपल्या शब्दांत आपल्या शैलीत आणि आपल्या भाषेत आम्ही अनुवाद करायला सुरुवात केली.
कॅनव्हास पुस्तक पूर्णत्वाला जाईपर्यंतचा प्रवास अगदीच झपाटलेला होता. रात्रंदिवस या कलाकारांनी आमचं आयुष्य व्यापून टाकलं होतं. कॅनव्हासमध्ये मायकेलअँजेलो, लिओनार्दो दा व्हिंची, व्हॅन गॉग, पिकासो, रेम्ब्रा, सेजान, रोदँ, लॉत्रेक, गोगँ, टर्नर, सरा, थोरो, देगा, पिसारो, दाली, मातिस, असे अनेक कलाकार आहेत. त्यांचा जगण्यातला संघर्ष आहे, त्यांची कला आहे. त्या कलेचं वैशिष्ट्य आहे. इतकंच नाही तर चित्रकलेचा गुहाचित्रांपासून सुरू झालेला प्रवास मॉडर्न आर्ट पर्यंत कसा पोहोचला आणि त्यातले दिग्गज प्रवासी कोण होते याविषयी देखील लिहिलंय. प्रत्येक कलाकाराचं जगणं अनुभवताना अंगावर थरार आला, त्यांची वेदना मनाला भिडली. त्यांच्या कलाकृतीनं मन अचंबित झालं.
मायकेलअँजेलो हा जगातला सर्वोत्कृष्ट शिल्पकार
त्याचं डेव्हिड हे शिल्प बघताना वेड लागतं. .........
१७ फूट शिळेवर डेव्हिडसाठी काम सुरू केलं. जवळजवळ २४ तास तो काम करत होता. कॉन्ट्रापोस्टोचं तंत्र वापरलं. एका पायावर भार देऊन उभं दाखवतात आणि दोन्ही खांदे आणि हात शरीरापासून १५ ते २० अंशातून वळलेले दाखवतात. या तंत्रामुळे शिल्प गतीमान दिसतं. जणू काही ते एक पाऊल पुढे टाकत आहे असं वाटतं.
डेव्हिड एका मेंढपाळाचा मुलगा त्या वोळी सॉल राजाच्या प्रजेला गोलायथ नावाचा राक्षस त्रास देत असतो. आपल्याला कोणीच जिंकू शकत नाही याचा गोलायथला गर्व होता. सगळेच त्याच्यासमोर हारलेले असतात. डेव्हिड त्याचं आव्हान स्वीकारतो आणि हातातल्या गोफणीच्या मदतीनं तो गोलायथला ठार मारतो.
तसंच रोदँ या शिल्पकाराची जडणधडण बघताना त्याचा संघर्ष बघताना वाईट वाटतं, पण त्याचं शिल्पकलेतलं झपाटलेपण बघताना या झपाटलेपणातून जगाला चकित करणार्या त्याच्या द किस सारख्या कलाकृती जन्माला येतात हे कळतं. शिल्पामध्ये जिवंत केलेली प्रणयभावना बघून ते शिल्प नसून त्याला शिल्पाला स्पर्श केला तर ते शिल्प थरारून उठेल असं वाटतं. त्याचं शरीरच नव्हे तर मन काय बोलतंय हेही समजतं.
व्हॅन गॉगच्या आयुष्याची फरफट, त्याची उपेक्षा, त्यांच आणि त्याचा भाऊ थिओ यांच्यातलं नातं, त्याची आज करोडो रूपयांनी विकली जाणारी चित्रं याची गोष्ट आपल्याला कॅनव्हास उलगडून सांगतो. लिओनार्दो दा व्हिंची आणि मायकेलअँजेलो मधली झटापट, लिओनार्दोमधला कुशल चित्रकार, इंजिनिअर, त्याचं मोनालिसाचं अमर झालेलं चित्र, त्यात दडलेले अर्थ हेही कॅनव्हास सांगतो. पिकासोसारखा लहानपणी अवखळ असलेला मुलगा चित्रकलेमध्ये किती प्रकार निर्माण करतो. कोलाज असो की क्युबिझम, ही सगळी चित्रं बघून हा माणूस आहे की चमत्कार असं म्हणायची वेळ येते. टर्नरची निसर्गचित्र, दालीचं सररिअॅलिझम असं खूप काही कॅनव्हासमध्ये आहे.
Add new comment