आर्ट बीट्स दिवाळी २०१५
नुकतंच शाळेत जायला लागलेल्या छोट्याशा मुलाला किंवा मुलीला हातात रंगीत खडू दिला की त्याचं किंवा तिचं कागदावर, पाटीवर किंवा मिळेल त्या जागेवर रेखाटन सुरू होतं. आपण सगळ्यांनीच लहानपणी काढलेलं चित्र आठवायचं झालं तर डोंगर, डोंगरातून उगवणारा सूर्य, समोर एक झोपडी, वाहणारी नदी, नारळाचं झाडं आणि आकाशात उडणारे चारच्या आकाराचे पक्षी....झालं आपलं चित्र! पण जेव्हा जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रं बघायला मिळतात, तेव्हा वाटतं ही चित्रं आहेत की खराखुरा प्रसंग डोळ्यासमोर साकारलाय?
ज्या चित्रकारांच्या चित्रांची किंमत आज कोट्यवधी रुपये आहे, अशा चित्रकारांच्या आयुष्यातले दोन मोजके गमतीदार प्रसंग आपण पाहू.
इटली या देशातला मायकेलअँजेलो कोण होता? एक शिल्पकार, एक चित्रकार, एक कवी, एक गिलाव्यावर कोरून चित्रं काढणारा फ्रेस्को, ब्राँन्झचं काम करणारा, एक स्थापत्यशिल्पी (आर्किटेक्ट) आणि रस्ताबांधणी करणारा एक कुशल इंजिनियरसुद्धा! ‘बॅकस्’, ‘पिएता’, ‘डेव्हिड’, ‘मोझेस’, ‘सिस्टाईन चॅपेल’, ‘द लास्ट जजमेंट’ यासारख्या सौंदर्यपूर्ण, अचूक आणि परिपूर्ण अशा अजरामर कलाकृती करूनही ‘मला कलेतलं फार काही कळत नाही’ असं म्हणणारा मायकेलअँजेलो एक महामानवच होता. कलेला आणि कलाकाराला कलाविश्वात दर्जा मिळवून देण्यात त्याचा बहुमोल वाटा आहे. रोममधल्या व्हॅटिकन सिटीमधल्या सिस्टाईन चॅपेलच्या छतावर मायकेलअँजेलोनं बायबलमधल्या सृष्टीच्या निर्मितीची गोष्ट इतक्या सुंदर पद्धतीनं चितारली आहे, की आजही केवळ ते छत बघण्यासाठी जगाच्या कानाकोपर्यातून लाखो लोक येतात आणि बघून झाल्यावर स्वतःला धन्य समजतात! चार-साडेचारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या मायकेलअँजेलो या कलावंताच्या कलाकृती बघताना रसिकांचे डोळे आजही दीपून जातात.
मायकेलअँजेलो लहान असतानाची ही गोष्ट आहे. त्या काळात डोमेनिको घिरलँडिओ (Domenico Ghirlandaio) नावाचा एक गाजलेला चित्रकार होता. भिंतीवरची चित्रं (म्युरल्स) करण्यात तो प्रसिद्ध होता. मायकेलअँजेलोचा मित्र ग्रेनाची आणि अनेक मुलं चित्रकला शिकायला घिरलँडिओकडे जात. गे्रनाची मायकेलअँजेलोला घिरलँडिओकडे शिकायला चलण्याविषयी नेहमीच आग्रह करायचा. मायकेलअँजेलोचं कलासक्त मन त्याला गप्प बसू देत नव्हतं. कलेच्या बाबतीत स्वतःचे वडील लोडोविको म्हणजे एक औरंगजेबच असल्यामुळे घरात चित्रकलेविषयी कोणाशी बोलायची तर चोरीच होती. घरात कुठल्याही कलेचा नुसता उच्चार जरी झाला, तरी लोडोविकोचा पारा एकदम वर चढत असे. आपल्या मुलांनी चांगलं शिकून मानाच्या नोकर्या कराव्यात आणि पैसे कमवावेत अशी त्याची इच्छा होती. पण मायकेलअँंजेलो तर चित्रकला शिकायची म्हणून हटून बसलेला असे. या त्याच्या हट्टामुळे लोडोविको आणि त्याचा काका दोघंही त्याला चांगला चोपही देत. पण मायकेलअँजेलो आपल्या मूळपदावर कायम असे. चित्रकला शिकण्याच्या हेतूनं अखेर ग्रेनाचीच्या आग्रहाखातर मायकेलअँजेलो घिरलँडिओकडे एकदाचा गेला.
घिरलँडिओच्या स्टुडिओत पोहोचताच आपण एखाद्या मंतरलेल्या ठिकाणी आलो आहोत असंच मायकेलअँजेलोला वाटायला लागलं. मायकेलअँजेलोला घिरलँडिओच्या स्टुडिओत मुक्तपणे आनंदानं चित्रं काढण्यात मग्न असलेली मुलं दिसली. त्याला त्यांचा हेवाच वाटला. कारण त्याला आपल्या स्वतःच्या घरी चोरून आणि लपून चित्रं काढावी लागत. ग्रेनाचीनं घिरलँडिओबरोबर मायकेलअँजेलोची ओळख करून दिली. घिरलँडियोनं मायकेलअँजेलोला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं, तेव्हा वडिलांचं नाव ‘लोडोविको द लिओनार्दो ब्युरोनाती सिमोनी’ असल्याचं मायकेलअँजेलोनं सांगितलं. त्या काळात जेवढं घराणं मोठं, तेवढं त्या व्यक्तीचं नावही मोठं असायचं. त्यामुळे कितीतरी वेळ घिरलँडिओ मायकेलअँजेलोकडे रोखून बघत राहिला. कारण तो वयाच्या दहाव्या वर्षापासून मुलांना चित्रकला शिकवायचा, पण मायकेलअँजेलो मात्र तेरा वर्षांचा दिसत होता. ही तीन वर्ष त्यानं काय केलं असावं हा प्रश्न घिरलँडिओला पडला. मायकेलअँजेलो म्हणाला, ‘मला माझ्या वडिलांनी भाषा शिकण्यासाठी शाळेत घातलं होतं. पण मला शाळा आवडली नाही. माझा वेळ तिथे फुकट जातोय असं मला वाटलं.’ एवढ्या लहान दिसणार्या मुलाला दिवसभर इथली कष्टाची कामं झेपतील का अशीही शंका त्याच्या मनात आली. त्यानं तसं बोलून दाखवताच मायकेलअँजेलो म्हणाला, ‘चित्रकलेसाठी पिळदार शरीराची गरज नाही.’ घिरलँडिओला मायकेलअँजेलोमधला निश्चयी स्वभाव आणि प्रामाणिकपणा आवडला. त्यानं त्याला एक चित्र काढून दाखवायला सांगितलं.
मायकेलअँजेलोनं लगेचच त्या स्टुडिओचंच चित्र काढायला सुरुवात केली. त्या भिंती, ते टेबल, तिथलं साहित्य, ते चित्र काढण्यात तल्लीन झालेले विद्यार्थी... बघता बघता मायकेलअँजेलोचं चित्र पूर्ण झालं. ते चित्र पाहून घिरलँंडिओ एकदम खुश झाला. तो म्हणाला, ‘अरे वा! छान चित्र काढतोस की. तुझे हातही चांगलेच दणकट आहेत.’
त्यावर मायकेलअँजेलो अभिमानानं म्हणाला, ‘‘हे हात एका पाथरवटाचे आहेत.’’
घिरलँडिओ म्हणाला, ‘‘माझी फी किती आणि ती कधी आणि कशी द्यायची हे तुला माझ्या विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी सांगेल...’’
घिरलँडिओचं बोलणं संपायच्या आतच मायकेलअँंजेलो म्हणाला, ‘‘मी तुमची फी देऊ शकणार नाही.’’
घिरलँडिओ चमकला आणि म्हणाला, ‘‘अरे, तुझं घराणं इतकं काही गरीब नाही...’’
त्यावर मायकेलअँजेलो म्हणाला, ‘‘हो, पण माझे वडील चित्रकलेचं नाव जरी काढलं तरी मला खूप मारतात. त्यामुळे फी देण्याची तर गोष्टच दूर...’’
घिरलँडिओ आश्चर्यानं म्हणाला, ‘‘अरे, मग तू त्यांच्या परवानगीशिवाय इथं शिकायला कसा येणार?’’
मायकेलअँजेलो ठाम आवाजात शांतपणे म्हणाला, ‘‘जर तुम्ही त्यांना पैसे दिले तर...आणि हो हा एवढाच एक मार्ग तुमच्याकडे आहे. नाहीतर ते शक्य नाही!’’
घिरलँडिओच काय, पण त्याचे सगळेच विद्यार्थीही आपापली कामं सोडून अवाक् होऊन मायकेलअँजेलोकडे पाहायला लागले. एका गुरूनं विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी पैसे द्यायचे हे सगळं विचित्र आणि विलक्षणच काहीतरी होतं. घिरलँडिओ आता संतापून काय करतो या विचारानं सगळे शिष्य श्वास रोखून उभे राहिले. पण आश्चर्य म्हणजे घिरलँडिओनं मायकेलअँजेलोची ती विचित्र अट मान्य केली. इथे विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी एक शिक्षक चक्क फी देणार होता! इतिहासात हे प्रथमच घडत होतं.
मायकेलअँजेलो जसा ग्रेट कलावंत होता, तसाच आणखी एक थोर चित्रकार म्हणजे पाब्लो पिकासो! पिकासो म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते गेर्निका हे जगप्रसिद्ध चित्र! पिकासोनं त्याच्या कारकिर्दीत एकूण १३००० चित्रं रंगवली आणि रेखाटनं केली. १ लाख मुद्राचित्रं (प्रिंट) आणि एन्ग्रेव्हिंग, तर ३४००० पुस्तकांची इल्यस्ट्रेशन्स आणि ३०० शिल्पं अशी एवढी १४७८०० इतक्या मोठ्या संख्येतली त्याची चित्रं अवाक् करणारी असून पिकासोनं अफाट कामगिरी कलेच्या विश्वात करून ठेवली! त्याची ३५० हून अधिक चित्रं चोरली गेली. पिकासोनं काढलेली चित्रं एकापुढे एक ठेवली तर कितीतरी किलोमीटरची जागा व्यापतील आणि त्यानं केलेली शिल्पं एकावर एक ठेवली तर त्यांची उंची आयफेल टॉवरपेक्षा मोठी असेल असं म्हटलं जातं ते उगाच नाही!
पिकासोची जादू त्याही काळात लोकांवर इतकी होती की पिकासोच्या बाबतीत केवळ पिकासाचं दर्शन व्हावं यासाठी हजारो लोक रांगा करून कित्येक तास त्याच्या घरासमोर डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघत असत.
पिकासोचा स्वतःच्या प्रतिभेवर ठाम विश्वास होता. तो म्हणे,‘मला कितीही मोठं म्युझियम द्या. मी ते माझ्याच चित्रांनी भरून टाकीन.’ त्याच्या मृत्यूनंतर सालो या भव्य वास्तूत फक्त त्याच्याच कलाकृती ठेवल्या आहेत.
पिकासोच्या चित्रांच्या किंमतीही जबरदस्त महाग असत. पिकासोच्या खूप उच्चभू्र आणि श्रीमंत समजल्या जाणार्या दक्षिण फ्रान्समधल्या निवासस्थानी येणारे पाहुणे पिकासोच्या घरात त्याचं स्वतःचं एकही चित्र नाही हे बघून चकित होत. एकदा तर असं सांगतात, की एकानं न राहवून पिकासोला चक्क विचारलंच,‘‘कमाल आहे, तुझ्या एवढ्या मोठ्या घरात तू स्वतः काढलेलं एकही चित्र भिंतीवर लावलेलं असू नये म्हणजे आश्चर्यच आहे. तुला तू काढलेली चित्रं आवडत नाहीत का?’’ पाहुण्याच्या उपहासानं भरलेल्या प्रश्नावरही शांतपणे पिकासो उत्तरला,‘‘आश्चर्य करण्यासारखं यात काही नाही. मी काढलेली चित्रंच मला प्रचंड आवडतात. पण त्यांना विकत घेण्याची कुवत माझ्यात नाही त्याला मी काय करू?’’
पिकासोचे वडील डॉन होसे रुईझ हे स्वतःही चित्रकलेचे शिक्षक असल्यामुळे चित्रकलेचं प्राथमिक शिक्षण पिकासोला त्याच्या घरातूनच मिळालं. लहान असताना शाळेत जायचं पिकासोच्या खूप जिवावरच येत असे. रोज सकाळी पिकासोला शाळेत सोडणं म्हणजे एक ठरलेला रंगारंग कार्यक्रमच असे. घरातले सगळेच जण त्याला नाना तर्हेनं उठवायचा प्रयत्न करत. पण पिकासो फक्त या कुशीवरून त्या कुशीवर वळायचा. तो कोणालाच दाद द्यायचा नाही. त्यानंतर कसंबसं उठवलंच तर तो सरळ रडायलाच सुरुवात करायचा. इतका वेळ संयम बाळगलेली घरातली इतर मंडळी मग वैतागून त्याच्यावर ओरडायची आणि त्याला पकडून आंघोळीला बसवणार, तोच पिकासो हातातून निसटून पळ काढायचा आणि मग त्याच्यावर डाफरत, रागावत सगळे जण त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत. शेवटी एखादा धपाटा देऊन पिकासोची उचलबांगडी करून, कसंबसं तयार करून त्याला शाळेत पोहोचवलं जाई. बरं, हे रोजच घडायचं. पिकासो तर रोज झोपण्यापूर्वीच दुसर्या दिवशी शाळा चुकवायची कशी याचा विचार करूनच झोपायचा. शाळेत जायच्या वेळेला अनेकदा आजारी पडल्याचं तो सोंग करे. समजा, लबाडी उघडकीला आली आणि शाळेत जावंच लागलं, तर मग वर्गात त्याचं सगळं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे असे. आता शाळा सुटायला इतके तास राहिले, इतकी मिनिटं राहिली असा मनातल्या मनात जप करत करत तो ‘आता शाळा सुटणार’ या वेळेपर्यंत येई. शाळा सुटण्याच्या वेळेशिवाय पिकासोच्या डोक्यात दुसरं काहीच नसे. कधी कधी तर शाळेत जाण्यासाठी म्हणून मग ‘मला कबूतर नेऊ दिलं तरच मी शाळेत जाईन’ अशा वेगळ्या आणि विचित्र अटी आईला घालून पिकासो शाळेसाठी तयार होत असे!
पुढे पिकासोनं जे यश मिळवलं ते खरं पाहता त्याच्या शिक्षकांसाठी एक धक्कादायकच गोष्ट ठरली. कारण वयाच्या दहाव्या वर्षी पिकासोनं शाळा सोडली होती. त्याला लिहितावाचताना खूप अडचण यायची. त्याला काही केल्या मुळाक्षरं लक्षातच राहात नसत. गंमत म्हणजे ए,बी,सी,डी ही मुळाक्षरं कोणत्या क्रमानं म्हणायची हे काही केल्या त्याला जमत नसे. गणिताचा आणि पिकासोचा तर छत्तीसाचा आकडा होता. शाळा कितीला सुटते तो आकडा मात्र त्याला बरोब्बर कळायचा. बस्स! पिकासोला वेगवेगळ्या गोष्टींचे आकार डोळ्यात साठवून घेण्याची सवय लागली होती. त्यामुळे ते आकडे, ती अक्षरं आणि त्या वस्तू या सगळ्या गोष्टी त्याच्या दृष्टीनं आकारच होते. त्यामुळे एकदा एखादी गोष्ट बघितली की तो ती गोष्ट जशीच्या तशी कागदावर उतरवू शकायचा. चिनी अक्षरलिपी जेव्हा पिकासोनं बघितली तेव्हा तो इतका खुश झाला, की आपण चीनमध्ये असतो, तर किती बरं झालं असतं असं त्याला वाटायला लागलं.
अशा कलावंतांची आयुष्य बघितली की वाटतं, अरे ही सगळी मंडळी तर तुमच्याआमच्यासारखीच होती. पण ती जगप्रसिद्ध झाली ती त्यांच्याकडे असलेल्या अलौकिक प्रतिभेमुळे, कलेच्या देणगीमुळे! तसंच कलेसाठी त्यांनी आपलं आख्खं आयुष्य वाहिलं, कितीही संकटं आणि अडचणी आल्या तरी आपली वाट सोडली नाही. अशा कलावंतांपुढे आपण नतमस्तक झालो नाही तर नवलंच!
दीपा देशमुख
Add new comment