नव्या रुपातलं ‘कॅनव्हास’, मनोविकास आणि मी!

नव्या रुपातलं ‘कॅनव्हास’, मनोविकास आणि मी!

गेले काही दिवस खूपच धावपळीचे गेले. कबूल केल्याप्रमाणे लेख, नव्या पुस्तकांवरचं काम आणि व्याख्यानांचे कार्यक्रम यात रोजचा दिवस कुठे जातो कळतच नाही. यात एक महत्त्वाची गोष्ट राहूनच जातेय हे लक्षात आलं. ती म्हणजे नव्या आकर्षक देखण्या रुपातलं आमचं ‘कॅनव्हास!’ २५ एप्रिल २०१५ साली मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलेलं हे आमचं ६०८ पानी चित्र-शिल्प कलेचा इतिहास आणि चित्र-शिल्पकार यांचं आयुष्य यावरचं पुस्तक! या पुस्तकाला देखणं करण्यासाठी गिरीश सहस्त्रबुद्धे या चित्रकार मित्रानं आणि मनोविकासचे आशिश पाटकर, अरविंद पाटकर आणि गणेश दिक्षितसह संपूर्ण टीम यांनी खूपच परिश्रम घेतले. या पुस्तकाचं ले-आऊट चांगलंच असायला हवं, यात रंगीत चित्रं हवीच, याचा कागद चांगल्या प्रतीचा असायलाच हवा, हे बुकबाउंडच असायला हवं, असा निश्चय त्यांनी केला होता.

माझ्या मनातलं स्वप्न आणि या सगळ्यांनी या पुस्तकाला वास्तवात आणायला केलेलं साहाय्य, यामुळे हे पुस्तक दिसायला खरोखरंच देखणं झालं. पहिल्याच वर्षांत ५ आवृत्या प्रसिद्ध झाल्या आणि संपल्या. ज्यांनी ज्यांनी वाचलं, त्यांनी फोन करून, मेल करून, मेसेज करून कौतुक केलं. याची प्रस्तावना सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रकार अमोल पालेकर यांची आहे. बाबा यानेके अनिल अवचट आणि जगप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांची मोलाची प्रतिक्रिया आहे.

'तुमचे आमचे सुपरहिरो' या मालिकेतल्या माझ्या स्वतंत्र ५ पुस्तकानंतरचं कॅनव्हास हे मी अच्युत गोडबोले यांच्याबरोबर लिहिलेलं पहिलं पुस्तक! आणि तेही इतकं मोठं! हे पुस्तक लिहिताना अक्षरशः झपाटल्यासारखं झालं होतं. प्रत्येक कलाकार अभ्यासताना त्याचं वेगळेपण समोर येत होतं. त्याच्या आयुष्यानं, त्याच्या कार्यानं, त्याच्या कलेनं मन स्तिमित होत होतं. जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या आणि एनसीपीए इथल्या मुंबईतल्या चकरा आणि तिथल्या ग्रंथालयात रोज १० ते ५ हा वेळ पुस्तकासाठी व्यतीत केलेला आठवत होता....या कलाकारांनीच मला ‘घाबरू नकोस, आमची भाषा तुला समजेल, फक्त आधी आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न कर’ असंच जणूकाही मला म्हटलं असावं. कारण इंग्रजीतून वाचन करायला घाबरणारी मी 'कॅनव्हास'च्या वेळी १०० ते १२० पुस्तकं इंग्रजीतून वाचावी लागली. ती समजून घेताना व्हॅन गॉग, मायकेलअँजेलो, लिओनार्दो दा व्हिंची, तुलूझ लॉत्रेक, पॉल गोगँ, पॉल सेझान, पिकासो, रेम्ब्राँ, रोंदँ, सॉल्वेदार दाली, पॉल क्ली, टर्नर, हेन्री मातीस किती किती कलाकार समोर येत गेले आणि आपल्या कहाण्या सांगत बसले. भाषेचा अडसर त्यांनीच तर दूर केला. त्यांच्यातलं झपाटलेपण, त्यांच्यातली चिकाटी आणि त्यांच्यातलं मनस्वीपण हळूहळू अंगात भिनत गेलं आणि 'कॅनव्हास' आकाराला आलं.

अर्थातच, या सगळ्या लिखाणात अच्युत गोडबोले यांचं मोलाचं स्थान आहेच आणि होतंच. त्यांच्यामुळे या विषयाला हात घालण्याची संधी मिळाली, त्यांचं बोट पकडून कलेच्या या प्रांतात प्रवेश करता आला, त्यांच्याकडून कसा अभ्यास करावा, कसं सोपं करून सांगावं आणि तरीही सगळं कसं सकस आणि सशक्त असावं याचे धडे मिळाले. ग्लास अर्धा रिकामा असलेला बघण्यापेक्षा भरलेला बघायची सवय याच माणसामुळे लागली. प्रत्येक गोष्टीतल्या उणिवा, कमतरता आणि दोष बघण्यापेक्षा चांगलं घेऊन पुढे जावं हेही मी या काळात त्यांच्याकडूनच शिकले.

'कॅनव्हास'विषयी खूप बोलावं वाटतंय, पण पुढल्या टप्प्यात बोलेनच. यावेळी महत्त्वाचं बोलायचं आहे ते आशिश आणि रीना यांच्याबद्दल! आशिशला प्रकाशन व्यवसायात घडत जाताना मी अनेक वर्षांपासून बघतेय. ज्या कष्टानं तो इथंपर्यंत पोहोचलाय, त्यानं आपल्या अंगात जे गुण विकसित केलेत त्याबद्दल त्याचं खरंच कौतुक! सुरुवातीला आमच्यात मतभेद देखील होत असत. माझ्या मनात एक असे, तर त्याच्या मनात एक! मग आम्ही एकमेकांची मतं कशी बरोबर आहेत हे ठासून सांगायचा प्रयत्नही करायचो. मात्र हळूहळू हे कधी बदलून गेलं कळलंच नाही. सहवासानं, एकमेकांना समजून घेण्यानं प्रेम वाढतं तसं मतभेदाचे मुद्दे कधी विरले कळलंच नाही. उलट कधी कधी माझ्यापेक्षाही आशिश मोठा होतो आणि मला काही सांगून जातो. त्याचं हे आत्मविश्वासानं, समंजसपणे वाटचाल करत असलेलं रूप बघणं हा आनंदाचा भाग आहे. सोबत रीना असते. आशिशची गोड बायको! त्याच्या म्हणजेच मनोविकासच्या सगळ्या कामात साहाय्य करणारी! आता आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मी वेळोवेळी सांगीतलीये, पण पुन्हा सांगावीच वाटते. आणि दरवर्षी सांगेन. माझ्या प्रत्येक वाढदिवसाची छानशी साडीची भेट आशिश आणि रीना यांच्याकडून असतेच असते. आणि आता तर त्यांनी मला ती वाट बघायचीही सवय लावलीय. वाढदिवस जवळ आला की मी आशिश आणि रीना यांच्या फोनची वाट बघायला लागते. एकदा तर मी फेसबुकवरची पोस्ट टाकलेली बघताच, म्हणजे आशिश आणि रीना यांनी मला सुरेख साडी कशी गीफ्ट दिली याचं रसभरीत वर्णन आणि फोटो टाकताच, ताबडतोब आशिश पाटकरसाठीचे फोन सकाळपासून खणखणायला लागले. प्रत्येक फोनवर त्याला ओळखणार्‍या, त्याच्या ऑफीसमध्ये काम करणार्‍या अशा अनेक स्त्रियांचे ते फोन होते. प्रत्येक जण त्याला आपला वाढदिवस कधी आहे हे आवर्जून सांगत होती. आशिशला काहीच कळेना. अखेर त्याला फेसबुकवरची माझी पोस्ट वाचून उलगडा झाला. मला फोन करत तो म्हणाला, 'दीपामॅडम, आता इतक्या सगळ्यांचे वाढदिवस कसे करावेत मला कळत नाहीये. तुम्ही अशी पोस्ट का टाकलीत हो?’ मी गमतीनं म्हटलं, ‘आशिश, काळजी करू नकोस. आपण प्रकाशनसंस्था बंद करून ‘मनोविकास साडी सेंटर’ टाकू या. किती जणींना वाढदिवस करायचे असतील त्यांना डिस्काउंटमध्ये साडी देऊयात.’ हा झाला गमतीचा भाग, पण असा स्नेह, असं प्रेम आणि असं नातं वृद्धिंगत होत जाणं मी खरोखरंच भाग्य समजते. त्यामुळेच आज 'कॅनव्हास' जेव्हा आणखी नव्या रुपात मनोविकासनं प्रसिद्ध केलंय, तेव्हा आशिश आणि रीना यांनी भेट दिलेल्या कांचिपुरम साडीनंच तो आनंद व्यक्त करावा वाटला. थँक्यू आशिश आणि रीना! प्रतीक्षा पुढल्या वाढदिवसाची!

दीपा देशमुख, पुणे

deepadeshmukh7@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.