कॅनव्हास, विज्ञानवेडा संजय पुजारी आणि आठवीचा धडा!
'बाहेरून माणूस कसा दिसतो आणि त्याच माणसाच्या अंतर्मनात काय चाललंय या दोन्ही गोष्टीं चित्रात उतरवण्याचं प्रभुत्व कलावंताला साध्य करावंच लागतं! या दोन्ही गोष्टी ज्या कलावंताला साध्य होतात त्याला श्रेष्ठ दर्जाचा कलावंत म्हणतात.’ हे उद्गार आहेत कलावंताचं हृदय, शास्त्रज्ञाची जिज्ञासा आणि तंत्रज्ञाचं कौशल्य असलेल्या अशा एका बुद्धिमान जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची याचे! चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ या सगळ्या भमिका एकाच वेळी निभावणारा रेनायसांससारख्या बहरत्या प्रबोधन काळातला कलावंत म्हणजे लिओनार्दो दा व्हिंची! लिओनार्दोनं काढलेल्या ‘मॅडोना ऑन दी रॉक्स’, ‘लास्ट सपर’ आणि ‘मोनालिसा’ यासारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगभर अजरामर झालं. चित्रासाठी तैलरंगांचा वापर करणारा तो पहिला इटालियन चित्रकार होता असं मानलं जातं.
लिओनार्दोनं अनेक यंत्रंही तयार केली, त्यांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले. पण समलिंगत्वाच्या ठपक्यामुळे त्याचं आयुष्य खूपच काळवंडलं होतं. लिओनार्दो एक उत्तम चित्रकार तर होताच, पण त्याचबरोबर तो एक चांगला लेखकही होता. त्यानं १४९२ साली लिहिलेली टिपणं १७९७ साली प्रकाशित झाली. लिओनार्दोनं एकूण दहा हजार पानं लिहिली. त्यापैकी आज ७००० पानं उपलब्ध आहेत. यात प्रकाशविज्ञान (ऑप्टिक्स), आवाजविज्ञान (अकौस्टिक्स), मेकॅनिक्स, हैड्रोलिक्स, उड्डाण (फ्लाईट), ख्रगोलशास्त्र (अॅस्ट्रॉनॉमी), शस्त्रं (वेपनरी) आणि शरीरविज्ञान (अॅनॉटॉमी) यांच्याविषयीचं त्याचं संशोधन, विचार आणि इतर माहितीही त्यानं टिपली होती. लिओनार्दोच्या मृत्यूनंतर लिओनार्दोच्या टिपणांपैकी कित्येक टिपणं नष्ट झाली, त्याची सगळी टिपणं जर सापडली असती, तर केप्लर, गॅलिलिओ आणि न्यूटन यांचं संशोधन आणि एकूणच विज्ञानाची प्रगती यांच्यावर त्यांचा प्रचंडच प्रभाव पडला असता असं आज मानलं जातं. लिओनार्दोनं संगीताचं शिक्षणही घेतलं होतं. ल्यूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाक्बगार होता. घोड्याची कवटी आणि एडक्याची शिंगं वापरून त्यानं ल्यूट बनवण्याचा एक वेगळाच प्रकार शोधून काढला होता. आयुष्यातलं कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नसे. त्यानं संगीताविषयीही लिखाण केलं. मात्र त्याची संगीतरचनेची हस्तलिखितं काळाच्या ओघात हरवली. तसंच त्याची अनेक चित्रं आणि शिल्पंही गहाळ झाली. शिल्पकलेतले त्याचे संकल्प कधीच पूर्ण झाले नाहीत. त्याच्या नोंदवह्या बरीच वर्षं अंधारातच राहिल्या. आज आपण हेलिकॉप्टर बघतो. लिओनार्दोच्या नोंदवह्यात अशाच प्रकारच्या हेलिकॉप्टर्संची अनेक रेखाटनं आणि गणितं बघायला मिळतात! कला आणि विज्ञान यातला संबंध, नदीच्या प्रवाहात येणार्या अडथळ्यांचा तिच्यावर होणारा परिणाम, नदीवर पूल बांधण्यासाठीच्या सूचना, चंद्रावर पडणारा सूर्याचा प्रकाश अशा वैज्ञानिक दृष्टिकोनातल्या अनेक नोंदी लिओनार्दोत ‘कोडेक्स लाइसेस्टर’ या वहीत करून ठेवल्या होत्या. कम्प्युटर क्षेत्रातल्या बिल गेट्स या मायक्रोसॉफ्टच्या उद्योगपतीनं लिओनार्दोच्या ‘कोडेक्स लाइसेस्टर’ नावाच्या एका वहीसाठी तीन कोटी डॉलर्स रक्कम मोजून ती खरेदी केली! या वहीत कला आणि विज्ञान यांच्यातला संबंध आणि वैज्ञानिक प्रक्रियेमधली सर्जनशील माहिती लिओनार्दोनं नोंदवली. त्यानंतर मात्र बिल गेट्सनं ती वही लोकांसाठी प्रसिद्ध केली. इतकंच नाही, तर बिल गेट्सनं कोडेक्स लाइसेस्टरची पानं स्कॅन करून ती कम्प्युटरसाठी स्क्रीनसेव्हर म्हणून लोकांना सीडीद्वारे उपलब्धही करून दिली.
लिओनार्दो जिवंत असेपर्यंत संशोधक, वैज्ञानिक आणि साहित्यिक ही त्याच्यातली रूपं लोकांना कळलीच नाहीत आणि एवढंच नव्हे तर आजही त्याच्या प्रतिभेची पूर्णपणे उकल झालेली नाही. त्याच्या वह्यांमधल्या अनेक गोष्टींवर आजही अनेक तज्ज्ञ अभ्यास करताहेत. असा हा चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा लिओनार्दो दिसायलाही अत्यंत देखणा होता. त्याचं भरदार, ताकदवान आणि पीळदार शरीर, धारदार नाक, उंचापुरा बांधा, तीक्ष्ण नजर, मानेवर रुळणारे सोनेरी केस, पिळदार मिशा आणि गळ्यापर्यंत रुळणारी दाढी यांनी तो अत्यंत आकर्षक दिसे. लिओनार्दो म्हणजे जणुकाही एक चालतं बोलतं शिल्पच आहे असं लोकांना त्याच्याकडे पाहून वाटे. तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे आणि इतरांशी वागताना प्रेमानं मिळून मिसळून वागत असे. जगातली विषमता पाहून लिओनार्दोला दुःख होई. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टींबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता. ‘वन्य पशूतला सगळ्यात व्रूर प्राणी म्हणजे युद्ध करणारा माणूस’ असं तो म्हणे. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला फाशीला नेत असताना त्याच्या चेहर्यावरच्या वेगवेगळ्या भावना त्यानं प्रत्यक्ष तिथे थांबून चित्रित केल्या होत्या.
लिओनार्दोच्या अनेक कलाकृती अर्धवट राहिल्या होत्या. लिओनार्दो एक कुशल इंजिनियर असल्याचं सिद्ध करणारे अनेक प्रकल्प केवळ कागदावरच राहिले. लिओनार्दोची अमर्याद स्वप्नं होती, पण ती पुरी करण्यासाठी त्याच्यातल्या माणूस असण्याची मर्यादा आड येत होती. त्याबद्दलही त्याला खूप वाईटही वाटे. 'कॅनव्हास' या आमच्या पुस्तकातला हा काही भाग! खरं तर याविषयी लिहीन असं कालच मी ठरवलं होतं आणि आत्ताच मोबाईल खणाणला. विज्ञानवेडा शिक्षक संजय पुजारी यांचा फोन होता.
खरं तर संजय पुजारी या तरुणाला विज्ञानानं झपाटून टाकलं आहे. विज्ञानाशिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही आणि सुचतही नाही. नुकतीच त्याची बदली एका छोट्याशा गावात झाली असून अवघ्या १५ दिवसांपूर्वी हा माणूस तिथं रुजू झालाय. मुलांशी त्याचे सूर फार पटकन जुळतात. सहजपणे त्यानं मुलांचं मराठीचं पुस्तक हातात घेतलं आणि त्यात धडा होता ः लिओनार्दो दा व्हिंची! लेखकाच्या ठिकाणी आमची नावं वाचून संजय हरखला. त्यानं चक्क मुलांना हा धडा शिकवला. मुलं खुश झाली, तसं संजयनं ‘तुम्हाला या धड्याच्या लेखिकेशी बोलायचंय का?’ असं विचारताच, मुलं आनंदात एकासुरात ‘हो.....’ म्हणाली. संजयनं मला फोन लावला. आज फोन सायलेंट वर न ठेवल्यानं मी तो लगेचच उचलला. मुलांशी बोलत गेले. आता धडा आवडलाच आहे तर कॅनव्हास मधला मोठा धडा वाचा असंही सांगितलं. मुलांनी कबूल केलं. इतकंच नाही तर संजय पुजारी यांनी आपणच आता शाळेत कॅनव्हास घेऊन जाऊ असंही सांगितलं. गावागावातल्या मुलांपर्यंत जगप्रसिद्ध वैज्ञानिक, तंत्रज्ञ, संशोधक, कलाकार पोहोचवण्याचं काम शिक्षकच करू शकतात आणि यात बालभारतीनं आमचा हा भाग निवडल्यामुळे मुलांपर्यंत पोहोचला. या दोघांचेही आम्ही मनापासून आभारी आहोत. तसंच मनोविकास प्रकाशनाचेही आभार! (नव्या आवृत्तीचं आगमन होताच आशिश आणि गणेश यांनी ताजी ताजी प्रत माझ्या हातात ठेवली होती. त्यांचेही फोटो टाकत आहे.) मुलांनी शाळेत यायचं आग्रहाचं निमंत्रण दिलंय. तसंच त्यांनी बसवलेलं विज्ञानाचं नाटक बघायलाही बोलावलंय. यापेक्षा मोठा आनंद दुसरा कुठलाच असू शकत नाही.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment