डॉ. ज्ञानेश्वर मुळे - पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया
एक गोष्ट सांगायचीये आज
गोष्ट नाही राजाची किंवा राणीची
ना राजपुत्राची किंवा शूर सरदाराची
गोष्ट आहे एका माणसाची
माणसातल्या माणुसपणाची!
मला पहिल्यांदा भेटला तो, मुळी रणरणत्या उन्हात
सायकलवरनं जात असताना वाटेत सापडलेली नाणी
वेचित चालला होता.....
पोटातल्या भुकेला समजावत होता,
की आता थोडाच वेळ धीर धर,
या मिळालेल्या पैशात
वडापाव नक्कीच खाता येईल
तेवढ्यात आपले रस्त्यात हरवलेले पैसे शोधणारी वृद्धा दिसताच
आपल्या पोटातल्या उसळलेल्या भुकेकडे दुर्लक्ष करून
तिचे पैसे तिच्या स्वाधीन करत, तिला तिच्या इच्छित स्थळी
सायकलवर बसवून सोडणारा.....
त्यानंतर मला पुन्हा तो भेटला, त्याच्या शाळेत
खोडकर, खट्याळ,
बाईंना सतवणारा...
पण आपल्यामुळे त्याच बाईंना त्रास होतोय कळताच
अपराधी भावनेनं ग्रस्त होऊन आजारी पडणारा.....
त्यानंतर दिवस-रात्र एक करून त्याच बाईंची
स्वप्नं खरी करण्यासाठी
सानेगुरूजींच्या गोष्टीतला
धडपडणारा मुलगा होणारा...
मला भेटला तो पुन्हा एकदा....
मर्ढेकर, अनिल, नारायण सुर्वे,
यांच्या वाटेवरून चालताना....
फुले, आगरकर, शाहू आणि आंबेडकरांच्या
विचारांची कास धरून चालताना....
किती वेळा भेटला मला तो...
गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश,
नव्हे देशाच्या सीमा ओलांडून
पार सातासमुद्रापलीकडे
मी बघितले त्याचे परिश्रम....
त्या त्या देशांत राहून
त्या देशाची भाषा शिकतांना....
मी बघितली त्याची चिकाटी,
त्यांच्यातला एक होऊन
तिथल्या भूमीचं मनोगत मांडताना
मी बघितला त्याच्यातला उत्साह, त्याची उमेद
त्या प्रत्येकाच्या दारी जाऊन
त्याच्या अडचणी समजून घेताना....
मी बघितली त्याची भरारी, आकाशाच्या सीमाही
ओलांडून जाताना
त्याचं काम, त्याचा ध्यास, त्याची स्वप्नं, त्याची सर्जनशीलता
सार्यांनाच त्यानं लावलेत पंख
क्रियाशीलतेचे
या माणसाची गोष्ट वाचताना,
मला मात्र भावला
त्याच्यातला विश्वाला जोडू पाहणारा,
माणुसकी जपणारा
एक सुंदर मनाचा माणूस
या सुंदर मनाच्या, प्रफुल्लित, ताजं, टवटवीत तरूण मन असलेल्या माणसाचं नाव ज्ञानेश्वर मनोहर मुळे! ज्ञानेश्वर मुळे आज दिल्ली इथल्या विदेश मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते एक लेखक आहेत, कवी आहेत, स्तंभलेखक आहेत, विचारवंत आहेत आणि एक डिप्लोमॅटही आहेत. ज्ञानेश्वर मुळे यांची कारकिर्द बघितली तर अवाक् व्हायला होतं. एसएससीमध्ये पुणे बोर्डातून संस्कृत विषयात ते राज्यात सर्वप्रथम आले आणि जगन्नाथ शंकरशेठ या अतिशय मानाच्या शिष्यवृत्तीनं सन्मानित झाले. मुंबई विद्यापीठातून पर्सोनेल मॅनेजमेंट या विषयात १९८१ साली त्यांनी मास्टर डिग्री मिळवली आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ते १९८३ साली भारतीय विदेश सेवेत रुजू झाले. दिल्लीत वाणिज्य मंत्रालयात अपर सचिव, जपानमध्ये तोक्यो (टोकियो) इथं द्वितीय सचिव, रशिया इथं मॉस्कोच्या दूतावासात प्रथम सचिव, जपानमध्ये पुन्हा एकदा दूतावासात प्रथम सचिव आणि कौन्सुलर म्हणून कार्यभार सांभाळला. दिल्लीतल्या वित्त मंत्रालयात निदेशक म्हणून काम करत असताना दिल्लीत मेट्रो सुरू व्हावी यासाठी जपानकडून वित्तीय मदत मिळवण्यात हातभार लावला. मॉरिशस इथं उपउच्चायुक्त, दमास्कस आणि सिरिया इथलाही पदभार सांभाळला, मालदीव इथं भारताचे उच्चायुक्त म्हणून काम बघितलं, सुरक्षा संबंधात भरघोस कामगिरी करत तिथे भारतीय सांस्कृतिक केंद्राची स्थापना केली. अमेरिकेत न्यूयॉर्क इथं भारताचे कॉन्सूल जनरल ऑफ न्यूयॉर्क हा पदभार, तिथे संपन्न झालेल्या मॅडिसन स्केअर गार्डन कार्यक्रमाचं संयोजन यशस्वीरीत्या पार पाडलं, इतकी सगळी मोठमोठी पदं सांभाळत असताना केंद्र सरकारच्या अनेक योजना आपल्या महाराष्ट्रात याव्यात यासाठी प्रयत्नशील राहिले!
ज्ञानेश्वर मुळे हे केवळ उत्तम प्रशासकीय अधिकारीच नाहीत, तर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधून १५ पेक्षा जास्त पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलं आहे. त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे उर्दू, अरेबिक आणि इतर भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. गेल्या शतकातल्या १०० सर्वश्रेष्ठ पुस्तकामध्ये त्यांच्या ‘माती, पंख आणि आकाश’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचा समावेश झाला आहे आणि हे पुस्तक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामील केलं गेलं आहे. अनेक मासिकं, तसंच महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ आणि लोकमत अशा नामांकित वर्तमानपत्रांत त्यांनी सातत्यानं स्तंभलेखन केलंय आणि आजही करत असतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून वाचनसंस्कृती वाढावी यासाठी ते कायम प्रयत्न करत असतात. त्यांनी अनेक वाचनालयं, क्रीडा मंडळं सुरु व्हावीत यासाठी पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर जिल्हयातल्या अब्दुल लाट या त्यांच्या जन्मगावी ५० अनाथ मुलांसाठी त्यांनी ‘बालोज्ञान’ सुरू केलं आहे.
ज्ञानेश्वर मुळे हा माणूस इतका साधा आहे आणि तो कुठल्याही वयोगटात पटकन जाऊन सामील होऊ शकतो. आपली प्रतिमा, आपला हुद्दा आणि आपला स्तर या कशाचाही विचार हा माणूस लोकांमध्ये मिसळताना करत नाही. आणखी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे एक निरागस मन ज्ञानेश्वर मुळे या माणसात बघायला मिळतं. हा माणूस कोणाविषयीच पूर्वग्रह बाळगत नाही. (जजमेंटल नाही.) तसंच हा इतका सकारात्मक विचार करणारा आहे की याला समोरच्यामध्ये काही वाईट किंवा नकारात्मक दिसतच नाही.
जगभरातलं कामानिमित्त फिरणं, कामाची व्यस्तता, कामातले अनेक ताण-तणाव यांच्याशी सामना करत असतानाही ज्ञानेश्वर मुळे या माणसानं स्वतःमधलं संवेदनशील मन जपलं आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दांमधून कविता अवतरतात. त्यांच्या लेखांमधून मालदीव, जपान, सीरिया, रशिया, अमेरिका असे देशही आपलं दर्शन घडवतात. आपलं काम करत असताना हा माणूस आपल्या कार्यालयाच्या खिडकीतून दिसणारे मोर न्याहाळत असतो, आपल्या कॅमेर्यात आणि आपल्या मनात त्यांना टिपून घेत असतो. ज्ञानेश्वर मुळे यांचं आयुष्य आणि काम यावर आधारित ‘जिप्सी’ नावाचा माहितीपट युनिक अॅकॅडमीनं काढला असून याचं दिग्दर्शन धनंजय भवलेकर यांनी केलंय. या माहितीपटानं दिल्ली इथं भरलेल्या इंटरनॅशनल माहितीपटांच्या महोत्सवात स्पेशल ज्यूरी अॅवार्ड प्राप्त केलं. २०१६ साली त्यांना महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी या संस्थेतर्फे पुणे शहरात ‘नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं. पतियाला सरकारनं त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल म्हणून त्यांचं छायाचित्र असलेलं टपालतिकीटही काढलं.
आकाशात उंच भरारी घेतलेल्या ज्ञानेश्वर मुळे यांची सुरूवात मात्र अतिशय चिमुकल्या खेडेगावातून झाली.
गावातलं वातावरण त्यांच्यावर संस्कार करत होतं. गावातली जातव्यवस्था त्यांना कळत चालली होती. ज्ञानेश्वरचे वडील, काका प्रवचन करायचे, त्यातून समतेचा संदेश द्यायचे. पण असं असतानाही गावातल्या देवळात मात्र महारांना प्रवेश नसायचा. त्या वयातही ज्ञानेश्वर मुळेंच्या मनात प्रश्नांनी गर्दी केली, आपण मोठं झाल्यावर असं जात-पात, गरीब-श्रीमंत असा भेदभाव करत कधीहावागायचं नाही हे त्यांनी पक्वं ठरवलं.
चार गावांमधून संयुक्तपणे झालेल्या चौथीच्या परीक्षेत ज्ञानेश्वर मुळे पहिले आले आणि कोल्हापूरच्या विद्यानिकेतन या निवासी शाळेत पुढल्या शिक्षणासाठी त्यांची निवड झाली. कोल्हापूरची ही शाळा महात्मा फुले आणि शाहू महाराज यांची स्वप्नं खरी करण्यासाठीच जणू काही स्थापन करण्यात आली होती. शाळेचं वाचनालय खूपच समृद्ध होतं. फुले, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि शाहू महाराज यांच्या जीवनावरची पुस्तकं याच वाचनालयातून मुळे यांनी वाचून काढली.
एकदा शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शरद काळे शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. फळ्यावर लिहिलेल्या त्यांच्या नावापुढे आयएएस असं लिहिलं होतं. तसंच स्पर्धात्मक परीक्षेत महाराष्ट्र मागे का अशा विषयावर त्यांचं भाषण होतं. ज्ञानेश्वर मुळेंना त्या आयएएस शब्दाचा अर्थ त्या वेळी कळला नव्हता. त्यांनी खूप सोप्या शब्दात आयएएस (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा भारतीय प्रशासकीय सेवा) याविषयी माहिती दिली. ‘मनात ठाम निश्चय आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर कोणीही आयएएस होऊ शकतो’ असं ते म्हणाले. त्या रात्री झोपेतही शरद काळे आणि त्यांचं भारावून टाकणारं भाषण मुळेंच्या डोळ्यासमोर येत राहिलं. स्वप्नात दिसणार्या फळ्यावर त्यांना ज्ञानेश्वर मुळे, आयएएस असं दिसत राहिलं. आपणही आयएएस व्हायचं आणि आपलं स्वप्नं खरं करायचं असं मुळेंनी ठरवलं.
शाळेतली सात वर्षं भुर्रकन उडाली.
कोल्हापूरला ज्ञानेश्वर मुळेंनी महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. खेडेगावातून गरिबीशी संघर्ष करत आलेली अनेक मुलं इथं होती. कोल्हापूरला शाहू महाराजांच्या पुढाकारानं अशा गरीब होतकरू आणि हुशार मुलांसाठी शिक्षणाची खूप चांगली व्यवस्था केली होती. खेडेगावातून आलेल्या मुलांमधला न्यूनगंड, इंग्रजी येत नसल्यानं मनातली कमीपणाची भावना, शहरी मुलांसारखे टापटीप कपडे नसणं अशा अनेक गोष्टी या मुलांना शहरी मुलांपासून वेगळं करत. अशा वातावरणात ज्ञानेश्वर मुळे शिकत होते आणि अनेक गोष्टी शिकत होते. निरोगी शरीरातच निरोगी मन वास करतं हे त्यांना व्यायामानं शिकवलं. वर्क्तृत्व, कथाकथन, काव्यस्पर्धा अश अनेक स्पर्धांमधून ज्ञानेश्वर मुळे भाग घेऊ लागले आणि त्या त्या स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यशही मिळवू लागले.
या काळात ज्ञानेश्वर मुळेंनी श्री. म. माटे, अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ, अरूण कांबळे, बाबुराव बागूल आणि अनेक मराठी दलित लेखक यांनी लिहिलेलं लिखाण अधाशासारखं वाचून काढलं. त्यातही बागुलांचं ‘जेव्हा मी जात चोरली’ आणि नारायण सुर्वे यांची ‘माझे विद्यापीठ’ ही कविता त्यांनी वाचली, तेव्हा त्यांचा प्रचंड असा प्रभाव त्यांच्या जगण्यावर पडला. याच काळात नाथ माधव, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, कोल्हटकर, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, पु. शि. रेगे, खानोलकर, ना. सि. फडके, आचार्य अत्रे, जयवंत दळवी, बाबुराव अर्नाळकर, चंद्रकांत काकोडकर असे अनेक लेखक ते वाचले गेले. यातूनच बर्यावाईट लिखाणाची समज येत गेली. त्यांच्यातला वाचक या प्रक्रियेतून घडत गेला.
महाविद्यालयीन बीएचं शिक्षण पूर्ण होताच ज्ञानेश्वर मुळे यांनी कोल्हापूर सोडलं आणि मुंबईचा रस्ता धरला. या काळात त्यांनी एमपीएससी (महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन- महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा दिली आणि त्यात ते उत्तीर्ण झाले. डेप्युटी कलेक्टर (उपजिल्हाधिकारी) म्हणून त्यांची पुण्यात नियुक्तीही करण्यात आली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन- केंद्रीय लोकसेवा आयोगाची) परीक्षा देण्याची तयारी सुरू केली आणि त्यातही नेत्रदीपक यश मिळवलं. आयएएस (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस) होताच लहानपणी स्वप्नात बघितलेला आयएएस आणि ज्ञानेश्वर मुळे हा बोर्ड त्यांच्या डोळ्यासमोर कितीतरी वेळ झळकत राहिला. तेव्हाच्या त्या तरूण तडफदार आयएएस अधिकारी शरद काळे यांची त्यांना तीव्रतेनं आठवण आली.
एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठी पात्र असण्यासाठी भारतीय नागरिक असणं आवश्यक असतं. तसंच तुम्ही पदवीधर असणंही आवश्यक असतं. वयाची २१ वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात. या परीक्षांसाठी ठरवलेला अभ्यासक्रमही असतो. त्यानुसार परीक्षा घेतल्या जातात. भारत सरकारच्या केंद्रीय आयोगाच्या (यूपीएससी) या परीक्षेत आयएएस (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस), आयएफएस (इंडियन फॉरेन सर्व्हिस) आणि आयपीएस (इंडियन पोलिस सर्व्हिस) अंतर्भूत असतात.
कोल्हापूरमधून अनेक वर्षांनी कोणीएक ज्ञानेश्वर मुळे- नामक व्यक्ती आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. भारताचे त्या वेळचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या दसरा चौकात ज्ञानेश्वरचा प्रचंड मोठा सत्कार झाला. आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होताच ज्ञानेश्वर मुळे प्रशिक्षणासाठी मसुरी इथं दाखल झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांसाठी प्रत्यक्ष नोकरीत रुजू होण्यापूर्वी उत्तर प्रदेशातल्या मसुरी या थंड हवेच्या ठिकाणी लाल बहादूर शााी राष्ट्रीय अॅकेडमी इथं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणासाठी देशभरातले उत्तीर्ण विद्यार्थी इथं बोलावले जातात. त्यांना ग्रामीण भागातल्या लोकांच्या जगण्याविषयी, त्यांच्या समस्यांविषयी सजग केलं जातं.
त्यानंतर ज्ञानेश्वर मुळे यांची पहिलीच नियुक्ती जपान या देशामध्ये झाली. जपाननंतर रशिया, मालद्वीव, मॉरिशस, सीरिया, दमास्कस अशा अनेक देशांत या जिप्सीची भटकंती झाली. प्रत्येक देश वेगळा, तिथली भाषा वेगळी, संस्कृती वेगळी! या सगळ्यांना समजून घेणं आणि त्यातला एक होणं आणि तरीही आपल्या देशाचा आणि त्या देशाचा संवाद घडवून आणणं ही मोठी जबाबदारी ज्ञानेश्वर मुळे लीलया पेलत होते आणि पेलताहेत. खरं पाहिलं तर ज्ञानेश्वर मुळे यांच्या कामाचं स्वरूप अनेक बाबतीत गुंतागुंतीचं आहे. ज्या ज्या देशात नियुक्ती होते, त्या त्या देशात संवादाच्या माध्यमातून भारत काय आहे कसा आहे हे सांगणं, तसंच भारताचे आर्थिक, सांस्कृतिक, तंत्रान, व्यापार आणि उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले संबंध यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणं, तसंच भारताचे आणि त्या देशाचे हितसंबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर जपण्याचे प्रयत्न करणं, अशी अनेक जबाबदारीची कामं त्यांना पार पाडावी लागतात.
सुरुवातीला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणं हे ज्ञानेश्वर मुळेंसाठी फार मोठं आव्हान बनलं होतं. इतर देशांमध्ये लोकांशी संवाद साधताना खूप त्रास होत असे. त्यावर ज्ञानेश्वर मुळे यांनी आटोकाट प्रयत्न सुरु केले. हळूहळू त्यांची भीती कमी झाली आणि अखेर ते अस्खलितपणे इंग्रजीतून संवाद साधू लागले. पुढे ज्या देशात ते गेले, तिथली भाषा त्यांनी आत्मसात केली.
ज्ञानेश्वर मुळे म्हणतात, ‘प्रत्येक देशाची आपली एक वेगळी संस्कृती असते, तिथली वागण्याची पद्धत वेगळी असते. हे सगळं आपण शिकायला हवं. आपण जर बदललो नाहीत, तर त्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये संवादाचा सेतू बांधलाच जाऊ शकत नाही. जपानी हा माणूस रशियन माणसापेक्षा वेगळा वागतो. तर अमेरिकन या दोघांपेक्षा आणखीनच वेगळं वागतात. या तिन्ही देशांमधली वागण्याची आणि विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. अशा वेळी त्यांच्या चालीरीती माहीत करून घेणं, त्या आत्मसात करणं, शिकणं हे अत्यंत महत्वाचं आहे.’
ज्ञानेश्वर मुळे म्हणतात, ‘एखादी गोष्ट तुम्हाला पटलेली असेल तरच तुम्ही ती इतरांना चांगल्या तर्हेनं पटवून देऊ शकता. त्यामुळे एक डिप्लोमॅट म्हणून ही जबाबदारी खूपच मोठी आहे. आपल्या जाणिवा प्रगल्भ करणं आवश्यक असतं. आपले विचार समर्थपणे समोरच्यापर्यंत पोहोचवणं हेही एक आव्हानच ठरतं. विदेशी धोरणाच्या वेळी दोन देशांमधल्या वाटाघाटी करताना त्या दोन्ही देशांच्या हितसंबंधांना बाधा येणार नाही ना याची काळजी घेणं महत्वाचं ठरतं. विदेशात राहणार्या भारतीय लोकांच्या अनेक समस्या असतात. अशा वेळी नेमकी दाद कुणाला मागावी याबद्दल ते खूप संभ्रमित असतात. त्यांच्या वैयक्तिक अडचणी, त्यांच्या कुटुंबातल्या संपत्तीच्या समस्या अशा अनेक प्रश्नांना घेऊन ते जर आपल्याकडे आले तर त्यांच्याविषयी आपल्या मनात अनुकंपा असली पाहिजे, सहानुभूती असली पाहिजे तर आपण त्यांना त्यात मदत करू शकतो.’
गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातल्या किमान १०० कोटी लोकांना पासपोर्ट मिळालेच पाहिजेत असं स्वप्न ज्ञानेश्वर मुळे यांनी बघितलंय. हे केवळ स्वप्न न राहता त्यांनी धडाकेबाज भूमिका घेऊन ठिकठिकाणी नियोजन करून यावर भारतभर काम सुरू केलंय. पासपोर्ट म्हणजे आपलं अस्तित्व, आपली ओळख, आपलं नागरिकत्व, आपला अभिमान आणि हे सगळं आपल्याला मिळालंच पाहिजे. या भावनेतून अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी नवीन कार्यालयं उघडली. याचं कारण लोकांना आपल्या पासपोर्टसाठी दूरवरची वारी करायला लागू नये. कारण त्या अनोळखी ठिकाणी त्या गरीब जिवांची ना राहण्याची सोय असते ना जेवणाची! तसंच पासपोर्ट मिळवणं हे इतकं इतकं कठीण आणि जिकिरीचं काम समजलं जात असे की त्या प्रक्रियेला भिऊन लोक ‘नक्को रे बाप्पा’ असं म्हणून लांब पळत. त्यासाठी परदेशगमन नाही करता आलं तरी चालेल अशी अनेकांची भूमिका होती. पण ज्ञानेश्वर मुळे यांनी या प्रक्रियेतल्या क्लिष्टतेची हवाच काढून घेतली. अतिशय सुटसुटीत अशी चार कागदपत्रं असली की कोणालाही आठ दिवसांच्या आत पासपोर्ट मिळण्याची व्यवस्था केली. तसंच पोलिस व्हेरिफिकेशनची प्रक्रियाही अतिशय सुटसुटीत आणि सौजन्यशील केली. लोकांना आता पासपोर्ट मिळवणं हे एका चमत्काराइतकं चकित करणारी गोष्ट वाटू लागली. त्यांच्या या धडाकेबाज कामामुळे लोक त्यांना ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ असं म्हणायला लागले!
ज्ञानेश्वर मुळे यांच्यातल्या संवेदनशील कवीला आजूबाजूचा निसर्ग, माणसं, कलाकुसरीच्या वस्तू, प्राणी, बोलकी दृश्यं आपल्या कॅमेर्यात टिपायची आवड आहे. जातील तिथे ते आपली आवड आजमावून बघत असतात. रशियात असो, की जपानमध्ये, सीरियामध्ये असो वा मालदीवमध्ये ते ते प्रत्येक क्षण त्यांनी आपल्या कॅमेर्यात बंदिस्त केले आहेत. त्यांची देश-विदेशात प्रदर्शंनही आयोजित केली गेली. आपल्याला अमुक एक प्रकारचा कॅमेरा लागतो वगैरे ज्ञानेश्वर मुळेंची मागणी नसते. हातातला आयफोनही त्यांना पुरेसा असतो. त्यांच्यात एक कुशल चित्रकारही दडलेला आहे. ज्ञानेश्वर मुळे यांना शांतता देणारं संगीतही आवडतं. मात्र या संगीताचा आस्वाद त्यांना एकट्यानं शांतपणे घ्यायला आवडतो.
ज्ञानेश्वर मुळे यांच्यातून कवी हा वेगळा काढता येत नाही. तो त्यांच्या कणाकणात मुरला आहे. रुजला आहे. त्यांचे ‘जोनाकी’, ‘श्री राधा’, ‘ऋतु उग रही है’, ‘मन के खलिहानो मे’, ‘सुबह है की होती नही’, ‘दूर राहिला गाव’ आणि ‘स्वतःतील अवकाश’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ज्ञानेश्वर मुळे यांच्या कामाबरोबरच त्यांच्यातल्या कवीबरोबरच त्यांच्यातला लेखक देखील सतत जागा असतो. त्यामुळे ते जातील तिथलं वातावरण, माणसं आणि निसर्ग त्यांना साद देतात आणि ते या सगळ्यांत रमतात देखील. त्यांनी ‘ग्यानबाची मेख’, ‘आकाश मंडप....पृथिवी आसन...’, ‘नोकरशाहीचे रंग’, ‘माणूस आणि मुक्काम’, ‘दूर राहिला गाव’, ‘सीरिया’, ‘रशियाः नव्या दिशांचे आमंत्रण’ या पुस्तकांबरोबरच ‘माती, पंख आणि आकाश’ हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिलं आहे.
कोल्हापूरजवळच्या अवघी १५०० लोकवस्ती असलेल्या एका अतिशय लहान खेडेगावात ज्ञानेश्वर मुळे यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण झालं, पण तिथपासूनचा त्यांचा प्रवास मात्र पुढे आकाशला गवसणी घालणारा झाला. ज्ञानेश्वर मुळे यांचे देश-विदेशातले शेकडो/हजारो मित्र आहेत. मैत्रीमध्ये एकमेकांना समजून घेण्याची क्षमता असायला हवी, खोल मैत्रीत विश्वास, आदर, प्रेम इतकंच नाही तर श्रद्धाही अभिप्रेत आहे असं ते म्हणतात. मैत्रीमध्ये वय, लिंग, राष्ट्रीयता, धर्म, भाषा, शिक्षण यातला कुठलाही भेद आडवा येऊ शकत नाही. मैत्री आपलं आयुष्य संपन्न करते. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मैत्रीला संपूर्ण जगाचा कॅनव्हास आहे. जगन्मित्र ज्ञानेश्वर मुळे म्हणतात, ‘मैत्रीमध्ये एक वैश्विक सामर्थ्य आहे.’
ज्ञानेश्वर मुळे यांनी आपल्या आयुष्यात सतत आव्हानं स्वीकारली. आपल्या कामाचा आवाका विस्तारला. आपल्या मर्यादांना केव्हाच ओलांडलं. अणि हे सगळं करत असताना या माणसाचं दैनंदिन आयुष्य अतिशय साधं आहे. पाठीमागे व्यस्तता असूनही ते त्यातही आनंदाचे क्षण शोधतात. त्यांच्या बोलण्यात कुठेही उपदेशकाचा अविर्भाव नसतो. एक प्रसन्न, उत्साही आणि सगळ्या भिंती, कुंपणं आणि मर्यादा ओलांडून पुढे पुढे जात असलेली ज्ञानेश्वर मुळेसारखी व्यक्ती पाहिली की मन प्रेरित तर होतंच, पण या भिंती पार करायला, ही कुंपण भेदून पुढे जायला, या मर्यादा ओलांडून पुढे जायला आत्मविश्वास देऊन जातं!
-दीपा देशमुख, पुणे
Comments
अतिशय प्रेरणादायी
अतिशय प्रेरणादायी
Add new comment