दिवाळीत दाखल झालेले १२ जीनियस वैज्ञानिक -जनादेश दिवाळी 2015

दिवाळीत दाखल झालेले १२ जीनियस वैज्ञानिक -जनादेश दिवाळी 2015

खरं तर ‘जीनियस’ हा प्रकल्प अनेक दिवसांपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून आमच्या मनात घोळत होता! विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, व्यवस्थापन, साहित्य, चित्र-शिल्पकला, संगीत आणि समाज/राज्यशास्त्र अशा सगळ्या क्षेत्रांत ज्यांनी आख्ख्या जगाला एक वेगळा विचार करायला भाग पाडलं असे ७२ युगप्रवर्तक ‘जीनियस’ या मालिकेतून टप्प्याटप्प्यानं वाचकांसमोर आणायचं आम्ही ठरवलं. जग बदलण्याचा ध्यास घेतलेल्या या शोधकांनी आपल्या जगण्याची दिशाच बदलवली. त्यांनी आडवळणाची काटेरी वाट निवडली आणि झपाटल्यासारखे ते आपल्या ध्येयासक्तीच्या दिशेनं प्रवास करत राहिले. अशा सगळ्या ७२ ‘जीनियस’चं चरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक शोध आणि त्यामागची मूलतत्त्वं यांची सखोल ओळख करून देणारी ही अभ्यासपूर्ण मालिका अत्यंत सोप्या, सुटसुटीत, रसाळ आणि खुमासदार शैलीत १२-१२ च्या संचात येत आहे.

'कॅनव्हास’ या चित्र-शिल्प विषयावरच्या ग्रंथानंतर आम्ही जीनियस प्रकल्पावर काम करायचं ठरवलं आणि लगेचच कामाला लागलो. ७२ पैकी पहिल्यांदा कुठले १२ जीनियस घ्यावेत, प्रत्येक पुस्तिका किती पानी असावी यावर आमच्या आपसांत चर्चा सुरू झाल्या. आम्ही सुरुवातीला १२ वैज्ञानिक निवडले. खरं तर किमयागारमध्ये अनेक वैज्ञानिक असताना पुन्हा वैज्ञानिकच का निवडले असावेत असा प्रश्‍न कोणाच्याशी मनात येईल. पण किमयागारमध्ये असलेले वैज्ञानिक अतिशय संक्षिप्त रुपात आपल्याला भेटतात आणि जीनियसमध्ये भेटणारे वैज्ञानिक आपलं आख्खं आयुष्य विस्तारानं उलगडून तर दाखवतातच, पण त्यांनी लावलेले शोध याबद्दलचा प्रवासही ते आपल्याला सांगतात. तसंच किमयागारमध्ये नसलेले अनेक वैज्ञानिक जीनियसचा हिस्सा बनले आहेत. म्हणूनच आम्ही विश्‍वाच्या निर्मितीबद्दल भाष्य करणारे, सूक्ष्मजंतूंच्या जगात जाऊन पोहोचणारे आणि लाखो/करोडो लोकांना मृत्यूच्या दाढेतून वाढवणारे, अणुबॉम्बच्या निर्मितीत सहभागी असणारे असे  गॅलिलिओ पासून ते फाईनमनपर्यंत १२ वैज्ञानिक आम्ही निवडले. या वैज्ञानिकांची शोधक दृष्टी आणि त्यांनी संशोधनासाठी घेतलेला ध्यास आम्हाला अचंबित करून गेला. अपुरी साधनसामग्री आणि प्रतिकूल सामाजिक परिस्थिती असतानाही त्यांनी कच न खाता आपली दमदार पावलं पुढेच टाकली. अनेक वेळा प्रयत्न फसले तरी मार्ग बदलला नाही. छी-थू झाली, जीवलगांचे मृत्यू झाले, अपमान झाले तरीही त्यांनी हार पत्करली नाही. हे सगळं आम्हाला स्तिमित करून गेलं. 

जीनियस लिहिताना आम्हाला भेटला आधुनिक विज्ञानाचा पितामह गॅलिलिओ! समुद्री यात्रेकरूंसाठी उपयोगी कंपास, तपामापक, दुर्बिण, पेंड्युलमचं घड्याळ, खूप कमी वजन मोजण्यासाठी केलेला तराजू आणि पंप, गतीचा आणि जडत्वाचा नियम अशा अनेक गोष्टींत मूलभूत संशोधन त्यानं केलं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हटल्यामुळे त्याला आयुष्यभर चर्चच्या छळाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर समोर उभा होता आयझॅक न्यूटन! त्यानं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून आपला दरारा आपल्या मृत्यूनंतरही अनेक शतकं टिकवून ठेवला. याबरोबरच न्यूटननं लोलक, प्रकाशाचे नियम, कॅल्क्युलस, ग्रहांची भ्रमणकथा अशा अनेक गोष्टीतलं संशोधन केलं. एका लहान मुलाच्या कुतुहलानं विश्‍वातल्या गूढ गोष्टी बघा आणि ते उकलण्याचा प्रयत्न करा असं सांगणारा न्यूटन किती विचित्र आणि विक्षिप्त होता हेही जिनियस वाचताना वाचकांनाही कळेल. त्यानंतर नोबेलपारितोषिक विजेता आईन्स्टाईन E=MC2 चं सूत्र घेऊन  सापेक्षतावादाचा सिद्धांत सोप्या पद्धतीनं उलगडवून दाखवत वाचकांची भेट घेतो आहेच. अफाट बुद्धिमत्तेचा आईन्स्टाईनवर आख्ख्या जगानं प्रेम का करावं हेही जीनियस आपल्याला सांगेल. सध्या इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित अशा केंब्रिज विद्यापीठात ल्युकेशियन प्रोफेसर म्हणून मानाचं पद भूषवत असलेल्या स्टीफन हॉकिंग या वैज्ञानिकानं आपल्या असाध्य अशा अपंगत्वावर मात करून सहा वेळा डॉक्टरेट मिळवली. इतकंच नाही तर त्याचं थिऑरॉटिकल कॉस्मॉलॉजी, क्वांटम ग्रॅव्हिटी आणि ब्लॅक होल्स यांच्यावरचं संशोधन संपूर्ण जगाला चकित करणारं आहे.  

कित्येक शतकं देवीसारख्या रोगानं लाखो/करोडो लोक मृत्युमुखी पडत असतानाच एडवर्ड जेन्नर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं देवीवरची लस शोधून जगाला वाचवलं. त्याच्या प्रचंड योगदानामुळे १९८० साली संपूर्ण जगातून हा रोग नाहिसा झाला. त्यानंतर आलेला आयुष्यभर मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारा विनम्र असलेला नोबेल पारितोषिक विजेता रॉबर्ट कॉख या जर्मन वैज्ञानिकानं कॉलरा (पटकी), अँथे्रक्स, टीबी (क्षय), सिफिलीस (गुप्तरोग) आणि घटसर्प यावर अफाट संशोधन केलं आणि अनेक विकारांवर कशा पद्धतीनं संशोधन करायचं याच्या पद्धती सुचवल्या. फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असलेल्या लुई पाश्‍चर यानं हवेतल्या धुळीत अब्जावधी सूक्ष्मजीव असतात हे सिद्ध केलं आणि पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडात नळी खुपसून ती लाळ काढून घेण्याचा आणि जिवावर बेतण्याचं महाभयंकर धाडस करून कुत्र्याच्या चावण्यानं होणार्‍या रेबीजसारख्या महाभयंकर रोगावरची लस शोधली.  नोबेल पारितोषिकानं गौरवलेला ब्रिटिश सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ ऍलेक्झांडर फ्लेमिंगच्या पेनिसिलीनच्या शोधामुळे वैद्यकशास्त्रत प्रतिजैविकांचं (अँटिबायॉटिक्सचं) युगच चालू झालं आणि अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणं शक्य झालं. ‘पेनिसिलीन निसर्गानंच तयार केलं होतं. मी फक्त ते शोधून काढलं’ असं विनमपणे म्हणणारा ‘पेनिसिलीनचा जनक’ ऍलेक्झांडर फ्लेमिंग हा जीनियसही आपल्याला इथेच भेटतो.

जीनियसमध्ये भेटताहेत मेरी क्युरी आणि लीझ माइट्नर यासारख्या भौतिकशास्त्रज्ञ! भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अशा दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढत दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी मेरी क्युरी ही पहिलीच स्त्री होती. विश्‍वाच्या कल्याणासाठी झटणार्‍या जगावेगळ्या मेरी क्युरीनं आणि तिचे पती प्येर क्युरी यांनी आपल्या शोधाचं पेटंट घ्यायलाही नकार दिला होता.  किरणोत्सारी पदार्थ आणि त्यांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम यांसारख्या महत्त्वाच्या विषयांच्या मुळाशी जाऊन तिनं शोध घेतला. विसाव्या शतकातली एक श्रेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ लीझ माइट्नर हिनं किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञान यांत मूलभूत संशोधन केलं. पुरुषांची टीका, समाजाकडून पदोपदी अवहेलना आणि अपमान हे सगळं सगळं सहन करत पुढे जाणार्‍या लीझ माइट्नरला केवळ स्त्री असल्यामुळे पंधरा वेळा नामांकन होऊनही नोबेल पुरस्कार मिळाला नाही. या दोघींची भेट आम्हाला खूप अस्वस्थ करून गेली. 

तसंच ज्याला आख्खं जग अणुबॉम्बचा जनक म्हणून ओळखतं असा असामान्य बुद्धी आणि प्रतिभा असलेला अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक, व्यासंगी विचारवंत, लॉस ऍलॅमस इथल्या मॅनहटन अणुसंशोधन प्रकल्पाचा संचालक, अणुबॉम्ब निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असलेला वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि  त्यानंतरच्या काळात हायड्रोजन बॉम्बला विरोध करणारा अशा अनेक रुपात जे. रॉबर्ट ओपेनहायमर आम्हाला जीनियसच्या रुपात भेटला. जन्मानं ज्यू असला, तरी मानवता हाच धर्म मानून विज्ञानावर प्रचंड प्रेम करणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन शााज्ञ रिचर्ड फाईनमन हा आपलं अस्थिर आणि वादळी आयुष्य, भरकटलेपण, पारदर्शी स्वभाव, खेळकर आणि खिलाडू संशोधक वृत्ती, चित्रकारिता घेऊन जीनियसमधून सामोर आला आणि त्याच्यातला संगीतकार, विद्यार्थी, शिक्षक आणि प्रियकर अनुभवताना आम्ही अक्षरशः थक्क झालो.

जीनियस मालिकेतला प्रत्येक वैज्ञानिक वेगळा आहे, असामान्य आहे पण तरीही तो आपल्यातला एक असाच वाटतो. विज्ञानविश्‍वातला ‘बॉस’ असणारा अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ असलेला आईन्स्टाईन हा स्वातंत्र्य, न्याय आणि समता मानणारा एक पुरोगामी विचारवंत होता. आज आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद ओलांडून पुढेच जाता येत नाही. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि ब्राऊनियन मोशन यामधलं त्याचं योगदान हे मूलभूत होतं. या विश्‍वाची निर्मिती कशी झाली आणि त्याचं कार्य कसं चालतं अशा प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठी आवश्यक असलेलं प्रचंड मोठं काम आईन्स्टाईननं पुढच्या पिढीतल्या शास्त्रज्ञांसाठी तयार करून ठेवलं. ‘एखादी गोष्ट तुम्हाला सोपेपणानं सांगता येत नाही याचा अर्थ ती तुम्हाला समजलेली नाही’ असं आईन्स्टाईन म्हणायचा. याच अल्बर्ट आईन्स्टाईन या माणसानं आपल्या वैज्ञानिक सिद्धांतांनी जग दणाणून सोडलं होतं.

आईन्स्टाईनला सांघिक मैदानी खेळ मुळीच आवडत नसत. मग खेळणं टाळण्यासाठी तो ‘आपल्याला खेळताना चक्कर येते, आपण खेळलो की खूप थकतो’ अशी वाट्टेल ती (आपण देतो तशीच!) कारणं देत असे. उगाचंच इकडे तिकडे हुंदडण्यापेक्षा आईन्स्टाईनला एकटं राहणं आवडे. या एकांतवासात तो चांगली पुस्तकं वाचत असे. शिवाय संगीत ऐकणंही त्याला मनापासून आवडायचं. संगीत आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी पूरकच होत्या. अभ्यास करता करता  आईन्स्टाईन मध्येच उठून सरळ व्हायोलिन घेऊन वाजवत बसे आणि त्या तंद्रीत एकदम त्याचा अभ्यासात अडथळा आलेला प्रश्‍न सुटे. मग तो समोर कोणी नसलं, तर जोरदार आवाजात ‘अहाहा, मला उत्तर सापडलं. मला उत्तर सापडलं’ असं ओरडत फिरायचा. 

एकदा सुट्टीच्या दिवशी आईन्स्टाईनचे वडील हार्मान आणि त्याची आई पॉलीन यांनी त्याला लष्कराचं संचलन (परेड) दाखवायला नेलं. लहानपणी तो खूपच एकलकोंडा असल्यामुळे त्याला सार्वजनिक ठिकाणी नेल्यानं त्याचं बुजरेपण कमी होईल अशी आशा त्यांना वाटत होती. मैदानावर लष्कराचं संचलन सुरू झालं होतं. वाद्यांचे आवाज, शिस्तीत ऐटबाज पावलं टाकत चालणारे ते कडक गणवेष घातलेले सैनिक पाहून आईन्स्टाईन खुश होईल आणि टाळ्या पिटत ते दृश्य बघेल असं हार्मान आणि पॉलीन यांना वाटलं. पण झालं उलटंच. आईन्स्टाईनकडे बघताच त्याच्या डोळ्यात आनंद दिसण्यापेक्षा त्यांना त्याच्या गोर्‍या गोबर्‍या गालावरुन न थांबता वाहताना अश्रू दिसले. त्याचे गाल लालेलाल झाले होते. त्या सैनिकांकडे पाहून तो स्फुंदून स्फुंदून रडायला लागला. त्याला कसंबसं शांत करायचा प्रयत्न करत हार्मान आणि पॉलीन त्याला घरी घेऊन आले. गणवेषधारी सैनिक पाहून त्याला भीती तर नाही ना वाटली ही शंका पॉलीनच्या मनात यायला लागली. पॉलीनचं वाटणं खरंही होतं. कारण कुठलाच चेहरा नसलेले आणि  एखाद्या यंत्राप्रमाणे कवायत करणारे ते संघटित लष्करी सैनिक बघून आईन्स्टाईनला प्रचंड भीती वाटली होती. पुढेही तो ही भीती मनातून कधीच पूर्णपणे घालवू शकला नाही. पुढे दुसर्‍या महायुद्धातल्या अण्वस्त्रानच्या विध्वंसांनंतर तर आईन्स्टाईननं जागतिक शांततेसाठी खूप प्रयत्न केले. पुढे भविष्यात अशा प्रकारची युद्धं होऊ नयेत यासाठी त्यानं खूप कठोर आणि परखड भूमिका घेतली.

आईन्स्टाईन खूपच मजेदार माणूस होता. प्रवास करताना तो कुठल्याही अनोळखी माणसाला लिफ्ट देत असे आणि त्याच्याबरोबर मैत्री करून लगेचच हास्यविनोदाला सुरुवात करत असे. त्याच्या अभ्यासिकेमध्ये  कामाव्यतिरिक्त कुठल्याही शोभेच्या वस्तू भिंतीवर किंवा इतरत्र त्याला चालत नसत. त्या वस्तू म्हणजे अडगळ किंवा ओझ्यासारख्या आहेत असं तो म्हणे. गालीचे, भिंतीवर लटकवलेल्या तस्विरी, फ्लॉवरपॉट्स असं काहीही ठेवलेलं त्याला आवडत नसे. त्यामुळे या दोन खोल्या सोडून त्याची बायको एल्सा तिला हवं तसं सुशोभन करत असे. पण आईन्स्टाईनच्या अनेक सवयी एल्सा बदलू शकली नाही. आईन्स्टाईन आंघोळीसाठी आणि दाढीसाठी खूप स्वस्तातला साबण वापरत असे. आर्थिक सुबत्ता आल्यानंतरही त्याची ही सवय त्यानं बदलली नाही. केस कापण्याचाही त्याला खूपच कंटाळा येई. त्यामुळे कित्येक महिन्यांनी तो केस कापायला जात असे. विज्ञानाचा विचार डोक्यात आला की त्याला स्थळकाळाचंही भान राहत नसे. एकदा तर आईन्स्टाईन आंघोळीसाठी गेला आणि बराच वेळ झाला तरी बाहेर आला नाही. शेवटी घाबरून एल्सा आणि त्यांची मुलगी मार्गो यांनी आरडाओरडा केला, तेव्हा आईन्स्टाईन बाहेर आला आणि त्यानं प्रश्‍नार्थक चेहरा केला. ‘तूच आत इतका वेळ काय करत होतास?’ असा प्रश्‍न केल्यावर आईन्स्टाईननं आपण टबातल्या पाण्यातच आकडेमोड करून एक गणित सोडवायचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. तसंच आपण टबमध्ये नसून आपल्या टेबलापाशीच बसलो आहोत असंही वाटल्याचं त्यानं सांगितलं. हे ऐकल्यावर मात्र एल्सानं कपाळावर हात मारून घेतला.

आईन्स्टाईननं कधीही मदतनीस ठेवला नाही. लोकांनी तसं सुचवलं तर ‘लोकांनी माझं नाही, त्यांचं काम केलं पाहिजे’ असं तो म्हणायचा. 
ज्या शास्त्रज्ञांना प्रचंड प्रसिद्धीचं वलय लाभलं, त्यातलं पहिलं नाव आईन्स्टाईनचं होतं, तर दुसरं नाव रिचर्ड फाईनमनचं होतं! भौतिकशास्त्रची शाखा विकसित करण्यात रिचर्ड फाईनमनसारख्या द्रष्ट्या शास्त्रज्ञाचा हात दुसरा कोणीच धरू शकणार नाही. नॅनो टेक्नालॉजीचं तंत्रज्ञान आज जगभर धुमाकूळ घालतंय, पण या तंत्राची चाहूल त्यानं सर्वप्रथम १९५९ सालीच व्यक्त केली होती. दुसर्‍या महायुद्धात अणुबॉम्ब प्रत्यक्ष बनवणार्‍या शास्त्रज्ञांमध्ये रिचर्ड फाईनचा प्रचंड मोठा सहभाग होता. अणुबॉम्ब चाचणीचा स्फोट गॉगल न लावता उघड्या डोळ्यांनी बघणारा हा धाडसी माणूस होता. नोबेल पुरस्कार प्राप्त रिचर्ड फाईनमन हा विसाव्या शतकातला एक प्रचंडच बुद्धिमान शास्त्रज्ञ होता. 

रिचर्ड फाईनमन म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व! जीवनावर प्रचंड प्रेम करणारा, मिश्कील स्वभावाचा, नवनवीन गोष्टी कुतूहलानं शिकणारा, चित्रकलेची आवड असणारा आणि ती कला आत्मसात करणारा, सगळ्या रंगात रंगून जाणारा, संगीतावर जीव टाकणारा, ड्रम वाजवणारा, इतिहासाचा पाठपुरावा करणारा, भाषेचं सौंदर्य न्याहाळणारा, तल्लख बुद्धीचा, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची नुसतीच गोडी नव्हे, तर त्यात सखोल ज्ञान आणि प्रावीण्य असणारा, संशोधक वृत्तीचा, शिकवण्याची आवड असणारा, तत्त्वज्ञानाची आवड असणारा, माणसाच्या जगण्यावर गंभीरपणे विचार करणारा पण त्याचबरोबर सतत आनंदी असणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसा आहे तसा असणारा -असा भौतिकशास्त्रज्ञ ज्यानं क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स थिअरी आणि भौतिकशास्त्र या विषयात सखोल काम केलं!
एकदा एका पार्टीमध्ये एकजण बोंगो हे वाद्य वाजवण्यात तल्लीन झाला होता. त्याच्या वाजवण्यात जी जादू होती, तिनं प्रभावित होऊन दुसरा एक तरुण आपल्या जागेवरून उठला आणि तडक टॉयलेटमध्ये जाऊन त्यानं आपल्या छातीवर शेविंग क्रीमच्या साहाय्यानं चित्रांचे आकार काढले. त्याच्या कानात आधीपासून चेरी लटकत होत्याच. तो टॉयलेटमधून बाहेर आला आणि बोंगोच्या तालावर तितकाच बेधुंद होऊन नाचायला लागला. एकीकडे बोंगोचा ताल आणि दुसरीकडे नाच अशी जुंगलबंदी सुरू झाली. त्या पार्टीत जमलेल्यांसाठी तर ही एक अनोखी पर्वणीच होती. काही वेळानंतर बोंगोवादकानं आपलं वाजवणं थांबवलं आणि त्या नाचणार्‍या तरुणाकडे मैत्रीचा हात केला. बोंगोवादकाला त्या तरुणाचा मनस्वीपणा, विचित्रपणा खूपच आवडला होता. त्या नाचणार्‍या तरुणाचं नाव जेरी जोथान होतं आणि तो एक उत्कृष्ट चित्रकारही होता. तर बोंगो वाजवणारा तरुण होता, जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन! 

फाईनमन आणि जेरी यांची खूपच चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या वारंवार भेटी व्हायला लागल्या. या भेटीमध्ये ‘कला आणि विज्ञान’ या एकमेव विषयावर दोघांच्या दीर्घ स्वरुपाच्या वाद-चर्चा रंगायला लागल्या. फाईनमन जेरीला म्हणायचा, कलाकार संपले आहेत. त्यांच्याकडे आता कुठलेच विषय शिल्लक राहिले नाहीत. पूर्वी चित्रांसाठी मुख्यत्त्वे धार्मिक विषय असायचे. पण आताच्या चित्रकारांना तांत्रिक जगातलं काहीच कळत नाही आणि त्यामुळे वास्तव जगातलं सौंदर्यही त्यांना दिसत नाही आणि चितारताही येत नाही.’’

फाईनमनचं अशा प्रकारचं म्हणणं जेरीला अजिबात पटायचं नाही. तो फाईनमनच्या प्रश्‍नाला तोडीसतोड उत्तर द्यायचा, ‘‘कलाकार आपल्या कलाकृतींमधून वेगवेगळ्या भावना व्यक्त करू शकतात. त्यासाठी त्यांना भौतिक गोष्टीं किंवा तांत्रिक जगाशी काहीही देणंघेणं नसतं. उलट शााज्ञ वेगवेगळ्या विषयांमध्ये गणिताची समीकरणं घुसडून त्यातलं सौंदर्य नष्ट करतात.’’ दोघांचा हा वाद कुठल्याच निष्कर्षापर्यंत पोहोचत नसे. 

एकदा फाईनमन जेरीच्या वाढदिवसासाठी त्याच्या घरी गेला आणि वाढदिवस साजरा करण्याचं सोडून नेहमीप्रमाणे त्यांचा ‘कला की विज्ञान’ याच विषयावरचा वादविवाद मध्यरात्रीच्या ३ वाजेपर्यंत चालला. फाईनमननं दुसर्‍या दिवशी जेरीला फोन करून सांगितलं की त्या दोघांतल्या वादाचं मूळ कारण जेरीचं विज्ञानाविषयीचं अज्ञान आणि फाईनमनचं कलेविषयीचं अज्ञान हे आहे. मग फाईनमननं जेरीला विज्ञान शिकवायचं कबूल केलं आणि जेरीनं फाईनमनला चित्रकला शिकवायची असं ठरलं. हा प्रसंग १९४४ साली घडला. 

जेरीनं फाईनमनला चित्रकलेचे धडे द्यायला सुरुवात केली. फाईनमनला वाळवंट, त्यातले त्रिकोणी आकाराचे पिरॅमिड आणि सूर्य अशीच चित्रं रेखाटता येत असत. त्या पलीकडे काही काढण्याची त्याची मजल गेली नव्हती. पण फाईनमनला आता मात्र खरंच चित्रकला शिकायची होती. जगाच्या सौंदर्याविषयी त्याची असणारी भावना त्याला चित्रांतून व्यक्त करायची तीव्र इच्छा होती. जेरीनं फाईनमनला खूपच चांगल्या रीतीनं चित्रकारितेचे धडे दिले. इतकंच नाही तर चित्रकला शिकवताना फाईनमनचा आत्मविश्‍वास कधीही कमी होणार नाही याची काळजी घेतली. फाईनमननंही जेरीसारखा इतका चांगला गुरू लाभल्याचा फायदा करून घेतला आणि अत्यंत परिश्रम केले. जेरी मात्र भौतिकशाा शिकण्याचा फंदात पडला नाही आणि फाईनमननं मात्र जन्मभर अनेक चित्रं रेखाटली आणि रंगवली! त्यातही त्यानं चितारलेली व्यक्तिचित्रं अप्रतिम आहेत. १९९५ मध्ये फाईनमन आणि ग्वेनेथ यांची मुलगी मिशेल हिनं फाईनमनच्या चित्रांचं ‘द आर्ट ऑफ रिचर्ड पी. फाईनमन’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. 

विज्ञान किती सुंदर दिसतं हे बघून रिचर्ड फाईनमन थक्क होत असे. त्याच्यामध्येही काहीतरी विलक्षण गुणधर्म असला पाहिजे. म्हणूनच जगभरातले करोडो लोक त्याच्यावर जीव ओवाळून टाकत. आपल्या आयुष्याकडे रसरशीपणे बघणारा, विज्ञानात काव्य शोधणार्‍या रिचर्ड फाईनमनमध्ये गणित आणि विज्ञान यांच्यासारखे कठीण वाटणारे विषय अत्यंत सोपे करून सांगण्याचं कसब होतं. इतकंच नाही तर सोपं करून सांगताना तो जो विचार करत असे त्याची कल्पनाही इतर जण करू शकत नसत. एखाद्या प्रक्रियेत एखादा इलेक्ट्रॉन कसा वागेल हे समजण्यासाठी तो आपण इलेक्ट्रॉन असतो तर अशा परिस्थितीत कसे वागलो असतो अशा पद्धतीनं विचार करत असे. पण गंमत आणि आश्‍चर्य हे की प्रचंड बुद्धिमान असलेल्या या माणसांत आपल्या बुद्धीचा जराही गर्व नव्हता.

फाईनमनची सर्वांगीण वाढ चांगली होण्याचं श्रेय त्याचे वडील मेलविल आणि आई ल्युसिल या दोघांना आवजू्रन द्यावं लागेल. फाईनमनला आपल्या वडिलांविषयी प्रचंड प्रेम होतं आणि मेलविल हा एक जगावेगळाच माणूस होता. आपल्या मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी मेलविलनं जे जे करता येईल ते केलं. मेलविल स्वतः हुशार असूनही त्यानं आपल्या मुलांसमोर आपल्याला कसं काहीच कळत नाही असाच भाव नेहमी ठेवला. सायंकाळी घरी आल्यावर तो आपण आज आपला स्वेटर कसा विसरलो, रस्त्यात भेटलेल्या माणसाशी तासभर बोललो पण त्याचं नाव मात्र आठवलंच नाही, आज आपण काय काय चुका केल्या असं काय काय तो सगळ्यांना हसत सांगत असे. फाईनमनवर कळत नकळत या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला परिणाम झाला. त्याच्या आई-वडिलांनी त्याला कधीही हे करू नकोस, ते करू नकोस असा धाक दाखवला नाही. त्यानं जमा केलेला घरभर पसारा असो, वा त्याचे त्याही वयातले छोटेमोठे प्रयोग असो, त्यांनी त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्याच्याशी सतत संवाद ठेवला. त्याच्यातलं कुतूहल जपलं आणि जिथे गरज पडेल तिथे त्यांनी त्याला आधार दिला. निसर्गातल्या आणि आसपासच्या गोष्टींमधलं ज्ञानाचं भांडार त्याच्यासाठी खुलं करून दिलं. 

मेलविल आपल्या मुलांबरोबर अनेक खेळ खेळण्यातही सामील होत असे. बाहेर भटकायला निघताना तो दोन रस्त्यांमधला कमी वाहतुकीचा रस्ता मुद्दाम निवडत असे. कधी कधी मेलविल फाईनमनला शाळेत सोडण्यासाठी निघे, तेव्हा तो मुद्दाम चुकीच्या रस्त्यावर गाडी वळवे, मग फाईनमन आरडाओरडा करून आपण रस्ता चुकलोय, शाळेला उशीर होईल असं सांगत असे. मग त्यावर मेलविल आणखी एक चुकीच्या वळणावर गाडी घेत असे आणि फाईनमनला वेळेवर शाळेत पोहोचवत असे. सगळे रस्ते पाठ असतानाही मुद्दाम काहीतरी रोमहर्षक मजेशीर गोष्ट फाईनमनबरोबर करणं मेलविलला आवडायचं. ते करत असतानाही आपण अगदी साधे आहोत हे त्यानं सतत त्याच्यावर ठसवलं. मुलांबरोबर मोठ्या आवाजात गाणी गाणं, तालवाद्य वाजवणं या गोष्टींना तर घरात उधाण येत असे. 

कुठलीही गोष्ट सोपी करून सांगण्यात फाईनमनच्या  वडिलांचा हात कोणी धरू शकत नसे. त्यांच्यामुळे आपल्या वडिलांप्रमाणेच एखादी अवघड गोष्ट सोप्या रीतीनं सांगणं फाईनमन शिकला. ‘एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तिचा गाभा समजून घ्यायला हवा’ असं मेलविल फाईनमनला सांगत असे. त्याला घेउन मेलविल घराजवळ असलेल्या दाट झाडीच्या जंगलात सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जात असे आणि मग ना ना तर्‍हेची प्रश्‍न-उत्तरं बापलेकात होत. मध्येच मेलविल एखादा पक्षी फाईनमनला दाखवी आणि विचारे, ‘तो बघ, तो पक्षी आपल्या चोचीनं आपले पंखांना का सारखा टोकतोय?’ मग फाईनमन जरा वेळ त्या पक्ष्याचं निरीक्षण करून तो पक्षी पंख साफ करायला चोचीचा वापर करत असावा असं उत्तर देत असे. मग तो आपले विस्कटलेले पंखही सरळ करत असावा असंही फाईनमनला वाटे. मग मेलविल विचारे, ‘पण त्या पक्ष्याचे पंख का बरं विस्कटत असतील?’ तो पक्षी उडताना किंवा खाली जमिनीवर उतरताना ते विस्कटत असतील असं फाईनमनला वाटे आणि तो तसं आपल्या वडिलांना सांगे. मग मेलविल म्हणे, ‘बघ बरं, तो उडून आल्यावर तसं करतो की जमिनीवर चालतानाही तसं करतो?’ फाईनमनला तो पक्षी उडतानाच नाही तर जमिनीवर असतानाही ती कृती करताना दिसे. मग त्याचे डोळे उत्तर शोधण्यासाठी वडिलांकडे बघत. मग मेलविल सांगे, पक्ष्यांच्या अंगावर बारीक किडे असतात आणि ते पंखाच्या मृत कातडीचा भाग खाऊन त्यावर जगतात. त्या किड्यांच्याही अंगातून एकप्रकारचं तेलासारखं द्रव्य बाहेर पडत असतं आणि त्या द्रावावर आपल्या डोळ्यांना न दिसणारे अतिशय सूक्ष्म किडे जगत असतात. ते सगळंच द्रव्य त्या किड्यांनाही पचत नाही ते नको असलेलं द्रव्य आपल्या शरीराबाहेर टाकतात. मग त्या नको असलेल्या द्रवावरही काही जिवाणू आणि बुरशीसारखे जीव जगतात.’ मग फाईनमनला तो पक्षी आपल्या पंखाना चोचीनं का टोकरत असावा याचं उत्तर मिळत असे. 

एकदा फाईनमनला त्याच्या मित्रानं एका पक्ष्याकडे बोट दाखवून विचारलं, तुला हा पक्षी माहीत आहे का? याचं नाव काय सांग?’’
फाईनमननं नकारार्थी मान हलवली. कारण त्याला तो पक्षी माहीतच नव्हता.
मग मित्र अभिमानानं म्हणाला, या पक्ष्याच नाव ब्राऊन थ्रोटेड थ्रश असं आहे. तुझे वडील तुला काहीच कसं शिकवत नाहीत रे?’’
त्यावर शांतपणे फाईनमन उत्तरला, अरे, माझे वडील मला खूप वेगळ्या पद्धतीनं शिकवतात. या पक्ष्याची दहा भाषेतली नावं माहीत असणं म्हणजे ज्ञान नाही. ती तर फक्त माहिती झाली. पण या पक्ष्याचं उडणं कसं आहे, तो कुठे वावरतो, त्याच्या सवयी काय आहेत, त्याचा दिनक्रम काय असतो हे सगळं ठाऊक असणं याला ज्ञान म्हणतात समजलं.’’

फाईनमनच्या मनातलं कुतूहल जागं ठेवण्यास मेलविलनं मदत केली होती. त्यामुळे त्याच्या मनातला ‘का?’ हा प्रश्‍न सतत जागा राहिला. आपल्या विचारांना चौकटीत कधीच बंद करू नकोस ही वडिलांनी दिलेली शिकवण त्याला आयुष्यभर कामी आली.

फाईनमन सात-आठ वर्षांचा असताना या ‘मॅड जीनियस’ ऊर्फ रिचड फाईनमनच्या घरातला फोन खणाणला. फोन उचलताच तिकडनं आवाज आला, रिचर्ड फाईनमन यांच्याशी बोलू शकतो का मी?’’ फाईनमननं ‘हो’ म्हणताच, पलीकडची व्यक्ती म्हणाली, अहो फाईनमनसाहेब, आमच्या हॉटेलमधला रेडिओ बिघडला आहे. तुम्हाला त्यातलं बरंच कळतं असं माझ्या कानावर आलं म्हणून त्रास देतोय, प्लीज, इथे येऊन आमचा रेडिओ बघता का तुम्ही?’’ मग  फाईनमननं आपण खूप लहान असल्याचं सांगितलं. पण तरीही त्या माणसानं मात्र ‘एकदा तरी माझा रेडिओ बघच’ अशी गळ घातली. मग काय फाईनमन महाशय चड्डीच्या खिशात स्व्रू ड्रायव्हर घेउन दिलेल्या पत्यावर पोहोचले. गंमत म्हणजे ज्या हॉटेलमध्ये रिचर्ड जाऊन पोहोचला, ते हॉटेल त्याच्या मावशीच्याच मालकीचं होतं. ऐटीत त्यानं रेडिओ उघडला. त्यातल्या अनेक तारा सैल झालेल्या त्याला दिसल्या. मग स्क्रू ड्रायव्हरनं त्यानं त्या घट्ट केल्या आणि रेडिओ बंद केला आणि दुरुस्त झालेल्या रेडिओनं घरभर आपला आवाज केला. ज्या वेळी पुढे फाईनमनला नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं तेव्हा त्याच माणसानं ‘रिचर्ड त्या वेळी इतका लहान होता की त्यानं चड्डीत खोचलेला स्व्रू ड्रायवर कसा चड्डीच्या बाहेर आला होता याचं वर्णन करत फाईनमननं दुरूस्त केलेल्या रेडिओची आठवण सांगितली आणि ती आख्ख्या अमेरिकेनं ऐकली.’ लहानपणी तो रेडिओ दुरूस्त केल्यावर तर रीतसर लोक त्याला ‘रेडिओ दुरूस्त करणारा छोटा मॅकॅनिक’ म्हणूनच ओळखायला लागले. बरं, फाईनमन काही साधा नव्हता, तो चांगलाच खट्याळ होता. त्याला आता रेडिओ दुरुस्तीचं तंत्र चांगलंच अवगत झालं होतं. कधी प्लग सॉकेटमध्ये नीट बसलेला नसे, तर कधी रेडिओतून आवाज येत नसे. मग अशा वेळी तो रेडिओ उघडायचा आणि मग विचार करण्याची ऍक्टिंग करायचा. मोठी माणसं मारतात तशा दोन-चार विचारमग्न पोझमध्ये फेर्‍या मारायचा. मग काहीतरी कळलंय अशा अविर्भावात लगेच तो रेडिओ दुरूस्त करायला हातात घ्यायचा. हे सगळं ती समोर बसलेली ग्राहक मंडळी बारकाईनं बघत असत. फाईनमनच्या फेर्‍या, त्याचा अभिनय आणि त्याची दुरुस्ती या सगळ्यांमुळे लोकांनामध्ये ‘ फाईनमन विचार करून दुरुस्ती करतो बरं’, असा लौकिक तर पसरला, पण त्याच्या हुशारीचा एवढ्या लहान वयात एक दबदबाही पसरला.

याच फाईनमननं पुढे मॅनहॅटन प्रॉजेक्टमध्ये आपली भूमिका कशी वठवली, हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर त्याच्या मनाची अवस्था कशी झाली आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या दुःखांनी त्याच्याशी केलेला पाठशिवणीचा खेळ बघितला की मन बैचेन होतं. एवढं सगळं घडत असतानाही फाईनमननं कधीही दुःखाबरोबर मैत्री केली नाही. हे सगळं अनुभवण्यासाठी केवळ फाईनमनच नाही तर जीनियसमधल्या प्रत्येक वैज्ञानिकाचं आयुष्य आणि त्यांचं शोधकार्य जाणण्यासाठी जीनियसचा प्रवास अनुभवावा लागेल. आम्ही तो अनुभवला, तुम्हीही त्या मार्गावरचे प्रवासी व्हावंत असं आम्हाला मनापासून वाटतं.

‘जीनियस’ ही गॅलिलिओ, न्यूटन, आईन्स्टाईन, हॉकिंग, जेन्नर, कॉख, पाश्‍चर, फ्लेमिंग, क्युरी, माइट्नर, ओपेनहायमर आणि फाईनमन या १२ वैज्ञानिकांना घेऊन आलेली मालिका अतिशय सोप्या, साध्या, सुलभ, अभ्यासपूर्ण तरीही रंजक आणि रसाळ पद्धतीनं लिहिण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ही मालिका विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी, उद्योजक आणि इतर कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते. लिहिता लिहिता आम्ही केवळ माध्यम झालो कारण या १२ ही वैज्ञानिकांचं आयुष्य आणि त्यांनी लावलेले शोध यांची गोष्ट इतकी विलक्षण होती की आमचं ते श्रेय कसलं, आम्ही केवळ लोकांसमोर ते आणलं आहे आणि आणतो आहोत इतकंच!
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.