गुजगोष्टी
अचानक एके दिवशी अपूर्व म्हणाला, 'ममा, तुझ्या काही कथा आपण एकत्र करून त्याचं किंडलवर पुस्तक प्रकाशित करूया.' मीही मग उत्साहानं इकडे तिकडे पसरलेल्या कथा शोधायला सुरुवात केली. बघता बघता 3० तरी कथा मिळाल्या. ज्या अनेक वर्षांपासून लिहिल्या गेल्या होत्या. यातल्या जवळपास सगळ्या कथा अनेक दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातल्या १२ कथा निवडून त्याचा गुजगोष्टी हा कथासंग्रह तयार झाला. त्यासाठी मग युनिकोडमध्ये टाईप कर, वगैरे सगळं काही आलंच. अपूर्वने मला या कथासंग्रहासाठी शीर्षक आणि मुखपृष्ठ ताबडतोब दे असं फर्मान काढलं. 'गुजगोष्टी' हे शीर्षक लगेचच निश्चितही झालं. पण मी जेव्हा मुखपृष्ठ करायला लागले, तर त्यातलं एकही अपूर्वला पसंतच पडेना. मग मीही नाद सोडून दिला आणि वीज चमकावी तसा माझ्या मनात विचार आला, रेणुकाला सांगावं का?
रेणुका माडीवाले ही मैत्रीण नुकतीच पुणे वेधच्या कार्यक्रमात भेटली होती. ती चांगली चित्रकार आहे आणि एक चांगली संवेदनशील व्यक्ती देखील! ती माझं लिखाण आवडीने वाचत असते. तिला मी मुखपृष्ठ करशील का विचारताच तिने मला माझ्या मनातल्या कल्पना विचारल्या आणि मी बोलत गेले. दुसर्याच दिवशी रेणुकानं स्केचेस मला पाठवले. आमच्या दोघींची पसंती होताच, तिनं त्यात रंग भरले आणि मुखपृष्ठ तयार झालं. एक मुलगी......तिचं मन कुठेतरी अजूनही पौंगडावस्थेतच रेंगाळतं आहे....ती जगाकडे त्याच वयातून बघते आहे. ती कल्पनेच्या दुनियेत रममाण झालीये. तिचं जग तिच्या कागदांवर अक्षरांमधून उतरतं आहे आणि साक्षीला तिची आवडती मनी देखील तिला सोबत करत बसलेली आहे. तिचा हा अक्षरांचा प्रवास तिला अलगद मऊसूत ढगांच्या गालिच्यावर बसवून सैर करून आणतो आहे. तिच्या अक्षरांची पुस्तक रुपी फुलपाखरं उडताहेत आणि ती आपल्या लिखाणात तल्लीन झाली आहे. रेणुका, हे सगळं प्रत्यक्ष उतरलं केवळ तुझ्यामुळे. खूप खूप थँक्स!
जनार्दन (म्हात्रे) यानं नेहमीप्रमाणेच रस घेऊन सगळ्या कथांची प्रुफस तपासणं, काही कथा युनिकोडमध्ये आणणं, माझ्याशी सतत चर्चा करणं, लेआऊट बद्दल सूचना करणं अशी अनेक महत्वाची कामं केली. एक डमी प्रत तर त्यानं काहीच क्षणात तयार करून माझ्यासमोरही ठेवली. जनार्दन, हा त्याच्या आवडीच्या विषयामध्ये रात्र, दिवस असं काहीही न बघता स्वतःला त्या कामात झोकून देतो हे विशेष. या पुस्तकासाठीही त्यानं तेच केलं. मला आठवतं, काही वर्षांपूर्वी आम्हाला जेव्हा कन्व्हर्टरचं महत्व कळलं होतं, तेव्हा वेगवेगळे कन्व्हर्टर डाऊनलोड करून १००-१०० पानं एकाच वेळी आम्ही कन्व्हर्ट करून बघितली आहेत. आणि ती मनासारखी झाल्यावर आनंदही साजरा केला आहे. थँक्स जनार्दन. तुझ्यामुळे पुस्तक आकाराला आलं.
अपूर्वने पुढाकार घेऊन माझ्याकडून सगळ्या फाईल्स घेतल्या आणि अॅमेझॉन किंडलवर 'गुजगोष्टी' प्रकाशित केलं. १८ नोव्हेंबर २०१९ या दिवशी किंडलवर गुजगोष्टींनी प्रवेश केला. मात्र त्यांची टेक्निकल टीम त्याची पडताळणी करत असल्यानं ७२ तासांच्या कालावधीनंतर ते सर्वांसाठी दिसायला लागलं. अपूर्वचे आभार कसे मानायचे? माझे मित्र प्रभाकर भोसले यांनी काहीच क्षणात कॅलिग्राफी करून गुजगोष्टी नावाला वेगळ रुपडं बहाल केलं. Thanks प्रभाकर !
गुजगोष्टी हा कथासंग्रह माझ्या मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यकर्त्या विजया चौहान यांना अर्पण केला आहे.
माझ्या व्यस्ततेमुळे आणि इतर कार्यक्रमांमुळे गुजगोष्टींबद्दल बोलायला जमलंच नाही.
आज मात्र ठरवून या 'गुजगोष्टी'ची पोस्ट टाकायची ठरवलं. अॅमेझॉन किंडलवर 'गुजगोष्टी' आणि दीपा देशमुख सर्च केलं तरी पुस्तक दिसेल आणि मी दिलेल्या लिंकवर गेलात तरी पुस्तक मिळेल. जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment