चांगुलपणाची चळवळ आणि मी
कधी अचानक येऊन कोसळणाऱ्या आठवणी, तर कधी अनेक वर्षांनी एखाद्याशी झालेली आकस्मिक भेट, कधी एखाद्या अनुभवाने मनात उफाळून आलेली वेदना, तर कधी एखाद्या प्रसंगाने गालावर उमटलेलं हासू...या सगळ्या गोष्टी भूतकाळाची सैर करवून आणतात आणि मग परत तीच ठिकाणं, तेच प्रसंग, त्याच व्यक्तींकडे बघताना एक तटस्थभाव मनात घेऊन ती सफर घडते. आज हा लेख लिहीत असताना ही सफर मला काहीतरी नक्कीच शिकवून जाईल हेही नक्की.
मी एका सरकारी अधिकाऱ्याची मुलगी...पाच भावंडातली एक. घरात मोठे तीन भाऊ आणि माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान एक बहीण. लहानपण तसं छानच गेलं. न कसली चिंता होती, ना कसलं दु:ख वाट्याला आलेलं होतं. राहायला सरकारी निवासस्थान आणि समोर बागबगिचा असल्यानं खेळण्यात वेळ बराच जायचा आणि झाडाखाली बसून पुस्तकं वाचणं हाही नाद याच काळात लागला. साधारणत: मी तिसरीत असल्यापासून पुस्तकं वाचायला लागले. माझा मावसभाऊ औदुंबर याच्याच कृपेने. औदुंबर याची गोष्ट म्हणजे हा धड शिकलाही नव्हता. रोज वेगवेगळ्या तक्रारी घरच्यांच्या कानावर यायच्या. वडील पोलीस कमिशनर, कडक शिस्तीचे अणि मुलगा असा गुंड. त्यामुळे त्यांनी वैतागून ‘माय मरो, मावशी जगो‘ प्रमाणे त्याला आमच्या घरी पाठवलं होतं. तो सुधारावा म्हणून माझ्या वडिलांनी त्याच्यासाठी एक फिरतं ग्रंथालय काढायचं ठरवलं. दिवाळीअंकांसह अनेक पुस्तकं खरेदी केली आणि दोन्ही पिशव्यांमध्ये भरून आमचा औदुंबर घरोघर ती पुस्तकं वाटपासाठी, पुस्तकं बदलण्यासाठी जायला लागला. घरात असलेली पुस्तकं खुणावायला लागली आणि माझं वाचन सुरू झालं.
वडिलांची दर तीन वर्षांनी होणारी बदली, कधी कधी तीन वर्षांच्या आधीच, त्यामुळे आम्हा मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने वडिलांनी औरंगाबाद इथे आई आणि आम्हाला राहायची व्यवस्था केली. वडील सुट्टीच्या दिवशी कधी महिन्यातून एकदा तर कधी दोनदा येत असत. त्या वेळी वडिलांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असलेले मित्र राघवेंद्र नळगीरकर यांच्याकडे आईबरोबर मी अनेकदा जायची. त्यांच्याकडे किशोर मासिकाचा अक्षरश: खजिना होता. गठ्ठेच्या गठ्ठे माळ्यावर त्या त्या वर्षीचे बांधून ठेवलेले असत. मला त्यांच्या घरी जायचं वेडच लागलं. अख्खी दुपार किशोरच्या अंकांचा फडशा पाडणं सुरू झालं. मग किशोरबरोबरच चांदोबा, किलबिल, अमृत आणि अशी अनेक पुस्तकं मित्र झाली. वय वाढायला लागलं तशी त्या त्या वयात अनेक लेखक/कवी मंडळी पुस्तकातून येऊन गप्पा मारू लागली.
लहानपणी आई मला घुमी म्हणायची, कारण मी मनातलं कधी व्यक्त करत नसे. आपल्या मनातलं समोरच्यानं ओळखलं पाहिजे असं मला वाटायचं. त्यामुळे मनातल्या गोष्टी मी डायरीत लिहून ठेवायची. या डायरीत मनातल्या गोष्टी, आवडलेले, न आवडलेले, दुखावणारे असे अनेक प्रसंग लिहिलेले असायचे. पुढे याच डायरीत सुविचार, शेरोशायरी, चित्रपटांतली गाणी, कविता, आवडलेल्या अनेक पुस्तकांमधले उतारे असं काय काय लिहिलेलं असायचं. शाळा कॉलेजमध्ये असताना शाळेतल्या भित्तीपत्रकाची संपादक म्हणून जबाबदारी घेतली होती, तीच जबाबदारी कॉलेजमध्येही आनंदाने पार पाडली.
कलेची आवड आईमुळे लागली. आईचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेलं होतं. खरं तर ती लग्नानंतर मॅट्रिक झाली. तिला अनेक कलांची आवड होती. त्यामुळे तिच्यामुळेच मी पंडित नाथराव नेरलकर, पंडित उत्तमराव उग्निहोत्री, पंडित शिवराम गोसावी यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला जायला लागले. तिने मला शिवणकाम शिकण्यासाठी उत्तेजन दिलं. त्यामुळे मी साधारणपणे १३-१४ वर्षांची असल्यापासून स्वत:चे ड्रेसेस, आईचे ब्लाऊज इतकंच नाही तर मैत्रिणींचेही ड्रेसेस शिवून देण्यात तरबेज झाले.
उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी चित्रकलेचा, पेंटिंगचा क्लास, तर कधी घरात माझा भाऊ नंदू याच्याबरोबर नवा व्यापार घरी तयार करण्यात वेळ घालव, कधी नवरात्रीच्या आधी देवघराला रंग देण्याचं काम कर, तर कधी देवांची रेशमी वस्त्र शिवण्याचं काम कर, असं बरंच करत असे. रोज सकाळी उठल्यावर बागेतली फुलं तोडणं आणि देवांसाठी हार बनवणं ही माझीच जबाबदारी असायची. घरातलं वातावरण धार्मिक असल्यानं मला सगळ्या आरत्या, मंत्रपुष्पांजली तोंडपाठ असायचं, आजही आहे. मोठा भाऊ रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारी दमदाटी करून धाक दाखवून घेण्यासाठी भाग पाडत असे. त्यामुळे रात्रीच्या पोळ्या करणं, भाजी निवडणं, अशीही कामं करायची सवय लागली होती. वडिलांबरोबर आठवडी बाजारात जाणं, भाजी आणणं हेही आवडीने करत असे. यामुळे चांगली भाजी कशी असते, ती कशी निवडावी हे तर कळलंच, पण त्याचबरोबर वडील त्यांच्याशी कसे बोलतात, त्या संवादातून त्यांची परिस्थिती, त्यांचे प्रश्न समजत गेले.
कॉलेजला असताना मित्रांमुळे आकाशवाणीची आवाजाची परीक्षा दिली आणि औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर युवावाणी कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून तर कधी कंटेट क्रिएटर म्हणून काम करायला लागले. कधी नभोवाणीमधल्या नाटकांतही सहभागी झाले. त्या वेळी कधी ज्येष्ठ नागरिकांच्या बागेत जाऊन मुलाखती घे, तर कधी ट्रक ड्रायव्हर क्लिनर यांच्याशी बोल, कधी अनाथाश्रमात जाऊन तिथलं मुलांचं विश्व बघ असंही सुरू झालं आणि यातून आपल्या सुरक्षित जगापेक्षा असलेलं वेंगळं जग कळत गेलं. घरात कधी काम काढलं की सुतार येई, इलेक्ट्रिशियन येई. त्यांचं काम बघत असताना ते काम, त्यातले बारकावे आणि त्यांची कौशल्य हे सगळं देखील आवडायला लागलं.
कॉलेजमध्ये असताना मराठी शिकवायला प्रख्यात कवी फ. मुं. शिंदे होते. अतिशय सुरेख शिकवायचे. आजही त्यांनी त्या वेळी शिकवलेली वसंत बापट यांची फुंकर ही कविता जशीच्या तशी आठवते. कवितेतल्या त्या नायिकेच्या वेदना जणू काही आपणच अनुभवतो आहोत असं त्या वेळी वाटलं होतं. तिच्या मनाची तगमग अस्वस्थ करणारी होती. फमुंसर फक्त अभ्यासक्रमातलंच शिकवत नसत, तर वसंत बापटांचं बोट धरून कधी मीनाकुमारीची शायरी देखील येत असे, तर कधी नारायण सुर्वे आणि मर्ढेकरांची झणझणीत वास्तव दर्शवणारी कविताही येत असे. कॉलेजच्या ग्रंथालयानं मग नारायण धारप, व. पु. काळे, अण्णाभाऊ साठे, वि. स. खांडेकर, प्रल्हाद केशव अत्रे, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर, आनंद यादव, शरदचंद्र चट्टोपाध्याय, विनोबा, महात्मा गांधी यासारखे अनेक लेखक भेटत गेले.
या पुस्तकांनी, या लेखकांनी एका चांगल्या शिक्षकाचंच काम केलं असं आता वाटतं. कारण वयाचे ते ते टप्पे पार करताना कधी कधी न आवडणाऱ्या, दुखावणाऱ्या अनेक गोष्टी घडत होत्या. मुद्दाम नाही, पण तरीही वयात येताना घरातल्यांनी मुलीची जात म्हणत काळजी म्हणून अनेक बंधनं टाकली, जी की जाचत होती. मुलांना ही बंधनं का नाहीत, आपण मुलगी आहोत म्हणून आपल्यालाच वाट्याला ही बंधनं का असे अनेक प्रश्न त्या वेळी पडायचे. सातच्या आत नव्हे, तर पाचच्या आत घरात हे बंधन, मुलांशी बोलायचं नाही हे बंधन, जोरात दात दाखवून हसायचं नाही हे बंधन, नाटकांत काम करायचं नाही हे बंधन, अशा अनेक गोष्टी त्यात होत्या. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये असो वा नाटकात असो काम करायचं नाही. त्या वेळी या गोष्टी ऐकणं भागही असायचं, पण कधी कधी मन बंड करायचं आणि मग घरातल्यांच्या नकळत नाटकात काम कर, गॅदरिंगमध्ये गाणी गा असं सगळं केलं आणि घरी कळल्यावर नंतर भरपूर बोलणी आणि मारही खाल्ला.
आज मागे फिरून बघताना जाणवतं, की आईमुळे मिळालेल्या कला - त्यांनी आयुष्य सुंदर तर केलंच, पण त्यामुळे अनेक कामांमध्ये स्वावलंबी देखील बनवलं. आजही माझे स्वत:चे ड्रेस, साडीवरचे ब्लाउज, साडीचा फॉल लावणं वगैरे माझी मीच करते. टेलरचं दुकान कधी बघावं लागत नाही. तिच्यामुळे गाणं शिकले आणि पुढे सामाजिक कार्यात पडल्यावर चळवळीतली गाणी गाताना, रचताना हेही शिक्षण उपयोगी पडलं. मोठ्या भावानं जरी त्या वेळी अनेक बंधनं घातली असली, तरी त्यानं कामाला असणाऱ्या शिपायांशी आदरानं बोलायचं शिकवलं होतं. सामाजिक कार्यकर्ता कोर्स केल्यानं आणि कष्टकरी लोक सहवासात आल्यानं त्यांचे प्रश्न समजले आणि त्यांच्यामाझ्यातलं अंतर नकळत्या वयातच नाहिसं झालं. आरईबीटी हा समुपदेशनाचा कोर्स डॉ. आनंद नाडकर्णीकडे केल्यामुळे माझ्या सहवासातल्या तरुणाईला समजून घेता आलं, पण त्याचबरोबर वाट्याला येणाऱ्या वैयक्तिक दु:खद घटनांना दूर अंतरावर ठेवता आलं. माणसामाणसांमधला आर्थिक स्तरावरून होणारा भेद कधीच केला गेला नाही.
किशोरावस्थेतल्या वयातले अनेक प्रसंग मनावर कोरले गेले. वयात येताना विशेषत: मासिक पाळी सुरू होताना, झाल्यानंतरचा काळ आईने मुलीला किती समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून न घेतल्यास कुठल्या न्यूनगंडातून जावं लागतं ते समजलं. प्रत्येक महिन्यात मी देव असतो असं समजून देवाची प्रार्थना केलीय, ही चार दिवसांची कटकट नको म्हणून नवस बोललेय. त्या चार दिवसांत खूप अपमानित झाल्यासारखं वाटायचं आणि समजून घेणारं आसपास कोणी नाहीच याची जाणीव मनाला जास्त क्लेश द्यायची. तसंच मुलगी म्हणून त्यांनी घातलेली बंधनं - हे करायचं नाही ते करायचं नाही यांनी आपण गुलाम आहोत आपल्याला मत नाही, आपलं कोणी ऐकणार नाही ही भावना त्या वयात जास्त दृढ होत गेली आणि मग बंडाकडे जाण्याचे मार्ग शोधत राहिली. ते मार्ग बरोबर होते की नाही कुणास ठाऊक, पण त्या वेळी मात्र हा एक पिंजरा आहे आणि या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं असंच मनानं घेतलं.
आपलं स्वत:चं अस्तित्व नसेल तर पहिला पिंजरा सोडून दुसराही पिंजराच असतो हे जरा उशिरा कळलं आणि मग काहीतरी करण्याची धडपड सुरू झाली. आकाशवाणीतलं कामाचं कॉन्ट्रॅक्ट, लहान मुलांसाठी काम करणाऱ्या शिल्पकार संस्थेबरोबरचं काम, यात नाटकं लिही, दिग्दर्शन कर वगैरे, रिमांड होममध्ये जा, तिथल्या मुलांशी संवाद साध, एकलव्य या संस्थेबरोबर शिक्षणावर काम कर, ब्युटीपार्लरचा कोर्स करून ते चालवणं, नॅचरोपथीचा तीन वर्षांचा कोर्स करून योगाचे क्लासेस घेणं असं बरंच काही सुरू झालं.
याच प्रवासात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी माझ्यावर औरंगाबादच्या महिला व्यासपीठाची जबाबदारी दिली. किशोरवयीन मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या कामात रमून गेले. त्याच वेळी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्याशी ओळख झाली. एक मृदू मनाचा, संवेदनशील, बुध्दिमान, प्रेमळ माणूस वडिलकीचं नातं घेऊन भेटला आणि त्यांच्या मुलीसोबत स्नेहजा रुपवते आणि प्रेमानंद रुपवते, तसंच मुलगा शिरीष चौधरी यांच्याबरोबर काम करता आलं. मोठेपण बाजूला ठेवून माणसांत माणूसपण शोधणारी ही माणसं होती. यांनी भरभरून प्रेम दिलं आणि गझलचं एक वेगळं विश्व असलेल्या लोकांमध्ये प्रवेश झाला. गझलमधलं रदीफ, काफिया, मतला हे कळत असतानाच मात्रांचा खेळ आणि व्याकरण समजलं अणि मीही गझल करायला लागले. या वेळी भीमराव पांचाळे, सुधाकर कदम, सुरेशकुमार वैराळकर, शेख मिन्ने, वैभव देशमुख, प्रमोद खराडे, जनार्दन म्हात्रे, मनोज ठाकूर यांच्यासह अनेक मंडळी ओळखीची झाली. मग अखिल भारतीय मराठी, हिंदी आणि उर्दू गझल संमेलन औरंगाबादला घेतलं, त्या वेळी बशर नवाज पासून निदा फाजली पर्यंतचे दिग्गज गझलकार जवळून बघायला आणि अनुभवायला मिळाले. यातून कलेच्या प्रांतातली मुसाफिरी तर घडलीच, पण अनेक माणसं जोडली गेली. एका क्षणी विद्या बाळ आणि मिळून साऱ्याजणीच्या कुटुंबाचा मी भाग बनले आणि महाराष्ट्र भर काम करणाऱ्या स्त्री कार्यकर्त्या माझ्या सख्या बनल्या. गीताली, आशा साठे, नयन कुलकर्णी, उज्वला आचरेकर, अशा अनेक मैत्रिणींनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
या सगळ्या प्रवासात आयुष्याला एक वळण मिळालं. मी समाजानं रचलेली एक चौकट मोडली होती. त्यामुळे कधी कोणाची सहानुभूती, तर कोणाची तिरस्काराची नजर, कोणाकडून होणारा अपमान हे सगळं टाळून कुठे जाता येईल याची चाचपणी करत असताना मासवण या आदिवासी गावात जाण्याचा मार्ग माझ्यासमोर संधीच्या रुपात आला. तोपर्यंत मी फक्त शहरी भागातलं आयुष्य बघितलं होतं. खेडं कसं असतं हे फक्त चित्रपटांमधून बघितलं होतं. अशा वेळी शिक्षण विभाग प्रमुख म्हणून आदिवासी सहज शिक्षण परिवार या संस्थेत मला काम करायचं होतं. या दुर्गम भागात जायला कोणी तयार नव्हतं. त्यामुळे केवळ मी तिथे जाण्यासाठी तयार असल्यानं मला ही संधी मिळाली होती.
मासवणला पोहोचले, तेव्हा तिथे मोबाईल्सचे टॉवर्स देखील नव्हते. त्यामुळे मोबाईलचा काहीही उपयोग नव्हता. कार्यालयात एक लँडलाईन फोन होता, पण काही कारणांनी केबल तुटली किंवा काही झालं तर आठ-आठ दिवस फोन बंद असायचा. पावसाळ्यात सूर्या नदीचा पूल पाण्याखाली गेला की सगळ्या गावांशी संपर्क तुटायचा. सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० असं रोज आठ तास लोड शेडिंग असायचं. सुरुवातीला हे जगणं नकोसंही वाटलं. पण जसजशी रुळत गेले, तसतसा तो परिसर, ती माणसं, ते काम आवडायला लागलं.
आदिवासी भागात मी शिक्षण क्षेत्रातलं काम करायला गेले खरी, पण तोपर्यंत मला सर्वशिक्षा अभियान म्हणजे काय, ग्रामशिक्षण समिती म्हणजे काय काहीही माहीत नव्हतं. सुरुवातीच्या काळात मला हे सगळं समजून घ्यावं लागलं. स्वत: गावोगाव फिरून १५ गावांमधल्या ७८ पाड्यांमधली शिक्षणाची परिस्थिती जाणून घ्यावी लागली. अंगणवाड्या किती आहेत, तिथलं काम कसं चालतं, प्राथमिक शिक्षण घेणारी मुलं किती आहेत, सातवीपासून गळती होणारी मुलं किती आहेत, दहावीनंतर या मुलांचं काय होतं, या मुलांच्या शिक्षणात कुठकुठल्या गोष्टींचे अडथळे आहेत हे सगळं स्वत: फिरून आकडेवारी गोळा करून समजून घेतलं आणि मग काम करायला सुरुवात केली. हे काम करत असताना अनेक अडचणी आल्या. गावातलं राजकारण, शिक्षकांचं अपडाउन करत शाळेत येणं, पालकांची उदासीनता, मुलांना आपल्या लहान भावंडांना सांभाळावं लागत असल्यामुळे त्यांची शाळेतली अनुपस्थिती, अनेक पालकांचं स्थलांतर आणि त्यामुळे शाळेचं महत्व नसणं, कुपोषण, मोतिबिंदू यांच्या समस्या, लहान वयातच रेती आणि वीट भट्टी यावर काम करण्याची सवय, अशा अनेक गोष्टी कळत गेल्या. फजितीही अनेक वेळा झाली.
स्कॉलरशिपसाठी मुलांसाठी मोफत वर्ग घेउयात असं मी ठरवलं, तसंच शाळाबाह्य मुलांसाठी खेळघर संकल्पना राबवूयात असंही ठरवलं आणि यासाठी आधी शाळेचे शिक्षक आणि पालक यांना विश्वासात घेवूया म्हणून त्यांना एका ठरावीक दिवशी निमंत्रित केलं. खूप हौसेनं तयारी केली. मुंबईहून माझ्या मार्गदर्शक विजया चौहान आल्या. अतिशय उत्साहानं आम्ही नियोजित स्थळी पोहोचलो आणि बघितलं तर तिथे एकही पालक, किंवा एकही शिक्षक उपस्थित नाही. त्यांना एका वरिष्ठ व्यक्तीने दम देऊन जायचं नाही असं सांगितलं होतं. तसंच मी त्या व्यक्तीला मान न देता हा कार्यक्रम आखल्याचा राग त्याला आला होता. मला हे असे अनुभव नसल्यानं मला खूपच रडायला आलं. अशा वेळी विजयाताई यांनी मला धीर दिला आणि समजून घेतलं. शिक्षक आणि पालक नसतील तर काय झालं, आपण मुलांशी बोलू असं म्हणत मुलांना बोलावलं. आम्ही मुलांशी गप्पा मारत त्यांना काय आवडतं, काय हवंय याबद्दल संवाद साधला. विजयाताईंच्या सल्ल्यानं मी पालघरला जाऊन गटविकास अधिकाऱ्यांना भेटले. झालेली घटना सांगितली. तोपर्यंत सरकारी अधिकारी इतकी सहज भेट आणि मदत करतात का ही भीती मनात होती. पण त्यांनी म्हटलं, अरे, तुमच्या कामानं आमचं सरकारचं काम उलट हलकं होतंय. तुमची मदतच होते आहे आम्हाला. तुम्ही काम करा. यापुढे कोणीही तुमच्या कामात अडथळा आणणार नाही. मी तसं लेखी पत्रं सगळ्या शाळांना देतो. मी खुशीत परतले. विजयाताईंनी मला समजून घेतलं, धीर दिला, त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांनी मनापासून साहाय्य केलं, त्यामुळे त्यानंतर मी शाळांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी, अनेक कार्यक्रम घेतले आणि ते सगळे यशस्वीही झाले. शिक्षक, पालक, मुलं सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत गेला.
त्या गावातली माणसं, कार्यकर्ते मंडळी जवळची झाली आणि माणसाच्या गरजा किती कमी असतात हे लक्षात आलं. वीज नसल्यानं कपड्यांना इस्त्री नाही, शहरी जीवनात आवश्यक वाटणारं ब्युटीपार्लर नाही, हॉटेलचे चमचमीत पदार्थ नाहीत, चित्रपट बघण्यासाठी थिएटर्स नाहीत, आणि मग अशा अनेक गोष्टी आयुष्यातून बादच झाल्या. इस्त्रीशिवाय कपडे घालण्याची सवय लागली. ब्युटीपार्लर हद्दपार झालं. साधं जगणं आणि त्यातली मौज कळायला लागली. कार्यकर्त्यांनी प्रेमानं डब्यात आणलेल्या रानभाज्यांची चव कळायला लागली. ऑफीसची गाडी किंवा बस उपलब्ध झाली नाही तर सुरुवातीला आता उन्हातान्हात, पावसांत चालत जावं लागणारं या विचारानं वाईट वाटून घेणारी मी नंतर कार्यकर्त्यांसोबत उन्हात असो वा मांडीएवढ्या चिखलातून पायी जायला तयार असायची. स्विर्त्झंलँड फिक पडावं असं निसर्गरम्य माझं कामाचं गाव मला वाटत होतं. विंचू, साप, अंधार यांना घाबरणारी मी भीतीला दूर पिटाळू शकले ते याच मासवणमुळे.
यानंतर विजया चौहानमुळेच नर्मदा बचाव आंदोलनात सहभागी होता आलं. मेधा पाटकर यांना जवळून बघता आलं. नर्मदेचा, स्थलांतरितांचा, पर्यावरणाचा प्रश्न समजून घेता आला. भौतिक वस्तूंचा मोह सुटला. नर्मदेच्या अनुभवानं जीवन किती क्षणभंगूर आहे हेही समजलं. मुख्य म्हणजे माझे आदिवासी कार्यकर्ते यांच्याशी माझी जवळीक कायमची निर्माण झाली. याचं कारण मी कमी बोलत असल्यानं आमच्यातलं अंतर तसंच होतं. पण मी मासवणला बोलायला शिकले. स्वत:हून बोलण्यात पुढाकार घ्यायला शिकले आणि आपण एक पाऊल पुढे टाकलं की रस्ता कसा सुकर होतो हे समजत गेलं. आजही हे सगळे कार्यकर्ते माझ्याशी घट्ट बांधले गेले आहेत.
आदिवासी भागातून एकदम मुंबईसारख्या महाकाय शहरात कामामुळेच यावं लागलं आणि मुंबईची भीती जाऊन मुंबईमधली ऊर्जा, मुंबईतली धडपडणारी माणसं, मुंबईतल्या लोकांचं जगणं, लोकलमधली एकमेकांना मदत करण्याची वृत्ती हे सगळं खूप भावलं. मुंबईनं माझा आत्मविश्वास वाढवला. त्याच वेळी डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकाराने युवांसाठी सुरू झालेल्या निर्माण या उपक्रमात काम करायला मिळालं. कामाबरोबरच महाराष्ट्रातला युवावर्ग जास्त जवळचा झाला. बुध्दिमान असलेली ही आजची तरुणाई कसा विचार करते, कुठल्या गोष्टीकडे कसं बघते, जीवनात त्यांना काय हवंय, त्यांचा ‘मी’ कडून ‘आम्ही’ कडे जाणारा प्रवास कसा आहे हे अनुभवता आलं. या मुलांच्या भावविश्वाचा मीही एक भाग झाले.
यानंतर ‘प्रथम’ सारख्या देशपातळीवर काम करणाऱ्या संस्थेत युवांसाठी विशेषत: निम्नस्तरातल्या युवांसाठी काम करता आलं. त्यांना प्रशिक्षण देता आलं. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना रोजगारासाठी सक्षम करता यावं या दृष्टीनं प्रयत्न करता आले. याच काळात यमाजी मालकर सारख्या अनुभवी संपादक मित्राबरोबर पर्यावरण, शिक्षण, अर्थकारण अशा अनेक विषयांवर काम करता आलं आणि ते प्रश्न समजून घेता आले, आणि कामामधलया अनेक तांत्रिक बाजूंही पक्क्या होत गेल्या. स्वभावानं शांत आणि गंभीर वृतीच्या या मित्रानं प्रत्येक पावलावर ‘मी आहे बरोबर’ हे न बोलता सांगितलं. त्यामुळेच अपूर्वला माझ्या मुलाला डेंग्यू झाल्यावर यमाजीनं मला सावलीसारखी सोबत केली. त्याच वेळी मला मुलगी मानणाऱ्या, बापाचं छत्र देणाऱ्या अनिल अवचटनंही साथ दिली.
या प्रवासातच एके दिवशी अच्युत गोडबोले यांची एका कार्यक्रमात ओळख झाली आणि त्यांनी माझं लिखाण बघून मी त्यांना लिखाणात मदत करावी असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. माझ्या आवडीचा विषय असल्यानं मी आनंदाने होकार दिला आणि जवळजवळ ८-९ वर्षं त्यांच्या प्रत्येक पुस्तकासाठी नोट्स काढणं, लेख संक्षिप्त करणं, मोठे करणं, टाईप करणं, लिखाण शुध्द करणं, लेखाचा क्रम रोचक करणं, लिखाणात खोली आणणं, मुखपृष्ठ तयार करणं, पुस्तकासाठी शीर्षक सुचवणं, (नॅनोदय, मनात, मुसाफिर, चंगळवादाचे थैमान वगैरे) अशा अनेक गोष्टी मी करायला लागले आणि यातूनच मग स्वतंत्र लिखाणाला सुरुवात झाली आणि तुमचे आमचे सुपरहिरो ही मालिका आकाराला आली. या मालिकेत मी ७ पुस्तकं लिहिली. यातलंच एक पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया हे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रवासाचा वेध घेणारं पुस्तक लिहिता आलं.
त्यानंतर मी आणि अच्युत गोडबोले मिळून जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांवर जीनियस मालिका लिहिली आणि ३६ शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, गणितज्ञ वाचकांसमोर आणले. पाश्चात्य संगीतावरचं सिंफनी असो वा चित्रशिल्पकलेवरचं कॅनव्हास असो ही साडेपाचशे-सहाशे पानी पुस्तकंही आकाराला आली. व्हॅन गॉग, पिकासो, रोदँ, मायकेलअँजेलो, लिओनार्दो दा व्हिंची, बिथोवन, बाख, मोत्झार्ट, एल्व्हिस प्रिस्ले, बीटल्स, बॉब डीलन सारखे कलाकार-संगीतकार अभ्यासता आले आणि त्यांचं बेफाम जगणं, त्यांच्या जगण्यात भरलेलं सगीत आणि सौंदर्य न्याहाळता आलं.
कार्यकर्त्यांचा पिंड असल्यामुळे सतत वेगळं काम करणाऱ्या लोकांकडे लक्ष जायचं आणि मग ही वेगळ्या वाटेवर चालणारी तरुणाई जवळची तर झालीच पण पाथफाइंडर्स या दोन पुस्तकांतून लोकांसमोर आणता आली. हे युवा इतकं भरीव काम करताहेत की यांच्यापुढे खरोखरंच नतमस्तक व्हावं असं वाटतं.
डॉ. अभिजीत सोनवणेसारखा कोणी आपली आंतरराष्टीय कंपनीतलं स्थान सोडून भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर म्हणून काम करतो, तर अतिश लक्ष्मणसारखा कोणी युवा मनोरुग्णांना आपला मानून त्यांचं जेवणखाण, त्यांच्यावरचे उपचार, त्यांना निवारा मिळवून देणं यासाठी झटतो. सचिनसारखा कोणी चौकटीतल्या शिक्षणाची परिस्थिती बघून स्वत:च प्रयोगशील शाळा उभी करतो आणि इतकंच नाही तर गरिबांच्या वस्तीत मोबाईल व्हॅन नेऊन तिथे शिक्षणाची व्यवस्था करतो. पुस्तकीच नव्हे तर जीवनावश्यक गोष्टींचं ज्ञान मुलांना इथे मिळतं. जयदीपसारखा विज्ञानवेडा, किमयागार आणि जीनियस ही आमची पुस्तकं वाचून प्रेरित होऊन भारतातलं पहिलं विज्ञानगाव महाराष्ट्रात उभं करतो, त्याच वेळी कऱ्हाडचा डॉ. संजय पुजारी तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आशीर्वाद घेऊन डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्राची उभारणी करत आपलं सगळं आयुष्य विज्ञानासाठी झोकून देतो. जयवंतसारखा आयटीतला तरुण एकाएकी हे सुखवस्तू जगणं सोडून शेतीमधलं ओ का ठो कळत नसताना सेंद्रीय शेतीचा ध्यास घेतो, अभ्यास करतो आणि तंत्रज्ञान आणि परिश्रम यांच्या जोरावर स्वत:ला सिध्द करतो. फासेपारधी मुलांवरचा गुन्हेगारीचा डाग मिटवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनंत झेंडेसारखा तरुण त्यांचा पालक बनतो, तर ऑटिझमसारख्या विकारांशी लढणारी मुलं बघून अंबिका टाकळकरसारखी तरुणी या मुलांचा आधार बनत आरंभ नावाची एक संस्था उभारते. आनंद शिंदेसारखा तरुण हत्तीशी संवाद साधत त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतो, तर तुषार कुलकर्णीसारखा तरुण जगभरातल्या जिराफांची संख्या कमी होतेय म्हणून आपलं आयुष्य त्यांच्यासाठी वाहतो. मधमाशांचं कमी होणारं प्रमाण आणि त्यांचा पर्यावरणातला आवश्यक असणारा सहभाग बघून अमित गोडसेसारखा तरुण आपली मुंबईतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून मधमांशाचं संरक्षण करण्यासाठी सज्ज होतो. वटवाघळांचा पर्यावरणाचं संतुलन राखण्यातला सहभाग, देशी वृक्षांचं महत्व हे सगळं सांगण्यासाठी डॉ. महेश गायकवाडसारखा तरुण शाळा-शाळा, कॉलेज-कॉलेजमध्ये जाऊन जनजागृतीचं काम हेच आपल्या आयुष्याचं ध्येय समजतो. आयुष्यातल्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत सीए झालेला अभिजीत थोरात, नादान परिंदे नावाची संस्था उभी करून अनेक तरुणांना उच्च शिक्षित करून पायावर उभं करण्याचा विडा उचलतो, तर सुनिल खांडबहाले सारखा तरुण संगणकावर मराठी भाषेचा शब्दकोश बनवतो. धनंजय सरदेशपांडे सारखा तरुण नाटकातून समाजभान देतो, तर आपल्या विकलंगतेवर मात करत हंसराज पाटील सारखा तरुण शासकीय सेवेत आपलं योगदान देतो. यजुवेंद्र सारखा तरुण तरुणाईला स्वावलंबी करण्यासाठी दीपस्तंभासारखा उभा राहतो, तर अमृत देशमुख सारखा तरुण पुस्तकांचं वेड रुजवण्याच काम करतोय, नंदा बऱ्हाटेसारखी स्त्री मोलकरणींच्या मुलांसाठी पाळणाघर उभं करते, तर स्वागत थोरात आणि सुमित पाटील यांच्यासारखे तरुण अंधाच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचं काम करतात. मुलींच्या मासिक पाळीचे प्रश्न सोडवण्यासाठी सानिया भालेराव सारखी तरुणी पुढाकार घेते, तर अपंगाच्या वाट्याला मानाच जगणं मिळावं म्हणून अभिजीत राऊत सारखा तरुण आपलं आयुष्य पणाला लावतो. सजल सारखा बायोडायव्हर्सिटीमधलं शिक्षण घेतलेला उच्चशिक्षित तरुण गवळाऊ गायींवर संशोधन करतो, तर सिध्दार्थसारखा तरुण कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचाच एक भाग बनून त्यांना न्याय मिळवून देतो. समाजातल्या अंधश्रध्दांना हद्दपार करण्यासाठी राजू इनामदार पुढे येतो, तर मुलांमधला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शिवाजी मानेसारखा तरुण आपलं आयुष्य वेचतो. ही आणि अशी अनेक तरुण मुलं-मुली माझ्याजवळ आली आणि माझ्या जगण्याचा भागही बनली. माझं आणि त्यांचं अतुट असं नातं तयार झालं.
मानवता हाच माझा धर्म आणि माणुसकी हीच माझी जात हे मला आयुष्यानं शिकवलं आणि म्हणूनच लिखाणाच्या निमित्ताने माझ्याजवळ आलेले गॅलिलिओ, न्यूटन, आईन्स्टाईन, हॉकिंग, फ्लेमिंग, कॉख, पाश्चर, मेरी क्युरी, लीझ माईटनर, फाईनमन, ओपेनहायमर, एडिसन, टेस्ला, लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन, आर्यभट्ट, रामानुजन पासून ते डॉ. स्वामीनाथन, जयंत नारळीकर या सगळ्यांनी आयुष्याचा व्यापक अर्थ समजून सांगितला. आपलं ध्येय निश्चित करण्यास मदत केली. कॅनव्हास आणि सिंफनी लिहिताना त्यातले चित्रकार, शिल्पकार आणि संगीतकार यांनी प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता जगणं कसं सुंदर करता येतं ते शिकवलं.
त्यामुळे यापुढेही माझं लिखाण हे कला, विज्ञान आणि सामाजिक भान यावरचं आधारित असणार आहे हे मात्र नक्की. जेव्हा शुभम किंवा मंदारसारखी मुलं अपघातात आपल्या आई-वडिलांना गमावतात, आणि मला आई म्हणून हाक मारायला लागतात तेव्हा ते माझ्या अपूर्वसारखेच मला वाटतात. कोणाची मी आज दीपाताई आहे, तर कोणाची दीपाई आहे. पण या नात्यांनी मला जबाबदारीचं भान दिलंय. मला जमेल तेवढं करण्याचं बळ दिलंय.
आयुष्यात भेटलेली माणसं, आलेले चांगले वाईट अनुभव, अनुकूल-प्रतिकूल परिस्थिती आणि वाचलेली पुस्तकं यांनी कसं वागावं आणि कसं वागू नये याचे धडे दिलेत, जे धडे वाटेत पुढेही साथ देत राहतील. माझं कुटुंब खूप मोठं आहे, विस्तारलेलं आहे आणि यासाठी मला वाटतं आधी आपण लोकांशी पारदर्शकतेचं नातं निभावायला हवं. मला काय हवं पेक्षा त्यांना काय हवंय याचा विचार करणं गरजेचं आहे. त्या नात्यात एक विश्वास निर्माण व्हायला हवा. असं झालं तर ते सुखदु:खात तुमच्या खांद्यावर आपलं डोकं निश्चिंतपणे विसावतात. आपली प्रतिमा, जी खरी नसते, आभासी असते तिच्यात गुंगून न जाता, किती पुरस्कारांनी कपाट भरलय याचा अभिमान न बाळगता समोरची व्यक्ती आणि मी एकाच पातळीवर आणि एकसारखेच आहोत असं समजून स्वत: पुढाकार घेऊन तिच्या खांद्यावर मित्रत्वाची थाप मारली तर ती व्यक्ती निश्चितपणे तुमची होतेच.
वयाच्या एका टप्प्यावर मला काय आवडतं, मला काय वाटतं, माझं काय मत आहे, माझे काय विचार आहेत, याला खूप महत्व आपण देतो, म्हणजे मीही दिलं. पण हळूहळू कळत गेलं, निसर्गात जसं वैविध्य आहे तसंच ते मानवी जीवनातही आहे, माणसामाणसांमध्येही आहे. त्यामुळे मी जर चार पायऱ्या चढून वर गेले असेल तर पहिल्या पायरीवरच्या माणसाला कमी लेखण्याचा अधिकार मला नाही किंवा तो गर्वही बाळगता कामा नये. मी त्याला वर येण्यासाठी हात द्यायला हवा किंवा तो त्याच पायरीवर राहण्यात आनंद मानत असेल तर तो अल्पसंतुष्ट वगेरे अशी दुषणं न देता त्याच्याशी संवाद ठेवायला हवा. माझे विचार आणि त्याचे विचार वेगळे असले तरी मैत्री असायला हवी. मतभेदांना बाजूला सारून एकमेकांकडे बघता यायला हवं. त्यामुळेच आज मी पूर्णपणे नास्तिक असले, कर्मकांडाला माझ्या आयुष्यातून हद्दपार केलेलं असलं तरी कुठल्याही श्रध्दावान व्यक्तीची मी चेष्टा करत नाही, ती हात जोडून देवपूजा असेल तर मी तिला नावं ठेवत नाही. त्यामुळे मग तिच्यामाझ्यातल्या मैत्रीमध्येही अंतर पडत नाही. म्हणूनच हे विचारांचं, आर्थिक परिस्थितीचं, भान ठेवून एका पातळीवर कसं येता येईल हा सातत्यानं प्रयत्न करायला हवा आणि मी तरी तो करते. स्त्री-पुरुष असंही न बघता मी समोरच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघते.
चांगुलपणा हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. आपल्याला कोणी वाईट म्हणावं असं कोणालाही वाटत नाही अगदी चित्रपटातल्या खलनायकालाही वाटत नाही. म्हणूनच तो चित्रपटात त्याला संधी मिळताच आपण असे का बनलो याविषयी बोलायला लागतो. जागतिकीकरणानं काही चांगलं घडवलं पण त्याचबरोबर चंगळवाद, विषमता, मूल्यांचा ऱ्हास, व्यक्तिकेंद्री समाज उभा करण्याचंही काम केलं. अशा वेळी माझी मूल्यं बळकट करण्यासाठी पुस्तकातली आणि प्रत्यक्षात भेटलेली माणसं मला दिशा दाखवणार आहेत. त्यामुळे मला वाटतं चांगुलपणा जपण्यासाठी या गोष्टींची खूप गरज आहे. वाचनाची सवय रुजवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं, सतत चांगलं लिखाण करणं, व्याख्यानांद्वारा जनजागृती करणं हे वैयक्तिकरीत्या मी करते आहे आणि पुढेही करत राहीन. माझ्याबरोबर जी माणसं जोडली जातात तीही याच दिशेनं चालतील हा विश्वास मनात आहे. चांगुलपणा, सकारात्मक वृत्ती माणसाला कधी एकाकी करत नाही त्यामुळे या गोष्टी बरोबर घेऊन चालायचं आहे.
रवींद्रनाथ टागोरांची विश्वाला जोडणाऱ्या नात्याची आठवण तरुणाईला करून द्यायची आहे, तर सानेगुरूंजीची खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेला अंगिकारायला मदत करायची आहे. जात-धर्म माणसाला माणसापासून दूर नेत असतील तर त्याला किती प्राधान्य द्यायचं हे डोळसपणे बघण्यासाठीही साहाय्य करायचं आहे. खरं तर आज अनेक तरुण-तरुणी हा चांगुलपणाचा वारसा जपत पुढे चालली आहेत. यांची आणि याची जाणीव नसलेल्या तरुणाईची एकत्रित भेट घडवून आणायची आहे. आज अरविंद गुप्ता, मेधा पाटकर, डॉ. प्रकाश आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, आ. ह. साळुंखे, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासारखी माणसं हे काम सजगपणे करताहेत आणि त्यांच्या कामामुळे होणारे बदल टीपणारी मी एक साक्षीदार आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या वेध उपक्रमाने किती तरुण बदलले, किती जणांना जगण्याचा मार्ग सापडला हे मी अनुभलंय आणि अनुभवते आहे. त्यामुळे चांगुलपणाची चळवळ ही कोण्या एकट्याची नसून ती आपल्या सगळ्यांचीच आहे.
शेवटी, डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या चांगुलपणाच्या चळवळीला माझ्या सक्रिय शुभेच्छा.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment