शब्दांचे जादूगार हरिवंशराय बच्चन
एक असते मुन्नी आणि एक असते चुन्नी. मुन्नी असते सहा वर्षांची, तर चुन्नी असते पाच वर्षांची. दोघी सख्ख्या बहिणी असतात. कपडे घेतले तरी दोघींचेही सारखेच, गळ्यातली माळ असो की कानातले डूल, तेही दोघींना सारखेच हवेत. मुन्नी ब तुकडीत, तर चुन्नी अ तुकडीत शिकत असते. एकदा काय होतं, परीक्षेचा निकाल लागतो त्या वेळी मुन्नी पास होते, तर चुन्नी नापास होते. आपण परीक्षेत उत्तीर्ण झालो तर स्वामी महावीर यांना मिठाईचा प्रसाद दाखवू असं मुन्नीनं कबूल केलेलं असतं. मुन्नीच्या इच्छेनुसार मुन्नीची आई मिठाई बनवते. ती सगळी गडबड बघून हिरमुसलेली चुन्नी आपल्या आईला विचारते, ‘आई, नापास झालेल्या मुलीला देवाला मिठाई देता येत नाही का ग?’
ही छोटीशी इटुकली गोष्ट मुलांसाठी लिहिली हिंदीतले विख्यात साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांनी. लहान मुलांची निरागसता त्यांच्या लिखाणातून अनेक वेळा प्रतिबिंबीत होताना दिसते. हरिवंशराय बच्चन हे नाव उच्चारताच मधुशाला हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रहही आठवतो. जीवनाविषयीचं तत्वज्ञान खूप सोप्या सहज भाषेत त्यांनी त्यात मांडलं आहे.
हरिवंशराय बच्चन यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 या दिवशी उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद जवळ प्रतापगढ जिल्ह्यातल्या बाबूपट्टी या लहानशा गावात एका कायस्थ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव प्रताप नारायण श्रीवास्तव आणि आईचं नाव सरस्वतीदेवी असं होतं. लहानपणी त्यांना बच्चन म्हणजे बच्चा/मुलगा या अर्थानं संबोधलं जात असे. शाळेत असताना उर्दू भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. पुढे केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेल्यानंतर जगप्रसिद्ध कवी डब्ल्यू बी. यीट्स यांच्या कवितांवर संशोधन करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. इंग्रजी साहित्यात डॉक्टरेट मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. हरिवंशराय बच्चन यांचं आडनाव खरं तर श्रीवास्तव असं होतं. पण ते केंब्रिज युनिव्हर्सिटीत होते, तेव्हा त्यांनी श्रीवास्तव ऐवजी बच्चन हे आडनाव लावायला सुरुवात केली.
1926 साली वयाच्या 19 व्या वर्षी हरिवंशराय बच्चन यांचा विवाह श्यामादेवी या 14 वर्षांच्या मुलीबरोबर झाला. लग्नानंतर केवळ पाचच वर्षांनी टीबीमुळे श्यामादेवीचा मृत्यू झाला. आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी म्हणजे 1941 साली हरिवंशराय बच्चन यांनी तेजी सूरी या पंजाबी तरुणीशी विवाह केला. तेजी सूरी ही अभिनय, नाटक आणि संगीत यांच्यात रस असलेली युवती होती. या दांपत्याला अमिताभ आणि अजिताभ अशी दोन मुलं झाली. तेजी बच्चन स्वत: नाट्य अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाची आवड बघून अमिताभला नेहमीच अभिनयासाठी प्रोत्साहन दिलं. आज अमिताभ बच्चन हा हिंदी सिनेसृष्टीत सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. घरातल्या कोणाचाही वाढदिवस असला की हरिवंशराय बच्चन एक भेटवस्तू आणि एक कविता करून त्या व्यक्तीला भेट देत असत. ‘माझ्याजवळची संपत्ती म्हणजे माझे शब्द आहेत’ असं ते म्हणत.
हरिवंशराय बच्चन यांना पुस्तकांचं इतकं वेड होतं की त्यांच्या घरात जिकडे तिकडे पुस्तकंच पुस्तकं दिसत. घर बदलायचं ठरलं की त्यांना पुस्तकांचीच जास्त काळजी वाटायची. समजा, आपल्या घराला आग लागली, तर? असा विचार एकदा त्यांच्या मनात आला आणि त्यांनी भगवद्गगीता, गीतगोविंद, कालिदास ग्रंथावली, रामचरित मानस, बायबल, संपूर्ण शेक्सपिअर, पोएटिकल वर्क्स ऑफ यीट्स, दिवाने गालिब आणि रुबाईयात उमर खय्याम ही पुस्तकं घेवून घराबाहेर पडायचं ठरवलं.
फक्त साहित्य क्षेत्रातच बच्चन यांनी आपला ठसा उमटवला नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी उडी घेतली होती. 1955 साली हरिवंशराय यांनी दिल्लीत जावून विदेश मंत्रालयात 10 वर्षं हिंदी भाषेचे विशेष अधिकारी म्हणून तर काही काळ ऑल इंडिया रेडिओवर देखील काम केलं. 1984 साली जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा त्या हत्येवर आधारित कविता हरिवंशराय बच्चन यांनी लिहिली. ही त्यांची शेवटची रचना ठरली.
मुलांसाठी त्यांनी चिमणी, कोकिळ, खारूताई, फुलं, कळ्या आणि सूर्य यांच्यासह अनेक विषयांवर कविता लिहिल्या. आपल्याला ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ ही म्हण माहीत आहेच. यावरच त्यांनी मुलांसाठी खूप सोप्या भाषेत एक कविता लिहिली. त्यात त्यांनी जंगलात कोल्हा काहीतरी खाण्यासाठी फिरत असतो आणि अखेर त्याला अंगुराची वेल दिसते. त्या वेलीवर द्राक्षाचा घोस लटकलेला असतो. द्राक्षासाच्या घोसाचे दाणे खूप रसाळ दिसत असतात. ते द्राक्ष बघून भुकेल्या कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटतं अणि तो घोस काढण्यासाठी तो उड्या मारायला लागतो. उंचच उंच उड्या मारून देखील कोल्ह्याला काही केल्या द्राक्षाचा घोसापर्यंत पोहोचता येत नाही. अखेर खूप प्रयत्न करूनही त्याच्या हाती काहीच पडत नाही, तेव्हा तो म्हणतो, ही द्राक्षंच मुळी चांगली नाहीत. आंबटच आहेत. याचप्रमाणे हंसाप्रमाणे कावळा आपणही गोरं व्हायचं ठरवतो आणि साबण लावून लावून कसा अयशस्वी प्रयत्न करतो हे देखील त्यांनी कवितेमध्ये गुंफलं होतं.
त्यांनी लिहिलेली रेल्वेवरची कविता तर खूपच भावणारी आहे. सगळ्यात लठ्ठ आणि काळा मुलगा हा रेल्वेचं इंजिन बनून सगळ्यांच्या पुढे उभा राहील आणि इतरांनी शिस्तीत त्याच्या मागे डबे बनून त्याच्या सूचनेप्रमाणे जायचं. मुलांमधला सगळ्यात लहान मुलगा सगळ्यात मागे गार्डचं काम करेल आणि तोच गाडी थांबवण्यासाठी आणि चालवण्यासाठी लाल आणि हिरवा झेंडा दाखवेल. आणि सगळ्यांच्या आवाजात झुक झुक करणारी ही रेल्वे शिट्टी मारत वेग घेईल.
हरिवंशराय बच्चन आणि निसर्गकवी म्हणून ओळखले जाणारे सुमित्रानंदन पंत या दोघांची 30 वर्षांची घनिष्ठ मैत्री होती. या काळात दोघांनी एकमेकांना जी पत्रं पाठवली, त्यातली पंतांची 700 पत्रं बच्चन यांनी जपून ठेवली होती. ज्या वेळी सुमित्रानंदन पंत यांना 71 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा हरिवंशराय बच्चन यांनी पंत के दो सौ पत्र या नावाचं निवडक पत्रांचं पुस्तक 1971 साली प्रकाशित केलं. या निवडक पत्रांमधली 10 पत्रं या पुस्तकात छापू नयेत अशी विनंती सुमित्रानंदन पंत यांनी आपल्या मित्राला केली. पण हरिवंशराय बच्चन यांचा स्वभाव खूप पारदर्शी असल्यानं त्यांनी पंत यांचं म्हणणं मुळीच ऐकलं नाही. माणसाचे गुणदोष, उणिवा, चांगलं-वाईट जगाला कळलं तर काय फरक पडतो असं त्यांना वाटत असायचं. पण हे प्रकरण इतकं वाढलं की शेवटी न्यायालयात गेलं. ती केस जरी हरिवंशराय बच्चन जिंकले, तरी आपण आपला चांगला मित्र गमावल्याची खंत त्यांना वाटत राहिली.
डॉ. हरिवंशराय बच्चन हे उच्च प्रतिभेचे कवी होते. तेरा हार, मधुबाला, मधुकलश, आत्मपरिचय, निशा निमंत्रण, एकांत संगीत, हलाहल, बंगाल का काल, सूत की माला, बुद्घ और नाचघर, दो चट्टाने, असे त्यांचे 26 हून अधिक कवितासंग्रह प्रकाशित झाले. 1968 साली त्यांना ‘दो चट्टाने’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केलं. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. याशिवाय क्या भुलूँ क्या याद करूँ, नीड का निर्माण फिर, बसेरे से दूर आणि दशद्वार से सोपान तक हे आत्मकथनात्मक लिखाण प्रसिद्घ झालं. 1969 साली त्यांची क्या भुलू क्या याद करू या आत्मकथेनं विक्रीचा उच्चांक नोंदवला होता.
हरिवंशराय बच्चन यांना पेन आणि कागद यांचं कमालीचं वेड होतं. गद्य प्रकारातलं लिहिण्यासाठी मजबूत लेखणी तर पद्यासाठी ते नाजूक लेखणी वापरत. लिहिण्यासाठी जाड कागद त्यांना आवडत असे. त्यांच्या टेबलावर नेहमीच जाडसर कागद आणि 10-12 पेन ठेवलेले असत. एखाद्याचा पेन त्यांना आवडला की ते चक्क न लाजता त्याच्याकडून मागून घ्यायचे.
‘मातीत मिसळून जाणारं शरीर, मस्तीनं भरलेलं मन आणि क्षणभंगूर जीवन हीच माझी ओळख’ असं हरिवंशराय आपला परिचय सांगताना म्हणत. 18 जानेवारी 2003 या दिवशी हरिवंशराय बच्चन यांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासामुळे झाला. पारदर्शी व्यक्तिमत्वाचा, जीवनावर भरभरून प्रेम करणारा, आपले विचार आणि कृती एक ठेवणारा हा विख्यात कवी हे जग सोडून कायमचा निघून गेला.
Add new comment