शिरीष पै (जन्म: १५ नोव्हेंबर १९२९- मृत्यू:२ सप्टेंबर २०१७)
शिरीष पै यांचं नाव उच्चारलं की हायकू आणि आचार्य अत्रे हे शब्द ओठांवर येतात.प्रल्हाद केशव अत्रे हे शिरीष पै यांचे वडील, त्यांचं असणं आणि नसणं या दोन्हींचा शिरीष पैंच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झालेला दिसतो. एकदा शिरीष पैंनी अत्रेंना प्रश्न विचारला होता, 'तुम्ही जेव्हा एकटे असता, तेव्हा तुम्हाला कंटाळा येत नाही का?' तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, 'मी एकटा कुठे असतो, तेव्हा मला माझी सोबत असतेच की!'
आचार्य अत्रे यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. पत्रकारिता, नाटक, सिनेक्षेत्र, वक्तृत्व, राजकारण आणि लिखाण या सगळ्याच क्षेत्रात मुसंडी मारून यश मिळवलेला एक अफाट माणूस होऊन गेला. असं म्हणतात वटवृक्षाखाली इतर रोपांची वाढ खुंटली जाते, तसंच मोठ्या माणसांची मुलं त्यांच्या मोठ्या व्यक्तिमत्वापुढे दबून जातात. पण अत्रेंच्या कुटुंबात असं घडलं नाही. त्यांची मुलगी शिरीष पै यांनी महाराष्ट्रावर आपल्या अस्तित्वाची वेगळी मोहोर उमटवली. आपल्या लाडक्या पप्पांवर खूप खूप प्रेम करणार्या शिरीष पैंवर वडलांच्या अनेक गोष्टींचा प्रभाव पडला होता.
बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या,कवी मनाच्या कवयित्रीची जडणघडण, प्रवास कसा झाला हे थोडं जाणून घेऊ या. शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ या दिवशी झाला. बंडखोर स्वभावाच्या अत्रेंची मुलगी ही देखील मुक्त वातावरणात वाढल्यामुळे लहानपणी त्या अतिशय खोडकर होत्या. अत्रे त्यांना ‘नानी’ अशी प्रेमानं हाक मारत. आणि ही नानी आपल्या वडलांना पप्पा अशी लांबट हाक मारत असे.
शिरीष पैचं बालपण पुण्यातल्या नारायण पेठेत शिरनाम्यांच्या वाड्यात पहिल्या मजल्यावर गेलं. सकाळी जाग आली, डोळे उघडले की घरी जमलेल्या अत्रेंच्या मित्रमंडळींचे हास्यविनोदाचे आवाज कानावर पडत. रोजच सकाळी अत्रेंकडे अशी मैफल जमत असे. लहानपणापासून घरात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची ये-जा असल्यानं शिरीषच्या कानावर अनेक गोष्टी पडत. वडलांबद्दलचे अनेक किस्से त्यांच्याच मित्रमंडळींच्या तोंडून ऐकायला मिळत. तासनतास गप्पांचा हा फड रंगलेला असे. कोणी कविता ऐकवत असे, तर कोणी विनोद, कोणी आपली नव्यानं लिहिलेली कथा वाचून दाखवत असे तर कोणी काही.....
अशा वातावरणात शिरीष घडत होती. कविता असो, वा त्या कवितेचं व्याकरण, कवितेतली लय, नाद, नैसर्गिक ताल हे सगळं कानावर आपसूकच पडत होतं आणि आत खोलवर रुजतही होतं. आपल्या पप्पांशेजारी बसून त्या सगळ्या गोष्टी ऐकणं शिरीषला खूप आवडायचं. परिणाम असा झाला की वयाच्या नवव्या वर्षीच ही चिमुकली एक गोष्ट आणि एक कविता लिहून मोकळी झाली. त्या वेळी खेळगडी नावाचं मासिक मुलांसाठी प्रसिद्ध व्हायचं. १४ व्या वर्षी शिरीषची कथा प्रसिद्ध होऊन तिला कथास्पर्धेतलं पहिलं पारितोषिक मिळालं. आपल्या मुलीची साहित्यातली आवड बघून अत्रेंनी शिरीषच्या लिखाणाला खूप प्रोत्साहन दिलं. त्यांनी तिला लिहिलेलं पहिलंच पत्र खूप प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी तिला, दिसामाजी काहीतरी लिहावे.....अशीच लिहीत राहा’ असं म्हणून आशीर्वादच दिला होता. आपल्या वडलांवर खूप खूप प्रेम करणारी आणि त्यांच्या प्रभावाने झपाटलेली शिरीष - तिनं आपल्या वडलांचा हा आशीर्वाद किंवा आदेश शिरसावंद्य मानला. अत्रेंना वकील होण्याची खूप इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही त्यामुळे त्यांनी आपल्या लाडक्या नानीला म्हणजेच शिरीषला लॉ करून वकील हो असं म्हटलं. शिरीष पै यांना मराठी विषय घेऊन एमए करावं वाटत असलं तरी त्यांनी वडलांच्या आग्रहाखातर आपलं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच ठिकाणी आयुष्याचा जोडीदारही त्यांना मिळाला. व्यंकटेश पै या देखण्या तरुणाला पहिल्यांदाच बघितल्यावर त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. समाजवादी विचारांच्या व्यंकटेश पैंमध्ये एक हाडाचा कार्यकर्ता तर होताच, पण त्यांचा ओढा राजकारणाकडेही होता.
आपल्या वडलांबरोबर शिरीष यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील पुढे भाग घेतला. त्या वेळचं त्यांचं धाडस अचंबित करणारं होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या अत्रेंच्या आक्रमक कृतीमुळे सरकारनं त्यांना पकडून तुरुंगात टाकलं. त्या वेळी मराठा हे अत्रेंचं वृत्तपत्र खूप प्रसिद्ध होतं. त्यातले रोजचे अग्रलेख वाचून लोक प्रेरित होत असत. मराठा म्हटलं की अत्रेंचा अग्रलेख आधी वाचायचा अशी सवय लोकांना लागली होती. कारण अत्रेंचा लेख म्हणजे एक जिवंत ज्वालेचा धगधगता अनुभव असायचा. त्यांचा अग्रलेख वाचून मराठी माणसांत हिम्मत आणि लढाऊ वृत्ती निर्माण होत असे. आता अत्रेच तुरुंगात गेल्यावर त्यांच्यासारखे अग्रलेख कोण लिहिणार असा प्रश्न लोकांना पडला.
अशा वेळी शिरीष पै यांनी खूप हिम्मतीने मराठाचं काम आपल्या खांद्यावर घेतलं. न डगमगता शिरीष पै यांनी एक युक्ती लढवली. त्या आपल्या वडलांचा डबा घेऊन तुरुंगात त्यांना भेटायला जात आणि वडलांचा डबा खाऊन झाला की रिकामा डबा घेऊन परत येत. त्या रिकाम्या डब्यात अत्रे अग्रलेख लिहून ती कागदं डब्यातून पाठवत. दुसर्या दिवशीच्या मराठातला अग्रलेख अत्रेंचाच असे. आपला लाडका नेता तुरुंगात असताना हा अग्रलेख आला कसा असा वाचकांनाच काय, पण सरकारलाही प्रश्न पडे. शिरीष पै यांनी त्या वेळी केलेलं हे धाडस खूपच लाखमोलाचं होतं. त्या आलेल्या प्रसंगांना धडाडीनं सामोर्या जात. अजिबात डगमगत नसत. पुढे मराठी दैनिकाच्या पहिल्या महिला संपादिका म्हणून हा मान त्यांच्याचकडे जातो.
या सगळ्या काळात शिरीष पैंची ओळख विजय तेंडुलकर, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, मधुकर केचे, मंगेश पाडगावकर, केशव मेश्राम, माधव ज्यूलियन, नारायण सुर्वे या साहित्यिक क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींशी झाली. त्यांचं लिखाण शिरीष पैंना खूप आवडायचं आणि ते मराठातही प्रसिद्ध होत असे. ते वाचून शिरीष पैं लिखाणातले अनेक बारकावे आणि अनेक गोष्टी शिकत होत्या. शिरीष पैंना इंग्रजी वाचनानंही झपाटून टाकलं होतं. चेकॉव्ह, वॉल्ट व्हिटमन, खलिल जिब्रान त्यांना आवडायला लागले. तसंच त्यांना एमिली ब्रांटेच्या कादंबर्या आणि कविता वाचायला खूप आवडत. या वाचनामुळेच त्यांचं लिखाणही जास्तीत जास्त सकस होत गेलं. आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्यावाईट लोकांमुळे आपल्या हातून लिखाण झालं असं शिरीष पै म्हणत. आपण ठरवून कुठलंही लिखाण केलं नाही, जे मनात उमटलं, तेच लिहिलं असंही त्या म्हणत. खरं तर शिरीष पै लेखिका म्हणून, कवयित्री म्हणून खूप ताकदीचं लिखाण करत. त्या एक प्रभावी ललित लेखिका होत्या, त्या नाटककारही होत्या, पत्रकार तर त्या होत्याच शिवाय त्या बालसाहित्यिकही होत्या.
एकदा विजय तेंडुलकर यांनी शिरीष पै यांना जपानी हायकू या काव्यप्रकाराची ओळख व्हावी या हेतूनं इंग्रजीतून अनुवादित असलेलं एक पुस्तक त्यांना भेट दिलं. हायकू हा काव्यप्रकार शिरीष पैंना इतका आवडला, इतका आवडला की त्या अक्षरशः झपाटून गेल्या. हायकू हा मुळातला जपानी काव्यप्रकार असून यात तीन ओळीत कवितेचा सगळा आशय मांडलेला असतो. आपल्याकडे म्हणजे भारतात हा हायकू रविंद्रनाथ टागोर यांनी प्रथम आणला. मात्र मराठीत हायकूची ओळख शिरीष पै यांनीच करून दिली. सुरुवातीला विजय तेंडुलकर यांनी दिलेलं हायकूचं पुस्तक शिरीष पै अनेकदा वाचत. पण त्या स्वतः हायकू लिहायला घेत, तेव्हा त्यांना ते जमत नसे. लिहिलेलं आवडत नसे. मन खिन्न होई. आपण जे काही लिहितोय ते हायकू नाही हे त्यांना कळायचं आणि मग त्या अस्वस्थ व्हायच्या.
एकदा सकाळी सकाळी शिरीष पै आपल्या बागेत उभ्या होत्या. बागेतली फुलझाडं वार्याच्या लहरींवर डोलत होती. झाडांवर पक्ष्यांची लगबग सुरू होती. त्यांचं लक्ष अचानक एका झाडावर असलेल्या कावळ्याकडे गेलं. आणि त्यांच्या ओठांमधून नकळत शब्द बाहेर पडले,
केव्हापासून करतोय काव काव
खिडकीतला एकाकी कावळा
इतका भरून येतो त्याचाही गळा?
या कावळ्याच्या दिसण्यानं शिरीष पैंचा हायकू मनातून ओठात आणि ओठातून कागदावर उतरला. मग मात्र त्यांना हायकूनं सतावलं नाही. मनात विचार आला रे आला की त्यांनी केलेला हायकू सहजगत्या कागदावर उतरू लागले.
प्रेम या विषयाला स्पर्श करताना त्यांचा हायकू म्हणतो,
आवडतेस तू मला...
तो म्हणाला
आयुष्याला आरंभ झाला
तेच प्रेम बदललं की भावनाही बदलतात, त्या म्हणतात,
उत्कट प्रेमाचाही
होतो शेवट
कधी कधी अकस्मात
त्यांच्या हायकू न कळल्यानं सुरुवातीला अनेकांनी त्यांच्यावर खूप टीका केली. हायकू ला हे टीकाकार 'कायकू' म्हणत उपहासानं हसत, टिंगलटवाळी करत. पण शिरीष पैंनी लोकांच्या टीकेकडे जराही लक्ष दिलं नाही. उलट या लोकांचं हे अज्ञान असल्याचं लक्षात घेऊन त्यांनी हायकू काय असतो, त्याच्याविषयी लोकांना समजेल अशा पद्धतीचं हायकूवर एक पुस्तकच लिहिलं आणि ते प्रसिद्ध केलं. सुरुवातीला हसणार्या, टीका करणार्या लोकांना मात्र कालांतरानं हायकूचं महत्व कळलं. हायकूनं मराठीत प्रतिष्ठेचं, मानाचं स्थान पटकावलं. हायकूमुळे शिरीष पैंना खूपच प्रसिद्धी मिळाली. चारोळीप्रमाणेच आपले मनातले विचार मांडण्यासाठी हायकू करण्याचं लोकांना वेडच लागलं. शिरीष पै अशा लोकांना समजावून सांगत, ‘हायकू म्हणजे विचार नव्हे, हायकू म्हणजे चिंतनही नव्हे, तर हायकू ही आपल्या जीवनाबद्दलची सहज प्रतिक्रिया आहे.’हायकूच्या केवळ तीन ओळींमधून आकाशाएवढा विशाल अर्थ व्यक्त करण्याची जबरदस्त ताकद त्यांच्या लिखाणात होती.
त्या आपल्या एका कवितेत म्हणतात,
हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात
पूर असतो त्यांच्या स्वभावात
किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात
कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात
जशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात,
उधळतात गंध, गळून पडतात
नियतीचा सहज स्विकार हृदय देणारेच करतात
अश्रुंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात
प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात
ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय देतात
हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात
शिरीष पै या निसर्ग आणि माणूस यांचं हळुवार नातं आपल्या हलक्या, सौम्य शब्दांत कवितेतून फुलवायच्या. कधी कधी मनाला उदासीनं ग्रासलं जातं. अशा वेळी निसर्गातली एखादी लहानशी गोष्ट तुम्हाला पुन्हा ताजतवानं कशी करते, तुमची मरगळ दूर कशी होते यासाठी त्या म्हणतात,
उदासलेलं माझं मन
इतक प्रसन्न कसं झालं?
साधं पाखरू तर बागेत चिवचिवलं.....
शिरीष पैंनी ५० पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं. हायकूसाठी तर त्यांना देशातूनच नव्हे तर परदेशातूनही अनेक निमंत्रणं येत असत. शिरीष पै नाव जनमाणसात प्रसिद्ध होऊनही त्या अतिशय साध्या होत्या. त्याचं व्यक्तिमत्व सौम्य आणि पारदर्शी होतं.
त्यांच्या कवितेतला आशावाद आपल्याला सतत सांगतो,
हा जन्म मानवाचा
सुख फारसे न हाती
जगण्यात अर्थ तरीही
शिकले जगून हे मी
शिरीष पै यांना आचार्य रजनीश म्हणजे ओशो यांचं तत्वज्ञान खूप आवडायचं. त्या त्यांच्या अनुयायी देखील झाल्या. ओशोंची हिंदी भाषेतली अनेक प्रवचनं शिरीष पै यांनी मराठीत अनुवादित केली. ती वाचताना त्यातला तरलपणा आणि अर्थाची खोली तितकयाच परिणामकारकरीत्या वाचकांना अनुभवायला मिळते. रवींद्रनाथ टागोर जगण्याला उत्सव मानत. तेच ओशोंच्याही मांडणीतून व्यक्त होत असायचं. शिरीष पैंना आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगणं ही गोष्ट मनोमन भावली आणि ती शिकवण त्या खरोंखरच जगल्या.
शिरीष पै ही मराठी साहित्यात वेगळी ओळख असलेलं नाव असलं तरी त्या जेव्हा रस्त्यानं जात, तेव्हा कोणी अरे, त्या बघ आचार्य अत्रेंच्या कन्या असं म्हणत, तेव्हा त्यांना खूप आवडायचं. हीच ओळख त्यांना जास्त सुखावून जायची.
आयुष्याच्या अखेरच्या काही दिवसांत अनेक व्यावहारिक गोष्टींमुळे त्या कंटाळून गेल्या. आचार्य अत्रेंच्या मृत्युपत्राच्या खरेखोटेपणाबद्दल कोर्टात केस सुरू होती. त्या कटकटींनी त्यांना हैरान करून सोडलं. पुढे त्यांना मराठा बंद करावा लागला त्याचंही त्यांना खूप दुःख झालं. मराठा बंद करताना त्यांनी स्वतः नुकसान सोसलं, पण एकाही कामगाराचा एकही पैसा बुडवला नाही. सगळ्यांचे हिशोब चोख चुकते केले. 'स्त्री म्हणून जन्माला आलो तरी संसारातली कर्तव्य पार पाडताना त्या स्त्रीला पुरुषाचंही आयुष्य जगावं लागतं. पुरुषासारखा पराक्रम अनेक बाबतीत गाजवावा लागतो. आणि हे सगळं मी माझ्या पराक्रमी वडलांकडून शिकले' असं त्या अभिमानानं म्हणत.
शिरीष पैंची कविता अगदी साध्यातल्या साध्या माणसालाही आवडायची कारण त्यात शब्दांचे खेळ असण्यापेक्षा काय म्हणायंचय ते सोप्या शब्दांतून ओघवत्या शैलीतून वाचकांपर्यंत पोहोचायचं. एका कवितेत त्या म्हणतात,
असो रुक्षता भवती सारी
काळजात परी प्रेम असावे
जग हे सुंदर म्हणता म्हणता
चांगुलपण तेवढे पहावे
रंग दोन हे जगात असती
शुभ्र जसा काळा तैसाही
खुले पांढरा काळ्यावरती
रीत विलक्षण असे अशी ही
डोळ्यांमधुनी अश्रू झरता
ओठांवरती हसू असावे
रात्र काजळी काळी पडता
पणतीने मिणमिणत रहावे
कधी निराशा कधी वेदना
हेही अनुभव हासत घ्यावे
आयुष्यातुनि सदैव आपण
दिव्यत्वाचे दर्शन घ्यावे
आयुष्याचं तत्वज्ञान अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांत मांडणार्या शिरीष पै यांनी मनातले हायकू, हायकू, हायकूचे दिवस, नवे हायकू आणि फक्त हायकू असे अनेक हायकू संग्रह प्रसिद्ध केले. हायकू हा काव्यप्रकार अक्षरशः त्यांच्या जगण्याचा श्वास होता. त्यांच्या एकाकीपणाच्या काळात हा हायकू त्यांना शेवटपर्यंत साथ देण्यासाठीच सोबती म्हणून आला. हायकूशिवाय त्यांचे एकतारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी आणि ऋतुचक्र हे त्यांचे काव्यसंग्रहही लोकांना खूप आवडले. लालन, बैरागीण, हेही दिवस जातील या त्यांच्या कादंबर्या जरूर वाचायला हव्यात. त्यांचं ललित लेखनही तितकंच सकस होतं. आजचा दिवस, आतला आवाज, अनुभवांती आणि प्रियजन हे त्यांचे लेख वाचायलाच हवेत. शिरीष पै यांनी चैत्रपालवी, खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे कथासंग्रह लिहिले. आईची गाणी आणि बागेतल्या गमती हे त्यांचं बालसाहित्य खूपच प्रसिद्ध आहे. हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली आणि कळी एकदा फुलली होती ही नाटंकही त्यांनी लिहिली. तसंच पप्पा, वडलांच्या सेवेसी ही चरित्रपर आणि सय आणि मी, माझे, मला हे अन्य लेखनही त्यांनी केलं. आपल्या वडलांप्रमाणेच सामाजिक भान जपणारं, आयुष्याला सुंदर करणारं, संवेदनशीलता जपणारं, निसर्गावर प्रेम करणारं लिखाण त्यांना आवडायचं. वडलांच्या सेवेसी या चरित्रपर लिखाणात शिरीष पै यांनी आपले वडील आचार्य अत्रे, पती व्यंकटेश पै, आई आणि स्वतःविषयी काही प्रसंग आिाण आठवणी लिहिल्या आहेत. त्यातून त्यांचं आपल्या जिवलगांविषयीचं प्रेम, अस्वस्थ करणार्या आठवणी, चढउताराचा प्रवास, तसंच त्यांचं पारदर्शी आणि निरागस मन पदोपदी समोर येत राहतं.
शिरीष पै यांची खरी ओळख लोकांनी हायकू लिहिणार्या म्हणूनच केली. शिरीष पैंनी देखील हायकूवर आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रेम केलं. अखेरच्या दिवसांत तर त्या केवळ हायकूच लिहीत.
त्या म्हणत,
स्वप्नामध्ये हायकू रचला
जाग येताच
हरवून गेला
मृत्यूची चाहुल लागली असावी तशा शिरीष पैंचा हायकू बोलतो,
खूप बघून घेतले
थोडे राहिले
आयुष्य संपत आले
किंवा त्यांचाच दुसरा हायकू
गोष्ट संपत आली
ऊर भरून आला
शेवट जवळ आला
मृत्यूची प्रतीक्षा करताही शिरीष पैंना हायकू सोबत करतो, त्या म्हणतात,
वाट बघतेय तो येण्याची
दारावर थाप
पडण्याची
वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचा फक्त हायकू हा काव्यसंग्रह डिम्पल प्रकाशनानं प्रसिद्ध केला. हा आपला शेवटचाच हायकूचा काव्यसंग्रह असेल अशा भावनाही शिरीष पैंनी गेल काही दिवसांत व्यक्त केल्या होत्या. २ सप्टेंबर २०१७ या दिवशी वृद्धत्वामुळे आपल्या राहत्या घरीच त्यांचा मृत्यू झाला. त्या नसल्या तरी आज आणि यापुढेही त्यांच्या कवितेतून त्या आपल्याशी संवाद साधतच राहतील, त्यांच्या कविता आपल्या जगण्याचा द़ृष्टिकोन अधिक व्यापक आणि विशाल करत राहतील यात मात्र शंकाच नाही.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment