दिग्गज अमॅझॉन डॉट कॉमचा जनक जेफ बेझॉस 

दिग्गज अमॅझॉन डॉट कॉमचा जनक जेफ बेझॉस 

जेफ बेझॉस नावाच्या मुलाची ही गोष्ट! आपल्या आजोबांचा प्रचंड प्रभाव असलेल्या या मुलाला आजोबांप्रमाणेच आपलं म्हणणं खरं करण्याची सवय होती. जेफ बेझॉसनं आपल्या आईला आपण पाळण्यासारख्या लहान पलंगावर झोपणार नसून आजपासून सगळ्यांप्रमाणेच मोठ्या पलंगावर झोपणार असल्याचं जाहीर केलं. तीन वर्षांचा एवढासा मुलगा, मोठ्या पलंगावरून पडेल अशी त्याच्या आईला धास्ती वाटत होती. तिनं बेझॉसला अनेक परीनं समजावून सांगितलं. आपली आई आपलं ऐकत नाही, ही गोष्ट लक्षात येताच बेझॉसनं चक्क एक स्व्रू ड्रायव्हर घेऊन छोट्या पाळणेवजा पलंगाचे सगळे स्क्रू काढून जोडलेले भाग वेगळे करून टाकले. आईनं ते दृश्य बघितलं आणि कपाळावर हात मारत तिनं जेफ बेझॉसला मोठया पलंगावर नेऊन पटकवलं. 

अतिशय मनस्वी असलेल्या जेफ बेझॉसचं लक्ष एखाद्या गोष्टीत गुंतून गेलं की त्याला आजूबाजूच्या जगाचं भानच राहत नसे. शाळेत असताना एखादी गोष्ट ऐकण्यात तो इतका रंगून जायचा की त्याला खुर्चीसह उचलून दुसर्‍या गोष्टीसमोर त्याच्या शिक्षिकांना न्यावं लागत असे. जेफ बेझॉसला इलेक्ट्रॉनिक उपकरणं उकलून बघणं खूपच आवडायचं. आपल्याला रेडिओ किंवा यंत्रमानव तयार करता आला पाहिजे या ध्यासानं मग त्याची खुडबूड आणखीनच चालत असे. मोठेपणी आपण पुरातत्व संशोधक व्हायचं, तर कधी अंतराळवीर व्हायची स्वप्नंही बेझॉस तासन्तास बघत असे. 

असा हा जेफ बेझॉस आज जगातल्या सगळ्यात अग्रगण्य असणार्‍या अॅमॅझॉन कंपनीचा जनक,चेअरमन आणि सीईओ असून त्याला ‘आधुनिक स्टीव्ह जॉब्ज’ असं म्हटलं जातं. जेफ बेझॉस हा अमेरिकन तंत्रज्ञ, उद्योजक, गुंतवणूकदार, विद्युत अभियंता आणि संगणकतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. 1999  सालच्या डिसेंबर महिन्यात टाईम या नियतकालिकानं बेझॉसची ‘पर्सन ऑफ द इयर‘ म्हणून निवड केली. बेझॉसनं सुरू केलेली ‘अॅमॅझॉन डॉट कॉम’ ही कंपनी पुस्तकं आणि सीडीज्/डीव्हीडीज, कम्प्युटर्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा प्रकारे अनेक वस्तू घरपोच आणून देण्याची किमया अॅमॅझॉन करते. अॅमॅझॉननं ग्राहकांशी विश्‍वासाचं नातं निर्माण केलं आहे. 

जेफ्री प्रेस्टन जॉर्गनसेन ऊर्फ जेफ बेझॉस याचा जन्म 12  जानेवारी 1964 या दिवशी अमेरिकेमधल्या न्यू मेक्सिको राज्यातल्या अल्बुकर्को इथे माईक बेझॉस आणि जॅकी जॉर्गनसेन या जोडप्याच्या पोटी झाला. लहानपणी गाईगुरांची निगा राखणं, शेतातली छोटीमोठी कामं करणं बेझॉसला आवडत असे. या कामांमुळे स्वावलंबन, समस्या निर्माण झाली तर उपाय शोधण्याचं बळ याचे धडे त्याला मिळाले. आपल्या बुद्मिमान आणि कल्पक आजोबांकडून नवनवी आव्हानं स्वीकारणं, प्रत्यक्षात उतरवणं आणि खंबीरपणे पुढे जाणं या गोष्टीही बेझॉसनं आत्मसात केल्या. 

बेझॉस शाळेत जायला लागला, तेव्हा विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये तो नेहमीच प्रथम क्रमांक पटकावत असे. या काळात त्याला विज्ञानकथांनी वेड लावलं होतं. एडिसन आणि वॉल्ट डिस्ने यांच्या धडाडीचं आणि यशासाठी झगडण्याचं कसब बेझॉसला स्फूर्तिदायी वाटत असे. शाळेत असलेल्या मेनफ्रेम कम्प्युटरविषयीची आणि त्याच्या टर्मिनल्सविषयीची माहिती बेझॉस आणि त्याच्या खटपट्या मित्रांनी मिळून शोधून काढली आणि टर्मिनलवर बसून त्यांना चक्क मेनफ्रेम कम्प्युटर कसा चालवायचा ते कळायला लागलं. 

शालेय शिक्षण संपल्यावर केवळ कुतूहल म्हणून बेझॉसनं मॅकडोनाल्ड्जमध्ये बटाट्याच्या चकत्या तळण्याचं काम कर, विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाची गोडी वाढावी म्हणून उन्हाळी वर्ग सुरू कर असे अनेक उद्योग केले. त्यानंतर त्यानं प्रिन्स्टन विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तिथं गेल्यावर एकापेक्षा एक बुध्दिमान मुलं पाहून बेझॉस धाडकन जमिनीवर आला. प्रिंन्स्टनमधून कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयांमधली पदवी बेझॉसनं मिळवली. 

पदवी मिळाल्यानंतर बेझॉसला स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू करावा असं वाटायला लागलं. मात्र अनुभवासाठी त्यानं आयबीएम, फिटेल, बँकर्स ट्रस्ट अशा कंपन्यांमध्ये काही काळ नोकरी केली. प्रत्येक ठिकाणी आपल्या कामानं त्यानं बढत्या मिळवल्या.  लौकिक अर्थानं बेझॉसनं प्रचंड यश मिळवलेलं असल्यामुळे मॅनहॅटन भागातला तो सगळ्यात लोकप्रिय ‘अविवाहित तरूण‘ म्हणून ओळखला जायला लागला. त्यामुळे अनेक मुलींचा त्याच्यावर डोळा होता. आपण नक्की कुठल्या मुलीशी लग्न करायचं हे ठरवण्यासाठी बेझॉसनं अत्यंत तर्कबुद्धीनं भरलेला एक चार्टच तयार केला. मात्र या चार्टची मदत न घेताच बेझॉसला शॉच्या कंपनीत असताना मॅकेंझी टटल नावाची तरूणी भेटली.  1993 साली दोघांनी लग्न केलं.

या काळात इंटरनेटचा प्रभाव सगळीकडे वाढत होता. आपल्याला इंटरनेटचा फायदा कसा करून घेता येईल याविषयी बेझॉसचाही विचार सुरू झाला. त्यातून ‘अॅमॅझॉन डॉट कॉम‘ची संकल्पना जन्मली. इंग्रजी भाषेतल्या अक्षरांच्या यादीमधल्या पहिल्या म्हणजे ‘ए‘ या अक्षरापासून हे नाव सुरू होत असल्यामुळे हे नाव सुरूवातीलाच येईल, तसंच अॅमॅझॉन नदीमध्ये असलेला भव्यदिव्यपणाही आपल्या व्यवसायात असल्याचं यातून आपल्याला सूचित करता येईल असं बेझॉसला वाटलं. बेझॉसनं आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. सुरुवातीला इंटरनेटवरून पुस्तकांसाठीच्या ऑर्डर्स घ्यायच्या आणि ती पुस्तकं प्रकाशकांकडून मिळवून ती ग्राहकांकडे पाठवून द्यायची असं त्याच्या व्यवसायाचं स्वरूप होतं. त्या वेळी इंटरनेटशी संबंधित असलेल्या बहुतेक सगळ्या कंपन्यांची कार्यालयं कॅलिफोर्नियामधल्या सिलिकॉन व्हॅलीच्या परिसरात असली तरी आपण मात्र वॉशिंग्टन राज्यातल्या सिऍटलमध्ये सुरुवात करायचा निर्णय बेझॉसनं घेतला. बेझॉसनं आपली कंपनी  5 जुलै  1994 या दिवशी एका छोट्या गराजमध्ये सुरू केली. बिल गेट्सच्या जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचा इतिहास याच ठिकाणी घडला होता. 

सुरूवातीला कंपनीत बेझॉसनं स्वत:चे पैसेच गुंतवले होते. आधीच्या नोकर्‍यांमध्ये चांगले लठ्ठ पगार मिळाल्यामुळे बेझॉसकडे बरेच पैसे शिल्लक होते. त्यामुळे पहिले काही महिने तरी आपण अॅमॅझॉनचं कामकाज चालवू शकू याची बेझॉसला खात्री वाटत होती. बेझॉसबरोबरच त्याची बायको मॅकेंझी टटलही त्याला त्याच्या कामात बरोबरीनं साहाय्य करायला लागली. हा व्यवसाय झटपट इतका वाढला, की बेझॉसच्या वडिलांनी गुंतवलेल्या 1  लाख डॉलर्सचे पुढच्या फक्त दोन वर्षांमध्ये तब्बल  1 कोटी डॉलर्स झाले! 

1995 साली इंटरनेट वापरणार्‍या लोकांची संख्या वेगानं वाढत जाऊन 1.60 कोटीवर पोहोचली होती. त्याबरोबरच अॅमॅझॉनची लोकप्रियताही वाढत गेली. तसंच सुरूवातीपासूनच बेझॉसनं आपली वेबसाईट साधी, वापरायला सोपी, आणि लोकांना परत परत भेट द्यावंसं वाटेल या दृष्टीनं आखलेली असल्यामुळे इतर वेबसाईट्सच्या मानानं लोकांना ती जास्त आवडत गेली. 14 मे 1997 या दिवशी अॅमॅझॉन कंपनीची शेअरबाजारात नोंदणी झाली. ऍमॅझॉनचे शेअर्स विकत घेण्यासाठी रांग लागली! वाढत्या मागणीमुळे बेझॉसनं आपल्याकडच्या कम्प्युटर्समध्ये चौपट वाढ केली. 1998 सालच्या नोव्हेंबर महिन्यात बेझॉसनं पुस्तकांशिवाय इतर वस्तूंच्या विक्रीच्या संदर्भातल्या आपल्या संकल्पनांविषयी जाहीर घोषणा केली. तसंच 1999 सालच्या शेवटी अॅमॅझॉनमधल्या कर्मचार्‍यांची संख्या वाढून  5000 वर पोहोचली.

2000 साली शेअरबाजारात भीषण मंदी आली. त्याचबरोबर अॅमॅझॉनच्या शेअरमधली घसरणही आणखी वाढत गेली. अॅमॅझॉनसह इंटरनेटशी संबंधित असलेल्या अनेक कंपन्यांनी या काळात सपाटून मार खाल्ला. पण न डगमगता कंपनीमध्ये बेझॉसनं जास्त लक्ष घालायचं ठरवलं.  त्याच्या प्रयत्नांमुळे 22  जानेवारी 2002 या दिवशी बेझॉसनं अॅमॅझॉन कंपनीला नफा झाल्याची ऐतिहासिक घोषणा केली! यानंतर ऍमॅझॉनचा विस्तार करणं, नवनवी उत्पादनं आपल्या वेब साईटवरून विकणं, चांगल्या कंपन्या विकत घेणं या सगळ्या गोष्टीसुद्धा केल्या. आता बेझॉस सगळे निर्णय खूप विचारपूर्वकरित्या घ्यायचा. तसंच शेअरधारकांना खूप नाराज करून चालणार नाही ही गोष्ट तो सतत आपल्या मनात ठेवूनच आपली पुढची चाल आखायचा. 

19 नोव्हेंबर 2017 या दिवशी बेझॉसनं ‘किंडल‘ हे डीजिटल स्वरुपातलं ‘ई बुक रीडर’ जगासमोर आणलं. सुरुवातीला 399  डॉलर्स किंमत असलेलं किंडल अवघ्या साडेपाच तासांमध्येच संपलं! त्यानंतर किंडलनं सगळीकडे धुमाकूळ घातला. आता भारतातसुद्धा किंडलचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे.
सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘क्लाऊड कम्प्युटिंग‘ नावाचा एक प्रकार अत्यंत गाजतो आहे. 2010 साली अॅमॅझॉननं क्लाऊड कम्प्युटिंग सेवा उपलब्ध करून दिली. तिचा लाभ जगभरातले  दररोज किमान  1 कोटी लोक घेतात. आज अॅमॅझॉनची वार्षिक उलाढाल 136 बिलियन यूएसडी इतकी आहे आणि त्यात जवळजवळ 541000 कर्मचारी काम करतात. 

प्रचंड काम करणारा आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी बेझॉस हा एक ‘मायक्रो-मॅनेजर‘ आहे. चिकाटीनं काम करणारी माणसंच बेझॉसबरोबर दीर्घकाळ काम करू शकतात. बेझॉस स्पष्टवक्ता असल्यानं अनेकदा  खूप लोक त्याच्यावर नाराज होतात. 

'कठोर परिश्रम करा, मजेत रहा आणि इतिहास रचा’ असं बेझॉस म्हणतो. 2017 च्या फोर्ब्सनं केलेल्या सर्व्हेक्षणानुसार यशाची शिखरं पादाक्रांत करणारा जेफ बेझॉस आज जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावर जाऊन बसला आहे! 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.