दिग्गज - स्वामी विवेकानंद
‘कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे. विचारासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचं उगमस्थान आहे. खेळासाठी वेळ द्या, कारण ते तारुण्याचं गुपित आहे. वाचनासाठी वेळ द्या, कारण ते ज्ञानाचा पाया आहे. स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण असलो तरच हे जग आहे आणि दुसर्यासाठी वेळ द्या, कारण ते नसले तर आपलं असणंही निरर्थक आहे.’ असं विवेकानंद म्हणत.
स्वामी विवेकानंद यांच्या व्याख्यानांना लोक प्रचंड गर्दी करत. आपल्या आयुष्यातला मार्गदर्शक म्हणून लोक त्यांच्याकडे बघत. एकदा एक मनुष्य विवेकानंदांकडे आला आणि चक्क रडायला लागला. आपल्यातले दुर्गुण आणि वाईट सवयी यामुळे आपलं जगणं नरकासारखं झालं असून त्यातून आपल्याला बाहेरही पडता येत नाही, तेव्हा त्यावर उपाय मागण्याची विनंती तो विवेकानंदांजवळ करत होता. विवेकानंदांनी आपल्या एका शिष्याला जवळ बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि नंतर काहीच वेळात त्या मनुष्याला आपल्याबरोबर बागेत फिरायला घेऊन गेले. बागेत त्यांचा शिष्य त्यांना एका झाडाला मिठी मारून बसलेला दिसला आणि तो त्या झाडाला, ‘मला सोड, मला सोड’ असं म्हणत होता. ते दृश्य बघून तो मनुष्य हसायला लागला आणि म्हणाला, ‘काय वेडा माणूस आहे हा’ त्यावर विवेकानंद स्मित करत म्हणाले, ‘तुझी देखील अवस्था अशीच आहे. दुर्गुणांना तूच धरून ठेवलं आहेस आणि सुटत नाही म्हणून तक्रारही तूच करतो आहेस.’ तो मनुष्य ओशाळला आणि विवेकानंदांचा निरोप घेऊन गेला.
आपलं व्याख्यान आणि तत्वज्ञान यांनी जगावर प्रभाव पाडणार्या विवेकानंदांचा म्हणजेच नरेंद्र विश्वनाथबाबू दत्त ऊर्फ नरेनचा जन्म १२ जानेवारी १८६३ या दिवशी विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी कोलकता इथं सिमुलिया भागात झाला. नरेनचे वडील कोलकता उच्च न्यायालयात ऍटर्नी होते. विश्वनाथबाबू आणि भुवनेश्वरी देवी दोघंही कृती करणारे सुधारक होते. कालबाह्य रुढींना त्यांनी झुगारून लावलं होतं.
मोठेपणी जगाला शांततेचा संदेश देणारा नरेन लहानपणी मात्र खूप खोडकर आणि रागीट होता. १८७१ साली पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत नरेंद्र जायला लागला. शाळेतला तीन वर्षांचा अभ्यासक्रम त्यानं एकाच वर्षांत पूर्ण केला होता. तसंच वयाच्या सोळाव्या वर्षी प्रवेश परीक्षेत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. त्याला दर्शनशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, कला, साहित्य, संगीत अशा अनेक विषयांमध्ये रुची होती. जगन्नाथ मिश्रा, ज्वालाप्रसाद, बेनी गुप्ता आणि अहमदखान या संगीततज्ज्ञांकडून नरेननं शास्त्रीय गायन आणि वादन यांचं शिक्षण घेतलं होतं. गायनाबरोबरच तबला, पखवाज, इसराज आणि सतार ही वाद्यंही तो कुशलतेनं वाजवत असे. तसंच वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, तत्वज्ञान यांचा सखोल अभ्यास होता. नरेननं प्राचीन संस्कृत आणि अनेक बंगाली ग्रंथांचा अभ्यास केला होता. १८८४ साली नरेननं इंग्रजी, गणित, इतिहास, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास करून बीएची पदवी मिळवली. त्यानंतर प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यानं तत्वज्ञान विषयात एमए केलं. डेव्हिड ह्यूम, हर्बर्ट स्पेन्सर, स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन हे विचारवंत नरेनला आवडत. हर्बर्ट स्पेन्सरच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यानं स्पेन्सरच्या 'एज्युकेशन' या पुस्तकाचा अनुवादही केला होता. नरेननं व्यायाम, मैदानी खेळ, वाचन, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणं, होडी वल्हवणं, घोडेस्वारी, लाठीयुद्ध यातही प्रावीण्य मिळवलं होतं. मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाच्या नरेनला त्याचे मित्र ‘बेले’ या नावानं हाक मारत.
एकदा वर्गात प्रा. हेस्टी यांनी वर्डस्वर्थ या कवीची एक्सर्क्शन ही निसर्ग कविता शिकवली आणि 'निसर्गातल्या सौदर्यांचं वर्णन ऐकून उपयोग नाही, तर तो एक अनुभव असून तो घ्या' असं हेस्टीनी सांगितलं. अनुभवाच्या बाबतीत आणखी विस्तारानं सांगावं या हेतूनं त्यांनी 'दिव्य अनुभव घेतलेली मी बघितलेली व्यक्ती म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस!' असं सांगितलं. त्या क्षणी नरेनच्या मनात रामकृष्ण परमहंस यांना भेटण्याची ओढ लागली. याच दरम्यान नरेन ब्राम्हो समाजाची तत्वं समजून घेण्यासाठी जात होता.
नरेनचं लग्न करायचं यासाठी विश्वनाथबाबूंनी एक सुस्वरूप, सर्वगुणसंपन्न अशी धनिक घरातली मुलगी बघितली. मुलीचे वडील नरेनला वकिलीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मुलीसहित इंग्लंडला पाठवणार होते. दोन्ही घरात उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. सगळं काही सुरळीत चाललेलं असताना २५ फेब्रुवारी १८८४ या दिवशी वयाच्या ५० व्या वर्षी विश्वनाथबाबूंचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूनं दत्त कुटुंबांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. भुवनेश्वरीदेवीच्या वाट्याला विधवा म्हणून उपेक्षेचे प्रसंग आले. विश्वनाथबाबू हा एकमेव कर्ता पुरुष निघून गेल्यानं राहतं घर सोडायची पाळी कुटुंबावर आली. नरेनची प्रशंसा करायला न थकणारे त्याचे भावी सासरे, त्यांनी लग्नातून काढता पाय घेतला. याच दरम्यानं रामकृष्णांचा अपघातानं एक हात मोडला होता. त्यांना भेटायला जाणं, कायद्याचा अभ्यास करणं, नोकरी मिळवण्याचे प्रयत्न करणं नरेन करत होता. दिवसा मिळेल ती नोकरी आणि रात्री एखाद्या मित्राकडे अभ्यास करणं असं नरेन करत होता. उपाशीपोटी घरी आल्यावर आपण जेवून आलोय असं सांगून कित्येक रात्री नरेननं फक्त पाणी पिऊन काढल्या.
याच दरम्यान सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक समता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून नरेननं वराहनगर मठाची स्थापना केली. या दिवसांत त्यानं संन्यस्त जीवनाला आरंभ केला. नरेन वेदांताचा अभ्यास करण्यासाठी सहा वर्षं हिमालयात जाऊन राहिला. तसंच वर्षभर तिबेटमध्ये राहून बौद्ध धर्माचाही अभ्यास केला. भाषा, प्रांत, पंथ, जात, धर्म यांची सगळी बंधनं त्यानं झुगारून दिली. खेत्री संस्थानचा राजा अजितसिंग नरेनचं मार्गदर्शन घेत असे. प्रजेला सुशिक्षित कर या नरेनच्या सल्ल्यानुसार खेत्री संस्थानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र यांची प्रयोगशाळा सुरू केली.
१० मे १८९३ या दिवशी राजा अजितसिंग खेत्री यांनी नरेनला विवेकानंद हे नाव दिलं आणि पुढे संपूर्ण जग त्यांना विवेकानंद याच नावानं ओळखायला लागलं. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी अमेरिकेतल्या शिकागो शहरात सर्वधर्म परिषद भरणार होती. या परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेला जायचं विवेकानंदांनी ठरवलं. खेत्री, म्हैसूर, हैदराबाद या संस्थांनच्या राजांनी आणि विवेकांनदांच्या चाहत्यांनी त्यांचा प्रवासखर्च उचलला. या प्रवासात विवेकानंदांनी अनेक देश बघितले. त्या वेळी त्यांना भारतातल्या परंपरा, रुढी, अंधश्रद्धा, भेदाभेद हे सगळं आठवून भारताला या गोष्टी कशा मागे नेताहेत हे समजलं. परिषदेच्या आधी अमेरिकेतल्या वास्तव्यात विवेकानंदांनी अनेक ठिकाणी भाषणं दिली. ‘आज भारताला खरी गरज धर्माची नसून औद्योगिक युगाला शोभेल अशा शिक्षणाची आहे’ असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. महात्मे आणि गूढ संदेश किंवा चमत्कार या गोष्टींवर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता.
परिषदेत सहभागी झालेल्या विवेकानंदांनी सात हजार सहभागींचं मन आपल्या वक्तृत्वानं जिंकलं होतं. व्यासपीठावर येताच त्यांनी, 'अमेरिकेतल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो....’ असे शब्द उच्चारले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. या वेळी केलेल्या व्याख्यानात विवेकानंद म्हणाले, 'धर्माच्या, पंथाच्या आणि संप्रदायाच्या दुराभिनापोटी अनेक वेळा हे जग मानवी रक्तानं न्हावून निघालं आहे. याच्या अतिरेकानं मानवी संस्कृतीचा विनाश झाला आणि अनेक समृद्ध राष्टं नामशेष झाली. ...’ विवेकानंदांच्या प्रत्येक वाक्याला श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दुसर्या दिवशी सर्व अमेरिकन वर्तमानपत्रांनी त्यांची भरभरून प्रशंसा केली होती.
विवेकानंदानी राजयोगावर लिहिलेलं पुस्तक १८९६ साली टॉलस्टॉयनं वाचलं आणि ‘आधुनिक भारताचा सगळ्यात श्रेष्ठ तत्वज्ञ कोणी असेल तर तो विवेकानंद होय.’ असं तो म्हणाला. सुभाषचंद्र बोस, पं. जवाहरलाल नेहरू, म. गांधी यांनी विवेकानंदाच्या आधुनिक आणि प्रागतिक दृष्टिकोनाला गौरवलं. विवेकानंदांनी विपुल लेखन केलं. ‘माणूस आस्तिक आहे की नास्तिक हे महत्वाचं नसून तो चांगला आहे की नाही हे मला महत्वाचं वाटतं’ असं विवेकानंद म्हणत. त्यांनी इंग्रजी आणि बंगालीमधून मोजक्या कविताही केल्या.
विवेकानंद काळाच्या पुढे बघणारे होते. यंत्रयुग, चंगळवाद, पर्यावरणाची हानी अशा विषयांवर त्यांनी धोक्याची सूचना त्यावेळी दिली होती. अतियंत्राचा वापर दुःखाला कसं आमंत्रण देईल, अतिपैसा खरा आनंद कसा नष्ट करेल अशा अनेक गोष्टींची वाच्यता त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून केली. वासनांनी वासनांना गुणायचं त्याला आपण प्रगती म्हणतो. ही खरी प्रगती नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या विवेकानंदांनी लोकांना मलेरिया होण्यामागची कारणं सांगून पाणी उकळवा, गाळा, स्वच्छता राखा असं सांगितलं. स्त्रियांच्या सन्मानाविषयी विवेकानंद आदरानं बोलत. मात्र त्यांची विधवा विवाह किंवा इतर काही बाबतीत मतं वाद होतील अशी होती. बालविवाह, पुर्नजन्म अशा बाबतीत विवेकानंदाचा ठाम विश्वास होता. मात्र त्याच वेळी विवेकानंदांनी ज्योतिषशास्त्रावर आणि त्यावरच्या अंधविश्वासावर कडाडून टीका केली होती.
‘शिक्षण म्हणजे डोक्यात निरंतर धुडगूस घालणारे आणि आपल्या मेंदूत ठासून कोंबलेल्या माहितीचे भेंडोळे नव्हे, माणूसपण घडवणारे, शील आणि चारित्र्य बनवणारे असे विचार म्हणजे शिक्षण!’ शिक्षणाबद्दलचे अतिशय स्पष्ट विचार विवेकानंदांनी मांडले.
‘मी केवळ हिंदुस्थानचा नाही, तर मी सार्या जगाचा आहे’ असं विवेकानंद म्हणत. ४ जुलै १९०२ या दिवशी कोलकत्याजवळच्या बेलूर मठात वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या स्मृती जागवणारं विवेकानंद स्मारक कन्याकुमारीच्या समुद्रात त्यांच्या असामान्य कार्याची साक्ष देत दिमाखात उभं आहे!
Add new comment