माझं एक स्वप्न आहे...मार्टिन ल्यूथर किंग (January 15, 1929 - April 4, 1968)
पंधरा वर्षांचा एक चुणचुणीत हुशार मुलगा आपल्या शाळेच्या वादविवाद स्पर्धेत निवडला गेला आणि दुसर्या शहरातल्या स्पर्धेत भाग घेऊन त्यानं ‘कृष्णवर्णीय आणि राज्यघटना’ या विषयावर बोलून प्रथम पारितोषिक पटकावलं. त्याला खूप आनंद झाला होता आणि अर्थातच त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या शिक्षकालाही! कधी एकदा आपण बसने घरी पोहोचतो आणि सगळ्यांना बक्षीस दाखवतो असं त्या मुलाला झालं होतं. तो आणि त्याचे शिक्षक परतीच्या बसमध्ये शिरले. काहीच वेळात बस भरली. बस सुरू होणार एवढ्यात दोन गौरवर्णीय प्रवासी आत शिरले. बसमध्ये एकही जागा बसण्यासाठी शिल्लक नव्हती. अशा वेळी बस चालकाने त्या मुलाला आणि शिक्षकाला उभं राहायला सांगितलं. त्या मुलानं आपल्या जागेवरून उठायला नकार दिला. त्या वेळी बसचा चालक त्या मुलावर ‘ए काळुंद्र्या, मवाल्या उठ म्हणतो ना’ असं म्हणून त्याचा अपमान केला. त्या मुलाला खूप राग आला. ज्या विषयावर बोलून त्यानं पारितोषिक मिळवलं होतं, त्या विषयाच्या उलट वागणूक इथं दिली जात होती. त्याच्याबरोबरचा शिक्षक खूप घाबरला आणि त्यानं त्या मुलाला उभं राहण्याबद्दल विनंती केली. शिक्षकाचं म्हणणं त्या मुलानं ऐकलं. परतीचा प्रवास दोघांनीही एकमेकांशी न बोलता अपमानजनक स्थितीत उभ्यानं केला. पदोपदी कृष्णवर्णीय म्हणून होणारा अन्याय आणि अपमान यांच्या आठवणींनी तो मुलगा दुःखी झाला आणि त्यानं ठरवलं की यापुढे या गोष्टी सहन करायच्या नाहीत. बंड पुकारणार्या या मुलाचं नाव होतं मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनियर!
मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनियर हा नेमका कोण होता? तो एक धर्मसुधारक, समाजसुधारक, मानवतावादी आणि क्रांतिकारी नेता होता! शांततेचा पुजारी होता! ज्याला जगातला शांततेबद्दलचा सर्वोच्च समजला जाणार्या नोबेल पुरस्कारानं गौरवलं गेलं. ज्याला अमेरिकेचा ‘महात्मा गांधी’ म्हटलं गेलं. जो आयुष्यभर गांधींजींच्या अहिंसेच्या मार्गावर चालत राहिला. महात्मा गांधींना मार्टिन ल्यूथर किंग आपला आदर्श मानत होता आणि त्यांचा फोटो त्यानं आपल्या घरातल्या भिंतीवर टांगला होता. महात्मा गांधीबरोबरच त्याला हेन्री थोरो आणि लिओ टॉलस्टॉय हे देखील खूप आवडायचे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी १८६३ साली गुलामगिरी नष्ट झाल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पण गुलामगिरी जरी कायद्यानं नष्ट झाली तरी प्रत्यक्ष आचरणातून, जगण्यातून ती गेली नव्हती. अशा वेळी माणसामाणसांमध्ये होणारा अपमानजनक, अमानवीय आणि अमानुष प्रकार थांबवण्यासाठी या माणसानं जगजागृती केली. काळा-गोरा हा भेद करत जनावरापेक्षाही जी दुःसह वागणूक माणसंच माणसांना देत होती ती मार्टिन ल्यूथर किंगला बदलायची होती. त्या वेळी धर्माच्या आड राहून धर्मसुधारक म्हणजेच पोप वगैरे लोक अनैतिकता, भष्ट्राचार आणि पाखंडीपणा करत. मात्र त्यांना कोणीही बोलू शकत नव्हतं. अशा वेळी मार्टिन ल्यूथर किंग या माणसानं अशा लोकांचं बिंग तर फोडलंच, पण लोकांना खरा धर्म काय असतो याची दिशा दाखवण्याचं कामही केलं. त्यानं निवडलेला हा मार्ग अजिबात सोपा नव्हता, पावलोपावली संकटं, संघर्ष आणि अडथळे होते, तरीही मानवतेच्या या पुजार्यानं आपला सत्याचा, खर्याचा मार्ग सोडला नाही.
मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनियरचा जन्म संघराज्यातल्या जॉर्जिया प्रातांतल अटलांटामध्ये एका कृष्णवर्णीय कुटुंबात १५ जानेवारी १९२९ या दिवशी झाला. मार्टिन ल्यूथर किंगचे वडील धर्मोपदेशक होते आणि कृष्णवर्णीय लोक त्यांना खूप मानत. मार्टिनच्या आई-वडिलांनी त्याला चांगले संस्कार दिले. घरातले सगळे त्याला एम.एल. या टोपणनावानं हाक मारत. आपल्या मुलानं कायद्याचं शिक्षण घेऊन वकील बनावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच बायबलविषयी मार्टिन ल्यूथर किंगचा खोलवर अभ्यास झाला. त्याला बायबलचे उतारेच्या उतारे पाठ होते. त्यानं नवा करार यातली अनेक गाणी पाठ केली होती आणि ती तो गायचाही.
वयाच्या पंधराव्या वर्षी मार्टिन ल्यूथर किंगने सोशॅलॉजी (समाजशास्त्र) या विषयाची पदवी प्राप्त केली. धर्माच्या माध्यमातून आपण समाजकार्य करायचं असा मार्टिन ल्यूथर किंगनं निर्धार केला. त्या वेळी धार्मिक बाबतीत लोक खूपच कर्मठ होते. साधूसंघामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याला कठीण अग्निदिव्यातून जावं लागलं. उदाहरणार्थ कडाक्याच्या थंडीत काहीही न पांघरता रात्र काढायची वगैरे. १९९५ साली मार्टिन ल्यूथर किंगने विटनवर्ग विश्वविद्यालयातून डॉक्टर ऑफ थिऑलॉजी ही पदवी प्राप्त केली. याच काळात त्यानं हिंदू, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांचाही अभ्यास केला.
देखण्या असलेल्या मार्टिन ल्यूथर किंगची ओळख कॉरैटा स्कॉट या गायिकेशी झाली. ती हुशार तर होतीच, पण मनमिळाऊ आणि सुंदरही होती. पाच फूट सात इंच असलेला मार्टिन तिला खूपच बुटका वाटायचा. मात्र सतत होणार्या भेटीगाठींमुळे तिला मार्टिन आवडायला लागला आणि १८ जून १९५३ या दिवशी दोघांनी लग्न केलं.
लग्न झाल्यानंतर अॅलबामामधल्या माँटंगोमरी इथल्या डेक्स्टर अॅव्हेन्यू बाप्तिस्त चर्चमध्ये धर्मोपदेशक म्हणून मार्टिन ल्यूथर किंगनं काम करायला सुरुवात केली. सकाळी साडेपाचला उठून आधी आपल्या स्वतःच्या लिखाणाला वेळ द्यायचा, त्यानंतर चर्चमध्ये जाऊन चर्चच्या सभासदांच्या समस्यांवर मार्गदर्शन करायचं, लग्न, अंत्यविधी, औद्योगिक कायद्यांबाबतीत साक्षीदार राहणं अशी कामं तो करायला लागला. आपल्या लहानपणी आपले वडील कसं प्रवचन देतात हे त्यानं बघितलं होतं. प्रवचनामध्ये ज्ञानाबरोबरच भाव असायला हवेत, नाट्यपूर्ण वाक्यं असायला हवीत, योग्य वेळेचं भान असायला हवं हे मार्टिनच्या लक्षात आलं आणि लोकांनाही त्याच्यातला उत्तम वक्ता दिसायला लागला. चर्चमध्ये येणार्या लोकांना मार्टिन ल्यूथर किंग आवडायला लागला.
त्या काळी धर्माच्या उच्च स्थानी राजपुत्र किंवा श्रीमंत व्यक्तींचीच वर्णी लागत असे. ही मंडळी विलासी आयुष्य जगायची आणि इतर सर्वसामान्य लोकांवर अत्याचार करायची. या भ्रष्ट धर्माचरण करणार्या लोकांना कोणी विरोध केला तर त्यांना आपलं आयुष्य गमवण्याची पाळी येत असे. हे धर्मोपदेशक सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवून स्वर्गात जाण्याची तिकीटं विकत असत. तसंच परमेश्वराची कृपा होवून तुम्हाला तुमच्या सगळ्या पापांपासून मुक्ती मिळेल असं सांगू लोकांकडून पैसे उकळत आणि त्याबदल्यात त्यांना एक प्रशस्तीपत्र लिहून देत. भोळ्या भाबड्या जनतेला हे सगळं खरंच वाटत असे. असं असताना चरित्रसंपन्न योग्य व्यक्तीला मात्र हे स्थान कधीही मिळत नसे. मार्टिन ल्यूथर किंगने मात्र आयुष्यभर आपलं जगणं चारित्र्यसंपन्न आणि सत्याच्या मार्गावरून चालणारं ठेवलं. गावागावातल्या चर्चमध्ये जाऊन तो लोकांना उपदेशपर प्रवचनं द्यायला जात असे. तसंच लहान लहान चर्चमधल्या धर्मोपदेशकांना शिकवण्याचं कामही तो करत असे. आपल्या दैनंदिन कार्यक्रमातून लिखाणासाठी वेळ मार्टिन ल्यूथर किंग काढत असे. धर्माचं खरं रूप लेख, पुस्तक, प्रश्नोत्तरं अशा माध्यमांमधून तो लोकांच्या समोर ठेवत असे. आपल्या आयुष्यात ३० हजार पत्रं मार्टिन ल्यूथर किंगनं लिहिली होती. मार्टिन ल्यूथर किंगनं अनेक पुस्तकं आणि धर्मग्रंथ लिहिले. बायबलचं जर्मनी भाषेत त्यानं अनुवादही केला.
मार्टिन ल्यूथर किंगने धर्मोपदेशकांचं दुष्कृत्य लोकांच्या समोर उघडं पाडलं. त्यानं ठिकठिकाणी घेतलेल्या प्रचारसभांमुळे पोप आणि त्याचे समर्थक इतके भयभीत झाले की त्यांनी मार्टिन ल्यूथर किंगला धर्मद्रोही, धर्मद्वेषी आणि धर्मविरोधी घोषित केलं. खरंखोटं करण्यासाठी मार्टिन ल्यूथर किंगने यावर पोप आणि धर्मरक्षक यांना आपल्यावरचे आरोप सिद्ध करावेत असं जाहीर आव्हान दिलं. पोप या गोष्टीसाठी मुळीच तयार नव्हता कारण आपला पराभव होईल हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. त्यानं त्या वेळचा राजा पाचवा चार्ल्स याच्या राजदरबारात मार्टिन ल्यूथर किंगवर धर्मद्राहाचा आरोप ठेवला आणि आपल्या अधिकाराचा वापर करून मार्टिन ल्यूथर किंगला हद्दपारीची शिक्षा ठोठावली. त्या वेळी दरबारातले प्रमुख न्यायाधीश खरं तर उपस्थितही नव्हते. पण पोपपुढे कोणाचंही चाललं नाही.
मार्टिन ल्यूथर किंगने त्यानंतर संपूर्ण युरोप पादाक्रांत केला आणि ख्रिश्चन धर्मातल्या अनिष्ट गोष्टी लोकांसमोर आणायला सुरुवात केली. धर्मोपदेशक आणि सनातनी पोपचा ढोंगीपणा त्यानं लोकांसमोर आणला. अनेक लोकांना मार्टिन ल्यूथर किंग म्हणतोय ते पटत असे. मात्र काही लेाकांना धर्माच्या विरोधात आणि त्यांचं श्रद्धास्थान असलेल्या धर्मोपदेशकांच्या बद्दल बोललेलं सहन होत नसे. अशा वेळी ते पोलिसांना हाताशी धरून मार्टिन ल्यूथरवर हल्ले करत आणि त्याला मारहाणही करत. मार्टिन ल्यूथर किंग आणि त्याच्या अनुयायांमुळे चळवळीला वेग आला.
धार्मिक गोष्टींबरोबरच गोरा-काळा असा भेद नष्ट व्हावा म्हणूनही मार्टिन ल्यूथर किंगनं आंदोलन छेडलं. कृष्णवर्णीय लोकांवर होणारे अत्याचार थांबलेच पाहिजेत ही त्याची भूमिका होती. त्या वेळी गोरे लोक कृष्णवर्णीय लोकांना बसमध्ये प्रवास करताना आपल्या बरोबरीनं बसू देत नसत. तसंच हॉटेलमध्ये जेवताना आपल्या टेबलवर बसायला त्यांना मनाई होती. इतकंच काय, पण कृष्णवर्णीय लोकांच्या वस्त्यादेखील वेगळ्या असत. गोर्यांच्या वस्तीत कृष्णवर्णीय माणूस राहू शकत नसे. गोर्यांच्या शाळांमध्ये कृष्णवर्णीय मंडळी शिक्षण घेऊ शकत नसत. बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये प्रवास करताना एखादा गोरा माणूस आत शिरला आणि जागा नसेल तर कृष्णवर्णीयाला आपली जागा सोडून त्याला बसायला जागा द्यावी लागत असे. धार्मिक शिक्षण घेण्याचा अधिकार कृष्णवर्णीयांना नव्हता. इतकंच काय पण गोरे लोक कृष्णवर्णीयांबद्दलची तुच्छता व्यक्त करण्यासाठी चक्क त्यांच्या तोंडावर थुंकत असत. त्यांना मारहाण करत ‘निगर’ ‘निगर’ असं म्हणत चिडवत. मार्टिन ल्यूथर किंगच्या वाट्यालाही असे अनेक अत्याचार आले होते. लहानपणापासून त्यानं अनेक गोष्टी सहन केल्या होत्या. एकदा मार्टिन ल्यूथर किंग आपल्या वडलांबरोबर बुट विकत घ्यायला दुकानात गेला, तेव्हा दुकानदाराने समोरच्या बाकावरून त्याला उठवलं. याचं कारण ते बाक फक्त गोर्यांसाठी राखीव ठेवलेले असत. गरीब कृष्णवर्णीयांची स्थिती आणि त्यांच्यावरचे अनन्वित अत्याचार पाहून मार्टिन ल्यूथर किंगचं अंतःकरण विर्दीण होत असे.
कायदा असूनही माँटगोमरीमध्ये त्याबद्दल काहीही केलं जात नव्हतं. गोर्यांप्रमाणे कृष्णवर्णीयांनादेखील मतदानाचा हक्क होता. पण मतदारसंघात नवनवे नियम आणून कृष्णवर्णीय लोकांना ते नियम कसे जाचक ठरतील आणि ते मतदान कसे करू शकणार नाहीत हे बघितलं जायचं. कधी कृष्णवर्णीयांनाी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला तर गोरे लोक लगेच हिंसक होत, धमक्या देत आणि शेवटी कृष्णवर्णीयांची नोकरी जात असे. या सगळ्या गोष्टींमुळे कृष्णवर्णीय लोकांमध्ये सतत भीती, दहशत आणि लाचारी आलेली मार्टिन ल्यूथर किंगला दिसत होती.
१९५५ साली डिसेंबर महिन्यामध्ये रोजा पार्कस् ही स्त्री आपल्या कामावरून घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर बसची वाट बघत उभी होती. तिने गर्दीची एक बस सोडून दुसरी बस पकडली. त्या बसमध्ये कृष्णवर्णीयांच्या सगळ्या जागा भरलेल्या असल्या तरी एक जागा शिल्लक होती. ती त्या जागेवर जाऊन बसली. त्यानंतरच्या बस स्टॉपवर काही गोरी माणसं बसमध्ये चढली आणि जागा नाहीये बघून दरडावून कृष्णवर्णीयांना जागा खाली करायला सांगायला लागली. घाबरून तीन कृष्णवर्णीय उठले, पण थकलेली रोजा पार्कस आपल्या जागेवरून उठली नाही. त्यावर, ‘उठतेस की पोलिसांना बोलावू?’ असं तो गोरा म्हणाला. तिनेही बंड करायचं ठरवलं आणि ‘बोलव पोलिसांना’ असं सांगितलं. बसचालकानं गाडी थांबवून पोलिसांना बोलावून आणलं. पोलिसानं तिला अटक केली. रोजा पार्कस ही खूपच कष्टाळू, शांत आणि प्रेमळ स्त्री होती. तिच्या या कृतीनं अनेक कृष्णवर्णीयांना तिचं खूप कौतुक वाटलं आणि या प्रकरणात ते तिच्या बाजूनं उभे राहिले. मार्टिन ल्यूथर किंगनं रोजा पार्कसला पाठिंबा दिला. या घटनेनंतर भेदाभेद करणार्या बसेसवर हजारो कृष्णवर्णीयांनी बहिष्कार टाकला. २१० टॅक्सीचालकांनी या बहिष्कारात लोकांची जाण्यायेण्याची सोय करून साहाय्य केलं. काही लोकांनी चालत जाणं पसंत केलं. काहींनी खेचर किंवा टांग्याचा वापर केला. शांततेच्या मार्गानं या सर्व लोकांनी बसेसवर बहिष्कार टाकला. या चळवळीचा नेता म्हणून मार्टिन ल्यूथर किंगला अध्यक्षपदासाठी निवडण्यात आलं.
या बहिष्कारानंतरच्या सभेत मार्टिन ल्यूथर किंग कृष्णवर्णीयांशी काय बोलणार या उत्सुकतेनं सुमारे चार हजार लोक चर्चसमोर त्याचं भाषण ऐकायला जमा झाले. या भाषणातून आपल्यावरचा अन्याय दूर होण्यासाठी मार्टिन ल्यूथर किंग कुठलाही हिंसेचा मार्ग सुचवला नाही. इतरांनी वाईट वर्तणूक केलेली असली तरी आपण आपल्या वागण्यात कटुता येऊ द्यायची नाही. कायदा आणि सुव्यवस्था हातात घ्यायचा नाही. मार्टिन ल्यूथर किंगचा एक न एक शब्द हजारोंचा जमाव शांततेनं ऐकत होता. आपल्याला न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी मार्टिनच्या रुपात एक थोर नेता मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसत होता. नागरी हक्क मोहिमेतला सहकारी राल्फ अॅबरनेथी हा मार्टिन ल्यूथर किंगचा सहकारी होता. त्यानं लोकांना तीन मागण्या वाचून दाखवल्या. बसचालकानं सर्व प्रवाशांशी सौजन्यानं वागावं, प्रथम येणार्याला प्राधान्य हे तत्व पाळलं जावं, बस कंपनीनं कृष्णवर्णीयांची वस्ती असलेल्या भागातल्या बसेससाठी कृष्णवर्णीय चालक नेमावा. अशा त्या मागण्या होत्या. या बस बहिष्काराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
असं असलं तरी प्रत्येक वेळी मार्टिन ल्यूथर किंग बंडाचं निशाण हाती घेत असे. त्याच्या आंदोलनामुळे ३५ वर्षांच्या त्याच्या आयुष्यात त्याला १७ वेळा तुरुंगात जावं लागलं. त्याच्यावर अनेक खोटे खटले दाखल केले गेले होते. तो तुरुंगात गेला की त्याची बायको कॉरैटा स्कॉट आिाण मुलं यांना आणखीनच त्रासदायक परिस्थितीला तोंड द्यावं लागे. मार्टिन ल्यूथर किंगला चार मुलं होती. प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळी त्याच्या घरावर बॉम्ब फेकण्यात आले होते. काही वेळा तर कृष्णवर्णीय गरीब स्त्रियांना पैसे देऊन भडकवून मार्टिन ल्यूथर किंगवर चाकूने वार करण्याचेही प्रयत्न करण्यात आले होते.
२८ ऑगस्ट १९६३ या दिवशी वॉशिंग्टन इथे मोर्चा काढून गुलामगिरीच्या मुक्ततेची शताब्दी साजरी केली गेली. अडीच लाख लोक मार्टिन ल्यूथर किंगचं भाषण ऐकायला जमले होते. यात कृष्णवर्णीय आणि गोरे दोघंही सामील झालेले होते. अब्राहम लिंकनच्या पुतळ्यासमोर मार्टिन ल्यूथर किंगचं ‘आय हॅव अ ड्रीम’ हे ऐतिहासिक भाषण झालं. ३४ वर्षांच्या आपल्या लाडक्या नेत्याचा शब्द न शब्द लोक आपल्या काळजात साठवून ठेवत होते. आपला नेता आपल्याच हृदयाची भाषा बोलतोय असं त्यांना वाटत होतं. आपल्या भाषणात मार्टिन ल्यूथर किंगनं म्हटलं, ‘एक दिवस हे राष्ट्र महान राष्ट्र म्हणून ओळखलं जाईल. जॉर्जियाच्या डोगरावर पूर्वाश्रमीच्या गुलामांची आणि त्यांच्या मालकांची मुलं एकत्र, बंधुभावानं एका टेबलावर बसतील हे माझं स्वप्न आहे. माझं एक स्वप्नं असंही आहे की एक दिवस मिसिसिपी राज्यात परिवर्तन होईल आणि तिथे स्वातंत्र्य आणि न्याय नांदू लागेल. माझं एक स्वप्न आहे की माझी चारही मुलं त्यांच्या रंगावरून नव्हे तर त्यांच्या चारित्र्यानं पारखली जातील. अमेरिका महान राष्ट्र बनण्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरलं पाहिजे. स्वातंत्र्याचा जयघोष जेव्हा सर्वत्र होईल तैव्हा आपली वाटचालही वेगानं होईल.’ त्या दिवशीच्या त्या भाषणानं मार्टिन ल्यूथर किंग यानं कृष्णवर्णीयच नव्हे तर समस्त गोर्यांनाही जिंकलं होतं. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने फक्त आणि फक्त मार्टिन ल्यूथर किंगच्या बातमीनं भरलेले होते. ‘मार्टिन ल्यूथर किंग हे कृष्णवर्णीय अमेरिकेचे अनाधिकृत राष्ट्राध्यक्ष बनले’ अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं गेलं होतं.
आता सगळीकडे शांतता नांदेल असं वाटत असतानाच काही विध्वंसक प्रवृत्तीनी मात्र अशांतता माजवायला सुरुवात केली. बॉम्ब हल्ले करून अनेक ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण केलं. अनेक लोक अपंग झाले तर अनेकजण मृत्युमुखी पडले. त्यातच २२ नोव्हेंबर १९६३ या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांना टेक्सॉस राज्यातल्या डल्लास इथल्या रस्त्यावरून जात असताना गोळ्या घातल्या गेल्या. सगळं वातावरण ढवळून निघालं होतं. मार्टिन ल्यूथर किंगला श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती. शांततेसाठी त्यांनी आवाहन केलं.
मार्टिननं आपली कुठलीही चळवळ, कुठलंही आंदोलन अहिंसेच्या मार्गानं आणि शांततेनं केलं. त्यामुळे त्याला १९६४ साली शांततेबद्दलच्या नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यानं व्हाईट हाऊस मध्ये मार्टिन ल्यूथर किंगला आदरपूर्वक बोलावलं.
आपलं संपूर्ण आयुष्य कृष्णवर्णीय लोकांना सन्मानपूर्ण जगता यावं म्हणून शांततेच्या मार्गानं लढणार्या या महामानवाची हत्या ४ एप्रिल १९६८ या दिवशी वयाच्या ३९ व्या वर्षी करण्यात आली. त्याच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती जॉन्सननं त्यांचा मृत्यूदिन शोकदिवस म्हणून जाहीर केला. येणार्या काळात एक दिवस कृष्णवर्णीय व्यक्ती आपली योग्यता जगभर सिद्ध करेल आणि आपलं स्थान निर्माण करेल असा विश्वास मार्टिन ल्यूथर किंगने मृत्यूच्या काही तास आधीच म्हटलं होतं. आपल्या मृत्यूच्या चार दिवस आधीच म्हणजे ३१ मार्च १९६८, रविवार या दिवशी मेम्फिस इथं डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांनी नागरी हक्क चळवळीतलं प्रेरणा देणार्या ओळी म्हटल्या होत्या ः वुई शाल ओव्हरकम......हम होंगे कामयाब एक दिन! मार्टिन ल्यूथर किंगच्या अंत्यविधीच्या वेळी डोळ्यांत अश्रू असलेल्या हजारोंच्या जमावानं ‘हम होंगे कामयाब’ म्हणत आपल्या लाडक्या नेत्याला निरोप दिला!
दीपा देशमुख
Add new comment