रेने देकार्त
रेने देकार्त या फ्रेंच तत्वज्ञ आणि गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जीनियसच्या काळातलं युरोपमधलं वातावरण अराजकतेनं भरलेलं होतं. सरदार आणि सरंजामदार यांचं सर्वत्र वर्चस्व होतं. तसंच धर्माच्या नावावर होणार्या युद्धांमुळे लोक जेरीला आले होते. सगळीकडे अज्ञानाचं आणि अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं होतं. प्लेगसारख्या रोगांच्या साथी पसरत होत्या. अशा पार्श्वभूमीवर जीवन म्हणजे काय? विश्व म्हणजे काय? या विचारांनी देकार्त झपाटला गेला होता. तत्त्वज्ञान आणि धर्म असे विषय म्हणजे फक्त शब्दांचे काढलेले बुडबुडे आहेत. आपलं दैनंदिन जीवन सुखकारक करण्यासाठी अशा विषयांचा काहीही उपयोग नाही; शिवाय या विषयांत तर्कशुद्धता नाही; हे विषय शिकण्यापेक्षा गणित शिकावं; गणितात शब्दांचं अवडंबर नसतं; उलट आशय थोडक्यात सांगणारी सूत्रं असतात; त्यामुळे या विश्वाचा अभ्यास आपण गणितामार्फतच योग्य रीतीनं करु शकू असं त्याला प्रकर्षानं जाणवायला लागलं.
देकार्तच्या काळी युक्लिडच्या भूमितीचा गणितावर प्रचंड प्रभाव होता. अगदी पूर्वीपासून गणितात बीजगणित आणि भूमिती अशा दोन पूर्णपणे वेगळ्या शाखा मानल्या जात होत्या. अशा वेळी भूमितेतले कूटप्रश्न सोडवण्यासाठी बीजगणिताचा उपयोग करण्याची कल्पना देकार्तच्या डोक्यात आली आणि त्यानं ’अॅनॅलेटिकल जॉमेट्री’ म्हणजेच ’बीजभूमितीचा’ पाया घातला. या बीजभूमितीमुळे आधुनिक गणिताची सुरुवात झाली. बीजभूमितीमुळे शुद्ध भूमितीची प्रगती बीजगणिताच्या साहाय्याने करता यायला लागली. सरळ रेषा, वा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा अनेकांची समीकरणं कशी मांडायची हे देकार्तनं भूमिती आणि बीजगणिताचं जे एकत्रीकरण (युनिफिकेशन) करून दाखवलं. यामुळे गणिताच्या भरभराटीला सुरुवात झाली. त्यानं लिहिलेले ‘डिस्कोर्सेस ऑन दी मेथड’, ‘मेडिटेशन ऑन फर्स्ट फिलॉसॉफी’ आणि ‘प्रिन्सिपल्स ऑफ फिलॉसॉफी’ हे ग्रंथ खूप गाजले.
रेने देकार्त याचा जन्म ३१ मार्च १५९६ रोजी फ्रान्समधल्या तुरेन जवळच्या ’ल हाय’ नावाच्या गावात एका सरदार घराण्यात झाला. आपल्या तिसर्या मुलाला जन्म देताच देकार्तच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूमुळे देकार्तची तब्येत अशक्त किडकिडीत राहिली. कदाचित त्यामुळेच त्याला एका जागी पडून विचार करण्याची सवय लागली. त्याच्या नाजूक प्रकृतीमुळे देकार्तच्या वडिलांनी त्याच्यावर कुठल्याच गोष्टीचा कधी दबाव टाकला नाही.
वयाच्या आठव्या वर्षी देकार्त ’ला फ्लेश’ नावाच्या शाळेत जायला लागला. त्याच्या प्रकृतीमुळे शाळेतही अमूक एका वेळेत त्यानं आलंच पाहिजे अशी सक्ती त्याच्यावर केली गेली नाही. घरात बिछान्यात पडून राहून विचार करण्याच्या सवयीमुळे शाळेत लॅटिन आणि ग्रीक भाषांचा अभ्यास करायचा देकार्तला खूप कंटाळा यायचा. त्यामुळे त्यानं वयाच्या सतराव्या वर्षी चक्क शाळेला रामराम ठोकला. देकार्तच्या घरच्यांना त्यानं वकील व्हावं असं वाटत होतं. त्यामुळे १६१६ साली त्यानं कायद्याची पदवी घेतली खरी पण त्याचं मन वकिलीतही रमलं नाही.
त्यानंतर देकार्त चक्क सैन्यात गेला. १६१८ साली प्रिन्स मॉरिस ऑफ ऑरेंज याचं ब्रेडा या त्या काळी हॉलंडचा भाग असलेल्या पण आज बोहेमियात असलेल्या शहरात युद्ध चालू होतं. या भागावर तेव्हा स्पॅनिश लोकांचं वर्चस्व होतं. मॉरिस ऑफ ऑरेंजच्या हाताखाली देकार्तनं आपलं सैनिकी शिक्षण पूर्ण केलं. ब्रेडामधल्या रस्त्यांवर फिरत असताना डच भाषेत कोणीतरी प्लॅकार्ड सांगताना त्यानं ऐकलं. प्लॅकार्ड म्हणजे जगाला आव्हान देणारा गणितातला एखादा कूटप्रश्न! तिथली गर्दी बघून देकार्तचं कुतूहल जागं झालं. हा काय प्रकार आहे हे नीट कळावं म्हणून त्यानं रस्त्यावरुन जाणार्या एका माणसाला त्या डच भाषेतल्या प्लॅकार्डचं भाषांतर लॅटिनमध्ये करायला सांगितलं. भाषांतर करणारा हा माणूस प्रसिद्ध डच गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ ‘आयझॅक बीकमन’ हा होता. देकार्तनं बीकमननं सांगितलेला प्रश्न काही तासांतच सोडवला. ते बघितल्यावर बीकमन चाटच पडला! या योगायोगानं घडलेल्या भेटीनंतर ते दोघं चांगलेच मित्र झाले. यानंतर बीकमननं देकार्तपुढे बरेच प्रश्न ठेवले. ते दोघे मिळून त्या प्रश्नांवर चर्चा करत आणि आपल्या आजूबाजूला घडणार्या घटनांच स्पष्टीकरण गणिताच्या आधारे देण्याचा प्रयत्न करत. देकार्त-बीकमन यांनी आपल्या या अभ्यासाला ‘फिजिओ-मॅथॅमॅटिका’ असं नाव दिलं. आज याला ‘मॅथॅमॅटिकल फिजिक्स’ म्हणतात. या दोघांनी अणुचं अस्तित्व मान्य करून ‘डेमॉक्रिटिका’ हे पुस्तक लिहिलं. हे सगळं करता करताच देकार्तच्या मनात बीजभूमितीची बीजं रोवली गेली होती. बीजभूमितीच्या निर्मितीमागे देकार्तला १० नोव्हेंबर १६१९ या दिवशी पडलेली तीन स्वप्नं आहेत असं मानलं जातं. आपल्या मनातल्या संकल्पना पूर्णत्वाला येऊन लोकांपर्यंत पोहोचायला देकार्तला तब्बल १८ वर्षं लागली! या अठरा वर्षांत देकार्तची सैन्यातली नोकरी चालूच होती.
देकार्त आपलं सैनिकी शिक्षणही पुस्तकीच राहू नये म्हणून हॉलंडहून जर्मनीला आला. तिथे बव्हेरियाचा राजपुत्र बोहेमियाशी लढत होता. लढाईचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी म्हणून देकार्तनं बव्हेरियाच्या राजपुत्राच्या चक्क सैन्यात नोकरी पकडली! पण कडाक्याच्या थंडीमुळे युद्धबंदी झाली. युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून आसुसलेल्या देर्कातच्या पदरी इथेही निराशाच पडली. मात्र १६२० साली आपली लढाईची खुमखुमी शमवण्याची संधी देकार्तला प्रागच्या लढाईत मिळाली.
लढाईनंतर देकार्त पूर्व फिजियाला निघाला, तेव्हा बोटीवरच्या खलाशांनी देकार्तला मारुन त्याचे पैसे लुबाडावेत असा कट रचायला सुरुवात केली. सुदैवानं देकार्तला बोटीवरच्या खलाशांची भाषा असल्यामुळे तो लगेच तलवार उपसून त्यांच्यावर धावून गेला. ठमला किनार्यावर घेऊन चला, नाहीतर एकेकाची खांडोळी करीन', अशी हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात तशी धमकीही देकार्तनं त्यांना दिली. देकार्तच्या या आवेशामुळे खलाशांनी घाबरून त्याला सुखरूप किनार्यावर सोडलं.
यानंतर देकार्त काही काळ हॉलंडला वडिलांकडे राहिला आणि त्यानंतर तो इटलीत रोमला गेला. इटलीत त्या वेळी गॅलिलिओचं प्रस्थ होतं. पण या दोघांची भेट झाली नाही. देकार्तला जर गॅलिलिओ भेटला असता तर देकार्तच्या तत्त्वज्ञानात नक्कीच बदल झाला असता. कारण गॅलिलिओ प्रयोगशील होता. कुठलीही गोष्ट प्रयोगानं सिद्ध करण्याकडे त्याचा कल होता. देकार्तनं मांडलेले काही सिद्धांत नंतर चुकीचे ठरले. देकार्तनं स्वत: प्रयोग करुन जर ते पडताळून पाहिले असते तर स्वत:तल्या त्रुटी त्याच्या लक्षात आल्या असत्या. या काळात त्यानं काही गणिती प्रश्न हाताळले. या विश्वाच्या संदर्भातले किंवा हे विश्व कसं चालतं हे सांगणारे दहा नियम त्यानं सांगितले. त्यातले पहिले दोन नियम न्यूटननं जे गतीचे नियम सांगितले त्याच्याशी साधर्म्य दाखवणारे होते.
१६२० ते १६२४ या कालावधीत देकार्त युरोपभर बराच हिंडला फिरला. देकार्त पुढे वीस वर्षं हॉलंडलाच राहिला. आपलं लिखाण अचूक व्हावं म्हणून युरोपमधल्या मोठमोठ्या वैज्ञानिकांशी आणि तत्त्वज्ञांशी तो सतत पत्रव्यवहार मात्र करत असे. पण गंमत म्हणजे त्याचा हा सगळा पत्रव्यवहार तो ‘ला फ्लेश’ या शाळेतला त्याचा मित्र फादर मर्सेन याच्याकरवी करत असे. देकार्तला एकांतवासाची आणि गुप्ततेची एवढी ओढ होती की एकट्या फादर मर्सेनलाच त्याचा ठावठिकाणा माहीत असे. या एकांतवासात त्यानं प्रचंड अभ्यास केला. त्याची अभ्यास करण्याची पद्धत पूर्णपणे कारणमीमांसेवर (रीझन) अवलंबून होती.
अज्ञातवासात गेल्यावर जवळजवळ सहा वर्षांनी म्हणजे वयाच्या अडतिसाव्या वर्षी या सगळ्या अभ्यासावर आधारित (Le Monde) म्हणजे ‘विश्व’ नावाचा ग्रंथ त्यानं लिहिला. शाळेपासूनचा आपला मित्र फादर मर्सेन याला त्यानं तो अर्पणही केला. या पुस्तकात देकार्तनं चर्चची त्यावेळी सुप्रसिद्ध आणि सर्वमान्य असणारी ’सहा दिवसांत विश्व कसं निर्माण झालं’ हे सांगणारी थिअरी आपल्याला अजिबात मान्य नाही असं मत मांडलं. पण हा ग्रंथ प्रकाशित करण्याचं धाडस त्याला झालं नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोपर्निकसचं म्हणणं उचलून धरल्याबद्दल गॅलिलिओला झालेली शिक्षा त्याला माहिती होती. गॅलिलिओच्या नशिबी जे आलं ते आपल्या नशिबी येऊ नये म्हणूनच कदाचित देकार्तनं हा ग्रंथच काय पण आपलं कुठलंही लिखाण आपल्या मृत्यूनंतरच प्रकाशित करावं असा आग्रह धरला. पण शेवटी त्यानं आपल्या हयातीतच हे लिखाण प्रसिद्ध केलं आणि गणितात नवे प्रवाह वाहायला लागले.
देकार्त नेहमी टापटीप राहात असे. त्याच्या या रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे त्याला अनेक मैत्रिणी होत्या. मात्र देकार्त जन्मभर अविवाहितच राहिला.
देकार्तनं देव-निसर्ग-माणूस यांच्यातलं नातं शोधण्याचा प्रयत्न स्वत:च्या तत्त्वज्ञानातून केला. विश्वातलं शेवटी सगळं गणिताकडेच वळतं आणि गणित हाच विश्वाचा पाया आहे असा त्याचा ठाम विश्वास होता. निसर्गातल्या सगळ्या घटना अतिशय सूत्रबद्ध असतात असं त्याला वाटत असे. देकार्तची बरीचशी मतं सरळसरळ चर्चच्या विरोधात होती. पण देकार्तला प्रिन्स ऑफ ऑरेंजचा पाठिंबा असल्यामुळे देकार्तला गॅलिलिओसारखा त्रास झाला नाही.
वयाची पन्नाशी जवळ आल्यावर १६४६ साली देकार्त हॉलंडमध्ये एगमॉंद नावाच्या गावात राहात होता. तिथे त्याला बागकामाचा छंद जडला होता. तोपर्यंत तो जगप्रसिद्धही झाला होता.
याच दरम्यान देकार्तची कीर्ती स्वीडनची अतिशय कर्तबगार पण विचित्र राणी ख्रिश्चिना हिच्या कानावर गेली. तिला देकार्तकडून गणित आणि तत्त्वज्ञान शिकण्याची इच्छा झाली. १६४९ साली राणीनं देकार्तला आणण्यासाठी जहाज पाठवलं. राणीला पहाटे पाच वाजता गणित शिकायचं असलं की कडाक्याच्या थंडीतही देकार्तला तिच्याकडे जावं लागायचं. यामुळे देकार्त न्यूमोनियाने आजारी पडला. आणि अखेर ११ फेब्रुवारी १६५० रोजी जगाला नवी दृष्टी देणारा देकार्त मात्र एका राणीच्या आंधळ्या हट्टापायी जगाला पारखा झाला.
‘आय थिंक, देअरफोर आय ऍम’ असं देकार्त म्हणायचा. आपल्याला आपल्या इंद्रियांमार्फत जे ‘ज्ञान’ मिळतं ते खरं असतंच असं नाही. उदाहरणार्थ, आपल्याला सूर्य मावळताना दिसतो. पण प्रत्यक्षात मात्र पृथ्वी फिरत असते आणि असं जवळपास सगळ्याच बाबतीत. मग या जगात निश्चित आणि खरं काय आहे? किंवा काही आहे की नाही? पण याचं उत्तर देकार्तनं दिलं. ज्याअर्थी मी हे सगळे प्रश्न विचारून शंका उपस्थित करू शकतो त्याअर्थी निदान हा शंका उपस्थित करणारा मी अस्तित्वात असायला पाहिजे. म्हणूनच आपल्याला फक्त आपल्या स्वत:च्या अस्तित्वाविषयी खात्रीनं सांगता येतं. बाकी सगळंच अनिश्चित स्वरूपाचं असतं' असं देकार्त म्हणायचा.
आधुनिक तत्वज्ञानाचा आणि बीजभूमितीचा पाया रचणार्या अशा रेने देकार्तला टाळून आपल्याला पुढे जाताच येत नाही हे मात्र खरं!
Comments
ही माहिती गणिती या अच्युत…
ही माहिती गणिती या अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकातून घेतलीय का? का? या लेखाचे गणिती पुस्तक झा ले? का या लेखावरुन प्रेरणा घेऊन गणिती गोडबोल्यांनी लिहिले ?
Add new comment