खंडहर सांगताहेत ‘मांडू’ची गोष्ट!

खंडहर सांगताहेत ‘मांडू’ची गोष्ट!

सहज बोलता बोलता अचानकपणे मांडूला जायचं ठरलं आणि मी, अपूर्व, अंजली आणि यमाजी मालकर २८ फेब्रुवारीच्या भल्या पहाटे मांडूकडे कूच केलं. मांडूला राहण्यासाठी यमाजीनं ऑनलाईन बुकिंग करून टाकलं होतं आणि प्रवासात रस्ता दाखवायला गुगलमावशी तैय्यार होत्या. 
पुणे, चांदवड, धुळे, शिरपूर, सेंदवा करत मांडूकडे आम्हाला वळायचं होतं. इथंपर्यंतचा प्रवास अगदीच सुखाचा झाला होता. संध्याकाळच्या आत आम्ही मांडूला पोहोचणार होतो. आम्ही हॉटेल पलाशपासून मांडूला जाण्यासाठी डावं वळण घेणार तोच गुगलमावशी म्हणाल्या, हा रस्ता जरा ट्रॅफिकमुळे स्लो असून पुढलं वळण घेतलं तर तो अतिशय शॉर्टकट आहे. मग काय आम्ही पहिलं वळण धुडकावून लावलं आणि दुसर्‍या वळणावरून आत वळलो. आत जाताच कच्चा रस्ता सुरू झाला. पांढरे दगडं असलेले अनेक ओढे वाटेत येत होते, पण पाण्याअभावी ते शुष्क होते....एकच छोटीशी गाडी कशीबशी जाऊ शकेल असा वळणावळणाचा घाटातला रस्ता होता....मांडूच्या ओढीनं आम्ही चाललो होतो. रस्त्यात एकही वाहन किंवा वस्ती नव्हती. आम्हाला त्यात वावगं फारसं वाटलंही नाही. काही ठिकाणा रस्त्याची डागडुजी सुरू करण्यासाठी खडी पडलेली होती, तर काही ठिकाणी चिखल झालेला! मधूनच एखादा खेडूत तरूण मोटारसायकलवरून येताना दिसत होता. आम्ही पुढे जात असताना लक्षात आलं, की ज्याला आम्ही रस्ता समजतोय, तो रस्ताच नाहीये....अशा दुर्गम वाटेवरून कसं पुढे जायचं आणि मागे वळायचं तर कसं, कारण वळायलाही जागा नाही अशी अवस्था.....एका बाजूला डोंगर तर दुसर्‍या बाजूला दरी....बरं दरीच्या बाजूनं कठडा, किंवा तारेचं कुंपण असं काहीही नाही....दरीच्या बाजूची जमीनही भुसभुशीत...म्हणजे गाडीचं चाक जरादेखील त्या बाजूनं गेलं तर गाडी दरीतच कोसळावी....जीव मुठीत धरून आम्ही मार्ग कापत होतो. मात्र जेव्हा अंधारही झाला आणि रस्ता आणखीनच कठीण बनला तेव्हा कळेचना काय करावं....किंचितसा पट्टा सिंमेटनं बनवलेला आणि त्यापुढे गाडीनं उडी मारून रस्ता शोधावा असं काहीसं...गाडी उडी कशी मारणार, हा काही चित्रपट नव्हता....यमाजी गाडीतून खाली उतरला...आजूबाजूचे दगड उचलून त्यानं त्या उडी मारण्याच्या गॅपवर उतरते रचायला सुरुवात केली. अंजली आणि मीही मदतीला सरसावलो. इतक्यात दूरवर दिव्यानं लुकलुकणार्‍या झोपडीतून दोघंतिघं आले, त्यांनीही मदत केली. दगड सरकले तर गाडी बंद पडण्याची शक्यता होती....पण स्टंट करत एकदाची गाडी निघाली. त्या ग्रामस्थांकडून हा मांडूचा नेहमीचा रस्ता नाहीच असंही कळलं, पण त्यांनी आम्हाला घाबरवलं नाही...‘आता थोडंच अंतर राहिलंय. जा सुखरूप’ अशा शुभेच्छा दिल्या. एकदम उंचच उंच चढाव आणि त्यानंतर रस्ता कुठे जातोय हेही कळायला मार्ग नाही अशी वळणं.......अशा रीतीनं आम्हाला अखेर ऐतिहासिक मांडूचा एक दगडी दरवाजा लागला आणि आम्हाला हायसं वाटलं.
आत प्रवेश करताच आपण या नगरीचे राजे आहोत आणि आपल्या या समृद्ध राज्यात आपला प्रवेश होतोय असं वाटू लागलं. दोनच मिनिटांत आम्ही मध्य प्रदेश पर्यटन विभागाच्या माळवा रिट्रिट या रिसोर्टमध्ये पोहोचलो. भुकेची जाणीव झाली. जेवणाची ऑर्डर देताच दहाच मिनिटांत गरमागरम जेवण समोर आलं. जेवणावर ताव मारून आम्ही झोपेच्या स्वाधीन झालो. 

सकाळी वीजन पाल नावाचा एक गाईड आम्ही बरोबर घेतला. माझ्यासाठी तर मांडूला जाणं ही एक अग्नीपरीक्षाच होती. माझ्या नाजूक झालेल्या प्रकृतीमुळे ही सगळी ठिकाणं मी कशी बघू शकेन, चढ-उतार कसा करू शकेन हे प्रश्न माझ्यासमोर होतेच. पण त्यांच्याकडे लक्ष न देता, पायात स्पोर्टशूज चढवून मी सज्ज झाले होते. मला उन्हापासून सरंक्षण करण्यासाठी एक छानशी हॅट हवी असल्यानं तीही मला मिळाली आणि वाटेतल्या एक एक वास्तूकडे लक्ष जाऊ लागलं. वीजन पाल हा मांडूचा रहिवासी तरूण गाईड अपूर्वच्या वयाचा होता, त्याचा आवाज किशोर कुमारसारखा होता आणि तो गातही चांगला होता. त्याच्या चार-पाच पिढ्या गाईडचंच काम करत होत्या. विजन आम्हाला सांगत होता ः

मध्यप्रदेशातल्या धार जिल्ह्यातलं धारपासून ३५ किमी दूर अंतरावर असलेलं मांडू परमार घराण्यातल्या राजा भोजनं स्थापन केलेलं एक प्राचीन शहर आहे. विंध्याचल पवर्ताच्या पर्वतरांगेत असलेल्या या परिसराला माळवा प्रांत असंही म्हटलं जातं. समुद्रसपाटीपासून हे नगर २१०० मीटर उंचीवर आहे. मांडूवर पाच वंशाच्या राज्यकर्त्यांनी राज्य केलं. परमार, तुघलक, खिलजी, मोघल आणि मराठा! 
मांडू १० व्या, ११व्या शतकात परमार वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात समृद्धीच्या कळसावर होतं. परमार राजांची राजधानी मांडू होती. मात्र १३ व्या शतकानंतर मुस्लीम आणि इतर आक्रमणकर्त्यांनी मांडूवर ताबा मिळवून तिथं आपल्या नावाच्या पाट्या लावून टाकल्या. नंतरच्या सुलतानांनी मांडूचं नामकरण शादियाबाद म्हणजेच खुशियोंका शहर असंही ठेवलं होतं. मांडूला जायचं असेल तर जुलै ते मार्च का कालावधी सगळ्यात चांगला! पावसाळ्यात तर मांडू बघणं म्हणजे स्वर्ग अनुभवणं!

मांडूमध्ये प्रवेश करण्यासाठी १२ प्रवेशद्वार आहेत. हे प्रवेशद्वार १४०५ ते १४०७ या कालावधीत निर्माण केले गेले.  प्रमुख दरवाज्याला दिल्ली दरवाजा, त्यानंतरच्या दरवाज्यांना रामगोपाल दरवाजा, जहांगीर दरवाजा, तारापूर दरवाजा, आलमगीर दरवाजा, भंगी दरवाजा अशी नावं आहेत. ही दारं बघताना मला औरंगाबादच्या पैठणगेटपासून दिल्ली गेटपर्यंतच्या अनेक गेटांची आठवण झाली. 

सुरुवातीला आम्ही  बाज बहाद्दूरचा महाल बघण्यासाठी पोहोचलो. हा महाल १६ व्या शतकात उभारला गेला. यात विस्तीर्ण पटांगण आणि भव्य अशी दालनं बघायला मिळतात. इथून मांडूचं मनोहारी रूप बघायला मिळतं. त्यानंतर असलेला आणि बाजबहाद्दूरनं खास राणी रूपमतीसाठी बनवलेला राणी रुपमतीचा महाल खडकांवर असून तो ३६५ मीटर उंचीवर उभा आहे. इथं संगीतांच्या स्पर्धा भरवल्या जात असंही गाईड म्हणाला. इथल्या कुठल्याही दालनात गायलं तर तो आवाज सगळीकडे सारखाच ऐकल्या जाऊ शकतो. गाईडनं जेव्हा ‘रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन....’ हे गाणं गायलं आणि आम्ही प्रत्येक दालनातून फिरत राहिलो, तेव्हा याचा अनुभव घेतला. या महालाच्या बांधकामातल्या तंत्रज्ञानामुळे कुठलंही वाद्य नसतानाही अतिशय सहजपणे आवाज फिरत होता. कानाला गोड लागत होता. अगदी वरच्या गच्चीवरून मांडूचं अतिशय विलोभनीय दर्शन घडतं. गार वारा आणि समोर दूरवर दिसणार्‍या ऐतिहासिक वास्तू, हिरवीगार झाडं, शेतं या दृश्यांमुळे पुन्हा महालाच्या खाली येण्याचं मन होतच नव्हतं. 

राणी रूपमती ही नर्मदेची भक्त होती. नर्मदेचं दर्शन केल्याशिवाय ती अन्नग्रहण करत नसे. बाजबहा्ददूरनं तिच्यासाठी जेव्हा हा महाल बनवला, तेव्हा रेवाकुंड म्हणजेच नर्मदेला या कुंडात आणलं असं म्हटलं जातं. १२ ही महिने या रेवाकुंडात नर्मदेचं पाणी असतं. तसंच राणी रुपमतीला आपल्या महालातून दूर अंतरापर्यंत वाहत्या नर्मदेचं दर्शनही होत असे. १९५७ साली प्रदर्शित झालेला राणी रूपमती हा चित्रपट बाजबहाद्दूर आणि राणी रूपमती यांच्या प्रेमकथेवर आधारलेला असून यात भारतभूषण आणि निरूपा रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यातलं मुकेशचं ‘आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते है’ हे गाणं आजही खूपच लोकप्रिय आहे.

बाजबहाद्दर आणि राणी रुपमती यांच्याविषयी अनेक कहाण्या लोकप्रिय आहेत. असं म्हणतात, बाजबहाद्दूर हा अकबराच्या पदरी असलेला अफगाण सरदार होता. मांडूची कीर्ती ऐकून अकबरानं त्याला मांडूवर चढाई करण्यासाठी पाठवलं. मांडूवर आक्रमण केल्यावर बाजबहाद्दूरनं स्वतःलाच इथला सुलतान म्हणून घोषित केलं आणि तो मांडूत राज्य करू लागला. इथं त्याला राणी रुपमती भेटली. कोणी म्हणतं, रूपमती ही अतिशय सुंदर अशी सुरेल आवाजाची गायिका असून ती फूलपूर गावातल्या गरीब यदुराय नावाच्या ब्राह्मणाची मुलगी होती, तर काहींच्या मते ती धरमपुरी किंवा टांडापूर या संस्थानची राजकुमारी होती. तिच्या वडिलांकडूनच तिनं संगीताचे धडे घेतले होते. राणी रुपमतीचं गाणं ऐकून बाजबहाद्दूर तिच्या आवाजावर लुब्ध झाला कारण तो स्वतःही गायन-वादन यातला विद्वान आणि दर्दी होता. काहींच्या मते बाजबहाद्दूर आणि राणी रूपमती यांच्यातली प्रेमकहाणी फुलली, पण जेव्हा अकबराला राणी रुपमतीच्या सौंदयाविषयी कळलं, तेव्हा त्यानं बाजबहाद्दूरला राणी रूपमतीला आपल्या दरबारात पाठवावं असा आदेश पाठवला. पण बाजबहाद्दूरनं तो आदेश धुडकावून लावला. चिडून अकबरानं आपला सरदार आदमखाँ याला बाजबहाद्दूरला धडा शिकवण्यासाठी पाठवलं. या युद्धात बाजबहाद्दूरचा पराभव झाला आणि राणी रूपमतीला कळताच तिनं हिरा खाऊन किंवा विष पिवून आपलं आयुष्य संपवलं. राणी रूपमतीच्या मृत्यूनं अकबराला खूप दुःख झालं आणि पश्चात्तापही झाला. त्यानं बाजबहादू्दूरची मुक्तता केली. बाजबहाद्दूरनं राणी रूपमतीच्या समाधीवर येऊन डोक आपटून  आपले प्राण त्यागले. (काहींच्या मते राणी रूपमतीच्या मृत्यू नंतरही बाजबहाद्दूर काही काळ जगला.) दोघांच्या मृत्यूनं अकबराला खूप वाईट वाटलं आणि त्यानं त्या दोघांची समाधी सारंगपूरला बांधली. आमचा गाईड वीजन पाल याच्या कहाणीनुसार राणी रूपमती आणि बाजबहाद्दूर यांच्यातलं नातं फक्त कलाकाराचं होतं, त्यांच्यातल्या प्रेमकहाण्या म्हणजे अफवा आहेत. मात्र आजही माळवा प्रातांत ठिकठिकाणी बाजबहाद्दूर आणि राणी रूपमती यांच्या प्रेमाबद्दलची लोकगीतं लोक गातात.

त्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो. तो इको पॉइंट होता. आपण जे बोलू त्याचा प्रतिध्वनी स्पष्ट शब्दात ऐकायला येत होता. तिथली मौज घेऊन आम्ही समोर असलेल्या दाई का महल, दाईके बहन का महाल बघायला गेलो. इथल्या छताचं रंगकाम बघण्यासारखं! त्यातही निळ्या मोरपिशी रंगाचा अप्रतिम वापर! इथंच असलेली लाल बाग आज अस्तित्वात नसली तरी जागेवरून ती कशी असेल याची कल्पना येते. इथूनच काही अंतरावर कारवाँ सराय म्हणजे लोकांच्या राहण्याचं ठिकाणी किंवा धर्मशाळा म्हणूया अशी वास्तू समोर दिमाखात उभी होती. बाहेरून फक्त दगडी भिंती आणि मोठं प्रवेशद्वार दिसत होतं. मात्र आत गेल्यावर सगळ्या बाजूंनी असलेल्या खोल्या आणि मध्यभागी विस्तीर्ण पटागंण नजरेत भरत होतं. मध्ये एक हौद असून त्यातून कारंजे उडत असावेत. समोरच मलिक मुगीथ मस्जिद होती. तीही अशीच भव्य! आतल्या कॉलम्सचं, खांबाचं नक्षीकाम बघणं अतिशय आनंददायी अनुभव होता. 

खरं तर मांडूचं मुख्य आकर्षण म्हणजे जहाज महाल! १४६९ ते १५०० या कालावधीत तयार झालेला जहाजमहल दोन तलावांच्या मध्ये उभा आहे. १२० मीटर लांबीचा हा जहाजमहल बघताना पाण्यात जहाज असल्याचा भास होतो. सुलतान ग्यासुद्दिन खिलजीनं आपल्या राण्यांसाठी या महालाचं निर्माण केलं होतं. यात पावसाच्या पाण्याचा उपयोग करून पोहोण्याचे तलाव केले आहेत. तसंच आख्खं मांडू शहरच रेन वॉटर हॉर्व्हेस्टिंगचा वापर करणारं नगर म्हणावं लागेल. जागोजागी विहिरी, तलाव, पाणी झिरपण्याची आणि त्याला मार्ग मिळण्याची अप्रतिम अशी व्यवस्था! इथल्याच परिसरात असलेल्या हिंडोल महालाच्या भिंती तिरप्या असून इथं राण्या झोका खेळत असल्यानं याला हिंडोला महल म्हटलं जातं. हिंडोला महालाचा आकार हटके आहे. तसंच या महालाला छत नाही. प्रत्येक कमानीवर झोका बांधला जात असावा. श्रावणसरींचा आनंद लुटत झुला झुलणार्‍या शेकडो राण्या मला इथं दिसायला लागल्या. इतकंच नाही, तर इथं या राण्यांना राहण्यासाठी दूरदूरपर्यंत महालांची व्यवस्था आहे. अनेक महाल आज केवळ अवशेषरूपात राहिले आहेत. मात्र जो आहे, त्यात राण्यांनी स्टीम बाथ घ्यावा अशी व्यवस्थाही बघायला मिळते. इथल्या महालांना जोडूनच शौचालयांची आणि स्नानगृहांची व्यवस्थाही बघायला मिळते. हा परिसर तलाव, महाल आणि बागा यांनी नटलेला आहे. या परिसरात शेकडो राण्यांची चहलपहल होत असेल, तेव्हाचं दृश्य एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसणार! या तलावाच्या मधोमध दूरवरून जलमहलही उभा आहे. 

इथंच फुलाच्या आकारातली चम्पा बावडी बघायला मिळाली.  आक्रमणकर्ते किंवा शत्रूंनी हल्ला केला तर राण्या या चम्पा बावडीमध्ये उडी मारत असत. आक्रमणकर्त्यांना त्यांना पकडता येत नसे. त्या मृत पावल्या असं समजून ते निघून जात. पण या चम्पा बावडीमध्ये खाली अनेक मजले आणि दालनं असल्यामुळे राण्या आत सुरक्षित राहत. तसंच आतून गुप्त भुयारी मार्ग त्यांना सुरक्षित स्थळी नेऊन सोडत. यातले गुप्त भुयारी मार्ग आज वटवाघळं आणि इतर कारणांमुळे बंद करण्यात आले आहेत. मात्र चम्पा बावडीमधले काही मजले आणि पाणी आजही आहे. इथंच मांडूमधल्या उत्खननात सापडलेल्या अनेक वस्तूचं संग्रहालय आहे. इथं या वस्तू जतन केलेल्या आहेत. 

जहाजमहालाच्या जवळच आणखी एक वास्तू आकर्षित करते. ती म्हणजे जामी मस्जिद! पूर्वी हे न्यायालय होतं असं म्हटलं जातं. राजाचं आसन, समोर पंचांना बसण्याचा चौथरा, स्त्रियांसाठी वर जाळीदार गॅलरी आणि समोरच्या भव्य अशा दालनात न्यायनिवाडा ऐकण्यासाठी जमलेल्या लोकांची व्यवस्था असं दृश्य नजरेसमोर आलं. मात्र इथं वेळोवेळी जी आक्रमणं झाली, त्यानंतर त्या त्या वास्तूचं रुपांतर त्या त्या आक्रमणकर्त्यांच्या इच्छेनुसार केलं गेलं. आज ही वास्तू जामी मस्जिद म्हणून ओळखली जाते. लाल दगडातली ही वास्तू अप्रतिम अशा बांधकामाचा नमुना आहे. जामी मस्जिद ही होशंग शाहनं बनवली. सिरियाची राजधानी दमास्कस इथल्या एका प्रसिद्ध मस्जिदीवरून जामी मस्जिद बनवली गेली असंही म्हटलं जातं. याच्या मागच्या भागात  होशंगशाहचा मकबरा आहे. हा मकबरा संगमरवरात बांधला असून भारतातली १३ व्या शतकात बांधलेली संगमरवरात बनलेली ही पहिली इमारत आहे. त्यानंतर १६ व्या शतकात ताजमहाल बनला गेला. शहाजहानच्या चार आर्किटेक्टनी हा मकबरा बघितला आणि त्यांनी त्याबद्दल शहाजहानला सांगितलं. शहाजहान होशंगशाहच्या मकबर्‍याचं वर्णन ऐकून प्रभावित झाला आणि त्यातूनच ताजमहालची प्रेरणा त्याला मिळाली  असं म्हटलं जातं. या मकबर्‍याच्या मागच्या बाजूला सराय किंवा लोकांच्या राहण्याची व्यवस्था असावी. अनेक दालनं इथं दिसतात. या दालनांमध्ये आज भग्न वास्तूंचे अवशेष जतन करून ठेवलेले आहेत. चहूबाजूंनी असलेल्या भिंतीमध्ये दिवे ठेवण्यासाठीचे सुरेखसे कोनाडे आहेत. लाल दगडातली अफगाणी शैलीतली ही जामी मस्जिद, त्यावरचे अनेक घुमट आणि मध्ये असलेला पांढराशुभ्र संगमरवरातला मकबरा बघणं आनंददायी गोष्ट आहे. 
जामी मस्जिदच्या समोर अशर्फी महाल आहे. हाही दिसायला खूपच विलक्षण दिसतो. म्हणजे खालचा मजला लाल दगडातला, तर वर पांढर्‍या संगमरवरातलं प्रवेशद्वार दिसतं. असं म्हणतात, अशर्फा महाल म्हणजे प्रत्यक्षात राजा भोजनं बनवलेलं संस्कृत भाषेचं विद्यापीठ होतं. मात्र पुढे आक्रमण करून राज्यकर्ते बनलेल्या होशंगशहा खिलजीनं आणि मोहम्मद खिलजीनं याचं मदरशामध्ये रुपांतर केलं. इथं विजयस्तंभही बांधले आणि आज मात्र इथं कबरी बघायला मिळतात. तसंच जहांगीर आणि नूरजहाँ इथं आले असताना आपल्या बेगमला पायर्‍या चढण्यासाठी उद्युक्त करताना जहांगीरनं तिला एक एक पायरी चढताना एक सुवर्णमुद्रा पायााखाली ठेवेन असं सांगितलं. त्याप्रमाणे जहांगीरनं त्या सुवर्णमुद्रा ठेवल्या आणि बेगमला तो महाल चढण्यास भाग पाडलं. नंतर त्या सुवर्णमुद्रा म्हणजे अशर्फी गरिंबाना दान करण्यात आल्या. म्हणून याला अशर्फी महाल असं नाव पडलं. या अशर्फी महालाचा परिसरही मोठा असून त्या वेळची संस्कृतशाळा कशी असेल याचं चित्र खालचा मजला बघून येतं. याच परिसरात चाफ्याचा खूप जुना वृक्ष आहे. ही इमारत चार ते पाच मजली असावी. मात्र आज दोनच मजले बघता येतात. विजयस्तंभ देखील ध्वस्त झालेले आहेत. लोक दूरदूरवरून आपली मन्नत पूर्ण झाल्यावर इथल्या कबरींवर चादर चढवण्यासाठी येतात. 

जामी मस्जिदच्या बाजूलाच जैन लोकांचं तीर्थस्थान असलेल्या मांडूमधल्या जैन मंदिरामध्ये सुपार्श्वनाथ यांची पद्मासनातली मूर्ती बघायला मिळते. या मूर्तीची स्थापना १४७२ मध्ये केली गेली. अतिशय स्वच्छ सुरेख अशा परिसरात जैन बांधवांसाठी राहण्यासाठी तिन्ही बाजूंनी धर्मशाळांची उभारणी करण्यात आलेली आहे. तसंच जामी मस्जिदच्या अलीकडल्या भागात एक राम मंदिर असून ते पुण्यातल्या पवारांनी राम मंदिराचं निर्माण केलं. त्यांच्या स्वप्नात या मूर्त्यांविषयी आल्यानं त्यांनी मांडूमध्ये येऊन उत्खनन केलं, तेव्हा त्यांना चार हात असलेली रामाची आणि इतर मूर्त्या मिळाल्या. भारतातली चार हातं असलेली रामाची ही पहिलीच मूर्ती आहे. इथून काही अंतर पुढे जाताच नीलकंठ मंदिर बघायला मिळालं. नीलकंठ हे शिवाचं मंदिर असून ते ६८ पायर्‍या खोल उतरून डोंगरात उतरून जावं लागतं. या मंदिराजवळ मोठा तलावही आहे. या तलावाचं निर्माण शाह बदगा खानं नं अकबराच्या हिंदू पत्नीसाठी केल्याचं म्हटलं जातं. या मंदिरावर अकबरकालीन कला बघायला मिळते.

इथून परतीच्या रस्त्यात गदाखानचा महाल बघायला मिळाला. गदाखान हा मांडूचा एकमेव मोठा व्यापारी! त्याचा भव्य महाल (आणि दुकानं बघणं म्हणजे) राजाच्या तोडीचा महाल असावा इतका मोठा! चार ते पाच मजली असलेला हा महाल धान्याची कोठारं, पाण्यासाठीच्या विहिरी, यांनी भरून गेलेला आहे. गदाखानच्या महालावरून मांडूची समृद्धी, तिथे भरभरून येणारी पिकं आणि गदाखानचा सर्वदूर असलेला व्यापार याची कल्पना येते. या महालाचे वरचे मजले उदध्वस्त झाले आहेत, मात्र वरती जायला असलेल्या पायर्‍या आजही शाबूत आहेत. इथं असलेल्या अंधेर बावडी आणि दुसरी उजली बावडी बघणं म्हणजे नितांत सुंदर अनुभव आहे. आजही या विहिरींचं पाणी वापरलं जातं. या बावड्यांवरून खाली जाण्यासाठी चम्पा बावडीप्रमाणेच चहूबाजूंनी पायर्‍या तर आहेतच, तसंच प्रत्येक मजल्यावर दालनंही आहेत. 
मांडूमध्ये फिरताना जागोजागी प्राचीन वास्तूंचे अवशेष बघायला मिळतात. तसंच ठिकठिकाणी धर्मशाळा, आणि मस्जिदीही बघायला मिळतात. इथल्याच परिसरात जाळी महाल म्हणजेच कधी काळी असलेलं शिवमंदिरही बघायला मिळालं. इथूनच एका डोंगरावर अंधाअंधी महाल असे दोन घुमट असलेले महाल बघितले. 

मांडूमध्ये फिरताना आंबा, सिताफळ असे अनेक वृक्ष नजरेला पडले तरी एक वृक्ष आपलं लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे या शासनकर्त्यांनी खास इराणमधून इथं आणून लागवड केलेला एक वृक्ष! याला मांडूचे लोक चिंचेचा वृक्ष म्हणतात. या चिंचा देखील आणखीनच मजेशीर आहेत. आंब्यापेक्षाही मोठ्या म्हणजे जवळपास नारळाच्या आकाराच्या या हिरवट रंगाच्या चिंचा असून त्यात औषधी गुणधर्म आहेत. ठिकठिकाणी टोपलं भरून त्या विकायला ठेवलेल्या दिसतात. त्याचं सरबतही प्यायला मिळतं. 

मांडूमध्ये भिल्ल आदिवासी जास्त प्रमाणात असून ते शेती किंवा मजुरी करतात. मांडू विखुरलेलं नगर वाटतं. कुडामातीच्या घरात ते राहताना दिसतात. त्यांचं जगणं अतिशय साधं असून पर्यटनाच्या काळात इथं चहलपहल जास्त असणार. दहापंधरा हॉटेल्स आणि तितक्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था असून वीसएक गाईडही इथे आपला व्यवसाय करताना भेटतात. आज अनेकांनी या ऐतिहासिक विहिरी बुजवून टाकल्या आहेत. पाणी जिरवणं आता त्यांच्या दृष्टीनं बाद झालेली गोष्ट आहे. तलाव आटलेले बघायला मिळातात, जे की काही वर्षांपूर्वीपर्यंत बाराही महिने पाण्यानं आणि कमळांनी भरलेले बघायला मिळत. असं सगळं असलं तरी मांडूचा निरोप घेणं अतिशय कठीण गोष्ट आहे. हिंदू, राजपूत, मुघल, अफगाणी अशा शैलींचा प्रभाव असलेल्या इमारती बघणं हा अविस्मरणीय अनुभव आहे. त्यामुळेच परतल्यावरही मांडूच्या वास्तू मनातून हटायला तयार होत नाहीत!

परतताना महेश्वरला गेलो, तिथं नर्मदा आणि तिचा घाट, बाजूला असलेला अहिल्याबाई होळकरांचा अचंबित व्हावा असा किल्ला यांचं धावतं दर्शन घेतलं. महेश्वर हे मंदिरांचं शहर, तसंच इथला महेश्वरी साडी निर्मितीचा उद्योग घराघरांतून चाललेला दिसतो. साड्यांचे प्रकार आणि रंग बघून हरखून जायला होतं! त्यामुळेच अंजली आणि मी मोह न आवरून माहेश्वरी साडी खरेदी करूनच गाडीत बसलो!
यमाजी, अंजली आणि मी एकाच गावचे, म्हणजे औरंगाबादचे! कॉलेजपासून एकमेकांना ओळखणारे! मधली अनेक वर्षं आपापल्या प्रवासात व्यस्त झाल्यानं भेट नव्हती, ती भेट पुन्हा पुणे शहरानं घडवली. अंजली विख्यात शास्त्रीय संगीत गाणारी गायिका, तर यमाजी पत्रकार, लेखक! मांडूच्या प्रवासात ही गुणी, समंजस जोडी अिाण अपूर्व बरोबर असल्यानं प्रवास सुखकर झाला, हे वेगळं सांगायला नकोच!

दीपा देशमुख, पुणे.  

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.