थिंक पॉझिटिव्ह - दिवाळी 2015

थिंक पॉझिटिव्ह - दिवाळी 2015

वर्तमानात जगायला आवडत असल्यामुळे कदाचित झालेल्या घटनांची खंत आणि भविष्याची चिंता मला फारशी वाटत नाही. पण हे वर्तमानात जगणं आणि आयुष्याकडे आशावादी नजरेनं पाहणं हे एकाच दिवसात घडलं नाही. त्यासाठी बर्‍यावाईट अनुभवांच्या, अडथळ्यांच्या आणि अडचणींच्या प्रवासातून जावं लागलं. प्रत्येक वळणावरच्या बर्‍यावाईट प्रसंगांनी खूप काही शिकवलं. प्रत्येक प्रसंगी मनात नकारात्मक विचार आले नाहीत असं नाही, पण त्याच वेळी सकारात्मक विचारही आले. तर कधी तो विचार घेऊन अनेक व्यक्ती समोर उभ्या राहिल्या. त्या विचारांनी, त्या व्यक्तींच्या आश्‍वासक वागण्यानं ही वळणं पार करत प्रवास करताना मजा आली, आजही येतेय.

आज याच भूतकाळातल्या काही कप्प्यात डोकावलं असताना मला आठवताहेत ते मी ठाणे जिल्ह्यातल्या मासवण या आदिवासी भागात काम करत असतानाचे काही प्रसंग....आयुष्यात कधी खेडेगावात राहण्याचा प्रसंग तोपयर्ंत आला नव्हता. पण आयुष्यात आलेल्या काही वळणांवर मला समोर असलेल्या पर्यायार्ंमधून एक पर्याय निवडावाच लागणार होता. खूप विचार करून अखेर मासवणला काम करायचा निर्णय मी घेतला होता. मासवणच्या १५ आदिवासी गावातल्या ७८ पाड्यांवरच्या मुलांच्या शिक्षणासाठी आदिवासी सहज शिक्षण परिवार या संस्थेच्या वतीनं शिक्षण विभाग प्रमुख म्हणून मला काम करायचं होतं. मी काम करण्यासाठी तिथे दाखल झाले, तेव्हा तिथलं लोड शेडिंग, दमट हवामान, शहरी सुविधांची वाणवा, मोबाईलला नेटवर्क नसणं नव्हे तर मोबाईलचे टॉवर्सच नसणं, सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ७ ते १० लाईट नाही. पावसानं किंवा वार्‍यानं मध्येच वीज गेली तर मग दिवस दिवस आनंदीआनंदच. तसंच ऑफिसच्या लँडलाईनफोनचाही काही प्रॉब्लेम झाल्यास लाईनमन येऊन बघेपर्यंतचे दिवस तसेच अधांतरी. ना कोणाशी संपर्क, ना कोणाशी गप्पा, साप, विंचू तर कायमच दिसत...काही वेळा मासवण ते पालघर या घाटात वाघही बघायला मिळत... असे ते दिवस...त्यातच संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सुधाताई  रणदिवे  आणि सचिव सुमनताई देशपांडे  दोघीही राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या खूप प्रेमळ स्वभावाच्या, पण तितक्याच शिस्तशीर. त्यांनी केलेल ३० वर्षांचं काम समोर उभं होतंच. त्या दोघींनी या पंधरा गावातल्या आदिवासी लोकांना स्वच्छतेचे, आरेाग्याचे धडे दिले होते. गावातले लोकच नव्हे तर, संस्थेसाठी काम करणारा प्रत्येक आदिवासी कार्यकर्ता नीटनेटका, हसतमुख आणि स्वच्छताप्रिय होता. 
मासवणची सूर्या नदी, मासवण ते पालघर या प्रवासातला बहुरंगी वृक्षांनी नटलेला तो घाट, हिरवागार परिसर आणि मनस्वी, स्वच्छंदी असलेले आदिवासी यांच्यात मी खूपच कमी वेळात रमून गेले.

मला आसपासच्या पंधरा गावात प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत मुलं शाळेत जाताहेत का, जात नसतील तर त्यांची कारणं काय, उपाय काय करता येईल, शिकताना मुलांना नेमक्या अडचणी काय येतात, आश्रमशाळांची स्थिती कशी आहे, शाळाबाह्य मुलांचं प्रमाण कमी कसं करता येईल आणि त्यांना शिक्षणप्रवाहात पुन्हा दाखल करता येईल का, आदिवासींच्या स्थलांतरावर काय काय उपाय असू शकतील, मुलांच्या आणि शिक्षकांच्या क्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल हे सगळं अभ्यासण्याआधी मला या पंधरा गावात फिरून सविस्तर माहिती आकडेवारीच्या स्वरुपात गोळा करायची होती आणि त्यासाठी मला रोज दिवस-दिवस या ठिकाणांना भेटी द्याव्या लागणार होत्या. उन्हाळ्यातल्या कडक उन्हात तर पावसाळ्यात मांडीपर्यंत चिखल तुडवत पाडे पाडे फिरावं लागत होतं. सुरुवातीला कंटाळा यायचा, नकोही वाटायचं पण नंतर आपण इथे राहणार्‍या लोकांपेक्षा कोणी वेगळ्या मुळीच नाही आहोत हे समजायला लागलं आणि कुरकूर करण्यापेक्षा तेच काम आनंदानं केलं तर? असा प्रश्‍न मनाला विचारून मी कामाला लागायची. संस्थेची धुकटण या आदिवासी गावात स्वतःची जमीनही होती. तिथे आम्ही शेतीतले बरेच प्रयोग करायचो. पावसाळ्यात भातशेतीही करायचो. कार्यकर्त्यांबरोबर भाताच्या रोपाचे गठ्ठे हातात घेऊन दोन-दोन रोपं पाण्यानं थबथबलेल्या मातीत खोचत पुढे पुढे सरकायचं. काम करत असताना एकमेकांशी हसत खेळत गाणी गात काम कधी संपायचं कळायचंही नाही. मात्र सवय नसल्यानं रात्री पाठ, पाय, आणि मान यांचं दुखणं असह्यही व्हायचं. चोवीस तास काम केलं तरी कमीच अशी मासवण आणि इतर गावातली स्थिती होती. पण त्या वेळी अपूर्वला (मुलाला)  मुंबईला शिकायला ठेवलं असल्यामुळे आठवड्यातला एक दिवस तरी मुंबईला जावं अशी तीव्र इच्छा असायची. पण त्याच वेळी सुट्टीच्या दिवसाचा उपयोग करून मासवणला किंवा जवळच्या एखाद्या गावात एखादं आरोग्य शिबीर किंवा डोळे तपासण्याचा कॅम्प आयोजित करावा अशी संस्थेची इच्छा असायची. सुरुवातीला शरीरानं मासवणला पण मन केव्हाच मुंबईत पोहोचलेलं असायचं. पण नंतर मात्र त्या दिवसांनी आपण जिथे आहोत तिथेच मनालाही खेचून आणायचं हे मी शिकले. 

मासवणला काम सुरू करताना माझ्याजवळ अनुभव शून्य होता. या शून्यातून सुरुवात होती.  त्यातच माझा स्वभाव खूप बोलका नव्हता. सगळं बोलणं स्वतःशीच आणि मनातल्या मनातच चाले. इथं तर आदिवासी गावागावांमध्ये मलाच बोलण्यात पुढाकार घेणं आवश्यक होतं. माझ्या मनात काय चाललंय हे ओळखणं आणि त्यानुसार इतरांनी माझ्याशी बोलणं अशा अपेक्षा करणं चूक होतं. हळूहळू सहा महिन्यानंतर संस्थेचे इतर कार्यकर्ते आणि गावातले सरपंच, शाळेतले शिक्षक आणि गावातले लोक मला ओळखायला लागले. तेही माझ्याशी बोलायला लागले. या सहा महिन्यात भरपूर फिरल्यामुळे मला माझ्या कामाविषयी आणि इतर उपयोगी बरीच माहिती मिळत गेली. 

आम्हाला वांदिवली नावाच्या गावात खेळघर सुरू करायचं होतं. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचं औचित्त्य साधून चवथीच्या मुलांना त्यांची शाळा सपंल्यावर रोज एक तास बोलवायचं आणि जिथे त्यांचा पाया कच्चा आहे त्यावर भर देऊन अभ्यास घ्यायचा. अवांतरही अभ्यास ही मुलं करतील असं नियोजन आम्ही केलं होतं. याचाच उपयोग या मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याकरताही होणार होता. खरं तर बहुतांश आदिवासी भागात चवथीपासून होणार्‍या गळतीचं प्रमाण प्रचंड होतं. ही गळती थांबवण्यासाठी आम्हाला वेगवेगळे उपक्रम राबवायचे होते. या मुलांना शिकवण्यासाठी काही ध्येयनिष्ठ राष्ट्रसेवादलाच्या निवृत्त शिक्षकांचा एक गट उत्सुक होता. पुण्याहून मासवणला ही मंडळी आळीपाळीनं येऊन राहणार होती. पंधरा पंधरा दिवस दोन शिक्षक मासवणला राहून गेले की नंतर पुन्हा दोन येणार असं त्यांनी नियोजन केलं होतं. इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांवर ते भर देणार होते. इंग्रजी शिकण्यासाठी तर आमचे आदिवासी कार्यकर्तेही तयार झाले होते. मी आणि इतर कार्यकर्ते यांनी जवळ असणार्‍या सगळ्याच शाळांना भेटी देऊन आम्ही हातात घेत असलेल्या या प्रकल्पाविषयी माहिती दिली, तेव्हा शाळेतले शिक्षकही आनंदित झाले. त्यांचं काम आम्ही बरंचंस हलकं करणार होतो. आपण २६ जानेवारीला शाळेतले कार्यक्रम झाले की इयत्ता चवथीची मुलं, शिक्षक आणि पालक यांना एकत्रित आणून वांदिवली केंद्राचं रीतसर उदघाटन करू असं आम्ही सगळ्या कार्यकर्त्यानी मिळून ठरवलं. आमचं झेंडावंदन झालं की आम्ही ४ थ्या इयत्तेच्या मुलांना घेऊन येऊ असं आश्‍वासन शिक्षकांनी आम्हाला दिलं. मग काय २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची जय्यत तयारी करून मी आमच्या संस्थेच्या प्रॉजेक्ट डायरेक्टर, सल्लागार आणि युनिसेफच्या निवृत्त अधिकारी मा. विजया चौहान यांना कळवलं. 

आमचा कामातला उत्साह बघून विजया चौहान या २५ जानेवारीच्या रात्रीच मासवणला पोहोचल्या. सकाळी लवकर उठून मी आणि माझे कार्यकर्ते असे आम्ही ठरलेल्या जागी पोहोचलो. पण एकही पालक, एकही मुलगा आणि एकही शिक्षक आम्हाला दिसेना. झेंडावंदन संपल्यावर जवळच्या शाळेतल्या मुलांनी आणि शिक्षकांनी येणं अपेक्षित होतं. तेवढ्यात मला एका शाळेतल्या शिक्षिकेच्या फोन आला. तिनं सांगितलं, आमची इच्छा असली तरी आम्ही कोणीही येऊ शकणार नाही. याचं कारण त्यांच्या केंद्रप्रमुख या अधिकार्‍यानं कोणीही जायचं नाही असं सांगितलं होतं. काही शाळांमागे केंद्रप्रमुख नावाचा एक अधिकारी असतो हे मला तोपर्यंत ठाऊकच नव्हतं. आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल त्याला न विचारता, त्याची परवानगी न घेता परस्पर मी शिक्षक आणि मुलांना कार्यक्रमासाठी बोलावलं याचा त्याला भयंकर राग आला होता. त्यामुळे त्यांनं सगळ्याच शाळांमध्ये कोणीही जायचं नाही असा दम भरला होता. त्या शिक्षिकेनं आपलं नाव कुठेही न येऊ देण्याची विनंती केली आणि फोन ठेवला. मी मटकन खालीच बसले. कार्यक्रमासाठी कितीतरी तयारी करून ठेवली होती. कार्यकर्त्यांना नियोजित ठिकाणी थांबायला सांगून मी संस्थेच्या ऑफिसमध्ये पोहोचले. विजया चौहान आमची धावपळ बघत होत्याच. त्यांनी मला बघताच आपण निघायचं ना? असा प्रश्‍न केला. मला तर रडायलाच आलं. तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमानं सगळी चौकशी केली आणि शांतपणे म्हणाल्या. हरकत नाही आपण गावातल्या इतर सगळ्या पालकांना बोलावू. तू वाईट वाटून घेऊ नकोस. आपण काम करतो म्हटल्यावर असे अनेक अडथळे येणारच. पण ‘बी पॉझिटिव्ह’ असं म्हणत त्यांनी मला हलकेच थोपटलं. 

आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. कार्यकर्त्यांच्या मदतीनं हळूहळू एक एक करत अनेक पालक जमा झाले. मुलंही एक एक करत गोळा झाली. मी बोलायला सुरुवात केली. पालकांना समजेल अशा भाषेत आम्ही सुरू करत असलेल्या उपक्रमाविषयी सांगितलं. शिक्षक उपस्थित राहू शकले नाहीत पण कार्यक्रम खूप चांगला झाला. दुसर्‍या दिवशी मी तालुक्याचं (आता जिल्हा) ठिकाण गाठलं. पालघरच्या गटविकास अधिकार्‍यांना भेटून आम्ही आदिवासींच्या शिक्षणावर काय काम करतो आहोत याची सविस्तर माहिती दिली. तेव्हा त्यांनी मी आपल्याला काही मदत करू शकतो का अशी विचारणा केली. मी आदल्या दिवशीच्या घटनेबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी एक पत्र काढून पंधरा गावातल्या सगळ्या शाळांना पाठवलं आणि यापुढे संस्थेनं शिक्षण आणि आरोग्य यावर आधारित कोणताही कार्यक्रम आयोजित केला तर शिक्षक आणि मुलांनी जरूर सामील व्हावं असं त्यात म्हटलं होतं. मी समाधानानं परतले. नंतर मी केंद्रप्रमुखांनाही भेटून अहंकार बाजूला ठेवून दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या ठरवलेल्या कार्यक्रमाला शिक्षक, केंद्रप्रमुख असे सगळेच आले. जागा कमी पडावी इतकी प्रचंड गर्दी पाहून खूप बरं वाटलं. त्यानंतरच्या सगळ्या कार्यक्रमांना असाच भरघोस प्रतिसाद मिळत गेला. शिक्षकांच्या मदतीनं आम्ही अनेक गोष्टी करू शकलो. मात्र हे सगळं घडण्यासाठी, प्रयत्नशील राहण्यासाठी नैराश्याच्या खाईत न जाऊ देता मला समजून घेत, मला बळ देत विजयाताईंनी ‘बी पॉझिटिव्ह’चा मंत्र दिला होता. त्यामुळेच हे घडू शकलं. 

अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडायचे नाहीत हे मी या प्रसंगातून शिकले. त्यानंतर विजया चौहान यांच्याच पुढाकारामुळे आणि पाठबळामुळे मी आणि माझे कार्यकर्ते आम्ही बडवाणी या मध्यप्रदेशातल्या ठिकाणी मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव सत्याग्रहात सामील झालो. तीन दिवस तिथे राहायचं असं ठरवलेलं असताना मी मात्र ८ दिवस मेधाताईंबरोबर राहिले, त्यांच्यात सामील झाले. त्या काळात मेधा पाटकर व्यक्ती किती असामान्य आहे हेही कळलं, पण एखाद्या प्रश्‍नासाठी आयुष्य पणाला लावण्याची त्यांची चिकाटी पाहून मी थक्क झाले. त्या आठ दिवसांत एका रात्री खवळलेल्या नर्मदेच्या पात्रात आम्ही अडकलो. मृत्यूला खूप जवळून बघितलं. आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे त्या क्षणांनी सांगितलं. हेलकावे घेत असलेल्या नावेत देशभरातून आलेले कार्यकर्ते, जीवनशाळेची आदिवासी मुलं, मेधाताई सगळेच होतो...तुफानी लाटांचा आवाज आणि गारठलेले आम्ही...ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. उद्याचा दिवस बघायला मिळणार नाही अशी ती मिट्ट काळोखी रात्र होती. पण हळूहळू वादळ शांत झालं, पहाट झाली आणि सूर्याच्या कोवळ्या किरणात नर्मदा सौम्य हसली. असं वाटलं रात्रभर खवळलेली नर्मदा ती हीच का? पहाटेचं ते वातावरण रात्रीच्या अगदीच विरोधातलं होतं. आता आजूबाजूचे हिरवेगार डोंगर दिसत होते. नर्मदेकाठचे हिरवेगार वृक्षही स्वागत करत होते. जणू काही तेही विजयाताईंच्या शब्दात सांगत होते, कुठलही प्रसंग आक्रमण करत येऊ दे, पण बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह!

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.