डोंगराएवढं काम करणारा माणूस!

डोंगराएवढं काम करणारा माणूस!

आयपीएच (इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ) पुणे - पहिला वर्धापन दिन - २४ मार्च २०१९ लहानपणी वाचलेल्या अदभुत कथा आजही विसरता आलेल्या नाहीत. रंगीबेरंगी पंख लावून विहरणार्‍या त्या सुंदर पर्‍या, ते उडते गालिचे, त्या जादूच्या बासर्‍या, मंतरलेला रम्य परिसर, भुकेची/आंघोळीची गोळी.... असं बरंच काही. या सगळ्या चमत्कार करणार्‍या गोष्टी खर्‍याच - असं मात्र आज प्रकर्षानं वाटतं आहे. याचं कारण म्हणजे असे सगळे अदभुत चमत्कार करणारा, जादुई जग दाखवणारा, परीकथेत घेऊन जाणारा, जगणं किती सुंदर आहे हे दाखवणारा एक सुंदर माणूस मी बघितलाय, बघतेय - त्यानं ३० वर्षांत डोंगराएवढं काम उभं केलंय- आणि आजही ते यशस्वीपणे करतोय. तो माणूस म्हणजेच डॉ. आनंद नाडकर्णी! कोल्हापूरचे दोन कार्यक्रम आटोपून मध्यरात्री अडीच वाजता पुण्यात पोहोचले. इतकं तातडीनं परत यायचं कारण होतं - पुण्यातला आयपीएचचा सकाळी १०.३० वाजता संपन्न होणारा पहिल्या वर्धापनाचा कार्यक्रम! ‘दीपाताई, नक्की यायचं हं’ चा सुखदाचा मधाळ आवाज कानात गुंजत होता. पुण्यातल्या शिवाजी नगरच्या मॉडर्न इंजिनियरिंग कॉलेजच्या सभागृहात पोहोचले. गीता भावसार ही गुणी मैत्रीण सोबतीला होती. आत गेल्यावर आमच्या वेध परिवारातले सगळे, आयपीएचे सहकारी, आणि अनेक मित्र-मैत्रिणी भेटले. कार्यक्रम लवकरच सुरू झाला. डॉक्टर आनंद नाडकर्णी हा माणूस जरा जास्तच कल्पक आहे! कुठलाही कार्यक्रम तो नेहमीच्या पठडीतला, कंटाळवाणा, सत्कार, हारतुरे, भाषणं असा करत नाही. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी द्यायला हवं हा ध्यास या माणसाला असतो.

मागच्या वर्षी याच दिवशी पुण्यात सदानंद दाते, सानिया, विकास आमटे, मृणाल कुलकर्णी अशा दिग्गजांना घेऊन त्यांच्याशी संवाद साधत पुणे आयपीएचची ओळख पुणेकरांना झाली होती. खरं तर मनोविकारांपासून मनोविकासापर्यंत काम करणार्‍या आयपीएचची ओळख अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे, तर भारताला आहे. पण ती या दिवशी जास्त वृद्धिंगत झाली असं म्हणू या. आयपीएचनं २९ वर्षं पूर्ण केली आहेत. या कार्यक्रमाच्या सुरेख आठवणी अगदी कालपर्यंत मनात रेंगाळत असतानाच लक्षात आलं, बघता बघता आयपीएचची पुण्यातली शाखा वर्षं पूर्ण करते आहे. डॉक्टरांची मानसकन्या डॉ. सुखदा चिमोटे आणि तिची टीम यांनी वर्षंभरात आयपीएच स्थिरावण्यासाठी खूपच मोलाचे प्रयत्न केले आहेत. तिनं पुण्याला आणि पुण्यानं तिला केव्हाच आपलं म्हटलंय. हे सगळं असं काय काय आठवत असताना समोरचा पडदा वर सरकला आणि रंगमचांकडे लक्ष गेलं! पडद्यावर आयपीएचचा सुरेखसा लोगो - मन थार्‍यावर, तर जग जाग्यावर....थिंक- इट-विटी....अशी अक्षरं दिमाखात झळकत होती! जगात सगळी कौशल्यं शिकवली जातात, पण विचार करायला शिकवलं जात नाही. याचं कारण तो आपण सगळे सतत करतच असतो. आजच्या कार्यक्रमात मात्र योग्य विचार योग्य दिशेनं कसा करायचा याची रुजवणूक खेळाच्या माध्यमातून व्यासपीठावरची मंडळी डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. सुखदा चिमोटे यांच्या साथीनं करणार होती. अबब! रंगमंचावर जवळजवळ २० एक माणसं बसली होती. त्यातच डॉ. आनंद नाडकर्णी आणि सुखदा चिमोटे हेही होते. एका एका टेबलाभोवती कोंडाळं करून सहा ते सात जणं काहीतरी आपसांत कुजबूजत होती. बरं ही मंडळी सगळ्या वयोगटातली होती आणि अनोळखी तर मुळीच नव्हती. तिला काही सांगायचंय या नाटकामुळे सध्या गाजत असलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान, पुण्याचं भूषण असलेले आमचे साहित्यिक मित्र संभा ऊर्फ संजय भास्कर जोशी, आरजे म्हटलं की ज्या तरुणाचं नाव आणि आवाज कानात घुमतो तो संग्राम खोपडे, पुस्तकांच्या जगात धूम मचवणारा बुकलेट गाय अमृत देशमुख, गोबीचं वाळवंट पायी पार करण्याचा विक्रम नोंदवणारी सुचेता कडेठाणकर, प्रसिद्ध अँकोलॉजिस्ट अनुराधा सोहनी, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बाल-कुमारसाहित्यिक आणि गंमतशाळेची धमाल करणारे राजीव तांबे, सध्या 'नाळ'मुळे प्रेक्षकांच्या मनात हळवं स्थान निर्माण केलेली गुणी अभिनेत्री देविका दफ्तरदार, स्टँडअप कॉमेडियन भाडिपाचा श्रावण, उत्साही अभिनेता शुभंकर एकबोटे, तडफदार अभिनेता विराजस कुलकर्णी, मुरांबाचा दिग्दर्शक वरूण नार्वेकर, भाडिपाचा स्टँडअप कॉमेडियन ओकांर, नाटककार, दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन, विख्यात दिग्दर्शक किरण यज्ञोपवित, अभिनेत्री विभावरी देशपांडे! समोर काय घडणार माहीत नव्हतं.

पण अपार उत्सुकता या मंडळींकडे बघून लागली होती. तीन टेबलाभोवती असलेल्या या तीन टीमची नावं उल्हास, उत्सुक आणि कन्फ्यूजन अशी होती. डॉ. आनंद नाडकर्णी आणि सुखदा यांनी सूत्रं हलवायला सुरुवात केली. समोर व्यासपीठावर एक एक अतिशय मनोरंजक आणि तरीही समोरच्याला काहीतरी देत जाणार्‍या नाट्यमय खेळांच्या फेर्‍या सुरू झालेल्या होत्या. प्रत्येकाची ओळख त्या टीममधलीच दुसरी व्यक्ती करून देत होती. ती ओळख जगासमोर असलेल्या ओळखीपेक्षा वेगळी होती. लोकांना त्यांच्याबद्दल ठाऊक नसलेल्या गमतीदार गोष्टी त्यामुळे समोर बसलेल्या प्रेक्षकांना कळत होत्या. विचार म्हणजे काय इथंपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला तर प्रेक्षकही यात सामील झाले. विचार म्हणजे काय हे प्रत्येकजण एका एका शब्दांत किंवा वाक्यात सांगत होता. बरोबर उत्तर येणार्‍याला डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि सुखदा यांच्याकडून चॉकलेट बक्षिसादाखल मिळत होतं. या फेर्‍यांच्या मध्ये समोर असलेल्या दोन पडद्यांवर आयपीएच संस्थेचा वर्षंभरातला कार्यक्रम अतिशय नेटकेपणानं सुखदा सादर करत होती. स्वसंवाद कसा असतो, संवादाचा मेळ, भाषेविना संवाद, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं व्यासपीठावरची मंडळी रंगवत होती. हे सगळं उत्स्फुर्तपणे घडत होतं.

या घडण्याच्या कुठल्याही रंगीततालिमा झाल्या नव्हत्या. इतकंच नाही तर व्यासपीठावरची मंडळी सगळी एकमेकांना येण्यापूर्वी वैयक्तिकरीत्या ओळखतही नव्हती. तरी त्यांच्यातलं को-ऑर्डिनेशन अफलातून होतं. क्षितीज पटवर्धन असो की किरण यज्ञोपवित, राजीव तांबे असो की देविका सगळेच कसे षट्कार मारत होते. यात नवी तरूण मंडळीही तोडीस तोड उत्तरं देत होती. क्षितीज पटवर्धन यांचा इन्स्टंट अभंग लक्षात राहिला, तर पुस्तकपेठेच्या संभाची मला चक्क दृष्ट काढावी वाटली. सगळं काही खेळकरपणे चाललं होतं, पण तो खेळ सगळ्यांना किती समृद्ध करून गेला हे शब्दांत सांगणं खूप कठीण आहे. सभागृहातले सगळे प्रेक्षक उल्हसित झालेच, पण व्यासपीठावरच्या सगळ्यांनी आपणही कसं नवीन काहीतरी घेऊन चाललो आहोत हे सांगितलं. अडीच तास चाललेला एक अदभुत आणि देखणा कार्यक्रम काय देऊन गेला? उल्हास, औत्सुक्य, स्पष्टता, सकारात्मक विचारांचं भान, कल्पकतेनं आणि नाविन्यानं जगू शकू अशा आयुष्याची दिशा! मनातली अनेक जळमटं गळून पडावीत आणि मनोविकासाच्या वाटेनं प्रवास करायला सज्ज व्हावं अशी ही रंजक सफर! थँक्यू, आयपीएच टीम!

दीपा देशमुख, पुणे

deepadeshmukh7@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.