मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र हे नाव महाराष्ट्रात कोणाला ठाऊक नाही अशी व्यक्ती सापडणं कठीणच. त्यातच डॉ. अनिल अवचट हे नाव तर महाराष्ट्रातल्या घराघरात जाऊन पोचलेलं. मी एका सामाजिक संस्थेसोबत काम करत असताना डॉ. अनिल अवचट यांच्याशी कामाच्या संदर्भात जास्त जवळून परिचय झाला. लिखाणाचा आणि सामाजिक कार्याचा धागादोरा जुळत असल्यामुळे मग डॉ. अनिल अवचट हे नाव औपचारिक न राहता, तो इतरांप्रमाणे माझाही बाबा (पालक) झाला. बाबाने नवीन काही लिहिलं की लगेचच त्याचा फोन येई आणि मी तडक पत्रकार नगर, पुण्यातल्या कृष्णा इमारतीत जाऊन धडकत असे. नवी कविता, त्या अनुषंगाने इतरही कविता, गाणी, बासरी सगळं कसं रीतसर, भरभरून आस्वाद घेण्यासाठी उभं असे. एक दिवस बाबाकडे गेले असताना, बाबा म्हणाला, मी मुक्तांगणला चाललोय, येतेस...नाही म्हणायचा तर प्रश्नच नव्हता. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी बाबासोबत मुक्तांगणला पोचले.

मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्र असून महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातल्या अनेक राज्यांतूनही पेशंट्स दाखल होतात असं ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात असं केंद्र कधी बघितलं नव्हतं. त्यामुळे एक वेगळंच कुतूहल मुक्तांगण बघण्यासाठी मनात निर्माण झालं होतं. मुक्तांगण येईपर्यंत बाबाचा रानमेवा गाडीभर आकर्षित करत खुणावत होता, भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा, पेरू, आणि असंच खाण्याचे अनेक पदार्थ! ते खात खात मुक्तांगण कधी आलं कळालंच नाही. मुक्तांगणची इमारत बघताच मला उगाचंच ग्रीक पद्धतीच्या इमारतींची आठवण झाली. दगडी बांधकामाची ती अत्यंत सुरेख अशी टुमदार इमारत समोर स्वागताला उभी होती. आम्ही आत गेलो. बाबाला पाहताच जो समोर येईल, तो ‘बाबा नमस्कार’ करत होता. बाबा, त्या सगळ्यांशी माझी ओळख करून देत पुढे चालत होता आणि मागे मागे मी! इमारतीत समोरच बसक्या शैलीचं व्यासपीठ आणि पायर्‍यापायर्‍यांची अर्धगोलाकार बसण्याची रचना दिसली. त्या ओपन स्टेजच्या मागच्या भिंतीना वेलींनी आच्छादून टाकलं होतं. हे सगळं खूपच सुंदर आणि छान होतं. डोळ्यात ते दृश्य टीपून घेत आम्ही पहिल्या मजल्यावर गेलो. तिथे पांढर्‍या स्वच्छ कपड्यात तरुणांपासून वृद्धांपर्यंतची मंडळी फिरत होती. कोणी वाचनालयात, तर कोणी कुठल्यातरी कामात गर्क असलेली दिसली. ते सगळेच व्यसनमुक्तीसाठी आलेले पेशंट्स होते. बाबा, सगळ्यांशी प्रेमाने ‘मित्रा’ असं संबोधून बोलत होता. त्यानंतर आम्ही निरोप समारंभाचा कार्यक्रम होता, त्या हॉलमध्ये गेलो. सगळे पेशंट्स शिस्तीत पांढर्‍या शुभ्र वेषात मांडी घालून ताठ बसलेले होते. आम्ही आत जाताच सगळ्यांनी स्वागत केलं. त्या हॉलमध्ये डॉ. सुनंदा अवचट यांचा फोटो लावलेला होता. मुक्तांगणच्या निमार्त्या - डॉ. अनिता अवचट - शरीराने त्या इमारतीत प्रत्यक्ष नसल्या तरी त्यांचं कार्याचं अस्तित्व सगळ्या परिसरात जाणवत होतं. बाबासोबत आम्ही सगळ्यांनी प्रार्थना म्हटली. प्रार्थना म्हणताना खूप शांत शांत मन होत गेलं. बाहेरच्या जगातले सगळे कोलाहल थांबले. प्रार्थना म्हणण्यामागे या शांतीची अनुभूती देणं हाच तर हेतू नसावा, कुणास ठाऊक!

त्यानंतर बाबानं सगळ्यांशी संवाद साधला. सगळेच जण बाबाचं बोलणं मन लाऊन ऐकत होते. त्यानंतर त्यातल्या काही पेशंट्स मित्रांनी आपली मनोगतं मांडली. साधारणपणे आपल्यातले वाईट गुण किंवा सवयी आपण इतरांपासून दडवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण इथे मात्र उलटंच चित्र दिसत होतं. प्रत्येक जण आपापल्या व्यसनाच्या सवयी, झालेला त्रास, त्यातून आलेलं नैराश्य आणि मग कुटुंबाला आपण नकोसे असणं, समाजानं टाळणं हे सारे अनुभव सांगत होता. मुक्तांगणला आल्यावरही १-२ दिवसांत काहीही करून पळून जाऊ असे बेत अनेकांनी आखले होेते. पण त्यानंतर जणुकाही जादू व्हावी असं काहीतरी घडलं. मुक्तांगणमध्ये चुंबकत्वाचा काहीतरी गुण असावा असं काहीसं घडलं. येणार्‍या पेशंट्सचे पळून जाण्याचे मनसुबे गळून पडले. इथे मिळणारी वागणूक काही औरच होती. कुटुंबाला, समाजाला नकोसे झालेले आपण, इतरांच्या सहानुभुतीच्या, तिरस्काराच्या आणि उपेक्षांच्या नजरांची सवय झालेले आम्ही - इथे असलेल्या कोणाच्याही नजरेत तो भाव नव्हता. उलट आपण कोणालातरी हवे आहोत, आपला कोणी तिरस्कार करत नाहीये, आपल्यावर एक वेगळया प्रकारचा विश्वास ठेवला जातोय आणि आपल्याला व्यसनाविषयी बोलून जास्त गुन्हेगार वाटावं असं बोललं जातच नाहीये हे पाहून प्रत्येक जण आलेला मुक्तांगणमध्ये विसावलेला दिसत होता. गंमत म्हणजे या पेंशट्समध्ये गरीब, मध्यमवर्गातले आणि अतिश्रीमंत असे तिन्ही वर्गातले सर्व वयोगटातले लोक होते. मुख्य म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था कॉमन हॉलमध्ये! म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला स्पेशल व्यवस्था असं काही इथं नव्हतं. मला सगळ्यात आश्चर्य असं वाटलं, की एक अतिश्रीमंत उद्योगपतीचा मुलगा स्वतःही अत्यंत कर्तबगार, हुशार, पण व्यसनामुळे वाया गेला आणि म्हणूनच त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याला मुक्तांगणमध्ये पाठवण्यात आलं. घरी सगळी राजेशाही व्यवस्था, नोकरचाकर असलेल्या घरातून आलेला मुलगा इथे मात्र झाडून काढण्यापासून ते स्वयंपाकाची भांडी साफ करण्याच्या कामात मनापासून गुंतलेला! निरोपाच्या त्या कार्यक्रमात प्रत्येकजण आपण आलो, तेव्हा कसे होतो आणि इथल्या प्रेमळ, मायेच्या वातावरणात इथलेच कसे होऊन गेलो हे आवर्जून सांगत होता. अतिशय अनौपचारिक वातावरणातला तो कार्यक्रम मला हलवून गेला.
 
मुक्तांगणमध्ये प्रत्येक बुधवारी अंतर्दीप प्रज्वलन विधी पार पडतो. या दिवशी येणार्‍या पेशंट्सचा निरोप समारंभ असतो. त्या प्रत्येकाच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जणुकाही त्यांना एक संदेश दिला जातो. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे...याच वेळी वैष्णजन तो तेणे कहिये रे, पीड परायी जाणे रे...हे भजनही गायलं जातं. इतरांच्या दुःखांना जाणणारा असा असावा. याच वेळी एक कार्ड आठवणीदाखल पेशंट्सना देण्यात येतं. त्यावर एक निरोप छापलेला असतो, ‘‘मित्रा, तू व्यसनमुक्त राहावेस अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. तुला कधीही मदत लागल्यास सांग. आम्ही चोवीस तास उपलब्ध आहोत.’’ जेव्हा मुक्तांगणमध्ये पेशंट दाखल होतो, तेव्हाचा त्याचा त्या अवस्थेतला फोटो आणि मुक्तांगणमधून परत आपल्या घरी जातानाचा फोटो, तसंच तो दाखल झाल्यावरचं त्याचं वजन आणि जाताना त्याचं वाढलेलं वजन हे त्या कार्डवर टाकलेलं असतं. हे कार्ड त्यानं शर्टच्या खिशात ठेवावं, जेणेकरून ते त्याच्या हदयाजवळ राहील आणि कधी व्यसनाची पुन्हा आठवण झालीच, तर ते कार्ड काढून त्यावरची प्रार्थना वाचली की मन शांत होईल. जाताना पेशंटला हातावर साखर घातलेलं दही ठेवलं जातं. उद्देश हाच की त्याचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा.

मुक्तांगणमध्ये प्रत्येक शनिवारी सगळे मिळून गाण्याची मैफल जमवतात. प्रत्येकाला जे कुठलं गाणं येईल ते त्यानं निःसंकोचपणे गायचं. कोणी गझल म्हणतं, कोणी भजन, कोणी फिल्मी गीत तर कोणी चक्क आरती. म्युझिक थेरॅपी ही अशी मुक्तांगणमध्ये काम करते. पिंजर्‍यातून उडू पाहणारा पक्षी हा मुक्तांगणचा सिम्बॉल आहे. मुक्तांगणमध्ये कौन्सिलिंगचं काम मुक्ता पुणतांबेकर करते, तर सुप्रसिद्ध सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी हे महिन्यातून दोन दिवस मुक्तांगणसाठी खास देतात. ते मुक्तांगणचे विश्वस्त आहेत. ते आले की मुक्तांगणचं सगळं वातावरण उल्हसित होतं. ते आरईबीटी थेरॅपीचा अवलंब पेशंट्सवर करतात. त्यांच्यासमवेत स्टाफ मिटिंग होतात. या मिटिंगमध्ये स्टाफ आपल्या मनातल्या अनेक गोष्टी व्यक्त करतात, त्यावर चर्चाही घडून येते. त्यानंतर कौन्सिलिंगची प्रात्यक्षिकं अशा अनेक गोष्टी. मुक्तांगणमध्ये पेशंट्सचे वाढदिवसही उत्साहाने साजरे केले जातात. ज्याचा वाढदिवस आहे तो आपले अनुभव सगळ्यांबरोबर शेअर करतो. मुक्तांगणमध्ये ‘मनोगत’ नावाचं हस्तलिखिताचंही प्रकाशन होतं. हे मनोगत सगळें पेशंट्स मित्र मिळून तयार करतात. यात काय नसतं? यात कव्हरपासून सगळा आतला मजकूर पेशंट्स मित्र तयार करतात. यात चित्रंही काढली जातात. इतकंच काय पण दारूवरची कार्टून्स आणि विनोदही असतात. आता मुक्तांगणमध्ये ‘आनंदयात्री’ हे द्वैमासिकही सुरू झालंय. योगासनं, पीटी, विविध खेळ, बुद्धिबळ या सगळ्यांच्या स्पर्धा होतात. बक्षीस समारंभही साजरा होतो. वर्षातून एकदा सगळे पेशंट्स मित्र सहलीला जाऊन आनंद साजरा करतात.

मुक्तांगणचं वाचनालय असंच उत्कृष्ट आहे. हे वाचनालय पु. ल. देशपांडे यांनी दिलेल्या देणगीतून  उभं राहिलं आहे. वाचनालयाच्या शेजारीच कौन्सिलरच्या केबिन्स आहेत. औषधालय, स्वयंपाकघर सगळं पाहून झालं, तेव्हा तिथली प्रत्येक गोष्ट स्वच्छतेची साक्ष देत होती. 

काही पुरुष पेशंट्स मित्रांशी बोलताना सहज म्हणून सुरू झालेली गोष्ट बघता बघता व्यसनात कशी रुपांतरित झाली हे कळालं. त्यानंतर डोक्यावर चढलेलं कर्ज, कुटुंबातून आणि नातेवाइकांतून होणारी हेटाळणी, व्यसनाशिवाय काहीही न सुचणं, मग राग, चिडचिड आणि सतत होणारीं भांडणं हा रोजच्याच दिनक्रमाचा भाग झाल्याचं काहींनी बोलून दाखवलं. तरुणांपैकी काहींची बेकारीमुळे व्यसनाला जवळ केलं होतं. तर काहींनी प्रेमभंगामुळे! बाजूच्या भागात स्त्री  पेशंट्स मला आढळल्या. आम्ही त्यांच्याशीही गपा मारल्या. ग्रामीण, शहरी, शिक्षित आणि अशिक्षित सर्व प्रकारच्या आणि सर्व वयोगटातल्या महिला तिथे होत्या. महिलांना व्यसन लागू शकतं हे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होतं, पण इथे मी प्रत्यक्ष त्यांच्यासोबत बसून, बोलून ते अनुभवत होते. घरातली उपेक्षा, छळ, मनातल्या दबलेल्या भावना आणि त्यातून झालेला स्फोट आणि ते विसरण्यासाठी घेतलेला व्यसनांचा आसरा हे प्रत्येकीच्या कहाणीतून व्यक्त होत होतं. बाबाशी बोलताना त्यांना कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नव्हता. कर्तृत्व गाजवणार्‍या कोणाचंही पालकत्व स्वीकारणं ही अभिमानाची गोष्ट असते, पण बाबाने जाणीवपूर्वक अशा व्यसनांच्या आधीन झालेल्या व्यक्तींचही पालकत्व स्वीकारलं, त्यांना सगळा समाज तिरस्काराने बघतो अशांना बाबा आपलं मानतो ही माझ्यासाठी खूपच मोलाची अशी बाब होती. प्रत्येकीला बाबाशी भरभरून बोलायचं होतं, बाबांनं त्यांना खूप वेळ द्यावा असंही त्यांना वाटत होतं. त्या सगळ्या बाबासमोर अगदी लहान, बालवयात गेलेल्या मुलींसारख्या मला भासल्या. त्यांच्यावर मायेची पाखरण करणारं कुणी त्यांना हवं होतं, तीच त्यांची मोठी गरज होती असं मला जाणवलं.

त्यानंतर मी वेळ मिळेल तशी बाबासोबत मुक्तांगणला जातच राहिले. मुक्तांगणचा स्टाफ म्हणजे आणखीनच एक वेगळीच मौज आहे. या स्टाफमधली बहुतांशी माणसं ही पूर्वी मुक्तांगणला पेशंट म्हणून राहिलेली अशी आहेत. त्यांच्यातल्या बदलाने त्यांना मुक्तांगणची ओढ लागली आणि ते कायमचे मुक्तांगणचे झाले असं त्यांचं म्हणणं!

मुक्तांगणविषयी जाणून घ्यायचं असेल, तर तिथली वास्तू, तिथली माणसं, तिथला परिसर सगळेच बोलायला लागतात. अगदी भरभरून! या सगळ्यांचा जो आधारवड बाबा आहे, त्याच्याशी बोलून मला मुक्तांगणच्या स्थापनेपासूनचं सगळं जाणून घ्यायचं होतं आणि ते जाणून घेता आलं.

१९८५ साली डॉ. अनिल अवचट आणि डॉ. अनिता अवचट यांच्या घरावरची दुपारी बेल वाजली. डॉ. सुनंदा ऊर्फ डॉ. अनिता अवचट या त्या वेळी येरवडा मनोरुग्णालयात सायकियाट्रिस्ट होत्या. डॉ. अनिताची ठाण्याची मैत्रीण आणि तिचा मुलगा दारात उभे होते. मुलगा इंजिनियरिंगला, मात्र वडिलांचा प्रचंड धाक - इतका की त्यांना राग आला की ते बेदम मारूनही काढत. त्यामुळे मनात घुसमट घेऊन जगणारा मुलगा पुण्यात शिकायला आला आणि मित्रांच्या संगतीने ड्रग्ज घ्यायला लागला. त्या संपूर्ण काळात त्या मुलाला आधार देण्याचं त्याला त्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी अवचट दांपत्यांनी अफाट परिश्रम घेतले आणि मग अशी कितीतरी ड्रग्जच्या आहारी गेलेली माणसं बाबाला आणि अनिता यांना आसपास दिसू लागली, भेटू लागली. खरंतर १९८० सालापासून महाराष्ट्रात गर्द उर्फ ब्राऊन शुगरचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर डॉ. अनिल अवचट यांनी गर्द नावाचं एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक वाचून पु.ल. देशपांडे आणि सुनिताबाई देशपांडे दोघंही अस्वस्थ झाले आणि त्यांनी यावर काहीतरी काम करायला हवं असं अवचट यांना सुचवलं. तेव्हा डॉ. अनिता अवचट यांनी ताबडतोब व्यसनमुक्ती केंद्र काढू या असा प्रस्ताव ठेवला आणि त्या कामाची सुरूवात करण्यासाठी पु.ल.देशपांडे आणि सुनिताबाईंनी १ लाख रुपयाची देणगी त्वरेनं देऊ केली. त्या वेळी डॉ. अनिल अवचट - बाबाला खूप टेन्शन आलं. आपण असं कुठलंही व्यसनमुक्ती केंद्र कधी पाहिलं नाही, आपल्याला अनुभव नाही आणि विशेष म्हणजे कुठल्याही तर्‍हेचं ट्रेनिंगही कधी घेतलेलं नाही. अशा अवस्थेत केंद्र कसं चालवायचं हा प्रश्न बाबाला पडला. पण अनिताजवळ सगळी उत्तरं होतीच. पेशंट ठेवायला जागा होतेय हे सगळ्यात महत्त्वाचं आणि राहिला प्रश्न प्रशिक्षणाचा तर आपण पेशंट्सकडूनच शिकू असं सुनंदा अवचट यांनी उत्तर दिलं. डॉ. अनिता अवचट त्या वेळी मेंटल सेक्शनमध्ये सीनियर सायकियाट्रिस्ट होत्या. ससून हॉस्पिटलमध्ये मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा विभाग सुरू झाला. पु. ल. देशपांडे यांना ‘मुक्तांगण’ नाव आवडत असल्यामुळे तेच नाव ठेवलं गेलं. ज्या दिवशी ससूनच्या इमारतीत व्यसनमुक्ती केंद्राची सुरूवात झाली, त्याच दिवशी मनोहर घारे नावाचा एक पेशंट मुक्तांगणसाठी मिळाला. व्यसनमुक्त हेाऊन गेली २५ वर्ष तो मुक्तांगणसोबतच काम करतो. सरकारने मुक्तांगणचा उपक्रम टेकओव्हर करावा यासाठी डॉ. अनिल अवचट आणि डॉ. सुनंदा अवचट यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यावेळी झिरो बजेटचे उत्तर सरकारकडून मोठ्या अडथळ्यासारखे उभे होते. केंद्रसरकारकडे अखेर हा प्रस्ताव पाठवला आणि तो मंजूर होऊन ग्रँटची रक्कमही हाती पडली. वेगवेगळे अडथळे पार करत आज मुक्तांगणची स्वतंत्र स्वतःची वास्तू पुण्यातल्या विश्रांतवाडी परिसरात उभी आहे. पु.लं.च्या प्रोत्साहनाने डॉ. अनिता अवचट या त्यांनी तिथल्या वरिष्ठांची परवानगी घेऊन मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं. त्यानंतर मुक्तांगण मित्र या संस्थेनं जन्म घेतला. २९ ऑगस्ट १९८६ पासून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं काम अव्याहतपणे चालू आहे. 
मुक्तांगणमध्ये दाखल झालेल्या पेशंटला एक दिलासा मिळतो. खरंतर व्यसनाधीन होणं हा एक आजारच आहे. अशा व्यसनी माणसाला प्रेमाची आणि सुरक्षिततेची आत्यंतिक गरज असते. त्याची त्याच्या जीवनमूल्यांवरची श्रद्धा आणि विश्वास दृढ झाला पाहिजे. त्याच्या कुटुंबियांनी त्याला समजावून घेतलं पाहिजे कारण त्याला अशा काळात कुटुंबाच्या मदतीची जास्त गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला तो जिथे आहे, त्या वातावरणात मोकळं वाटलं पाहिजे आणि हे सगळं लक्षात घेऊन मुक्तांगणची रचना त्या प्रकारे करण्यात आली. डॉ. अनिता अवचट यांचा महात्मा गांधीच्या शिकवणुकीवर गाढ विश्वास होता. त्यामुळे मुक्तांगणमधली उपचारपद्धती ही गांधीजींच्या आश्रम पद्धतीच्या धर्तीवरच असावी असं त्यांना वाटत असे. मुक्तांगणच्या स्थापनेपासूनच केंद्रात अत्यंत साधेपणा, स्वावलंबन आणि स्वच्छता या गोष्टी आवर्जून पाळल्या जातात. स्वयंशिस्त हे केंद्राचं वैशिष्ट्य आहे.

खरंतर व्यसन हा एक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वरुपाचा आजारच आहे. मुक्तांगणमध्ये पेशंट दाखल झाल्यावर त्याचं व्यसन सुटावं म्हणून अनेक उपक्रम तर त्याच्यासाठी आखलेले असतातच. पण त्याशिवाय त्याच्यावर उपचार केले जातात ते कोणते? केंद्रात दाखल झाल्यावर अंमली पदार्थ न मिळाल्याने जो त्रास होतो (विथ्ड्रॉल सिम्प्टम्स किंवा टर्की) तो कमी करण्यासाठी करावे लागणारे उपचार. तसंच व्य्यसनी माणसाच्या पूर्वेतिहास जाणून घेऊन  अंमली पदार्थ सेवनाची सुरूवात कुठून आणि कशी झाली, व्यसन वाढत कसं गेलं, व्यसनाचे त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबिय्यांवर कोणकोणते दुष्परिणाम झाले य्याची माहिती त्य्याच्य्याशी आणि त्याच्या कुटुंबियांशी बोलून मिळवणं.ते प्रश्न कसे सोडवता येतील याची कुटुंबियांसमवेत चर्चा करणं.आणि पर्यार्य समोर ठेवणं. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्य्यसन सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, त्य्याची जबाबदारी इतर कोणाची नसून आपलीच आहे याची जाणीव व्यसनी व्यक्तीस करून देणं, ही जाणीव झाली तर त्याच्यावर केल्या जाणार्‍या उपचारांचा फायदा दिसू लागतो. ही जाणीव परिणामकारकरित्या व्हावी यासाठी अत्यंत पोषक वातावरण मुक्तांगणमध्ये निर्माण केलेलं दिसून येतं. आणि शेवटच्या टप्प्यात व्यसनी व्यक्तीचं पुनर्वसन यावर विचार केला आहे. त्या व्यक्तीस झेपेल असा कार्यक्रम तयार केला जातो आणि त्यात पूर्वीची देणी मिटवणं, गेलेलं काम परत मिळवणं, वगैरेसारख्या गोष्टींचा समावेश असतो. 
पुण्याशिवाय नाशिक, सोलापूर, सातारा, मुंबई, उरळीकांचन, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, कराड आणि औरंगाबाद इथेही कौन्सिलिंग सेंटर्स सुरू केली गेली आहेत. मुक्तांगणमध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, नागालँड, जम्मू इथूनही पेशंट्स येतात.

मुक्तागणविषयी अधिक जाणून घ्यायचं असल्यास, पत्ता आहे,
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
सेटिया हॉस्पिटल समोर, हॉटैल लँडमार्कच्या मागे,
मोहनवाडी, विश्रांतवाडी, पुणे ४११०१५
फोन ०२० - २६६९७६०५

मुक्तांगणला देणगी देताना पु. ल. देशपांडे म्हणाले होते, ‘एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला तर माझ्या देणगीचे मी सार्थक झाले असे समजेन.’ पु. ल. गेले, सुनिताबाई गेल्या. जिच्या जिद्दीमुळे, तळमळीमधून मुक्तांगण उभं राहिलं ती बाबाची अर्धांगिनी डॉ. अनिता या प्रवासातून लांबवरच्या प्रवासात गेल्या. आज बाबा, डॉ. आनंद नाडकर्णी, मुक्ता आणि मुक्तांगणचा सगळा स्टाफ खूप निष्ठेने हे हाती घेतलेलं कार्य चालवत आहे. डॉ. अनिता यांच्या एका वाढदिवसाच्या दिवशी बाबाने त्यांना आपण भेट म्हणून आपल्या आयुष्यातली दोन वर्ष मुक्तांगणच्या कामात जास्तीत जास्त देण्याचं कबूल केलं. पण ही दोन वर्ष कधी संपलीच नाहीत. हाती घेतलेला वसा आजही चालवत बाबा उभा आहे. सगळ्या मुक्तांगणमित्रचा बाबा म्हणून. अखेर बाबाने म्हणजेच डॉ. अनिल अवचट यांनी रचलेली ही प्रार्थना खूप बोलकी आहे.

बीत गया सो बीत गया
क्यु करता है शोक
आज अभीका क्षण है तेरा,
उस बारे मे सोच
भविष्य कोई ना जाने रे
क्युँ  कर उसकी चिंता
करना जो कुछ भला भलाई
अब क्षण है मोका
बुरे करम से पछताते हो
एक भलाई उसका औसद
कितना भी हो घना अंधेरा
भागत है जब देखे ज्योत

दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.