डॉ. पांडू - अर्थपूर्ण -
विदर्भातल्या गडचिरोलीसारख्या भागातलं तोयामिट्टा नावाचं एक इवलसं 50 कुटुंबं असलेलं गाव. अशा दुर्गम आदिवासी भागातल्या एका आदिवासी मुलाच्या प्रवासाची ही गोष्ट. हिलमाडिया म्हणून संबोधले जाणारे हे आदिवासी अत्यंत खोलवर जंगली भागात रहातात, माडिया भाषा बोलतात आणि तिथे मानवी संस्कृतीचे कुठलेही पडसाद पडलेले दिसत नाहीत.
पांडू लहान असतानाच त्याचे वडील वारले. आईला कुष्ठरोग झालेला. आपल्या आईसोबत पांडू बाबा आमटेंच्या सहवासात आला आणि कधीही अनुभवता आलं नसतं अशा जीवनाचा मार्ग बाबांनी आणि आमटे कुटुंबियांनी पांडूसाठी खुला करुन दिला.
प्रकाश आमटेंनी या लहानग्या पांडूला आपल्याच मुलासोबत शाळेत टाकलं. आपल्या मुलात आणि पांडूत कुठलाही भेद त्यांनी कधी केलाच नाही. कन्नमडावी येथे एका झाडाखाली पांडूची शाळा सुरु झाली. शाळेचे शिक्षक स्थानिक भाषेत म्हणजे माडियातले अनेक शब्द वापरुन मुलांना समजेल असं शिकवत. हळूहळू पांडूला अभ्यासाची गोडी लागली. जंगलात रहाणारा, जिथे सायकलसुद्धा जाणं कठीण अशा गावातला पांडू बाबांचे संस्कार आणि शिक्षणाच्या माध्यमातून नवं जग बघू लागला. 7 वी पर्यंत आश्रमशाळेत शिकून झाल्यावर वरोरा येथे शिकायला गेला. आनंदवनात रहायचं आणि आनंदवन ते वरोरा असा सायकलने प्रवास करायचा असा पांडूचा दिनक्रम सुरु झाला.
बारावी झाल्यावर निकाल लागला आणि मेडिकलच्या मुलाखतीसाठी बोलावणं आलं. मुंबई कधीही न बघितलेला मुलगा बाबा आणि आमटे परिवाराच्या प्रेरणेनं मुंबईत जाउन पोहोचला. अॅडमिशनसाठी ताबडतोब 800 रुपये भरावे लागणार होते आणि ती रक्कम तर पांडूजवळ त्याक्षणी नव्हती... पांडूला रडू कोसळलं. मेडिकल कॉलेजमध्ये असलेल्या शुभांगी लिमये यांनी त्याची विचारपूस करुन ते पैसे पांडूला दिले. आजही ती मदत पांडू विसरु शकत नाही. प्रवेश मिळाला. वेळोवेळी बाबा, प्रकाश आमटे फोन करुन पांडूची विचारपूस करत त्याची काळजी घेत. पण मुंबईसारख्या महानगरीतलं वातावरण या जंगलातल्या मुलाला अस्वस्थ करुन टाके. पांडूची आदिवासी शब्दांची पेरणी असलेली भाषा, अबोल स्वभाव, साधी रहाणी यामुळे सतत इतर मुलांकडून होणा-या टिंगलीला सामोरं तर जावं लागेच. पण या अडाणी मुलाशी काय मैत्री करायची या भावनेतून इतर मुले त्याच्यापासून फटकून दूरच रहात. वर्गात चाललेलं काहीही समजत नसे. प्राध्यापकांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व आणि पांडूला त्यातलं एकही अक्षर कळत नसे. त्यातच या यांत्रिकी जगातला कोरडा व्यवहार बघून सतत आईची आणि आनंदवन, हेमलकशाची आठवण त्याला येई. तीन कागदासारख्या पातळ पोळ्या असलेला एक डबा तो आणि त्याचा मित्र कसाबसा एकवेळ वाटून खात. त्यामुळे पोट तर भरत नसेच पण त्यासाठी कोणाला त्रास द्यावा असं स्वाभिमानी पांडूला वाटत नसे. याचा परिणाम व्हायचा तो झाला, पांडू अशक्त झाला आणि पहिल्या सेमिस्टरमध्ये दोन विषयात चक्क नापास झाला. शिक्षकांपासून सगळ्यांनीच ‘इसके बसकी बात नही’ असं म्हणत पांडूने आपला गाशा गुंडाळून आता परत जावं असंच सुचवलं. प्रकाश आमटेंनी पांडूला समजून घेतलं. आपल्या या मुलावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी त्याला धीर दिला..प्रयत्न कर जमेल तुला असं सांगितलं. बाबा आमटे स्वतः लिहून पांडूला पत्रं पाठवत. ही पत्र म्हणजे पांडूसाठी अमूल्य असा ठेवा आहे. त्यानं ती आजही जपून ठेवली आहेत. बाबांचं प्रत्येक पत्र पांडूची निराशा पळवी, त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करीत. पुन्हा पांडू कामाला लागला. त्याच्यासमोर प्रेरणा होती बाबांची, प्रकाश आमटे, मंदा आमटेंची...आनंदवन आणि हेमलकशात अपार कष्टांनी उभ्या राहिलेल्या त्या नंदनवनाची.. प्रकाश आमटेंना जमतं, मला का जमू नये? मी मेहनत करण्यात मागे हटणार नाही या विचाराने पांडूने मला आलंच पाहिजे या विचाराने .प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात इथपासून पांडू समजून घेण्याची धडपड करु लागला...अनेक शब्द पाठ करु लागला..एकलव्यासारखा एकच ध्यास घेऊन पांडूने अभ्यासाला सुरुवात केली. आपलं एमबीबीएस प्रथम श्रेणीत पांडूने पूर्ण केलं. त्यानंतर बालरोगतत्ज्ञ व्हायचं या ध्यासाने पुढची एमडीसाठी अॅडमिशन घेतली. आपल्या भागात प्रकाश आमटेंसारखंच आपल्याला परतून काम करायचंय हा ध्यास मनात कायम होताच.
सुरुवातीची एन्ट्रनशीपसुध्दा पांडूने सोयी असणा-या भागात न मागता भामरागडसारख्या दुर्गम भागात मागून घेतली. लवकरच लोकांच्या मनात एक विश्वासाचं नातं निर्माण केलं. बालरोगतज्ज्ञ म्हणून त्याची अल्पावधीत ख्याती झालीच पण सर्जरीमध्येही त्याचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. कुठे फॅन बिघडलाय आणि जोडायचाय तर पांडूला एका इलेक्ट्रिशियनचं ज्ञान तितकंच असतं. कुठल्याही कामात ‘नाही' हा शब्द पांडूजवळ नसतोच. पांडू फूटबॉल, मल्लखांब, स्विमींग यासारख्या खेळातही स्टेट लेव्हल चॅम्पियन आहे. भोव-यात पोहण्याचं अदृभूत असं कसब पांडूजवळ आहे. खेळांमुळे आपण खूप सकारात्मक आहोत असं पांडूला वाटतं.
पांडूच्या लग्नाची गोष्टही खूपच विलक्षण आहे. पुण्यात स्थायिक झालेल्या एका सुविद्य जोडप्याने आपल्या मुलीच्या बाबतीत जगावेगळा निर्णय घेतला. लोकविज्ञान चळवळीत काम करणा-या, वैज्ञानिक दृष्टिकोन मानणा-या आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणा-या या जोडप्याने बदलाची सुरुवात घरापासून करायची ठरवलं होतं. वेगळ्या वाटेने चालणारा, जातिधर्म न मानणारा असा तरुण त्यांना आपल्या मुलीसाठी जोडीदार म्हणून हवा होता. कॉन्व्हेंटमधून शिकलेली, मायक्रोबायोलॉजीत पदवीधर झालेली त्यांची मुलगी शीतल ही त्यांच्यासारख्याच विचारांची होती/आहे. दागिन्यांचा/पैशाचा मोह नसलेली ही मुलगी पांडूबरोबर हेमलकशात जाऊन संसार थाटायला तयार होती.
आजही पांडूशी बोलताना त्याच्या भाषेतनं एक आदिवासी भाषेची लय जाणवते. भाषेचा तो गोडवा ऐकताना वाटलं, शीतल आणि पांडू यांच्या संस्कारांमध्ये, संस्कृतीमध्ये दोन टोकाचं अंतर...कसं जमवून घेतलं असेल दोघांनी ? शीतलशी बोलताना कळाल्ं, जेव्हा ती लग्न करुन हेमलकशात आली, तेव्हा रोज पेशंटसोबत, इतरांसोबत ती पांडूचं सगळ्यांशी मिसळून वागणं, त्याचा कष्टाळू स्वभाव आणि त्याचं कामातलं कौशल्य बघत असे, इतरांकडून ते ऐकत असे तेव्हा तिला आपला नवरा खरंच जगावेगळा आहे हे लक्षात येई. पांडूचा प्रेमळ आणि नम्र स्वभाव, मेडिकलमधलं त्याचं ज्ञान आणि कामातलं कौशल्य यामुळे लोकांनी पांडूला पांडूरंग करुन टाकलं.
दोघांमध्ये गंमती-जंमतीही अनेक घडत. लग्न झाल्यावर दोनच दिवसांत पांडूच्या आईने पांडूला सांगितलं, पाणी आणायचं आहे, दोन-तीन गुंड घेऊन ये. झालं, शीतलची पाचावर धारण बसली. पाणी नदीवर किंवा विहिरीतून आणणं ठीक, पण त्यासाठी गुंड कशासाठी पाहिजेत ? तिने आपण चुकीचं ऐकलं असावं या भावनेतून आपल्या सासूला परत विचारलं, तेव्हा सासूने परत ठाम आवाजात पाण्यासाठी गुंड हवेतच सांगितलं..थरथर कापत असलेल्या शीतलला जेव्हा कळालं गुंड म्हणजे पाण्याचे हंडे तेव्हा कुठे तिच्या जिवात जीव आला. अशा अनेक गंमती घडत.
जशी शितल हेमलकशात गेली..तिथल्या अनेक गोष्टी शिकली खरंतर हे सांस्कृतिक अभिसरण घडायलाच हवंय. पुण्या-मुंबईच्या युवांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जाऊन तिथं काम करावं आणि गडचिरोलीसारख्या युवांना पुण्या-मुंबईचं जीवन कळावं. पांडू मुंबईत कधी रमला नव्हता. पण जेव्हा शहरातल्या गरिबांच्या प्रश्नाविषयी ऐकत असे, वाचत असे तेव्हा तो अस्वस्थ होई. शहरातली आरोग्यव्यवस्थेची दुरावस्था, वाढती महागाई आणि मग साहजिकच लोकांचं आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष यामुळे पांडूने निर्णय घेतला आपण पुण्यात किंवा मुंबईत रहायचं आणि स्वतःसाठी ही एक आव्हान म्हणून स्वीकारायचं ठरवलं. पुण्यात नरे रोडवरच्या श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटलमध्ये पांडू गरिबांना मोफत आरोग्यसेवा देण्यात हातभार लावतोय. त्याला इथल्या कामगार, कष्टकरी वर्गासाठी काम करायचंय. त्यासाठी सरकारी यंत्रणेतून ते करुन एक वेगळा इतिहास घडवायचा या प्रतीक्षेत सद्या पांडू आहे. पांडूचं ध्येय आणि पांडूचा अथपासून इथपर्यंतचा प्रवास हा वेगळ्या अर्थानं अर्थपूर्ण आहे.
भौतिक सुविधा तर दूरच पण जिथे सूर्याची किरणंही चटकन पोहोचत नाहीत असा आदिवासी भागातला पांडू डॉक्टर झाला आणि शहरापर्यंत पोहोचला. आपल्या व्यवस्थेत आदिवासींसाठी अनेक योजना आहेत. पण त्याबाबत बदल घडून येण्याबाबत मात्र उदासीनता आहे, त्यासाठी वेगळी यंत्रणा असावी लागेल. बाबांनी, प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांनी पांडूचं पालकत्व ज्या पद्ध्तीने घेतलं, त्याला पावलोपावली तू उभा राहू शकतोस असा धीर दिला अशी रचना आजच्या समाजात कशी निर्माण होईल ? सहृदय, समाजाचा विचार करणारे, बांधिलकी मानणारे अनेक पांडू कसे तयार होतील ?
पांडूला भेटायला आपल्याला नक्कीच खूप आवडेल. पांडूशी संपर्क करायचा असल्यास मोबाईल नम्बर 9763115908 असा आहे. भेटणार ना त्याला ?
दीपा देशमुख,
adipaa@gmail,com
Add new comment