बाईच्या जीवंतपणाला चूड लावणाऱ्या सती प्रथेची गोष्ट

बाईच्या जीवंतपणाला चूड लावणाऱ्या सती प्रथेची गोष्ट

सतीची प्रथा हे शब्द समोर आले की राजा राममोहन रॉय (२२ मे १७७२-२७ सप्टेंबर १८३३) यांचं नाव डोळ्यासमोर येतं. तसंच सतीविषयी बोलायचं झालं तर मराठी वाचकाला चटकन रणजीत देसाईंची ‘स्वामी’ ही कादंबरी देखील लगेचच आठवते. या ऐतिहासिक कादंबरीची पार्श्वभूमी खूपच वादळी आणि राजकीय परिस्थितीत होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. लोक स्वातंत्र्याचा श्वास घेत मुक्त, निर्भय जीवन जगू लागले. मात्र १६८० ला शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा मुलगा संभाजी याला शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज्याची धुरा सांभाळता आली नाही. त्यानंतर पेशव्यांनी मराठ्यांचा राज्यकारभार त्यांचे पंतप्रधानपद भूषवत सांभाळायला सुरुवात केली. त्यातले एक पेशवाई भूषवणारे पंतप्रधान म्हणजे श्रीमंत माधवराव पेशवे! 

महाराष्ट्रातल्या पुणे शहरात - शनिवारवाड्यात अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी पेशवेपद सांभाळण्याची जबाबदारी माधवराव पेशवे यांच्यावर येऊन पडली. त्यांचं वय लहान असलं तरी त्यांची बुद्धी अफाट होती. आपसातले कट- कारस्थानं आणि निजामाकडून आणि मुघलांकडून आक्रमणाची भीती अशा अस्थिर वातावरणात माधवरावांना राज्यकारभार सांभाळावा लागत होता. त्यातच त्यांना क्षय रोगानं ग्रासलं होतं. १७७२ मध्ये हैदरावर स्वारी करण्याच्या मोहिमेवर माधवराव पेशवे असताना ते आजारी पडले आणि वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी रमाबाईनं सती जाण्याचा निश्चय केला. पुण्याजवळ थेऊर हे अष्टविनायकाचं एक प्रसिद्ध देवस्थान आहे. तिथे नदीकाठी रमाबाई सती गेल्या. तिथे एका वृंदावनाच्या स्वरूपात सतीचं स्मारक तिथे उभं आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणार्‍या या कालावधीचा बोलका इतिहास ‘स्वामी’ या कादंबरीतून मांडला आहे. त्या वेळची परिस्थिती आणि इतिहासासोबतच रमाबाई आणि माधवराव यांच्यातलं पती-पत्नीमधलं फुलत जाणारं प्रेमाचं नातं आणि माधवरावांच्या मृत्य्ाूच्या बातमीनंतर रमाबाईनं सती जाण्याचं ठरवणं हा प्रसंग लेखकानं प्रभावीपणे रेखाटला आहे. 

माधवराव पेशवे यांचा शेवट जसा जवळ आला तशी त्यांनी रमाबाईंजवळ शेवटपर्यंत सोबत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मृत्यूनंतर स्वर्गात दोघांना एकत्र सोबत राहता येईल ही वेडगळ आशा यापाठी होती. रमाबाईंनी पतीची साथ मृत्यूनंतरही देण्यास मूक होकार दिला. रमाबाईला ते म्हणाले, ‘‘मला खात्री होती. तू मला शेवटची सोबत करशील......’ त्यानंतर काही वेळानंतर माधवरावांचं निधन झालं. रमाबाईंनी परिधान केलेली ती वां, तो मस्तकीचा मळवट, ती गंभीर चर्चा पाहून सार्‍यांची मनं चरकली. सुन्न होऊन सारे ते दृश्य भरल्या नजरेनं पाहत होते. आनंदीबाईपासून सगळ्यांनी त्यांना सती जाऊ नये म्हणून विनवणी केली. पण रमाबाईचा सती जाण्याचा निर्धार बोलून दाखवला. सतीच्या महायात्रेच्या वेळी येणारे सगळे माधवरावांबरोबरच रमाबाईंचंही दर्शन घेत होती. माधवरावांसोबत जाणार्‍या रमाबाईंनी नदीपर्यंत जाईपर्यंत प्रत्येकाला नाण्यांपासून ते अंगावरच्या दागिन्यांपर्यंत काही ना काही दिलं. 
 
नदीकाठावर जमलेली ती अफाट गर्दी, मंत्र म्हणणारे ब्राह्मण, घाटावर रचलेली चंदनाच्या लाकडाची चिता अकरा आहुतींनी युक्त असा तुपाचा होम करून अग्नीला प्रदक्षिणा घालून समोरच्या अथांग जनसमुदायाला हात जोडून आणि शिडीवरून चितेवर प्रवेश करणार्‍या रमाबाई असं लेखकानं सती जाण्याच्या ठिकाणचं वर्णनही खूप सविस्तरपणे केलं आहे. त्यानंतर धडाडणारी पेटलेली चिता आणि  चितेभोवती उभे असलेले आणि चकित नजरेने पाहणारे राखणदार, ढोलकरी. नागरे, ढोलकी आणि इतर वाद्यांच्या गजरात ज्वाला आकाशाला भिडत गेल्या आणि ज्वालांच्या सोबत लोकांना काहीच क्षण एक फडफडणारा शुभ्र पांढरा पदर दिसला.

‘स्वामी’ या कादंबरीचा लेखक रणजीत देसाई यांनी केलेला शेवट वाचून वाचक सुन्न होतो. शेवटच्या प्रसंगातलं सतीचं वर्णन....पुण्याजवळच्या थेऊरला आजही नदीकाठी रमाबाई सती गेल्या त्या इतिहासाच्या प्रसंगाची साक्ष देत मूकपणे वृंदावन उभं आहे. हा सगळा प्रसंग पती-पतीच्या निस्सिम प्रेमाची, एकनिष्ठतेची आणि उत्कटपणे एकमेकांसाठी जगण्या-मरण्याची कथा सांगतो. 

मात्र मनात एक प्रश्न उभा राहतो तो रमाबाईच्या सती जाण्याचा....! फक्त रमाबाईच नव्हे तर सती जाणार्‍या असंख्य, अगणित स्त्रियांचा! या कादंबरीत जरी सती जाण्याचं उदात्तीकरण केलेलं असलं तरीही सती जाणं म्हणजे काही खेळ नव्हता. या प्रथेमागे हजारो स्त्रियांचे आक्रोश दडलेले आहेत. ही सती प्रथा निघाली कशी आणि तिची मुळं नेमकी कुठून निघाली असावीत? सती जायला स्त्री सहजासहजी तयार कशी होत असे?

पुराणात सतीविषयीच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत आणि त्या सगळ्या दंतकथांनी सती जाण्याचं उदात्तीकरणच केलं आहे. तसंच धर्मानं देखील स्त्रीच्या आयुष्यात पतीचं स्थान म्हणजे परमेश्वरासारखं असून तो नसेल तर तिलाही काही अस्तित्वच नाही असं म्हणून ठेवलंय. पतीविषयीचं उत्कट प्रेम, स्वर्गात पतीसोबत राहता येण्याची आशा, पतीनंतर चारित्र्यहनन होण्याची भीती, वैधव्यातल्या हालअपेष्टांना तोंड देण्यापेक्षा सुटका करून घेणं, संपत्तीमध्ये विधवेचा वाटा असण्यापेक्षा धर्म आणि नीती यांच्या नावानं उजळ माथ्यानं त्या स्त्रीचा मृत्यू घडवून आणणं हेच फार सोयीचं होतं. स्त्री का तयार होते याच्या अनेक कारणांपैकी  एक महत्त्वाचं कारण म्हणजे लहानपणापासून मनावर झालेले संस्कार आणि त्या संस्कारांना अनुसरुन ती व्यक्ती स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमताच कधी कधी गमावून बसते. तिला बुद्धिभेद झालेला असतो. इथे स्वेच्छा म्हणजे स्वतःच्या निर्णयाचा अविष्कार नसतो तर संस्काराची जी पुटं चढवलेली असतात त्यांच्या जीवनमूल्यांचा तो अविष्कार असतो. पतीच्या मागे जिवंत राहणं म्हणजे पाप आणि त्याच्यासोबत सती जाणं म्हणजे सर्वात मोठं पुण्यकर्म असं लहानपणापासून मनावर ठसवलेलं होतं. त्यामुळे ही खर्‍या अर्थानं त्या स्त्रीची स्वेच्छा असतच नाही. त्यामुळे सतीला परवानगी देणं हे न्याय्य नाहीच नाही. आपल्या मृत पतीला मोक्ष मिळावा म्हणून त्याची विधवा स्त्री आत्मदहन करते असं हिंदू परपंरावाद्यांचं म्हणणं आहे. म्हणून तर ती स्त्री सती गेल्यावर तिचं मंदिर बांधलं जातं आणि तिला मृत्यूनंतर प्रतिष्ठा प्राप्त होते. 

कबीर हा पहिला कवी आहे की ज्यानं सती जाताना स्त्रीच्या वेदना त्याच्या काव्यातून मांडल्या आहेत. १७ व्या शतकात काश्मीरचा शासनकर्ता राजा सिकंदर यानं सर्वप्रथम सतीची प्रथा बंद केली होती. त्यानंतर पोर्तुगाली गर्व्हनर अल्बुकर्क यानंही या प्रथेविरुद्ध जोरदार आवाज उठवला होता. भारतात मोघल सम्राट अकबर आणि पेशव्यांबरोबरच गर्व्हनर लॉर्ड कॉर्नवालीस, लॉर्ड हेस्टिंग्स यांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांना तितकंस यश आलं नाही. डिसेंबर, १६६३ मध्ये औरंगजेबानं आदेश दिला आणि त्याने आपल्या राज्यात कुठेही सतीचा प्रकार केला तर त्यासाठी कडक अशी कार्यवाही करण्यात येईल आणि दंड ठोठावण्यात येईल असं जाहीर केलं. औरंगजेब राज्यावर असेपर्यंत स्त्रियांना जाळल्या जाण्याचं प्रमाण जवळपास आढळत नाही असं दिसून आलंय. अपवाद म्हणून फक्त राजघराण्यातल्या स्त्रिया! शिखांचे पहिले गुरू गुरु नानक यांनी जाहीररीत्या सतीप्रथेची निंदा केलेली दिसून येते. 

त्या वेळी विचारांनी आधुनिक असलेले राजा राममोहन रॉय अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावले. स्वतःच्या कुटुंबातल्या अलकमंजिरीच्या वैयक्तिक अनुभवानं ते होरपळले होतेच, पण त्याचबरोबर भारतीय स्त्रियांची त्या वेळची स्थितीही त्यांना पाहवत नव्हती. स्त्रियांचे कैवारी म्हणून आपलं उर्वरित आयुष्य त्यासाठी खर्च करणारे राजा राममोहन रॉय होते तरी कोण? आणि ही अलकमंजिरी कोण?

‘आधुनिक भारताचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे राजा राममोहन रॉय यांच्या आयुष्यातली ही विदारक घटना! 

राममोहन रॉय यांचा भाऊ जगमोहन आणि वहिनी अलकमंजिरी यांचं  राममोहनवर निरतिशय प्रेम होतं. अलकमंजिरी तर त्यांची खूपच काळजी घेई. राजा राममोहन रॉय त्यांना वाटणारी समाजाविषयीची कळकळ ते नेहमीच आपल्या वहिनीबरोबर बोलत. स्त्रियांची हिंदू धर्मातली गुलामासारखी झालेली स्थिती, तिचे हक्क आणि सतीप्रथेविरूद्धही ते अनेक वेळा आपल्या वहिनीसोबत चर्चा करत. काही कारणानं त्यांना इंग्लंडला जायचं ठरलं तेव्हा अलकमंजिरीने स्वतः त्यांची प्रवासाची तयारी करून दिली. दुर्देवाची गोष्ट म्हणजे ते इंग्लंडमध्ये असतानाच त्यांच्या भावाचा - जगमोहनचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्यांची लाडकी वहिनी अलकमंजिरी हिला सती जावं लागलं. तिला वाचवायला राममोहन नेमके त्या वेळी तिथे नव्हते. अलकमंजिरीला सती जायचं नव्हतं. पण रुढीप्रिय समाजाच्या दबावापुढे ती काही करूच शकत नव्हती. धर्ममार्तंडांनी तर तिची चितेसोबत जळण्याची सगळी सगळी व्यवस्था केली होती. त्या वेळच्या लोकांना सती जाणं म्हणजे खूपच पातिव्रत्याचा आणि पूजनीय असा सोहळा वाटत असे. अलकमंजिरीला सजवण्यात आलं. तिला नवी काठापदराची साडी नेसवण्यात आली. कपाळावर कुंकू आणि भांगात सिंदूर भरण्यात आला. हिंदू स्त्रीसाठी कुंकू लावणं म्हणजे तिच्या पतीच्या जिवंत असण्याचं ते प्रतीक असतं. तिचे लांब केस मोकळे सोडण्यात आले. मुळातच सुंदर असलेल्या अलकमंजिरीच्या चेहर्‍यावर भीतीशिवाय काहीही नव्हतं. अलकमंजिरीला तिच्या पतीसमवतेत चितेवर बांधून त्या चितेला अग्नी दिला गेला. अलकमंजिरीच्या तोंडून पडलेल्या किंकाळ्या जमलेल्या जमावाला ऐकू येणं शक्यच नव्हतं कारण सतीचा जयजयकार ते एका धुंदीत करत चालले होते.  जोरजोरात ढोल-ताशे वाजत होते. जसजसा वाद्यांचा आवाज वाढत गेला तसतसा अलकमंजिरीच्या किंकाळ्या कुठल्या कुठे लुप्त झाल्या. वेढलेल्या ज्वालांनी त्या किंकाळ्यांनाही जणूकाही भस्म केलं.  दुसर्‍या दिवशी लोक जेव्हा अस्थी सावडायला आले तेव्हा त्यांना फक्त एकाच व्यक्तीच्या अस्थी मिळाल्या.  त्यांना खूपच आश्चर्य वाटू लागलं. त्यांनी राखेत इतस्ततः दुसर्‍या अस्थीचा शोध सुरू केला. जमलेल्या लोकांमध्ये हे कसं काय घडू शकतं म्हणून चर्चा सुरू झाली. अस्थीविषयी बातमी वार्‍याच्या वेगानं सगळीकडे पसरली. जमलेल्या जमावानेही अस्थींचा शोध सुरू केला. ज्या झाडीजवळ चिता रचली होती त्या झाडीत अर्धवट जिवंत अवस्थेत अलकमंजिरी जमावाच्या नजरेस पडली. खरंतर औषधोपचारानं अलकमंजिरीचा जीव वाचू शकला असता. जगण्याच्या अतीव इच्छेमुळेच की काय अलकमंजिरीला त्या झाडीनं जिवित ठेवलं होतं. मात्र समाजातल्या लपलेल्या राक्षसी वृत्तीचा विजय झाला. त्यांनी अर्धमुर्च्छित अवस्थेतल्या अलकमंजिरीला झाडीतून निष्ठूरपणे ओढून बाहेर काढलं आणि पुन्हा चिता रचून तिला जिवंतपणी जाळलं. चितेवर ठेवल्यावर तिच्या अंगावर मोठमोठाली लाकडं रचण्यात आली. चितेला अग्नी दिल्यानंतर बांबूच्या काठ्यांनी टोचून ती बाहेर पडू नये याची काळजी घेण्यात आली. तिला महासती म्हणून त्यांनी तिचा जयजयकारही केला.  

राजा राममोहन रॉयना विदेशातून आल्यावर त्यांना ही बातमी समजली. अलकमंजिरीनं राजा राममोहनरॉय यांच्या नावानं एक पत्र लिहून ठेवलं होतं. ते पत्र त्यांच्या हातात पडलं. त्यात तिनं लिहिलं होतं, ‘‘आज तुम्ही असता तर ही दुर्घटना कदाचित टळू शकली असती.’’ त्यांचं दय विदीर्ण झालं. मन दुःखानं वेडंपिसं झालं. माणूस इतकं क्रूरपणे वागू शकतो का? धर्म माणसाला मारण्यासाठी उद्युक्त करतो का? रुढी, प्रथा, परंपरा माणसाच्या कल्याणासाठी की त्याला नष्ट करण्यासाठी? त्यांच्या मनात आपल्या आवडत्या वहिनीचं एकच वाक्य पुन्हा पुन्हा फेर धरून नाचू लागलं, ‘भाऊजी, तुम्ही असता तर कदाचित ही दुर्घटना टळू शकली असती.’ त्यांचं मन आक्रोश करत सुटलं. त्यांनी संतापानं हातात बंदूक घेतली आणि ते गावातल्या लोकांना आवाहन देत बाहेर पडले. पण हळूहळू त्यांच्यातल्या आक्रोशाची जागा त्यांच्यातल्या विवेकशील संयमानं घेतली आणि त्यांनी सतीची ही प्रथा बंद करण्याचा निश्चय केला. खरं तर हे काम त्या काळाच्या दृष्टीनं अजिबातच सोपं नव्हतं. त्या काळात समाजावर असलेला धार्मिक गोष्टींचा पगडा इतका जबरदस्त होता की त्याला छेद देणं अत्यंत कठीण होतं. ‘मी हिंदू धर्माचा विरोधक नाही तर त्यातल्या वाईट चालीरीतींचा विरोधक आहे’ असं राजा राममोहन रॉय म्हणत.

एका कर्मठ ब्राह्मण परिवारात बंगाल इथे हुगळी नदीकाठी मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या राधानगर इथे २२ मे १७७२ रोजी राजा राममोहन रॉय यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रमाकांत रॉय असं होतं तर आईचं नाव फूलठाकुराणी. रमाकांत रॉय यांना तीन मुलं होती. मोठा जगमोहन आणि धाकटा राममोहन. कर्मठ घराण्यातले असले तरी त्यांच्या वडलांनी आपल्या मुलांना शिकण्यासाठी खूपच प्रोत्साहन दिलं. राजा राममोहन रॉय यांची ईश्वरावर श्रद्धा होती. धर्मात सांगितलेल्या कर्तव्यांचं ते पालन करत. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांना बंगाली, संस्कृत, अरबी, ग्रीक, हिब्रू, फारशी आणि इंग्रजी भाषा येत असत.  इंग्रजी भाषा आणि सभ्यता यांच्या त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. वडलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी पटणा इथे पाठवलं होतं. त्यांना इंग्रजीमुळे युरोप आणि फ्रान्समधल्या क्रांतीविषयी अभ्यास करता आला. युक्लीड आणि अ‍ॅरिस्टॉटल या विचारवंतांनी अरबी भाषेत जे लिहून ठेवलं होतं त्याचा अभ्यास राममोहन रॉय यांनी या काळात केला. या अभ्यासामुळे त्यांचे विचार अधिक प्रगल्भ झाले. त्यांनी वेद-उपनिषद यांचा बंगाली भाषेत अनुवादही केला. जुन्याबरोबरच नवंही साहित्य अभ्यासणं त्यांना आवडत असे. जुन्या शास्त्रातल्या लिखाणामागचा अर्थही त्यांनी शोधायचा प्रयत्न केला. वेदांवरचं त्यांचं इंग्रजीतलं लिखाण हे आजही युरोप आणि अमेरिकेमध्ये विख्यात आहे. उपनिषद आणि इतर अनेक धार्मिक ग्रंथांचं लिखाण त्यांनी इंग्रजी आणि बंगालीतून अनुवादित केलं. गणित आणि विज्ञानावरही त्यांनी अनेक लेख लिहिले, पुस्तिका लिहिल्या. रुढीपरंपरांना मानणार्‍या समाजाला विज्ञानाकडे नेलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. म्हणूनच त्यांनी विज्ञानाचा प्रसार करण्याचा विडा उचलला होता. 

राजा राममोहन रॉय यांच्या जन्माच्या वेळची स्थिती काय होती? अठराव्या शतकातल्या उत्तरार्धाचा काळ. भारतात इंग्रजांनी आपली पाय घट्ट रोवले होते. सगळा समाज अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होता. सगळा हिंदूस्थान विशेषतः बंगाल हा मूर्तीपूजेत जखडला गेला होता. रुढी आणि रीतीरिवाजांवर लोकांची अंधश्रद्धाच होती. भिक्षुकांचं स्तोम मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. खोट्या नाट्या पौराणिक कथांचे दाखले देत ते सर्वसामान्यांना लुटत असत. सती जाणं, आईनं आपल्या पहिल्या मुलाला गंगेत फेकून देणं, जगन्नाथाच्या रथाखाली चिरडून मारणं म्हणजे भाग्याच्या गोष्टी लोक समजत.

वयाच्या १७ व्या वर्षीच राजा राममोहन रॉय यांनी मूर्तीपूजेला विरोध करण्यास सुरुवात केली. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी त्यांचा विरोध नव्हता. मात्र कर्मकांड आणि अनिष्ट रुढी त्यांना मान्य नव्हत्या. एखादी मूर्ती किंवा चित्र याला देव समजून त्याची पूजा करायची किंवा परमेश्वराला आकार असतो असं समजायचं या गोष्टींवर राममोहनचा मुळीच विश्वास नव्हता. 

अनेक गोष्टीत त्यांचं त्यांच्या वडिलांसोबत मतभेद होते. शेवटी तर त्यांनी घरही सोडलं. ते हिमालयात गेले. ते तिबेटला गेले असताना त्यांनी तिथे बुद्ध धर्माचाही अभ्यास केला. तिबेटच्या वास्तव्यातून त्यांनी एक गोष्ट जाणली ती म्हणजे ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे मानवी जीवनाचं ध्येय असलं पाहिजे’ असं मानून त्यांनी त्याबाबतीत सर्वत्र हा विचारही पोचवला आणि ही गोष्ट स्वतः आयुष्यभर आचरणात आणली. तसंच जैन धर्माविषयी देखील त्यांनी अभ्यास केला. पुढे त्यांनी मुस्लिम विद्वान मंडळींकडून त्यांनी  सुफीचाही अभ्यास केला.

घरी परतल्यावर राजा राममोहन रॉय यांच्या वडिलांना वाटलं की याचं लग्न केलं तर याच्यात काही बदल होतील. म्हणून त्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. या काळात ते बनारसला गेले आणि तिथे त्यांनी वेद, उपनिषदं आणि भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला. त्या कालावधीत त्यांना सस्कृतमधून श्रुतिस्मृती, न्याय, काव्य, तर्कशाा, गीता, पुराण यांचा सखोल अभ्यास करता आला आणि या मूलभूत ग्रंथातल्या ज्ञानाविषयी सर्वसामान्यांना काहीही माहिती नाही असं त्यांच्या लक्षात आलं. वडलांच्या मृत्यूनंतर राजा राममोहन रॉय यांनी काही काळ त्यांनी १८०९ ते १८१४ या कालावधीत रंगपूर येथे ईस्ट इंडिया कंपनीत कामही केलं. 

 १८२८ मध्ये ब्राह्मो समाजाच्या स्थापनेबरोबरच सामाजिक कार्यासाठी आपलं उर्वरित आयुष्य घालवण्याचं ठरवलं. राजा राममोहन रॉय यांना ‘आधुनिक भारताचा जनक’ असं म्हटलं जातं. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. इतर देशांमध्ये शिक्षणाचा विस्तार कशा प्रकारे झाला आहे, तिथली जीवनपद्धती कशी आहे, त्या देशांमध्ये गरिबी नष्ट करण्यासाठी त्या लोकांनी काय प्रयत्न केले, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यांना करावा वाटे. स्वातंत्र आंदोलन आणि पत्रकारितेत त्यांनी बहुमूल्य योगदान दिलं होतं. त्यांनी बालविवाह, सतीची प्रथा, जातीभेद, कर्मकांड या रुढींना त्यांनी खूप विरोध केला. केवळ देखावा म्हणून उत्सवांचा हैदोस, देवांमध्येही हा मोठा तो लहान असा भेद, अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींचं राममोहन यांना अतीव दुःख होत असे. स्त्री-पुरुषात समता असलीच पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. कर्मकांडानं आणि अनिष्ट रुढीप्रथांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला त्यातून सोडवण्यासाठी कोणीतरी पुढे येणं आवश्यक आहे हे त्यांनी जाणलं आणि आपलंच हे कर्तव्य आहे या भावनेनं त्यांनी या रुढीप्रथांविरूद्ध आवाज उठवला. त्यांना हिंदूधर्मातल्या  एकाही शास्त्रात या प्रथेचं समर्थन आढळलं नाही. इतकं अमानवीय कृत्य आणि त्याचं समर्थन शास्त्रात करणं केवळ अशक्य होतं. त्यांच्या प्रचाराला नातेवाइकांपासून ते बाहेर विरोधही खूप झाला पण त्यांनी आपलं काम सोडलं नाही. 

मध्ययुगीन भारतात मुस्लिम आक्रमणानंतर स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात आली होती. राजपूत समाजात तर युद्धामध्ये ज्यांच्या पतींनी प्राण गमावले त्यांच्यासाठी स्वतःला सुरक्षित ठेवणं अत्यंत कठीण होतं. बलात्कार आणि लूट, गुलाम बनवणं हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झालेले याच काळात दिसतात. खरं तर मुस्लिम आक्रमणांपूर्वी आत्मदहनाचे फारसे पुरावे इतिहासात सापडत नाहीत. दक्षिण भारतात तर याचं प्रमाण अतिशय कमी होतं. ख्रिश्चन धर्माप्रमाणे एका जिवंत व्यक्तीला आत्मदहनासाठी प्रवृत्त करणं ही अतिशय निंदनीय अशी बाब होती. तसंच यामागे ब्रिटिशांची कूटनीती अशीही होती की, सतीप्रथेविरूद्ध कायदा करणं म्हणजे हिंदूंमध्ये फूट पाडणं आणि त्यांना कमकुवत करणं अशीही एक चाल होती. तसंच समाजानं अव्हेरलेल्या या विधवांना ख्रिश्चन मिशनर्‍यांकडून धर्मांतर करायला लावणं असाही एक छुपा हेतू त्यामागे होता. हिंदू धर्मानुसार स्त्रियांसाठी आपलं घर सगळ्यात महत्वाचं मानलं जातं. सगळ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांची उपस्थिती आवश्यक समजली जाते. धार्मिक विधींमध्ये आपल्या पतीसोबत असणं हे अपरिहार्य समजलं जात असे. कुठल्याही धार्मिक कार्यात एकट्या स्त्रीनं असणं समाजाला रुचत नसे. म्हणून तर मुलीचा विवाह लवकर करण्यावर प्रत्येक पित्याचा भर त्या काळी दिसून येतो. फक्त ओझं नाही तर एक नैतिकतेचं ओझंही तो पिता बाळगून असे. त्यामुळे लग्न उरकलं की तो त्याच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद त्याला होत असे. (आजही थोड्या फार फरकानं बर्‍याच अंशी हीच मानसिकता दिसून येते.) लग्नाआधीच जर मुलीचं कौमार्यभंग झाला तर सामाजिक दबाव वाढत असे. त्यामुळेच कुठलीही स्त्री तिच्या घरात खूप सुरक्षित समजत असे. घराचं महत्व तिच्यासाठी जन्ममरणाइतकं मोठं होतं. कुटुंबाच्या सर्व गरजा पुरवणं आणि सर्व कामं करणं, त्याचबरोबर काही व्यवसायात उदाहरणार्थ, शेती, हस्तकला वगैरेमध्ये हातभार लावणंही स्त्रिया करत. काही घरात तर स्त्रिया शिलाई, विणकाम करुन स्वतंत्रपणे कमाई करत असत. विधवेचं जगणं नशिबी आलंच तर मुलगा असेल तर तो तिची जबाबदारी स्वीकारत असे. म्हणून त्या स्त्रीला देखील स्वतःला मुलगा असणं खूप गरजेचं वाटत असे. मुलगी नको असे. विधवेसाठी तिचं जगणं म्हणजे नरकासम असे. गरीब कुटुंबात ती असेल तर तीर्थस्थळी उपेक्षित आयुष्य तिला कंठण्याची वेळ येई. जरा बर्‍या आर्थिक परिस्थितीतल्या कुटुंबात विधवांना थोडं नीट वागवलं जात असे. मात्र संतती नसलेल्या विधवांची स्थिती फारच दयनीय अशी होती.  या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यापेक्षा मृत्यू हा मार्ग कदाचित बरा असंच तिला वाटत असावं. सतीची प्रमुख प्रथा क्षत्रियवर्णामध्ये सुरु झाली. ब्राह्मण स्त्रीने सती जाऊ नये अशी स्पष्ट शास्त्रवचनं आहेत. अंगिरस यानं असं म्हटलंय की ब्राह्मण जातीतल्या स्त्रीनं सतीचा मार्ग घेतला तर ती आत्महत्या ठरते आणि तिला तिचा पती स्वर्गात नेत नाही. पण हा विरोधाभास आहे कारण  बंगामध्ये तर सती जाणार्‍या सर्वाधिक ब्राहृमण स्त्रिया होत्या. १७ व्या आणि १८ व्या शतकात भारताच्या सर्व भागातून सतीचं स्मारक, असंख्य सतीशिळा, सती मंदिरं आढळतात. १९ व्या शतकात बंगालमध्ये सती जाण्याचं प्रमाण सर्वाधिक होतं. 

सतीप्रथेविरुद्ध अनेक लेख लिहून राजा राममोहन रॉय हे सातत्यानं प्रयत्न करत होते. सतीच्या चालीचा दाहक अनुभव त्यांनी त्यांची वहिनी अलकमंजिरी हिच्या दुःखद मृत्यूनं घेतला होता. १८११ पासून या निश्चयानं पावलं उचलण्यास सुरुवात झाली. १८१५ ते १८१८ या कालावधीत कलकत्ता, डाका, मुर्शिदाबाद, पाटणा आणि बनारस आणि बरेली या सहा जिल्ह्यातून एकूण २३६५ स्त्रियांच्या सती जाण्याची इंग्रज सरकारने सविस्तर नोंद केलेली आढळते. (कलकत्यात १५२८, डाका - १६५, मुर्शिदाबाद - १०४, पाटणा- १५५, बनारस - ३५३, बरेली - ६०) हुगळीचे तत्कालीन कलेक्टर एच. ओकली यांच्या अहवालानुसार हुगळी जिल्ह्यात सर्वाधिक सती जाण्याचं प्रमाण होतं. तिथले लोक कालीमातेचे उपासक असून यातल्या बहुसंख्या लोकांना सती जाणं म्हणजे धार्मिक कृत्य न वाटता एक करमणुकीचं साधन वाटत होतं. मानवतेच्या दृष्टीनं सती जायला लावणं हे कृत्य अतिशय निंद्य असल्यामुळे कोणत्याही धर्मशास्त्राप्रमाणे हा खूनच आहे असं १८१८ साली एक सतीविषयी पुस्तक राममोहन यांनी प्रकाशित केलं. त्यात सतीप्रथेचे समर्थक आणि सतीप्रथेचे विरोधक यांच्यातली चर्चा संवादरूपाने उद्धृत केली होती. धर्मभोळ्या हिंदूंचं प्रबोधन करण्याची राजा राममोहन रॉय यांची ही बुद्धिनिष्ठ पद्धत होती. गव्हर्नर लॉर्ड बेंटिक यानं ४ डिसेंबर १८२९ रोजी बंगाल रेग्युलेशन अ‍ॅक्ट हा सतीविरोधी कायदा संमत केला.

कायद्यानुसार सतीची प्रथा बंद करण्याचं खरं श्रेय लॉर्ड विल्यम बेंटिक यालाच जातं. राजा राममोहन रॉय यांनी तन मन धनानं त्यांना सहकार्य केलं. त्यांनी आपली ‘संवाद कौमुदी’ या पत्रिकेद्वारा या प्रथेवर कडाडून हल्ला चढवला. त्या वेळचे राधाकांत देव आणि महाराजा बाळकृष्ण बहादूर यांनी राजा राममोहन रॉय यांना विरोध प्रचंड प्रमाणात केला. पण राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि १८२९ साली १७ व्या कलमानुसार विधवांना जिवंतपणी जाळणं हा गुन्हा समजण्यात यावा असं घोषित करण्यात आलं आणि पहिल्यांदा हा कायदा बंगालमध्ये लागू झाला आणि त्यांनतर १८०३ मध्ये मुंबई, मद्रास आणि इतर ठिकाणी लागू झाला. 
 
हा कायदा पास होण्यापूर्वीची गोष्ट अशी: लॉर्ड बेंटिक सतीची प्रथा थांबण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असताना त्यांना राममोहन यांच्या कार्याबद्दल कळलं हेातं. त्यामुळे ते स्वतः त्यांच्या घरी आले. तेव्हा राममोहन रॉय यांनी बेंटिक यांना पतीच्या मृत्यूनंतर एका हिंदू स्त्रीची अवस्था काय असते हे दाखवून दिलं. ज्या स्त्रीसाठी तिचा सर्वेसर्वा तिचा नवरा असतो त्याच्या मृत्यूनं ती एकाकी तर होतेच होते, पण स्वतःचं जीवन तिला एक ओझं वाटू लागतं. अशा वेळी नेमके तिचे स्वार्थी नातलग आणि धार्मिक रुढींमध्ये अडकलेला समाज तिला सती जाण्याविषयी अनुकूल करतो. नातेवाइकांना तिच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या संपत्तीमध्ये रस असतो. आणि तिच्या सती जाण्यानं त्या संपत्तीचा ताबा मिळण्याचा मार्गही मोकळा होणार असतो. त्यामुळे ते तिला नवर्‍याबरोबर सती जाण्यास उद्युक्त करतात आणि तू सती गेल्यानं तुझी कीर्ती होईल आणि तू स्वर्गात जाऊन तुझ्या सात पिढ्यांनाही स्वर्गात स्थान मिळेल अशी भ्रामक समजूत तिची करून देतात. त्यांनी सती जाणार्‍या स्त्रियांना नाइलाजानं, जबरदस्तीनं सती जावं लागतं हे मांडलं आणि ज्या स्त्रिया आधीच नवर्‍याच्या मृत्यूनं होरपळून गेल्या आहेत त्यांना अशा अवस्थेत त्यांचे नातेवाईक त्यांच्या दुःखाचा फायदा घेऊन त्यांची जबरदस्तीनं सती जाण्यासाठी संमती मिळवतात. मात्र चितेवर त्या स्त्रीला आगीचे चटके सहन न झाल्याने ती चितेच्या बाहेर येण्यासाठी धडपडू लागली तर हेच दुष्ट लोक बांबूच्या काठ्यांनी टोचून तिला पुन्हा आत लोटून तिला जिवंत मारतात.

लॉर्ड बेंटिकला राममोहन रॉय यांचा विचार पटला. आता सरकार आणि राजा राममोहन रॉय यांचे मिळून सतीविरुद्धचे प्रयत्न सुरू झाले. संवाद कौमुदी, वंगदूत, समाचार चंद्रिका अशा पत्रांमधून लोकांना जागृत करण्याचे प्रयत्न राममोहन यांनी केले. इतकंच नाही तर राजा राममोहन रॉय यांनी एक व्हिजिलन्स सोसायटी स्थापली. (Vigilance Society) कलकत्याच्या आजूबाजूच्या भागात एखादी स्त्री सती जातेय हे कळताच त्या ठिकाणी जाणं आणि चौकशी करणं हे काम ही सोसायटी करत असे. 

राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड बेंटिकला सांगितलेले सगळे मुद्दे सरकारला महत्त्वाचे वाटू लागले. आणि त्यांनी १८२९च्या डिसेंबर महिन्यात सतीची ही दुष्ट प्रथा बंद करण्याच्या आवश्यकतेतून सतीची चाल बंद करण्याचा कायदा पास केला गेला. या कायद्यात सती जाण्यास त्या स्त्रीची इच्छा असो वा नसो जे कोणी सती जाण्यासाठी मदत करतील वा सती जायला लावतील त्यांना फाशीची शिक्षा देखाल ठोठावण्यात येऊ शकेल असं कठोरपणे मांडलं.

१८२९ पर्यंत राजा राममोहन रॉय यांनी हा कायदा पास व्हावा यासाठी जे प्रयत्न केले त्याला तोड नाही. पण हा कायदा पास झाल्यानंतरही त्यांना स्वस्थता मिळू शकली नाही. त्यांच्या विरोधकांनी १४ जानेवारी १८३० रोजी एक सभा भरवून सतीची चाल बंद करणं म्हणजे हिंदू धर्मात हस्तक्षेप करणं असं म्हणून राजा राममोहन रॉय यांच्या विरोधकांनी ८०० लोकांच्या स्वाक्षर्‍यांसह एक अर्ज लॉर्ड बेंटिक यांच्याकडे पाठवला होता त्यात असं म्हटलं होतं की, ‘राममोहन रॉयसारख्या माणसांना धर्माची मुळीच चाड नाही. युरोपियनांसोबत खायला प्यायलाही त्यांना काहीही लाज वाटत नाही. अशा लोकांवर विश्वास ठेवला जाऊ नये. धर्मशााावर बोलण्याचा अधिकार फक्त आमच्या पंडितांनाच आहे तेव्हा त्यांचाच सल्ला घ्यावा. ज्यांना आपल्या पूर्वजांविषयी अभिमान वाटत नाही अशा माणसांची मतं विचारात मुळी घेऊ नयेत.’ त्यानंतर अनेक पंडितांच्या स्वाक्षर्‍या असलेल्या पुरवण्याही त्या अर्जासोबत जोडल्या गेल्या. ३४६ लोकांच्या आणि २८ पंडितांच्या स्वाक्षर्‍यांसहित दुसरा अर्ज सरकारला (गव्हर्नर जनरल) पाठवला. राममोहन रॉय यांनी देखील १६ जानेवारी १८३० ला ३०० लोकांच्या स्वाक्षर्‍यांचा आणि ८०० ख्रिश्चन लोकांकडून सतीप्रथेविरुद्ध पाऊल उचलणार्‍या सरकारचं या कायद्याचं अभिनंदन करणारं एक मानपत्र पाठवलं. 

राममोहनच्या सतीविरुद्धच्या कार्यामुळे त्या वेळी सर्व बंगाल चवताळून उठला होता. मात्र राममोहन रॉय डगमगले नाहीत. त्यांनी मनु, याज्ञवल्क, विष्णुस्मृती, भगवद्गीता यात सतीविषयी काय म्हटलंय हे लोकांसमोर आणलं. राममोहन रॉय यांनी शााात असलेल्या अनेक संस्कृत वचनांचा आधार घेत शास्त्रात हिंदू स्त्रीला सती जाण्याची सक्ती नाही हे दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.  बृहस्पती, मनु, विष्णु, याज्ञवल्क्य आणि कात्यायनाचा आधार घेत राममोहन रॉय यांनी स्त्रीला संपत्तीत कसा अधिकार होता हेही दाखवून दिलं. पण श्रीमंत जमीनदार आणि धर्ममार्तंडांनी  त्या वेळी ११२६० रूपये जमा केले आणि धर्मसभा नावाची सभा स्थापन करून हा कायदा रद्द करण्यासाठी इंग्लडच्या राजाला पत्र पाठवलं. पार्लंमेंटमध्ये हा कायदा बदलला जाऊ नये म्हणून राममोहन रॉय स्वतः इंग्लंडला गेले आणि ही निर्दयी आणि व्रूर मनुष्यजातीला काळिमा फासणारी चाल कायद्याने बंद करण्यात आली.

राजा राममोहन रॉय हे दिसायला देखणे आणि सहा फूट उंच, पीळदार शरीर असलेले होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक होतं. त्यांचं वैशिष्ट्यं म्हणजे लिहिताना आणि बोलताना ते भाषेचा अत्यंत मोजका वापर करत. ते अतिशय नेमकेपणानं आपली गोष्ट मांडत. कोणीही दुखावलं जाणार नाही याची ते काळजी घेत. ब्राह्मो समाजाची स्थापना केल्यामुळे त्यांना समविचारी अनेक अनुयायी मिळाले आणि त्या विचारांचा प्रसार करण्यास बळकटीही आली. 

१८३१ मध्ये राजा राममोहन रॉय जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा मोघल सम्राटानं त्यांना ‘राजा’ ही पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला. त्यांनी त्यासाठी स्वखर्चाने केलेली हिंदू कॉलेजची स्थापना म्हणजे ही संस्था त्या काळी सगळ्यात आधुनिक अशी संस्था समजली जात असे. त्यांनी १८२५ साली वेदान्त कॉलेजची स्थापना केली. रविंद्रनाथ टागोरांच्या मते तर राजा राममोहन रॉय यांनी भारतात एका नव्या आधुनिक युगाची सुरूवात केली. स्त्री शिक्षण, विधवा विवाह यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभी केली. लोकांची विचार करण्याची मानसिकता बदलल्याशिवाय बदल घडणार नाहीत याची त्यांना खात्री होती. स्त्रियांना संपत्तीमध्ये हिस्सा असायला हवा, त्यांना शिक्षण घेता आलंच पाहिजे यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. भारतीय भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र कोणी काढलं असेल तर तेही राजा राममोहन रॉय यांनी! लोकांमध्ये परिवर्तन आणायचं असेल तर वर्तमानपत्रासारखं दुसरं साधन नाही हे त्यांनी ओळखलं होतं. एकाच वेळी हजारो लोकांना या माध्यमाद्वारे समजवता येईल याची त्यांना खात्री होती. एक बंगाली साप्ताहिक, ‘मिरत-उल-अखबार’ हे वर्तमानपत्र आणि ‘संवाद कौमुदी’ नावाचं बंगाली साप्ताहिक ते चालवत. या सगळ्यांतून धार्मिक आणि सामाजिक सुधारणांविषयी चर्चा आणि लेख असत. त्या काळी कुठलीही गोष्ट प्रसिद्ध करायची झाल्यास सरकारची परवानगी घ्यावी लागे. सरकारने राजा राममोहन रॉय यांना परवानगी नाकारली. तेव्हा त्यांनी सरकारला आवडत नाही म्हणून सत्य नाकारलं जाऊ शकत नाही अशी कडाडून टिका केली आणि आपल्या अधिकाराची मागणी केली. १५० वर्षांपूर्वी एवढं धाडसानं बोलणारा हा माणूस होता. त्यांच्या धडपडीला यश मिळालं आणि त्यांना मुद्रणाची परवानगी मिळाली.

‘‘जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर आपल्याला चांगलं पीक हवं आहे, त्यासाठी चांगली खतं, यंत्र यांची आवश्यकता आहे. आणि याचा उपयोग कसा करायचा हे माहीत होण्यासाठी शिक्षण चांगलं असलं पाहिजे. आपल्याला मोठी धरणं बांधणं आणि कालवे खोदणं करावं लागेल. पूल, दवाखाने, रस्ते, कारखाने असलेच पाहिजेत अशी त्यांची धारणा होती. जमीनदारांची मनमानी आणि शेतकर्‍यांचं दुःख त्यांनी जाणून त्यावर अनेक लेख लिहिले आणि त्याच वेळी ‘कसेल त्याची जमीन’ हे त्यांनी प्रखरपणे मांडलं. जमिनीवरचा पहिला हक्क शेतकर्‍याचा, मग जमीनदाराचा आणि नंतर सरकारचा असं त्यांनी ठामपणे सांगितलं. खरं तर ते स्वतः एक जमीनदार होते, पण तरीही इतरांवरच्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्यास ते कधीच कचरले नाहीत. 

शिक्षणाचं महत्त्व तर त्यांना राजा राममोहन रॉय यांना होतं, पण कला आणि विज्ञानात पारंगत असणारी माणसं किती आवश्यक आहेत हे ते जाणून होते. विदेशांमध्ये ज्ञानाचा विस्तार कोणत्या तर्‍हेनं होतो हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे असंही त्यांना वाटे. आजच्या युगात जर एखाद्या देशाला आपली प्रगती करायची असली तर फक्त इतिहासात घुटमळणं आणि प्राचीन संस्कृतीच्या पोकळ अभिमानाच्या गप्पा मारून काहीही होणार नाही तर आजच्या युगाला शोभेल अशी शक्ती आणि ज्ञानाचा विस्तार करणं आवश्यक आहे असं ते म्हणत. 

शिक्षणाशिवाय मनाला प्रसन्नता नाही, शिक्षणामुळेच मन फक्त प्रगल्भ होतं. विचारशक्ती शिक्षणामुळेच पल्लवित होते. नव्या जाणिवा तयार होतात आणि त्यातूनच सुधारणा खोलवर रुजल्या जातात असं राजा राममोहन रॉय यांचं मत होतं. मुलाचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झालं पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. एखाद्या विषयाच्या आकलनासाठी मातृभाषेसारखी दुसरी भाषा नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आयुष्यभर त्यांनी विश्वबंधुत्वाची भावना जपली. 

राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू इंग्लंडमध्ये ब्रिस्टल येथे (स्टेपल ग्रोव्ह) २७ ऑक्टोबर १८३३ साली पहाटे २ वाजून २५ मिनिटांनी मेनिनजायटिस मुळे झाला. ब्रिस्टलच्या स्मशानभूमीत त्यांच्या अस्थी दफन केल्या आणि त्यांच्या समाधीवर भारतीय पद्धतीप्रमाणं एक स्मारक उभारलं. राजा राममोहन रॉय हे भारताला आधुनिक बनवणारे आणि त्या दिशेनं नेणारे अनोखे भारतीय होते यात शंकाच नाही!

दीपा देशमुख
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.